मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

मृगजळ भाग २०

तेवढ्यात बेल वाजली. इस्त्रीवाला असेल असं वाटून सौरभने इस्त्रीच्या कपड्यांचं गाठोडं घेत दार उघडलं. दारात अंकिता उभी होती. तिला पाहून सौरभच्या पायातले त्राण गेले आणि तो म्हणाला-

सौरभ- तू?

अंकिता- म्हणजे? मी नाही तर अजून कोणी येणार होतं का? बाजूला हो. माझा फोन विसरले मी घरी आणि परत यावं लागलं.

हे बोलून ती घरात आली. समोरच तिचा फोन चार्जिंगला लावला होता तो घेऊन घाईत चपला सरकवून गेली देखील. हृदयाचे ठोके वाढलेला सौरभ सोफ्यात बसला. इतक्यात काळ्या बाथरूममधून बाहेर आला आणि म्हणाला-

काळ्या- काय प्लॅन आहे आज तुझा?

सौरभ- काही खास नाही.

काळ्या- मग चल. मस्त बिअर पिऊ. जेऊ. माझी संध्याकाळी फ्लाईट आहे. मी गोव्याला परत जाईन. तू घरी ये.

हे ऐकून सौरभला बरं वाटलं. काळ्या घरात असणं त्याला नकोच होतं. सौरभ लगेच तयार झाला.

सौरभ- मस्त आयडिया आहे. मी आलोच चेंज करून.

इतकं बोलून तो आत गेला आणि आई बाहेर आली. काळ्याला थेट विचारलं तिने.

आई- काय रे, तू मगाशी कोणाची चौकशी करत होतास?

काळ्या- मानसी वाहिनीची.

आई- मानसी वहिनी? तुला कशी माहित ती?

काळ्या- असं काय करता आई. सौरभ आणि वहिनी येतात ना गोव्याला मध्ये मध्ये. आमच्याच रिसॉर्टला उतरतात. माझ्या बायकोची आणि मानसी वाहिनीची पण मस्त मैत्री झाली आहे.

इतक्यात सौरभ चेंज करून बाहेर आला. आईला काळ्याशी बोलत बसलेली पाहून थबकला आणि घाईत म्हणाला-

सौरभ- चल रे, आपण निघूया.

आई- कुठे जाताय सौरभ? ह्याची आणि मानसी वाहिनीची भेट घालून देतो आहेस का?

ह्यात तिने मानसी ह्या शब्दावर जोर दिलेला ऐकून सौरभ समजायचं ते समजला आणि नजर चोरत म्हणाला-

सौरभ- न..नाही…आम्ही दोघेच जेवायला जातोय. चल काळ्या.

काळ्याने आईचा निरोप घेतला. तुम्ही पण एकदा गोव्याला या म्हणाला आणि दोघे बाहेर पडले. आई जाम चिडली होती. तिला मानसीचा चेहरा आठवून राग येत होता. मानसीला सौरभच्या आयुष्यातून काहीही करून काढायचा तिने निर्णय घेतला होता.

मानसी बेडवर पडून होती. उठून काहीही करायचा तिचा मूड नव्हता. श्रीरंग जे बोलला ते कुठेतरी तिच्या मनात परत परत येत होतं. एकूणच मूड उदास झाला होता. दिवस सरकता पुढे सरकत नव्हता. इतक्यात श्रीरंगचा फोन आला. तिने फोन घेतला.

श्रीरंग- काय करते आहेस?

मानसी- काही नाही. लोळते आहे.

श्रीरंग- Wow. मी येऊ का कंपनी द्यायला?

मानसी – Please यार रंगा. पकवू नको. आधीच थोडा hangover आहे.

श्रीरंग- मस्त पोटभर जेव. की hangover उतरेल.

मानसी- नको. उठून काहीही करायचा पण कंटाळा आलाय.

श्रीरंग- तुला करायला कोण सांगतंय? त्याची ऑर्डर मी ब्लू लीफच्या शेफला दिली आहे. आपण फक्त तिथे जायचं आहे.

मानसी- What?

श्रीरंग- Yes. आता पटकन तयार हो आणि एका तासात ब्लू लीफला ये. उतारा म्हणून चिल्ड बिअर पी आणि मस्त गरम गरम जेव. ये पटकन. मी वाट बघतोय.

मानसी ते ऐकून खुश झाली. इतका वेळ अंबलेला दिवस अचानक फ्रेश वाटू लागला. पटकन तयार होऊन ती निघाली. तिने गाडी ब्लू लीफच्या पार्किंगमध्ये लावली आणि गाडीतून उतरली तर समोर श्रीरंग उभा होता.

श्रीरंग- हाय.

मानसी- हाय. बरं झालं यार तू प्लॅन केलंस. मी घरी इतकी बोअर होत होते ना…

श्रीरंग- मला ते माहित होतं. म्हणूनच हा प्लॅन केला.

तो हे बोलून निघाला. मानसीने त्याला हाक मारली-

मानसी- रंगा..

रंगा थांबला. मागे वळून म्हणाला-

श्रीरंग- काय ग?

मानसीने पुढे होत त्याला मिठी मारली. काही क्षण ती तशीच होती. मग मागे होत म्हणाली-

मानसी- आता चल.

श्रीरंग- हे काय होतं? म्हणजे मजा आली मला. पण का?

मानसीने त्याला चापटी मारली आणि म्हणाली-

मानसी- नालायक आहेस. सगळं माहित असतं तुला तरी मुद्दाम विचारतोस. तू खूप चांगला आहेस ना म्हणून तुला hug केलं. ओके? असाच रहा. चल आता.

दोघे आत आले. त्यांचं टेबल रिझर्व्ह होतं. दोघे एकमेकांशी बोलत टेबलवर जाऊन बसले. श्रीरंगने बिअरची ऑर्डर दिली. दोघे गप्पा मारू लागले आणि तितक्यात चार टेबल सोडून एका कोपऱ्यात सौरभबरोबर बसलेल्या काळ्याने मानसीला पाहिलं आणि तो उठून धावत तिच्याकडे आला आणि म्हणाला-

काळ्या- ह्याला म्हणतात will power. मी तुमच्या घरी गेलो होतो पण आपली भेट झाली नाही. मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती आणि बघा भेट झाली आपली मानसी वहिनी. कशा आहात?

काळ्याला तिथे अनपेक्षितपणे पाहून मानसी गडबडली. श्रीरंग पण काळ्याच्या तोंडून मानसी वहिनी ऐकून मजा येत होती.

मानसी- अरे तू..तुम्ही इथे?

काळ्या- हो…आणि तुमचा नवरा पण आहे बरोबर.

त्याने तिथूनच जोरात हाक मारली-

काळ्या- ए सौरभ, कोण आलंय बघ. अरे ये इथे.

सौरभ पण मानसीला तिथे पाहून चकित झाला. पण काळ्याने हाक मारल्यावर त्याला यावंच लागलं. तो मानसीच्या टेबलजवळ येऊन formal हसत म्हणाला-

सौरभ- हाय…

मानसी- हाय…

काळ्या- ए तुम्ही दोघे असे अनोळखी असल्यासारखे हाय हेलो काय करताय?

हे बोलून काळ्या मानसीच्या शेजारची खुर्ची ओढून बसला पण. आणि म्हणाला-

काळ्या- चला वहिनी, आपली भेट झाली बरं झालं. ए सौरभ, बस की. तू का उभा?

सौरभ पण बसला. काळ्याने वेटरला त्यांचे ग्लास आणि खाणं इथे आणायला सांगितलं. तिथे बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की श्रीरंग पण तिथे आहे. त्याला पाहून काळ्या आश्चर्याने म्हणाला-

काळ्या- वहिनी, हे कोण?

मानसीला सुचत नव्हतं की काय सांगायचं. पण तेवढ्यात श्रीरंग म्हणाला-

श्रीरंग- मी तुमच्या वहिनीचा कलीग. श्रीरंग. आम्ही एकाच कंपनीत काम करतो. लंच टाईममध्ये जेवायला आलो एकत्र.

काळ्या- अच्छा ओके. मी संदीप रेगे. ह्याचा मित्र. गोव्याला असतो. आमचे रिसॉर्ट आहेत. कधी आलात तर या नक्की.

असं म्हणून काळ्याने स्वतःचं कार्ड त्याला दिलं.

श्रीरंग- नक्की येईन.

काळ्या- ए सौरभ, एक आयडिया सांगू का?

सौरभ- काय आयडिया?

काळ्या- तू आणि वहिनी उद्याच या गोव्याला.

सौरभ – ए काहीही काय? उद्या काय?

काळ्या- त्यात काय? अरे उद्यापासून गोवा फेस्टिव्हल सुरू होणार आहे. एक आठवडा धमाल असते. आमचे सगळे रिसॉर्ट बुक आहेत. पण तुमची नेहमीची रूम तुम्हाला देईन मी. काहीतरी सेटिंग करेन.

सौरभ- ए नाही रे..असं अचानक उद्या कसं शक्य आहे? घरी काय सांगू?

काळ्या- अरे घर तर इथे समोर बसलेलं आहे ना? बाकी आईला सांग बायकोला घेऊन पन्नासाव्या हनिमूनला जातोय म्हणून. काय वहिनी?

मानसीला काय react करावं तेच न कळल्याने ती गप्प बसली. नुसती स्माईल दिली तिने.

काळ्या- बघ. वहिनी हसल्या. म्हणजे त्यांना यायचं आहे. तू आता भाव नको खाऊ. ओ श्रीरंग भाऊ, तुम्ही पण या बायकोला घेऊन.

श्रीरंग- मला आवडेल गोव्याला यायला. पण माझं लग्न नाही झालेलं. त्यामुळे बायको नाहीये.

काळ्या- मग मैत्रिणीला घेऊन या. आपलं रिसॉर्ट कपल फ्रेंडली आहे.

श्रीरंग मानसीकडे बघत म्हणाला-

श्रीरंग- नाही ना. मैत्रीण पण दुसऱ्या कोणाबरोबर जाणार आहे.

काळ्या- Oh. मग एकटेच या. गोव्यात कोणीतरी भेटेल तुम्हाला नक्की. आमचा गोवा म्हणजे प्रेमी जीवांचं heaven आहे. आधीच जुळलेल्या जोड्या तिथे आणखी फुलतात आणि ज्यांच्या जुळलेल्या नाहीत त्यांच्या जोड्या तिथे जुळतात.

श्रीरंग- Oh great. मग यायलाच पाहिजे. मी येतो उद्या. तुमचे दादा आणि वहिनी नाही आले तरी.

काळ्या- ह्याला म्हणतात खरा प्रेमी. गोव्यात तुम्हाला तुमची मैत्रीण नक्की भेटणार. ए सौरभ, ओ वहिनी, या की. किती भाव खाणार? विमानाची तिकीट मी काढू का? आता काढतो.

सौरभ – ए नको रे बाबा. तिकीट काय काढू का? आम्ही काढू आमची तिकीट.

काळ्या- म्हणजे येणार ना तुम्ही? काय वहिनी?

मानसी आणि सौरभला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. श्रीरंग हळूच म्हणाला-

श्रीरंग- मानसी, आता संदीप इतका आग्रह करतोय, वहिनी वहिनी म्हणत तर जाऊया ना. तुझ्या मिस्टरांना तयार कर.

काळ्या- सौरभचं माझ्यावर सोडा. तुम्ही वहिनीच बघा.

श्रीरंग- वहिनी येते आहे. तुम्ही काळजी नका करू.

काळ्या- झालं मग. आता सौरभ काय नाही म्हणेल? ठरलं तर. या तुम्ही. चांगले चार दिवस काढून या. धमाल करू. ए सौरभ, मी निघतो रे. ट्रॅफिक लागला तर फ्लाईट मिस होईल माझी. उद्या भेटूया गोव्यात. श्रीरंग भाऊ, तुम्ही पण या.

श्रीरंग- एक मिनिट…मला ए श्रीरंग म्हण आणि मी पण तुला ए संदीप म्हणेन. चालेल?

काळ्या- हे मस्त आहे. जास्त formality मलाही आवडत नाही. चला, मी पळतो. हे बिलाचे पैसे.

असं म्हणून खिशातून पाकीट काढून टेबलवर चार हजार रुपये ठेवून काळ्या निघून पण गेला. सौरभ, मानसी आणि श्रीरंग awkward उभे होते. शेवटी श्रीरंग खाली बसला आणि बिअर सिप करून म्हणाला-

श्रीरंग- दादा, वहिनी, अरे बसा. ड्रिंक एन्जॉय करा. उद्या गोव्याला जायचं आहे ना? त्याचं प्लॅनिंग करूया.

मानसी- मी गोव्याला वगैरे येणार नाहीये.

श्रीरंग- का?

मानसी- का म्हणजे? नाही यायचं मला.

श्रीरंग- ते कळलं. मी का यायचं नाहीये ते विचारलं.

मानसी- माझी मर्जी.

श्रीरंग- मग हे त्या बिचाऱ्या संदीपला सांगायचं होतंस ना. तेव्हा गप्प का बसलीस? तो आता वाट बघत राहील. (सौरभला) दादा, तुम्ही सांगा ना वहिनीला.

त्याच्या तोंडून हे ऐकून मानसी आणखी चिडली.

मानसी- रंगा, stop it.

श्रीरंग- stop करून कसं चालेल? गोव्यात तुम्हाला दादा-वहिनी म्हणायचं आहे चार दिवस. मग आतापासून प्रॅक्टिस नको करायला?

मानसी- तू जा एकटाच गोव्याला आणि नाच त्या फेस्टिव्हलमध्ये. मला अजिबात इंटरेस्ट नाहीये.

सौरभ- मानसी, आपण जाऊया.

मानसीने रागाने त्याच्याकडे पाहिलं. तो शांतपणे म्हणाला-

सौरभ- आज काळ्या घरी आला होता. आईसमोर त्याने मानसी वहिनी कुठे आहे अशी चौकशी केली. आईला आता सगळं माहित झालं आहे.

मानसी- अच्छा? मग छान झालं की. तुला जे घरी सांगायला जमत नव्हतं ते त्याने सांगितलं. अंकिता पण तेव्हा घरी असती तर बरं झालं असतं.

सौरभ- मानसी प्लीज. आता मला घरी राहाणं impossible होणार आहे. आई माझं डोकं खाणार आहे. तुला तर तिचे विचार माहीतच आहेत.

मानसी- पण तुझा मुख्य प्रोब्लेम आता संपला आहे ना सौरभ. आईला कळलं तर तिला काय वाटेल हा. कारण आता तिला कळलं आहे. So आता तुला घरातून बाहेर पडायला काहीच हरकत नाहीये.

सौरभने श्रीरंग असल्याचं लक्षात येऊन मानसीला खूण केली.

मानसी- रंगाला सगळं माहित आहे. अगदी सुरुवातीपासून काळ्यापर्यंत सगळं. त्याला सोड. तू तुझं बोल. तू उद्या बाहेर पडलास की गोव्याहून परत आल्यावर घरी न जाता दुसऱ्या जागेत राहणार का? आपलं ठरलं होतं तसं? तर मी गोव्याला वगैरे येईन. नाहीतर मला तुला इथेही भेटायची इच्छा नाहीये. मी कंटाळले आहे आता.

सौरभ हे ऐकून शांत बसला. त्याच्या डोळ्यासमोर घरी कटकट करत असलेली आई आली. तिला थंड व्हायला दोन तीन दिवस तरी जाणार हे त्याला माहित होतं. तोवर तिच्याबरोबर एकाच घरात राहून त्याच्या डोक्याचा भुगा झाला असता हे तो जाणून होता. म्हणूनच गोव्याला जाण्याची ही संधी त्याला सोडायची नव्हती. वरून गोव्यात श्रीरंगलादेखील दाखवून द्यायचं होतं की मानसी कोणाची आहे. आणि हे सगळं शक्य होतं, जर त्याने मानसीला घर सोडायचं प्रॉमिस केलं असतं तरच. तो नकळत बोलून गेला-

सौरभ- ठीक आहे मानसी. गोव्याहून आल्यावर मी घरी परत जाणार नाही. ठरल्याप्रमाणे वेगळी जागा घेऊन राहीन. I promise.

हे बोलून त्याने मानसीच्या हातावर हात ठेवला. त्या हातांकडे बघत असलेला श्रीरंग मनातल्या मनात म्हणाला-

श्रीरंग- मानसी, हा परत खोटं बोलतोय आणि ह्यावेळी ते तुझ्या लक्षात येईल. हा तुझ्या लायकीचा नाहीये. कारण तू प्रचंड शूर आहेस आणि हा माणूस एक नंबर फट्टू आहे.

श्रीरंगच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्याने समोरचा ग्लास एका घोटात संपवला आणि एक्स्क्यूज मी म्हणून तो सिगारेट ओढायला बाहेर पडला. मानसी सौरभच्या डोळ्यात सत्य शोधायचा प्रयत्न करत होती. सौरभ नेहमीप्रमाणे नजर चोरत होता. बाहेर दाटून आलेली संध्याकाळ मानसी आणि सौरभच्या नात्याची पण संध्याकाळ ठरणार होती का, हे येणारा काळच सांगणार होता.

क्रमश:

आधीच्या भागाची लिंक- मृगजळ भाग १९

मृगजळ सर्व भाग- मृगजळ- सर्व भाग

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

3 thoughts on “मृगजळ भाग २०”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!