गुंतता हृदय ही मराठी दीर्घकथा मंदार जोग

तेजसने गाडी सुरू केली. गल्ल्या सोडून गाडी हायवेला लागल्यावर मुग्धाने तिची सीट मागे सरकवली. मग नेसलेली साडी हाताने काढून मागच्या सीटवर टाकली. पर्समध्ये आणलेल्या लहानशा आरशात बघून पटकन लिपस्टिक लावली. केसांना बांधलेला चाप सोडून ब्रशने विंचरून केस मोकळे सोडले. प्रशांतचं आवडतं परफ्युम तिने फवारलं. मुग्धा आता त्या वन पीस spaghetti top मध्ये निखारा दिसत होती. त्या परफ्युमचा वास तेजसला वेड लावत होता. सीटवर बसल्यामुळे तो short ड्रेस आणखी वर सरकून दिसत असलेल्या तिच्या मांड्या तेजसचं लक्ष वेधून घेत होत्या.

मुग्धा- हा ड्रेस ठीक आहे ना?

तेजसने न राहवून गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. मुग्धा त्याच्या डोळ्यात बघत होती. तेजसने मुग्धाचे केस डाव्या हाताने धरून तिचा चेहरा आपल्या जवळ आणला आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवले…..

त्यांच्या मागे असलेली आर्याची गाडी काही अंतरावर थांबली होती. आर्या तिच्या गाडीत बसून पुढच्या गाडीत काय सुरू आहे हे बघायचा प्रयत्न करत होती. पण अंधारात तिला नीट दिसत नव्हतं. तेजसने मुग्धाला स्वतःपासून लांब केलं तेव्हा मुग्धा डोळे मिटून तशीच बसली होती.

तेजस- काय झालं?

मुग्धा- काही नाही तेजस. मला कळत नाहीये की मी हे का करते आहे.

तेजस- काय?

मुग्धा- मी तुला विरोध का करू शकत नाही. ह्या आपल्या जवळीकीमुळे जर मला नंतर गिल्टी वाटतं, तर मग मी हे होऊ का देते?

तेजस- मुग्धा, एक सांगू?

मुग्धा- काय?

तेजस- काही प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला ना, तर उत्तरं आपल्यापासून लांब धावतात. त्यापेक्षा ते प्रश्न तसेच धरून ठेवायचे मनात. मग उत्तरं स्वतःहून त्या प्रश्नांच्या शोधात आपल्या जवळ येतात. आता जाऊया डिनरला?

मुग्धा- हम्म…

तेजसने गाडी सुरू केली. आर्या त्यांच्या मागे निघाली. तेजसची गाडी पोर्चमध्ये थांबली. तेजस आणि मुग्धा उतरले आणि निघाले. आर्या त्यांच्या मागे होती. तेजस आणि मुग्धा लाउंजमध्ये येऊन बसल्यावर आर्या त्यांच्यापासून लांब असलेल्या एका टेबलवर बसली. वेटर ऑर्डर घ्यायला आल्यावर तेजसने मुग्धाला काय घेणार विचारलं.

मुग्धा त्याच्या डोळ्यात विश्वासाने बघत म्हणाली-

मुग्धा- ब्रीझर…..

तेजसने तिची आणि त्याची ऑर्डर दिली. वेटर गेला. मुग्धा काहीच बोलत नव्हती. तेजस तिच्याकडे टक लावून बघत होता. टेबलावर लावलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात मुग्धाचा गोरा चेहरा खूप सुंदर दिसत होता. तिने सहज समोर बघितलं, तर तेजस तिच्याकडेच बघत असल्याचं मुग्धाच्या लक्षात आलं. मुग्धा पण त्याच्या नजरेत नजर मिळवून बघू लागली. तेजसने सहज तिच्या हातावर हात ठेवला. मुग्धाने तिचा हात काढला नाही. ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली-

मुग्धा- काय हवंय तेजस तुम्हाला?

तेजस- तुला काय वाटतं? मला काय हवं असेल?

मुग्धा- मला काय हवंय हेच माहीत नसलेल्या मला तुमच्या मनातलं कसं कळणार?

तेजस- डोळे… डोळे सांगून टाकतात मनात काय आहे ते. बघ माझ्या डोळ्यांत दिसतं का काही.

मुग्धा- तेजस, प्रशांत गेल्यापासून आयुष्य इतकं अंधारलं आहे ना, की स्वतःचाच चेहरा मला दिसत नाही. आयुष्याच्या वाटेवर चालताना ठेच लागेल, अडखळून पडेन अशी भीती वाटते. बरं, आधाराला म्हणून एखादा हात धरावा, तर तो हात वासनेने बरबटलेला असेल ह्या भीतीने आधार घ्यायलाही भीती वाटते.

हे ऐकून तेजसने त्याचा हात तिच्या हातावरून काढून घ्यायचा प्रयत्न केला. मुग्धाने त्याचा हात घट्ट धरला आणि म्हणाली-

मुग्धा- तेजस, मी तुमच्या हाताविषयी बोलत नाहीये. पण डोळे नाही वाचता येत मला, आत्ता तरी. मी खूप कन्फ्युज्ड आहे तेजस. जे काही होतंय किंवा झालं आहे ते योग्य की अयोग्य? जर अयोग्य आहे, तर मी ते थांबवू का शकत नाही, ह्या प्रश्नाचं आणि अपराधीपणाचं काहूर माझ्या मनात आहे. So…

इतक्यात वेटर त्यांची ड्रिंक्स घेऊन आला. त्यांच्या बोलण्यात खंड पडला. वेटर ड्रिंक्स सर्व्ह करून गेला. परत एक सायलेन्स. दोघेही हातात हात धरून बसले होते.

तेजस- मुग्धा, तू जर खरंच पुण्याला गेली असतीस ना ट्रान्स्फर होऊन, तर मला खूप आठवण आली असती तुझी.

मुग्धा- हम्म…

तेजस- तुला आली असती का माझी आठवण?

मुग्धा- (त्याच्या डोळ्यात बघत) खरं बोलू की खोटं?

तेजस- माझ्याशी फक्त खरं बोल.

मुग्धा- मग खरं उत्तर हेच आहे की मला माहीत नाही. मी म्हणाले ना तेजस, मी तुमच्याशी जे वागते ते का वागते, इथे तुमच्याबरोबर का आले आहे, तुमची-माझी काही वेळा झालेली जवळीक… ह्या गोष्टी माझ्या आयुष्याला पडलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहेत. मला अनेकदा प्रशांतच्या फोटोकडे बघायची लाज वाटते. पण तेजस, आज खरं सांगते तुम्हाला. माझ्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह असलेला प्रशांत somehow मला रागावलेला वाटत नाही. फोटोतले त्याचे डोळे मला काहीतरी सांगत असतात. काहीतरी positive. पण मलाच ते समजून घेता येत नाहीये.

तेजस तिच्या डोळ्यात बघत म्हणाला-

तेजस- मुग्धा, हे सगळं तुझं मन सांगतंय आणि ते बरोबर पण आहे. पण तुझे डोळे काय म्हणतायत माहीत आहे?

मुग्धा- काय?

तेजस- ते म्हणतायत, “तेजस, मला जवळ घ्या. तुमच्या मिठीत घ्या. मी वाट बघते आहे. फक्त मला भीती वाटते आहे.”

मुग्धा- (त्याच्या डोळ्यात बघत.) असेल. तसं असेलही. तेजस, आज प्रशांतला जाऊन इतके महिने झाले. माझं आणि प्रशांतचं सेक्स लाईफ खूप active होतं. तुम्ही माझे मित्र आहात आणि आपण ह्या विषयावर बोलतोय म्हणून तुम्हाला सांगते. प्रशांत आणि मला दोघांनाही एकमेकांची साथ, संगत आणि शृंगार खूप आवडायचा. प्रशांत नवनवीन कल्पना ऐकून, वाचून, बघून यायचा आणि मला सांगायचा. त्याला तो इनोव्हेशन म्हणायचा. आमचा आनंद जिवंत ठेवण्यासाठी तो काय काय क्लुप्त्या लढवत असे. (मुग्धाला ते सर्व आठवून हसू आलं.)

तेजस- Wow. म्हणजे प्रशांत खूप रसिक होता तर?

मुग्धा- हो. खूप म्हणजे प्रचंड. आणि तो अचानक गेल्यावर रोज सेवन कोर्स डिनर करणाऱ्या व्यक्तीवर उपासमारीची वेळ यावी, तसं काहीसं माझ्या बाबतीत झालं. सुरुवातीच्या दिवसांत तो गेल्याचा आघात आणि दुःखच इतकं होतं की बाकी जाणीवा जणू गोठून गेल्या होत्या. पण म्हणतात ना की काळ सर्व जखमा भरतो. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. दुःखावर काळाची फुंकर पडल्यावर समोर दिसत होतं ते माझं आणि अमेयचं आयुष्य… प्रशांतच्या शिवाय. मग आर्थिक गरज म्हणून मी आपल्या कंपनीत नोकरी धरली. पोटाची भूक भागवायला जेवत होते. मायेची भूक भागवायला अमेय आहेच. पण स्त्री म्हणून असलेली आणि ती पण प्रशांतसारख्या नवऱ्याने नेहमी तृप्त केलेली शरीराची भूक कधीतरी डोकं वर काढते. अंगात वणवा पेटतो. खूप त्रास होतो. पण मी त्यात जळून जाते किंवा सरळ बाथरूममध्ये जाऊन शॉवरखाली बसून त्या पाण्यात माझ्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि अश्रू विसर्जित करते आणि आतून कोरडी होऊन पाण्याने निथळत बाहेर येते.

तेजस- (आश्चर्याने) मुग्धा…

मुग्धा- आणि मग त्यात तुम्ही मित्र म्हणून आयुष्यात आलात. आपल्या भेटी वाढल्या. क्वचित होणाऱ्या तुमच्या स्पर्शाचं आकर्षण वाटू लागलं. तेजस, प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे? शरीराची भूक भागवायला पुरुष बिनदिक्कत बाजारात जातो आणि तिथे रोख पैसे मोजून समाजव्यवस्थेची व्हिक्टिम झालेल्या एका स्त्रीला उपभोगून परत व्हिक्टिम करतो. पण अशीच जर एखादी बाई असेल… माझ्यासारखी… तर तिला ते सुख मिळवायला स्वतः व्हिक्टिम व्हावं लागतं. दहा स्त्रियांबरोबर संबंध ठेवणारा पुरुष हा स्टड समजला जातो आणि प्रियकराबरोबरदेखील संबंध ठेवणारी स्त्री स्लट समजली जाते.

तेजस- मुग्धा प्लीज. मी तुला असं काही समजत नाही आणि आपल्यात असं काही झालेलं देखील नाही. So…

मुग्धा- हो तेजस. मी आज विषय निघाला म्हणून बोलते आहे. प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का? जवळ येताना पुरुषांना संधी हवी असते आणि बायकांना विश्वास. त्यामुळे मला वाटतं, प्रशांत गेल्यानंतर माझी होत असलेली घुसमट आणि मला तुमच्याबद्दल असलेला विश्वास, ह्या दोन गोष्टी कारण असतील मी तुम्हाला विरोध न करण्याच्या.

तेजस- हम्म… बरोबर आहे तुझं analysis. Or should I say self analysis?

मुग्धा गोड हसते. तेजस म्हणतो-

तेजस- मुग्धा, तुझं स्माईल किलर आहे. तुला हे कोणी सांगितलं आहे का आधी?

मुग्धा- हो.

तेजस- अच्छा? कोणी?

मुग्धा- प्रशांतने. अजून कोण सांगणार?

तेजस- मुग्धा, तू प्रशांतला विसरू शकणार नाहीस हे मला माहीत आहे. पण आयुष्याला नव्याने सुरुवात करायचा विचार कधी मनात येतो की नाही?

मुग्धा- मी प्रशांतशिवाय आयुष्याचा विचारच करू शकत नाही तेजस. मला त्याचं माझ्या आयुष्यातील अस्तित्व आजही जाणवतं. मला आत्ता इथेही तो माझ्या जवळ बसला आहे आणि आपलं बोलणं ऐकतो आहे असं वाटतंय. मग घरी गेल्यावर तो फोटोतून मला सांगेल त्याला काय वाटलं ते. पण त्याला आपली मैत्री मान्य आहे असं मला वाटतं. नाहीतर त्याने मला तसा सिग्नल दिला असता.

तेजस- मुग्धा, मी तुझं प्रशांतवरचं प्रेम appreciate करतो. पण हे सिग्नल देणं वगैरे जरा जास्त होतंय असं नाही का वाटत? I mean, प्रेम होतं, तू त्याला मिस करतेस हे पण मान्य. पण म्हणून तो अजूनही तुझ्या आयुष्यात आहे असं समजून पुढल्या आयुष्याचा विचारच करायचा नाही, हे मला पटत नाही.

मुग्धा- पण मला हे पटतं, प्रशांत.

तेजस- मी तेजस आहे. प्रशांत नाही.

मुग्धा- Oh sorry. मी चुकून प्रशांत म्हणाले.

हे सर्व conversation ऐकून तेजसचा mood off झाला. तो त्याचा ग्लास घेऊन उठून गेला. पण मुग्धाला खूप मोकळं वाटत होतं. आज तिने तिची अवस्था तेजसला सांगताना तिला स्वतःलादेखील अनेक गोष्टी clear झाल्या होत्या. तेजस उठून गेला तरी प्रशांत तेजसच्या खुर्चीत बसून आहे असं काहीतरी मुग्धाला वाटत होतं. आता हा मनाचा खेळ आहे की दोन ब्रीझरची नशा, हे मात्र तिला कळत नव्हतं. पण ते feeling खूप मस्त होतं.

इथे तेजस लाउंजच्या टेरेसवर आला. त्या उंचीवर वारा प्रचंड वेगाने वाहत होता. तेजस टेरेसच्या कठड्याजवळ येऊन उभा राहिला. ग्लास कठड्यावर ठेवून खाली दिसणारे रस्ते आणि इमारती बघू लागला. इतक्यात त्याच्या मागे आलेल्या आर्याने दोन्ही हात त्याच्या हातांखालून पुढे नेऊन त्याच्या छातीवर ठेवले आणि त्याला मागून मिठी मारली. तेजस तसाच उभा होता. आर्याने त्याच्या मानेची पापी घेतली. तेजसने डोळे मिटून घेतले. तेजस म्हणाला-

तेजस- मुग्धा… मी तेजस आहे. प्रशांत नाही.

आर्या- हम्म…

तेजस- माहीत आहे ना? तरी इतकी जवळ कशी माझ्या?

आर्या काही न बोलता तिची बोटं त्याच्या छातीवरून फिरवू लागली.

तेजस- मुग्धा, आज इरादा काय आहे? मगाशी बोललीस ते खरं की आत्ता वागते आहेस ते खरं?

आर्या काहीच बोलली नाही. ती तशीच उभी होती. तेजसने त्याची बोटं तिच्या बोटांत गुंफली आणि तो शांत उभा होता. त्याला आज मुग्धाचा स्पर्श थोडा वेगळा वाटत होता. त्यात आर्यासारखा आक्रमकपणा जाणवत होता.

तेजस- मुग्धा, अचानक काय झालं तुला?

आर्या काहीच बोलली नाही. इतक्यात तेजसला शोधत मुग्धा टेरेसवर आली. तिथे तिला पाठमोरा उभा असलेला तेजस आणि त्याला मागून बिलगलेली आर्या दिसली. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मुग्धा पुढे गेली आणि तिने तेजसचा दंड धरून त्याला आपल्याकडे वळवलं. तिला समोर उभी पाहून तेजस हबकला. त्याने बाजूला बघितलं तर त्याचा दंड घट्ट धरून मादक हसत असलेली आर्या त्याला दिसली. तेजस चक्रावला.

तेजस- आर्या तू? इथे?

आर्या- हो. का?

मुग्धा- तेजस, मी म्हणाले ते किती बरोबर आहे. पुरुषांना संधी हवी असते आणि बाईला विश्वास. तुम्ही देखील संधी सोडली नाहीत, पण माझा विश्वास मात्र गमावला आहे. निघते मी. बाय.

तेजस- हे बघ मुग्धा… असं काही नाहीये. मला वाटलं ती तूच आहेस.

मुग्धा- अरे वा. म्हणजे कोणत्याही बाईचा स्पर्श माझा वाटतो, की माझा स्पर्श तुम्हाला कोणत्याही बाईचा वाटतो?

तेजस- मुग्धा प्लीज. असं काही नाहीये.

मुग्धा- मी निघते आहे तेजस. बाय.

मुग्धा तिरमिरीत निघाली. तेजस तिच्या मागे निघाला. पण आर्याने त्याचा हात धरला.

तेजस- आर्या, सोड माझा हात. हा काय फालतूपणा आहे?

आर्या- तेजस, ती जाईल. ती लहान मुलगी नाहीये घरी आणायला आणि सोडायला जायला.

तेजस- Leave me, आर्या.

तेजसने स्वतःचा हात सोडवून घेतला आणि तो धावत मुग्धाच्या मागे गेला. पण तोवर मुग्धाची लिफ्ट खाली निघाली होती. तेजसने दुसऱ्या लिफ्टचं बटण दाबलं. ती लिफ्ट येईपर्यंत तो अस्वस्थपणे वाट बघत होता. तोवर मुग्धाची लिफ्ट लॉबीमध्ये पोहोचली होती. तेजसने लॉबीचं बटण दाबलं. लिफ्ट निघाली. एक-एक मजला तेजसला एक-एक शहराइतका लांब वाटत होता. त्याची लिफ्ट लॉबीमध्ये आली. तेजस बाहेर पडून पोर्चमध्ये आला. त्याने दोन्ही बाजूला पाहिलं, पण मुग्धा तिथे दिसली नाही. त्याने मुग्धाला फोन लावला. मुग्धा फोन घेत नव्हती. तेजस स्वतःवर जाम वैतागला. आता काय करावं हेच त्याला सुचत नव्हतं. हताश होऊन, डोळे बंद करून त्याने दोन्ही हात डोक्यावर ठेवले.

इतक्यात त्याच्या पाठीवर एक हात पडला. त्याने मागे वळून पाहिलं. ती मुग्धा होती. तिला पाहून तेजसला समाधान आणि आश्चर्य वाटलं.

तेजस- मुग्धा तू? मला वाटलं…

मुग्धा- (शांतपणे) चला…

तेजस- कुठे?

मुग्धा- सांगते मी.

तेजसने valet मधून गाडी मागवली. दोघे निघाले. मुग्धा सीटवर मागे डोकं टेकवून शांत बसली होती. रिकामा रस्ता आणि मागे जाणारे दिवे बघत होती. तेजसची गाडी तिच्या बिल्डिंगजवळ आली.

मुग्धा- चला.

तेजस- कुठे?

मुग्धा- घरी….

तेजस- (आश्चर्याने) आत्ता? तुझ्या घरी?

मुग्धा- हो….

तेजसने गाडी पार्क केली. दोघे निघाले. मुग्धाने चावीने दार उघडलं. दोघे घरात आले. मुग्धाने अमेय झोपला होता ती बेडरूम बाहेरून लॉक केली आणि तेजसला म्हणाली-

मुग्धा- घ्या. तुम्हाला संधी हवी आहे ना? मग ही घ्या संधी.

मुग्धाने त्याला मिठी मारली. हे तेजसला पूर्णपणे अनपेक्षित होतं.

तेजस- मुग्धा….

मुग्धा- तेजस, मी तुम्हाला हवी असलेली संधी देते आहे. पण तुम्ही माझा विश्वास नका तोडू. तुम्ही फक्त माझे आहात. मी तुम्हाला इतर कोणाशीही share नाही करू शकत.

इतकं बोलून मुग्धाने स्वतःला तेजसच्या हवाली केलं.

पहाटे चार-साडेचारच्या सुमारास तेजस तृप्त झोपलेल्या मुग्धाच्या कपाळाचं चुंबन घेऊन म्हणाला-

तेजस- मी निघतोय. जाऊ ना की अजून थोडा वेळ थांबू?

मुग्धा झोपेच्या गुंगीत होती. ती फक्त हसली.

तेजस- बाय. ऑफिसात भेटू ओके?

तेजसला उठवत असलेल्या दांडेकर काकूंना त्याला झोपेत बोलत असलेला बघून आश्चर्य वाटलं. काकूंनी त्याला जोरजोरात हलवत उठवलं.

काकू- काय रे तेजस? कोणाशी बोलतो आहेस? उठ लवकर.

तेजस आईचा आवाज ऐकून दचकून उठला.

तेजस- आई तू? इथे?

काकू- इथे म्हणजे? आणि झोपेत कोणाशी बोलत होतास?

तेजसला आपण स्वप्न बघितल्याची जाणीव झाली.

तेजस- काही नाही. एक कस्टमर आला होता स्वप्नात.

काकू- अरे, किती विचार करशील ऑफिसचा? पटकन बाहेर ये. आम्ही ब्रेकफास्टला वाट बघतोय.

तेजस- हो आई. तू हो पुढे. मी आलोच.

काकू गेल्या. तेजस विचार करू लागला. मग त्याला आठवलं की काल तो लॉबीमध्ये धावत आला. मुग्धा दिसली नाही. त्याने अनेक फोन केले. पण मुग्धाने फोन घेतला नाही. थोड्या वेळाने तिचा फोन switched off लागत होता. मग घरी आल्यावर त्याने अनेक मेसेज केले. पण तेदेखील deliver झाले नाहीत. त्याचं टेन्शनमध्ये त्याला झोप लागली आणि मग हे स्वप्न.

तेजसला मग स्वप्न आठवू लागलं. एखादं स्वप्न प्रत्यक्ष अनुभवासारखं इतकं खरं वाटणारं कसं असू शकतं? मुग्धाच्या घरची ती रात्र, तो प्रणय, मुग्धा… हे सर्व त्याला अजूनही डोळ्यांसमोर दिसत होतं. त्याने फोन चेक केला. सर्व मेसेज deliver झाले होते. पण reply नव्हता. तेजस उठून बाथरूममध्ये गेला.

काल रात्री रिक्षाने एकटी घरी आलेली मुग्धा प्रचंड वैतागली होती. तेजसवर आणि स्वतःवर पण. ती स्वतःला प्रश्न विचारत होती की, “तेजस आर्याबरोबर जवळीक साधतोय तर मला राग का आला? माझा आणि त्यांचा संबंध काय आहे? आम्ही थोडे जवळ यायचं काय कारण होतं ते मी त्यांना सांगितलं. आणि तेच कारण असेल, तर मग मला वाईट का वाटतंय? मी पझेसिव्ह का झाले आहे त्यांच्या बाबतीत?”

हा विचार करत मुग्धा सकाळची सगळी कामं उरकत होती. ऑफिसला उशीर नको म्हणून तिची सगळी लगबग सुरू होती.

तेजस ब्रेकफास्ट टेबलावर आला. दांडेकर काका आणि काकू त्याची वाट बघत होते.

तेजस- Good morning बाबा.

काका- Good morning. काय रे, आई सांगत होती की तुझ्या स्वप्नात पण हल्ली कस्टमर येतात.

तेजस- येतात नाही बाबा. आज आला.

काकू- हम्म… कारण बाकी कोणी नाहीये ना स्वप्नात यायला.

तेजस- ए आई, उगाच काय?

काका- तू आर्याला ओळखतोस का?

हे ऐकून तेजसला ठसका लागला.

तेजस- क…कोण आर्या?

काका- अशा किती आर्यांना ओळखतोस तू?

तेजस- नाही फार नाही. पण का?

काका- काल रात्री तुझा रुमाल त्या आर्याकडे राहिला होता. आपल्या राधिकाची भाची आर्या…. माहीत आहे ना तुला?

तेजस- (शॉक होऊन) म…माझा रुमाल? आर्याकडे? हे कसं शक्य आहे?

काकू- ते तुलाच माहीत. पण मुलगी गोड आहे.

तेजस- (घाबरून) अ…. आई…. तुला काय माहीत आर्या गोड आहे ते?

काकू- थांब. मी बोलावते तिला आणि मग तूच सांग ती गोड आहे की नाही ते.

तेजस- ब…बोलावते म्हणजे?

काकू उठून गेल्या. तेजस टेन्शनमध्ये होता.

काका- तेजस, तू नीट विचार केला आहेस ना?

तेजस- कसला विचार बाबा?

काका- आर्याच्या प्रपोजलचा.

तेजस- कसलं प्रपोजल बाबा? ती ऑफिसला आली होती आणि आमची ओळख झाली आणि that’s it. बाकी कसलंही प्रपोजल वगैरे काहीच नाहीये आमच्यात.

काका- पण काल रात्री तू तिच्याबरोबर स्काय लाउंजमध्ये गेला होतास ना?

तेजस- नाही, मी तिच्याबरोबर गेलो नव्हतो.

इतक्यात काकूंबरोबर आत आलेली आर्या म्हणाली-

आर्या- माझ्याबरोबर नव्हतास मग कोणाबरोबर गेला होतास तेजस? ऑफिसात एखादी मैत्रीण आहे की एखाद्या मैत्रिणीला ऑफिसात जॉब दिला आहेस आणि तिला स्काय लाउंजला घेऊन गेला होतास?

तेजस मुग्धाचं नाव घेऊ शकत नाही.

तेजस- हो बाबा. काल मी आणि आर्या होतो स्काय लाउंजला.

काका- ते कळलं आम्हाला तुझा रुमाल तिच्याकडे आहे हे बघूनच.

काकू- आर्या, बाळा तू काही खात का नाहीयेस? कसलं गं डाएट वगैरे करता तुम्ही हल्लीच्या मुली.

आर्या- काकू, हे डाएट पंधरा दिवस आहे. ते संपल्यावर येईन तेव्हा तुमच्या हातचे सगळे पदार्थ खाईन. (तेजसकडे बघून) आता काय येणं-जाणं सुरूच राहील ना?

काका- मग तेजस, डेट ठरवली आहे का तुम्ही दोघांनी की अजून फक्त हवेतच आहेत गोष्टी?

तेजस- बाबा, कसली डेट आणि काय बोलताय तुम्ही? आमच्यात काहीही गोष्टी नाहीयेत. उगाच काहीतरी गैरसमज नका करून घेऊ तुम्ही. माझा रुमाल काल पडला असेल स्काय लाउंजमध्ये आणि हिला तो मिळाला असेल. आणि स्काय लाउंजमध्ये मी आर्या “बरोबर” गेलो नव्हतो. मी माझ्या friends बरोबर होतो आणि आर्या मला तिथे भेटली. That’s it.

काका- हो ठीक आहे ना मग. इतकं चिडायला आणि defensive व्हायला काय झालं? मी फक्त प्रपोजलबद्दल विचारतोय. कारण ती commitment असेल.

तेजस- कसलं प्रपोजल बाबा? मी तिला कोणतंही प्रपोजल दिलेलं नाहीये.

काकू- काय गं आर्या? हा काय म्हणतोय?

आर्या- तेजस, प्रपोजल मी दिलं आहे. आठवतंय ना तुला?

तेजस- (चिडून) मला असं काही प्रपोजल वगैरे आठवत नाहीये आर्या.

आर्या- तेजस, तुला आठवत नाही? मी तुला दगडातून तुझी मूर्ती बनवायचं प्रपोजल दिलं आणि तू ते मान्य पण केलं होतंस.

तेजस- (आश्चर्याने) ओह… तुम्ही त्या प्रपोजलबद्दल बोलताय?

आर्या- काकू, ह्याला वाटलं मी त्याला लग्नाचं प्रपोजल देते आहे. म्हणूनच इतका घाबरला तो. पण काकू, मी इतकी वाईट आहे का की माझ्या लग्नाच्या प्रपोजलबद्दल विचार करून एखाद्याला भीती वाटावी?

काकू- काहीही काय? अगं नक्षत्रासारखी आहेस दिसायला. ज्या घरी जाशील तिथे आनंद निर्माण करशील. तुझ्या लग्नाच्या प्रपोजलवर उड्या पडतील. कोणी घाबरेल कशाला?

काका- हां तर तेजस, ही मूर्ती करायची म्हणजे तुला नियमित आर्याच्या स्टुडिओमध्ये जाऊन अनेक तास बसावं लागेल. ऑफिस सांभाळून तुला ते जमणार आहे का? नाहीतर उगाच commitment करू नको.

काकू- नाही कसं जमणार? जमवावंच लागेल तुला. काय?

तेजस- हो आई, जमवतो मी. आता तयार होऊ? मला ऑफिसला जायचं आहे.

आर्या- अरे वा, ग्रेट. मग मला विल्सन क्लबला सोडशील on the way?

तेजसने तिला एक dirty look दिला आणि तो आत गेला. आर्या काका आणि काकूंशी गप्पा मारू लागली.

मुग्धा सर्व आवरून ऑफिसला निघाली. गेटजवळ येऊन रिक्षाची वाट पाहू लागली. दहा मिनिटं वाट बघूनही एकही रिक्षा आली नाही. मुग्धा गल्लीतून बाहेर येऊन हायवेवर उभी राहिली. वीस मिनिटं वाट बघितल्यावर तिला कोणीतरी सांगितलं की आज रिक्षांचा संप आहे. मग तिने कॅब बुक करायला ॲप उघडलं. तिथे कॅब्स उपलब्ध नव्हत्या आणि होत्या त्या अर्ध्या तासाने आणि चौपट भाडं द्यायची तयारी असल्यास येणार होत्या. मुग्धाला कळत नव्हतं की आता ऑफिसला कसं जायचं!

तेजस आणि आर्या त्याच्या गाडीतून निघाले.

तेजस- तुला माझा रुमाल कसा मिळाला?

आर्या- मी काढला तुझ्या खिशातून.

तेजस- अरे वा. म्हणजे चोरीची कला पण येते तर तुला? आणि का बरं काढलास माझा रुमाल?

आर्या- आज तुझ्या घरी येऊन परत करण्यासाठी.

तेजस- पण माझ्या घरी यायची इतकी काय हौस?

आर्या- माझ्या प्रपोजलचा तू सिरियसली विचार करावास म्हणून.

तेजस- मी त्याला केव्हाच हो म्हणालो आहे, आर्या.

आर्या- पण मी त्या प्रपोजलसाठी आलेच नव्हते.

तेजस- मग कसलं प्रपोजल?

आर्या- माझं प्रपोजल तुझ्या शेजारी ह्या गाडीत बसलं आहे, तेजस.

आर्या जोरात हसली.

तेजस- आर्या, this is not funny. तू उगाच माझ्या घरी येऊन complications निर्माण केलेस. ते मला आवडलं नाहीये.

आर्या- मग तू माझ्या घरी ये. एकदम simple आणि sorted असेल सगळं. येतोस?

तेजस- तू जरा चक्रम आहेस का, आर्या?

आर्या- हे बरोबर बोललास. माझी आई पण मला चक्रम म्हणते.

तेजस- तू impossible आहेस.

आर्या- तेजस, एक मिनिट गाडी जरा मागे घेशील?

तेजस- काय झालं?

आर्या- अरे मेडिकल शॉप गेलं एक. मला painkiller घ्यायची आहे. दात खूप दुखतोय.

तेजस- पुढे घे ना मग.

आर्या- नको. Pain खूप वाढलं आहे अचानक. प्लीज, मागे घे ना गाडी.

तेजसने गाडी बाजूला थांबवली आणि रिव्हर्स घेऊ लागला. एका ठिकाणी आल्यावर आर्या म्हणाली-

आर्या- बस, इथेच थांबव.

तेजसने गाडी थांबवली.

आर्या- मी आलेच.

आर्या गाडीतून उतरली. रस्त्यात तिच्या समोर थोड्या लांब ऑफिसला कसं जायचं ह्या विवंचनेत असलेली मुग्धा उभी होती. आर्याने मुग्धाला उभी असलेली बघूनच तेजसला गाडी रिव्हर्स घ्यायला लावली होती.

आर्या मुग्धाकडे गेली.

आर्या- हाय मुग्धा. ऑफिसला निघाली आहेस?

मुग्धा- हो.

आर्या- अगं, पण रिक्षांचा संप आहे आज.

मुग्धा काही बोलली नाही. आर्याला समोर बघून तिच्या डोक्यात तिडीक गेली होती.

आर्या- तू माझ्याबरोबर ये. मी तुला सोडते.

मुग्धा- नको. मी करते manage.

आर्या- काय manage करणार आहेस? वेडेपणा करू नको. नाहीतर आज बिनपगारी रजा होईल. चल पटकन.

आर्याने मुग्धाचा हात धरून तिला नेऊ लागली. थोडं पुढे आल्यावर मुग्धाला तेजसची गाडी दिसली. ती बघून मुग्धाचा वेग कमी झाला. आर्या तिला ओढत होती.

दोघी गाडीजवळ आल्या. आर्याने गाडीचं मागचं दार उघडलं आणि मुग्धाला बसायला सांगितलं. मुग्धा रागात गाडीत बसली. आर्या पुढे बसली आणि तेजसला म्हणाली-

आर्या- बघ, मी काय surprise आणलं आहे तुझ्यासाठी? तुला आवडेल ही खात्री आहे.

मागे बसलेली मुग्धा बघून तेजसला प्रचंड धक्का बसला.

तेजस- मुग्धा… तू?

आर्या- हो, मुग्धा. आवडलं ना surprise? मला माहीतच होतं.

तेजस मागे वळून मुग्धाकडे बघत होता.

आर्या- आता चालणार आहेस की तिलाच बघत बसणार आहेस, तेजस?

तेजसने गाडी सुरू केली. त्याला rear-view mirror मध्ये संतापलेली मुग्धा दिसत होती. डावीकडच्या आरशात हसत असलेली आर्या दिसत होती. पुढे ट्रॅफिकने फुललेला, त्याच्या डोक्यातील विचारांच्या गर्दीसारखी गर्दी असलेला रस्ता होता, ज्यातून मार्ग काढणं आता प्रत्येक पावलावर कठीण होणार होतं!

क्रमशः

पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग २५)

सर्व भाग एकत्र लिंक- गुंतता हृदय – सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “गुंतता हृदय….(भाग २४)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!