आशा भोसले-
मी खूप लहान असताना आमच्याकडे ‘आशा इन लंडन’ नावाची कॅसेट होती. बाबा कधीतरी ती लावत. त्यामुळे त्यातली गाणी सगळी पाठ होती. बाकी त्या वयात कॅसेटच्या नावाचाही अर्थ माहीत नव्हता तर गाण्यांचा कळण्याचा प्रश्नच नाही. पुढे थोडी अक्कल आल्यावर फक्त आणि फक्त लता कानावर येत गेली. लताचं प्रत्येक गाणं प्रत्येक वेळी परत ऐकताना काहीतरी नवीन देऊन जातं. लताच्या अगदी पन्नासच्या दशकातील गाण्यांपासून अगदी दिल दीवाना बिन सजना के माने ना ते तुझे देखा तो ये जाना सनम पर्यंत गाणी ऐकत आयुष्य सरलं होतं! लता म्हणजेच गाणं अशी स्थिती होती आम्ही लहान असताना!
पण तेव्हाही लता व्यतिरिक्त आणखी एक आवाज मनाला भावला होता. गाण्यातलं तेव्हा शून्य कळत होतं आणि आजही त्यात बदल झालेला नाही. तसं तर कोणत्याही कलेतलं तांत्रिक काहीच अंग नाही. फक्त जी कलाकृती हृदयाला हात घालेल ती चांगली, असं सोपं गणित आहे माझं माझ्यापुरतं. त्यामुळे पटकन काही आवडत नाही, झटकन कशाची स्तुती होत नाही. पण जेव्हा आवडतं तेव्हा केलेली स्तुती मनापासून असते. त्यात सच्चाई असते. वरवरपणा नसतो. असो. तर लताच्या आवाजाबरोबर आणखी एक आवाज मनात खोलवर जाई आणि तो त्या ‘आशा इन लंडन’ मधल्या आशा भोसले नामक गायिकेचा होता. मग पुढे आशा म्हणजे लताची बहीण. हृदयनाथ त्यांचा भाऊ. मंगेशकर कुटुंबीय वगैरे माहिती मिळत गेली. तिथून मग माझ्या आयुष्याच्या लता नावाच्या ट्रॅकला समांतर असा आशा नावाचा ट्रॅक जोडला गेला तो कायमचा. सरस्वतीच्या शेजारी अंबाबाईचा फोटो ठेवला गेला तो कायमचा! जसजशी अक्कल येत गेली तसतशी आशा भोसले हा फक्त आवाज न राहता ती एक व्यक्तिमत्त्व म्हणून आवडून गेली. तिच्या आयुष्याचा प्रवास, तिने दाखवलेली जिद्द ह्यामुळे तिच्याबद्दल आदर प्रचंड वाटला आणि वाढला.
माझं हिंदी सिनेमा संगीत लतापासून सुरू झाल्यामुळे आशाबद्दलच्या लेखातही लताचा उल्लेख येतोच. कारण हिंदी, मराठी किंवा एकूणच स्त्री पार्श्वगायन, भावगीत गायन, सुगम संगीत हे प्रकार माझ्यासाठी लतापासून सुरू झाले आणि आशावर येऊन संपले. सेम हाच प्रकार पुरुषांच्या बाबतीत रफीपासून सुरू होऊन किशोरवर संपला आहे! ह्या चौघांच्या व्यतिरिक्त अनेक उत्कृष्ट पार्श्वगायक, गायिका होते आणि आहेत. पण ह्या चौघांनीच इतकं करून ठेवलं आहे की ते ऐकण्यात, समजून घेण्यात, प्रत्येक वेळी परत ऐकल्यावर ते आणखी गवसण्यात सगळा जन्म संपेल!
आशाच्या मला आवडणाऱ्या गाण्यांची लिस्ट करून प्रत्येक गाण्याबद्दल लिहू लागलो तर आयुष्यभर लिहूनही संपणार नाही अशी लेखमाला लिहू शकेन! बाकी तिच्या हजारो गाण्यांची लिस्ट गुगल केल्यावर उपलब्ध होईल. म्हणून त्यावर लिहिणे टाळतो! मला आशा म्हटल्यावर काय दिसतं ते सांगतो. मला ना लता म्हणजे करड्या शिस्तीच्या, गंभीर अशा शाळेच्या मुख्याध्यापिका वाटतात आणि आशा म्हणजे पदर खोचून मुलांबरोबर कबड्डी खेळणाऱ्या पीटीच्या मस्तीखोर बाई वाटते. लता अत्यंत शिस्तप्रिय आई वाटते आणि आशा म्हणजे हळूच केक-बिक भरवणारी प्रेमळ मावशी वाटते.
आशाची शेकडो भाषांत हजारो अजरामर गाणी आहेत. पण डोळे बंद करून आशा भोसले असं म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर काय येतं ते सांगतो. एक अत्यंत हसरा, प्रेमळ, लाघवी चेहरा. एक दिलखुलास हास्य. प्रेमाने लाड करणारी एक मावशी, उत्तमोत्तम साड्या आणि दागिने ल्यालेली एक अत्यंत ग्रेसफुल मराठी स्त्री. एक जबरदस्त धारदार आवाज. ओपी नय्यरची गाणी. आरडीची अवघड गाणी. हृदयनाथ मंगेशकरांची वेड लावणारी गाणी. हिंदी सिनेमातील प्रत्येक नायिकेच्या आयुष्यातील काही अजरामर गाणी. नायिकांव्यतिरिक्त सिनेमातील सहनायिका, व्हॅम्प, कॅब्रे डान्सर ह्यांच्या आयुष्यातील अजरामर गाणी. स्टेज परफॉर्मन्समध्ये आवाजाबरोबर गाणी परफॉर्म करून प्रेक्षकांना खिशात टाकण्याची दैवी देणगी असलेली आशा!
तुलना चूक आहे. कारण लता आणि आशा ह्या दोघी म्हणजे देवाने घडवलेली दोन अप्रतिम लिमिटेड एडिशन रत्न आहेत. एक एक पीस बनवून देवाने साचा मोडून टाकल्याने दुसरी लता किंवा आशा बनणे नाही. पण तरीही शांत लता आणि फ्लॅमबॉयंट आशा मला सचिन आणि लाराची आठवण करून देतात. दोघेही प्रचंड लाडके पण एकमेकांपेक्षा भिन्न. दोघांची वेगवेगळी बलस्थाने.
आशाचा आवाज! आहा! त्याबद्दल मी पामराने काय लिहावं? मला शब्दात सांगणं अशक्य असल्याने एक उदाहरण देतो. आपण फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये जातो. अतिशय सोफिस्टिकेटेड वातावरण. क्युरेटेड मेन्यू. आपण ऑर्डर करतो. उत्कृष्ट दर्जाचं अन्न वाढलं जातं. ते बनवताना सगळे जिन्नस उच्च दर्जाचे वापरलेले. बनलेला पदार्थ, त्याची सजावट, चव आणि सगळंच उत्कृष्ट. जेवल्यावर प्रचंड समाधान वाटतं. आणि आपण आनंदाने बाहेर पडतो. ते समाधान, तो दर्जा इतर कुठेच मिळत नाही.
दुसरा प्रकार म्हणजे आपण एखाद्या झकास ढाब्यावर जेवायला जातो. वातावरण अगदी मोकळं-ढाकळं. आपण ऑर्डर देतो. तिथेही जेवणात वापरले जाणारे जिन्नस अगदी उत्तम दर्जाचे असतात. पदार्थ देखील अत्यंत चवदार असतात. एक घास तोंडात टाकल्यावर आपण जेवणाच्या प्रेमात पडतो. तेवढ्यात ढाब्याचा मालक स्वतः येऊन आस्थेने चौकशी करतो. जेवण आवडलं का विचारतो. स्वतःच्या वतीने एखादं स्वीट “फक्त चव घ्या” म्हणून ऑफर करतो. तिथे परफॉर्म करत असलेल्या ढोलवाल्यांना बोलावून आपल्या जवळ दोन मिनिटं ढोल वाजवायला सांगून आपल्याला खुश करतो. आपण जेऊन, तृप्तीची ढेकर देऊन, हात स्वच्छ धुवून तिथून खुश होऊन निघतो. घरी आल्यावरही आपल्या बोटांना त्या ढाब्यातील जेवणाचा वास अजूनही येत असतो. आपल्या हातावर, जिभेवर आणि मनावर तो ढाबा, ते वातावरण, तो मालक आणि ती चव बराच काळ रेंगाळतात. आपण नकळत त्यांच्या प्रेमात पडलेले असतो आयुष्यभरासाठी!
लताचं गाणं हा माझ्यासाठी फाईन डायनिंग अनुभव आहे तर आशाचं गाणं म्हणजे पुढेही बराच वेळ रेंगाळणारं धाब्यावर जेवलेलं जेवण आहे!
पण एक गंमत सांगतो. एक लहान मुलांचा डॉक्टर आहे. त्याच्या रील्स खूप प्रसिद्ध आहेत. तो मुलांशी खेळतो, मस्ती करतो आणि मग हळूच इंजेक्शन देतो आणि पटकन बोळा फिरवून परत खेळू लागतो. बाळांना कळतही नाही की त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे. आशाचा आवाज माझ्या मते त्या डॉक्टरसारखा आहे. तिचं गाणं आमच्यासारख्या भक्तांना कधी गुदगुल्या करत, कधी हळूच पाठीवर हात फिरवत आणि ते करताना कधी ते गाणं हृदयात शिरून तिथे आपली मोहोर उमटवून संपतं ते कळतही नाही. गाणं बाहेर संपतं. पण आमच्या मनात ते कायमस्वरूपी वाजू लागतं. त्या धारदार आवाजाच्या सुरीने आमच्या हृदयावर योग्य शस्त्रक्रिया केलेली असते. आशाचे गाणे नावाचा, प्रचंड आनंद देणारा एक पेसमेकर आमच्या हृदयात असाच कधीतरी बसला आणि कायमचा तिथेच चिकटला. त्यातून निर्माण होणाऱ्या “आशाचे गाणे” नामक लहरी आमचे हृदय जिवंत ठेवत होत्या, आमच्या अस्तित्वाला सुखाचा रक्तपुरवठा करत होत्या. आमची सबंध हयात त्याने व्यापून टाकली होती!
पण १२ एप्रिल २०२६ रोजी काळाने आमचा तो पेसमेकर काढून घेतला, आमचा आवडता ढाबा काल नियतीने बंद केला. आशा नावाची रसिकांची प्रेमळ, अल्लड तरीही अत्यंत प्रगल्भ अशी मावशी काळाने ओढून त्याच्या गर्तेत नेली! आमचं बालपण, आमचं तारुण्य आणि आता आमच्या चाळीशीच्या पलीकडच्या काळाला जोडणारा, समृद्ध करणारा शेवटचा दुवा कायमचा तुटला! आशा गेली!
मला हल्ली नेहमी असं वाटतं की मी गच्चीवर अंथरूण टाकून आकाशाकडे बघतोय. रात्रीची वेळ आहे. मी अगदी लहान आहे आणि माझ्या आकाशात विविध क्षेत्रात दैदिप्यमान काम करणाऱ्या तारे-तारकांनी गर्दी केली आहे. कला, क्रीडा, राजकारण, व्यवसाय, संशोधन, शौर्य, समाजसेवा आणि विविध क्षेत्रातील दिग्गज तारे-तारकांनी माझं आकाश फुललेलं आहे. मला त्यांच्या प्रकाशात न्हाऊ घालत आहे, समृद्ध करत आहे! मग हळूहळू मी मोठा होऊ लागतो. वय वाढू लागतं आणि माझ्या आभाळातून एक एक तारा निसटू लागतो. माझ्या नजरेसमोर उल्कापात होत राहतात आणि माझी श्रद्धास्थाने, ते तेजस्वी लोक, ते तारे लोप पावत जातात. ह्या वर्षी आशा नावाची एक सुंदर चांदणी अस्ताला गेली! मागे उरला आहे तो प्रचंड अंधार, हाताच्या बोटावर मोजता येतील असे काही मोजके तारे आणि अनंत आठवणींची आकाशगंगा!
आपल्या गाण्यातून असंख्य लोकांच्या मनाला फक्त आणि फक्त आनंद, शांती आणि समाधान देणाऱ्या आशाचा आज वाढदिवस. तिच्या करोडो fans तर्फे आशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
©मंदार जोग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

अतिशय सुरेख व सुंदर लेख… आशाताईंचं कर्तृत्व व संगीत क्षेत्रातील कार्य एवढं मोठं आहे की ते यशाच्या फुटपट्टीत मोजता येईल. त्यांच्याएवढी
आवाजातील विविधता क्वचितच एखाद्या गायिकेमध्ये पहावयास मिळेल . …….
आशाताईंबाबत छान विविध पैलू उलगडून दाखवले आहेत.फाईन डायनिंग उपमा सुंदर लेख आवडला
खूप छान वाटले अत्यंत सुंदर शब्दांत आपण दोघींचं वर्णन केले आहे खुप आवडलं