छोटीसी बात
हल्ली मला सत्तर ऐंशीच्या दशकातील सिनेमे ओटीटीवर बघायचा नाद लागला आहे. ते पण शक्यतो बटबटीतपणा नसलेले, हिंसा, अश्लीलता, विनाकारण रडारड, आरडाओरडा, बलात्कार वगैरे नसलेले सिनेमे बघतो मी हल्ली. कदाचित दोन्ही धुरंदर पाहिल्यावर अजूनही उताऱ्याची गरज संपलेली नसल्याने तसे सिनेमे मला सध्या पाहावेसे वाटत असतील. तर त्याच उताऱ्याचा भाग म्हणून मी काल बासू चॅटर्जींचा छोटीसी बात दहाव्यांदा पाहिला.
आहा. काय सुंदर सिनेमा आहे. बी. आर. चोप्रा निर्माते, बासू दा दिग्दर्शक. कलाकार अमोल पालेकर, विद्या सिन्हा, असरानी आणि अशोक कुमार ही प्रमुख स्टारकास्ट. साधी सोपी कथा आणि सलील चौधरी ह्यांची आज ५० वर्षांनी देखील सुमधुर वाटणारी गाणी! विकेंड सार्थकी लावायची हमी. बाहेर गर्दीत फिरायला जायला नको, भंगार सिनेमे थिएटरमध्ये पाहायला नको. घरी बसा आणि टीव्हीवर बघा. मी अशा सिनेमांना ब्राह्मणी भोजन म्हणतो. तृप्त करणारं, सहज पचणारं, तब्येतीला पोषक, खिशाला परवडणारं, सात्त्विक चवीचं जेवण. काल छोटीसी बातच्या निमित्ताने तो योग जुळून आला आणि आजही त्याची चव मनावर रेंगाळते आहे!
मुंबईत राहणारा एक तरुण अमोल पालेकर. रोज ऑफिसला बेस्ट बसमधून प्रवास करताना सहप्रवासी असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो. त्याचा प्रॉब्लेम आहे आत्मविश्वासाचा अभाव. तो मनातलं तिला सांगू शकत नाही. मग त्यांच्या मध्ये असरानी क्यूट व्हिलन बनून येतो. मग अमोल पालेकरला लव्ह गुरू अशोक कुमार धडे देतात. आणि शेवटी हिरो हिरोईन आनंदात राहतात अशी लिनियर, सोपी कथा. पण बासू दा ती कथा फार तरलतेने उलगडत नेतात. लहान लहान प्रसंग प्रेक्षकांना पात्रांच्या भावविश्वात गुंतवत जातात. प्रेडिक्टेबल असलेल्या गोष्टीदेखील प्रत्यक्ष पाहिल्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येतं.
अमोल पालेकर ह्यांनी बासू दा आणि ऋषिकेश मुखर्जी ह्यांच्या बरोबर केलेल्या सिनेमात जो शहरी चम्या सादर केला होता तो इथेही छान वठवला आहे. इथे तर तो चम्या फक्त चम्या आहे. गोलमाल, बातों बातों में, रंग बिरंगी वगैरेमध्ये त्याला इतरही काही छटा होत्या. इथे त्या देखील नाहीत. त्यामुळे अमोल पालेकरच्या पात्राबद्दल सहानुभूती वाटते. आपल्या ओळखीतील तसे बिचारे अरुण सिनेमा बघताना आपल्याला आठवतात.
आम्ही लहान असताना आमच्या चाळीतील एक काका विद्या सिन्हाला सुतळी बॉम्ब म्हणायचे. ते का, ते पुढे आम्ही मोठे झाल्यावर तिचे सिनेमे पाहिल्यावर पटकन लक्षात येत आणि ते नाव किती apt होतं हे जाणवतं. आम्ही तिला टीव्हीवर मालिकांमध्ये आजीच्या भूमिकेतच जास्त पाहिलं. पण तिच्या तरुणपणी सिनेमात ती साडीत गुंडाळलेला घट्ट डायनामाईट वाटते. काहीही रिव्हिल न करता प्रचंड आकर्षक दिसते. तिचे डोळे, ओठ, त्यांच्या हालचाली फार सुंदर आणि आकर्षक होत्या. तिने कामही सुंदर केलं आहे. मला तिचा रजनीगंधा सिनेमाही आवडला होता. तिचे इंकार, पती पत्नी और वोह, सबूत वगैरे तुरळक सिनेमे मी पाहिले आहेत. आणखीही काही असतील पण नावदेखील आठवत नाही. ते सोडा. ह्या सिनेमात ती कमाल आकर्षक दिसली आहे आणि प्रभाची भूमिकाही सुंदर साकारली आहे.
असरानी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनय शिकलेला गुणी नट होता. हिरोचे व्यक्तिमत्त्व नसल्याने विनोदाकडे वळला आणि आयुष्यभर विनोदी भूमिकाच करत राहिला. ह्या सिनेमातही त्याने रंगवलेला खलनायक नागेश जाम क्यूट आहे. इतका की त्याचा राग न येता दया येते. तो खरं तर खलनायक नसून बिचारा जास्त आहे. ह्या सिनेमात त्याचं ते जहांगीर आर्ट गॅलरीच्या कॅफेटेरियामध्ये चिकन आलाफूस ऑर्डर करणं निव्वळ अशक्य आहे.
बाकी दादामुनी तर अभिनयाचे दादा होते. आमच्या आजोबांच्या वयाचे. कोणतीही भूमिका द्या. ते चोपायचे. ह्या सिनेमातही त्यांनी रंगवलेला लव्ह गुरू कर्नल ज्युलियस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग अफलातून आहे.
सिनेमात जानेमन जानेमन तेरे दो नयन, न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ, ये दिन क्या आये ही अप्रतिम गाणी आहेत. सिनेमाचा एकूण मूड खूप फ्रेश आणि सकारात्मक आहे. आणि मला सर्वात आवडलेला भाग म्हणजे ह्या सिनेमात सत्तरीच्या दशकातील आमच्या स्वच्छ, कळकट परप्रांतीय गर्दी, प्रदूषण आणि ट्रॅफिकविरहित सुंदर मुंबईचं दर्शन होतं. नरिमन पॉईंट, फोर्ट, बेस्ट बस, शिवाजी पार्कच्या गल्ल्या बघायला मिळतात. आमचे आईवडील ऑफिसला जाताना दिसत तसे लोक पडद्यावर अनेक वर्षांनी पाहायला मिळतात. त्या सगळ्याला एक नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू आहे जी फक्त एकेकाळची सुंदर मुंबई पाहिलेल्या, अनुभवलेल्या, जन्माने मुंबईकर असलेल्या लोकांनाच कळेल!
शक्य आहे त्यांनी हा सिनेमा अवश्य बघा. पाहिला असेल आणि आयुष्यात असलेला स्ट्रेस, थकवा घालवायचा असेल तर परत बघा. आयुष्य तिखट, लाल जाळ पदार्थांनी व्यापलेलं असताना ह्या सात्त्विक ब्राह्मणी भोजनाचा आस्वाद अवश्य घ्या. तृप्त वाटेल.
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

मस्तच.. कितीही वेळा बघितला तरी कंटाळा येत नाही.. असे साधे सहजसुंदर चित्रपट हल्ली आवडू लागले आहेत..
kharay kitihi vela pahila tari punha punha baghavasa vatto … brahmnibhojan ani chamya ya upma avadlya…. dhanyawaad