मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

मृगजळ भाग २१

सौरभला घरी जायची अजिबात इच्छा होत नव्हती. आई कटकट करणार हे त्याला माहित होतं. पण उद्याची bag भरायला घरी तर जावंच लागणार होतं.

त्याने विमानाची तिकीट काढायची जबाबदारी मानसीवर टाकली होती. सबब, “श्रीरंग पण येणार आहे ना आपल्या बरोबर? मग तू त्याच्या बरोबर ठरव आणि तिकीट काढ.” त्याला उगाच तिघांच्या तिकिटाचा खर्च करायचा नव्हता. सौरभ घरी आला. आई अंकिताला काही सांगणार नाही ह्याची त्याला खात्री होती. त्यामुळे घरी अंकिता असेल तर त्याच्या पथ्थ्यावर पडणार होतं. तिच्यासमोर आई विषय काढू शकली नसती आणि सकाळी त्याला गोव्याला पळून जाता आलं असतं. त्यामुळे आज कधी नव्हे तो सौरभ अंकिताला घरी पाहायला आतुर झाला होता. पण नशीब त्याच्या बाजूने नव्हतं. अंकिता तिच्या kitty पार्टीला गेली होती. हर्षद तर उशिरा घरी यायचा. घरी आई एकटीच होती. तिनेच दार उघडलं. सौरभ नजर चोरून आपल्या रूममध्ये जात असताना आईने हाक मारून त्याला थांबवलं.

आई- सौरभ…

सौरभ- काय ग?

आई- तू त्या मानसीशी लग्न केलं आहेस की काय?

सौरभ- काहीही काय बोलतेस तू आई?

आई- काहीही नाही. तू तिला गोव्याला नेतोस, तिची ओळख बायको म्हणून करून दिली आहेस. हे नक्की काय आहे? तिला मी पाहिली ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की ही बया पांढऱ्या पायाची आहे म्हणून. आणि लावलाच तिने तुला स्वतःच्या नादी. ते काही नाही. अंकिता आली की मी तिला हे सगळं सांगणार आहे.

सौरभ- आई, तू वेडी आहेस का जरा? मानसी आणि माझं अफेयर आहे ह्या संशयावरूनच माझं आणि अंकिताचं भांडण झालं दहा वर्षांपूर्वी. तेव्हा आमचं काहीही नव्हतं.

आई- म्हणजे आता आहे. काय आहे? तुम्ही लग्न केलंय का कुठे देवळात वगैरे जाऊन?

सौरभ- मला वेड लागलंय का एक लग्न असताना दुसरं करायला? आम्ही फक्त चांगले मित्र आहोत.

आई- बाळा, मी आई आहे तुझी. तुला नऊ महिने पोटात वाढवून जन्म दिलाय मी. त्यामुळे तू मला मूर्ख समजू नको. तुझ्या डोक्यात एखादी गोष्ट यायच्या आधी मला ती कळते.

सौरभ- कळते ना? मग झालं. माझं लग्न वगैरे काहीही झालेलं नाहीये मानसीशी. पण आम्ही रिलेशनमध्ये आहोत. अंकिताच्या कटकटीला कंटाळलो मी आणि आमचं जमलं. मानसी खरंच खूप चांगली मुलगी आहे आई.

आई- मुलगी नाही, बाई…

सौरभ- हा, तेच ते…

आई- आणि लग्न न करता हे असं नातं, तुझ्याबरोबर गोव्याला वगैरे येणं, तुझी बायको म्हणून तिथे लोकांसमोर जाणं तिला मान्य आहे? ती लग्नासाठी मागे लागत नाही?

सौरभ शांत झाला.

आई- काय विचारलं मी? तिला हे असं नातं मान्य आहे? तिला लग्नाची अपेक्षा नाही?

सौरभ- तिला लग्न करायचं आहे आई. आणि म्हणते पण लग्न करूया म्हणून…

आई- तू तिला काही वचन वगैरे तर दिलेलं नाहीस ना?

सौरभ- वचन असं नाही…पण आपण लग्न करू असं मी तिला सांगितलेलं आहे..त्यामुळे..

आई- लाज नाही वाटत तुला सौरभ? एक बायको घरात असताना दुसऱ्या बाईला लग्नाचं आमिष दाखवून फसवतो आहेस तू.

सौरभ- ए आई प्लीज हा. आमिष काय? आमचं प्रेम आहे एकमेकांवर.

आई- तिचं नक्की आहे. नाहीतर ती मूर्खासारखी तुझ्याबरोबर इतकी वर्ष राहिलीच नसती. पण तुझ्यासाठी ती फक्त पर्याय आहे. तुझ्या कजाग बायको आणि विस्कटलेल्या वैवाहिक जीवनासाठी तू शोधलेला एक पर्याय. पण एक लक्षात ठेव सौरभ. त्या मानसीबरोबर तुला जे नातं ठेवायचं असेल ते ठेव. कारण मी कितीही सांगितलं तरी तू ऐकणार नाहीस हे मला माहित्येय. पण ते सगळे धंदे घराबाहेर. तू चुकूनही अंकिताला घटस्फोट देण्याचा किंवा त्या मानसीशी लग्न करण्याचा विचार जरी केलास ना, तर मी त्याच दिवशी अंगावर रॉकेल ओतून काडी लावून जीव देईन. हे लक्षात ठेव.

इतकं बोलून आई रागात आत निघून गेली. सौरभ सुन्न झाला होता. थोडक्यात आई जिवंत आहे तोवर त्याला मानसीशी लग्न करता येणार नव्हतं. तो तसाच सोफ्यावर डोळे मिटून बसला आणि अचानक त्याला खूप हलकं वाटू लागलं. काहीतरी ओझं कमी झाल्यासारखं. इतके दिवस मानसीशी लग्न न केल्याचं ओझं, थोडाफार गिल्ट सौरभच्या मनावर होतं. आता आईने warning दिल्यावर त्याच्या मनाने ते सर्व ओझं, गिल्ट आईच्या गळ्यात टाकलं आणि मन त्याला म्हणालं, “तू जरी तयार झालास तरी आई हे लग्न होऊ देणार नाहीये. म्हणजे तू आई असेपर्यंत लग्न करू शकणार नाहीस. त्याला आई कारण आहे. तू नाही.” मनातल्या मनात त्याने आई शंभर वर्षं जगेल जा असा प्रश्न स्वतःलाच विचारला आणि त्या विचाराने का कुणास ठाऊक तो खूप खुश झाला. शिट्टी वाजवत तो आत bag भरायला गेला.

मानसी आणि श्रीरंग तिच्या गाडीतून तिच्या बिल्डिंगपर्यंत आले. मानसीने गाडी पार्क केली. दोघे उतरले.

मानसी- So…

श्रीरंग- So?

मानसी- कितीची फ्लाईट बुक करू?

श्रीरंग- तू सांग, मी करतो.

मानसी- ए नाही हा. आपण दोघे असतो तर ठीक आहे. तू सौरभचं तिकीट नाही काढायचं. मी काढते तिन्ही तिकीट. सकाळी सातची एअर इंडिया आहे. आम्ही नेहमी त्याने जातो. म्हणजे सगळा दिवस मिळतो गोव्यात.

श्रीरंग- ठीक आहे. तुमचा रुटीन बदलू नका माझ्यासाठी. Go ahead. तिकीट मला पाठवून दे. सहा वाजता एअरपोर्टवर भेटू.

मानसी- आणि रिटर्न चार दिवसांनंतरच करते. इव्हिनिंग फ्लाईट. म्हणजे तो पण दिवस मिळेल आपल्याला.

श्रीरंग- As you wish.

मानसी- ओके..बाय..तू जाशील की गाडी नेतोस माझी?

श्रीरंग- No. I will manage.

श्रीरंग तिचा निरोप घेऊन निघाला. मानसी घरी आली. चेंज करून तिकीट काढायला app उघडलं. तिकीट बऱ्यापैकी महाग होती. आता उद्याची तिकीट आज काढल्यावर महाग असणारच. पण तिने रिटर्न जर्नी टाकून तिकीट काढली. सौरभ आणि श्रीरंग दोघांनाही तिकीट पाठवली आणि तिने bag भरायला घेतली. सौरभला तिकीट मिळाल्यावर त्याने thank you. उद्या भेटू असा मेसेज केला. श्रीरंगचा काहीच मेसेज आला नाही. मानसीची bag भरून झाली. तिनेच मग श्रीरंगला मेसेज केला. झोपलास का असं विचारलं. श्रीरंगचा फोन आला.

मानसी- हाय..

श्रीरंग- हाय..

मानसी- मला वाटलं झोपलास की काय. कारण काहीच रिप्लाय नाही तिकीट पाठवल्यावर.

श्रीरंग- मी पण bag भरत होतो.

मानसी- हम्म..ए तू बोअर नाही ना होणार गोव्याला? म्हणजे सौरभ आणि मी and..

श्रीरंग- Oh not at all. संदीप म्हणाला आहे ना की मला तिथे कोणीतरी भेटेल म्हणून. So मी त्या कोणीतरीला शोधेन. तुम्ही तुमचा हनिमून करा मस्त.

मानसी- तू इतका चांगला का आहेस रंगा?

श्रीरंग- कारण मी लकी नाहीये. चांगले लोक बरेचदा लकी नसतात आणि लकी लोक अनेकदा चांगले नसतात.

मानसी- असं का बोलतोस?

श्रीरंग- जर मी लकी असतो तर मी किती चांगला आहे हे तुला कॉलेजमध्येच कळलं असतं आणि आज आपण एकत्र असतो.

मानसी- हम्म..असू दे. पुढल्या जन्मी आपण एकत्र येऊ.

श्रीरंग- का? हा जन्म अजून खूप बाकी आहे. त्यातही एकत्र येऊ शकतो आपण.

मानसी- झाली सुरुवात flirt करायला? तुला माहित्येय ना I am already committed to सौरभ?

श्रीरंग- Hmm…चला झोपतो आता. उद्या लवकर उठायचं आहे. Good night.

मानसी- Good night.

मानसीने फोन कट केला आणि दिवे बंद करून ती बेडवर टेकली. इतक्यात मेसेज नोटिफिकेशन आलं. तिने पाहिलं तर तिच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा झाले होते. पाठवणाऱ्याचं नाव श्रीरंग होतं. तिने श्रीरंगला फोन लावला.

श्रीरंग- मी झोपलो आहे.

मानसी- तू गप. तू पैसे पाठवलेस मला?

श्रीरंग- हो.

मानसी – का?

श्रीरंग- तिकिटांचे.

मानसी- What? तिकीट मी काढली आहेत ना?

श्रीरंग- हो. तू करोडपती आहेस मला माहित्येय. म्हणूनच इतका लहानसं खर्च मी तुला करू दिला नाही. तू युएसचं तिकीट स्वतः काढ आणि मला भेटायला ये. त्याचे पैसे मी तुला नाही देणार.

मानसी- तू वेडा आहेस का रंगा? तू सौरभच्या तिकिटाचे पण पैसे दिलेस मला. मी नको म्हणाले होते ना?

श्रीरंग- बरं, त्याच्या तिकीटाची जी किंमत आहे ना, तेवढ्या पैशांची मला पार्टी दे कधीतरी ओके? पण आता झोप आणि मलाही झोपू दे. बाय, Good night.

हे बोलून त्याने फोन कट केला. मानसीने फोन बाजूला ठेवला आणि ती बेडवर पडली. डोळे मिटल्यावर तिच्या डोळ्यासमोर श्रीरंग येत होता. प्रेमळ, smart, caring, हुशार, देखणा, कर्तृत्ववान, तिच्यावर प्रेम करणारा, तिचा आदर करणारा, जे मनात आहे ते बोलणारा, तिची काळजी घेणारा, तिचं मन जाणणारा आणि राखणारा, तिला समजून घेणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला जगात सर्वात जास्त विश्वासार्ह वाटणारा तिचा मित्र श्रीरंग! हळूहळू त्यातच तिला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी तिघेही एअरपोर्टवर भेटले. श्रीरंगला पाहून मानसीला काल झोपताना तो डोळ्यासमोर दिसला होता ते आठवलं. ती त्याच्याकडे बघत होती. विमानात शिरल्यावर सौरभने स्वतःची bag वर टाकली आणि तो विंडो सीटवर बसला. श्रीरंगने मानसीची bag उचलून वरच्या compartmentमध्ये टाकली. मग स्वतःची टाकली. मानसीला aisle सीटवर बसायची ऑफर दिली. पण ती मधल्या सीटवर बसली. तो aisle सीटवर बसला आणि विमानात मिळणारं magazine चाळू लागला. सौरभ बाहेर दिसत असलेलं विमान खिडकीतून बघण्यात मश्गूल होता.

मानसी एकदा सौरभकडे आणि एकदा श्रीरंगकडे बघत होती. तिच्या मनात काहीतरी विचित्र कालवाकालव होत होती जी काय आहे हे तिलाच कळत नव्हतं. विमान तोवर रनवेवर आलं आणि प्रचंड वेगाने धावू लागलं. मानसी डोळे मिटून बसलेल्या श्रीरंगकडे बघत होती. विमान त्या तिघांना घेऊन हवेत झेपावलं तेव्हा सूर्योदय नुकताच झाला होता आणि खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या सोनेरी सूर्यकिरणांनी चेहरा उजळून गेलेला श्रीरंग खूप handsome दिसत होता. मानसी त्याला बघण्यात हरवून गेली होती. इतक्यात श्रीरंगने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. त्याने पाहिलेलं बघताच मानसीने नजर खिडकीकडे फिरवली.

आता विमानाने देखील दक्षिण दिशेकडे वळून गोव्याच्या दिशेने प्रस्थान सुरू केलं होतं. गोव्यात काय घडणार हे फक्त जिला माहित होतं ती नियती विमानाच्या पंखावर बसून त्या तिघांकडे बघत होती.

क्रमश:

पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय…. (भाग २२)

मागील भागाची लिंक- मृगजळ भाग २०

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “मृगजळ भाग २१”
  1. ata ase vatatay kahitari hovot ani mansila kalo ki saurabh che kay plans aahet te mhanje sagle apaplya ayushat pudhe jayla mokle

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!