गुंतता हृदय ही मराठी दीर्घकथा मंदार जोग

तेजसने गाडी सुरू केली. त्याला रिअर व्ह्यू मिररमध्ये संतापलेली मुग्धा दिसत होती. डावीकडल्या आरशात हसत असलेली आर्या दिसत होती. पुढे ट्रॅफिकने फुललेला, त्याच्या डोक्यातील विचारांच्या गर्दीसारखी गर्दी असलेला रस्ता होता, ज्यातून मार्ग काढणं आता प्रत्येक पावलावर कठीण होणार होतं!

वाटेत आर्याला drop केल्यावर मुग्धा पुढल्या सीटवर येऊन बसली. तेजस रस्त्यावर लक्ष ठेवून बोलू लागला.

तेजस – कशी आहेस मुग्धा?

मुग्धा – मी मस्त आहे एकदम.

तेजस – हे बघ, काल रात्री जे झालं ना….

मुग्धा – तेजस…. प्लीज, आपण हा विषय इथेच थांबवूया का? मला तुमच्याबद्दल काहीही तक्रार नाहीये. राग तर अजिबात नाहीये. मग कोणतंही justification किंवा कारण द्यायची गरजच नाहीये. ह्यापुढे तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा आणि मला माझ्या पद्धतीने जगू द्या.

तेजस – हे बघ मुग्धा, मुळात इतकं रागवायची गरजच नाहीये.

मुग्धा – पटलंय की मला ते. मी मूर्ख आहे. उगाच मनाला लावून घेते काही गोष्टी, ज्यांची गरजच नाहीये. पटलंय मला हे.

तेजस – मुग्धा, तू ओव्हररिऍक्ट करते आहेस. मी समजावू शकतो नक्की काय झालं ते.

मुग्धा – नाही तेजस. काय झालं ते मी बघितलं आहे. काल रात्री आणि आज सकाळी पण. त्या मध्ये पण काय काय झालं असेल. So तुम्ही मला काय झालं हे सांगायची गरज नाहीये. तुम्ही जे मला सांगाल ते जे झालं, ते का झालं ह्याचं कारण असेल आणि मी आधीच म्हणाले आहे की आता कोणतंही कारण द्यायची गरज उरलेली नाहीये.

तेजसने त्याचा डावा हात तिच्या हातावर ठेवला आणि तेजस म्हणाला—

तेजस – मुग्धा, प्लीज यार. निदान मी काय सांगतो ते ऐकून तर घे.

मुग्धा – तेजस, माझा हात सोडा. प्लीज.

तेजस – मी काय सांगतोय ते ऐकते आहेस का तू?

मुग्धा – आणि मी काय सांगते आहे ते तुम्ही ऐकलं का? माझा हात सोडा… प्लीज.

तेजसने तिचा हात सोडला. तो जाम वैतागला होता.

तेजस – तुम्ही मुली म्हणजे खरोखर अशक्य असता.

मुग्धा – आम्ही मुली? अच्छा, म्हणजे बऱ्याच मुलींचा अनुभव दिसतोय. छान.

तेजस – मुग्धा, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? काहीही काय बोलतेस.

मुग्धा – बरं, मी वेडी आहे. मान्य. कशाला करता ह्या वेड्या मुलीशी मैत्री? अजून आहेत की अनेक मस्त, हुशार आणि modern मुली आर्यासारख्या. त्यांच्याशी करा मैत्री.

तेजसने रागाने गाडी थांबवली. मुग्धाचा चेहरा दोन्ही हातांत धरून तो म्हणाला—

तेजस – हे बघ मुग्धा, ही नाटकं जरा बंद कर आणि माझं ऐकून घे.

मुग्धा – (शांतपणे) तेजस, आपण ऑफिसच्या गेटजवळ आहोत. नीट बसा, प्लीज.

ते ऐकून तेजस दचकून लांब झाला. ते खरंच ऑफिसच्या इमारतीच्या गेटजवळ होते. तेजसने शांतपणे गाडी आत नेली. ड्रायव्हरला चावी सुपूर्द करून दोघे निघाले.

लिफ्टमध्ये कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. ऑफिसात दोघे आपापल्या डेस्कवर जाऊन बसले. तेजस जाम वैतागला होता आणि मुग्धा डिस्टर्ब होती. दोघांचंही मन कामात लागत नव्हतं. तेजसने मुग्धाला मेसेज केला.

तेजस – ऐकणार का मी काय सांगतो आहे ते?

मुग्धाने रिप्लाय दिला.

मुग्धा – मी कामात आहे.

तेजस – काय काम आहे आज?

मुग्धा – माझं रोजचं काम.

तेजस – ते रोजचं असतं. पण आज गैरसमज दूर करणं हे जास्त महत्त्वाचं काम आपल्या समोर आहे.

मुग्धा – तेजस, प्लीज मेसेज नका करू. मला काम करू दे.

तेजस – मी मेसेज करणार. जोवर तू माझं ऐकून घेत नाहीस तोवर मेसेज करणार.

मुग्धाने वैतागून फोनचं नेट कनेक्शन बंद केलं. ते लक्षात आल्यावर तेजस म्हणाला—

तेजस – मी असा हार नाही मानणार, मुग्धा.

असं म्हणून त्याने फुलांचा एक मोठा बुके ऑर्डर केला आणि तो ऑफिसात मुग्धाला पाठवायला सांगितला. मग बुके येईपर्यंत तो रिसेप्शन एरियामधील कॅमेऱ्याचं फुटेज स्क्रीनवर बघत होता. बुके घेऊन माणूस आला. रिसेप्शनिस्टने मुग्धाला बोलावून घेतलं. तो बुके पाहून मुग्धा चकित झाली. त्यावर फक्त “सॉरी” लिहिलेली नोट होती. मुग्धा बुके घेऊन आत गेली.

तेजसने इंटरकॉमवर तिला फोन केला.

मुग्धा – हेलो…

तेजस – कसा वाटला बुके? आता माफ करणार ना? आणि ते पण मी न केलेल्या चुकीसाठी?

मुग्धा – प्लीज, मी काम करू का?

तेजस – कर ना. पण आधी राग गेला हे मान्य कर.

मुग्धा – मी आधीच म्हणाले आहे की मला कसलाच राग वगैरे नाहीये. So ह्या बुकेची वगैरे खरंच गरज नव्हती. आता मला प्लीज काम करू द्या.

मुग्धाने फोन कट केला. एक नजर बुकेकडे बघितलं. त्याचा वास घेतला आणि ती कामाला लागली.

तेजसच्या घरी दांडेकर काका आणि काकू बोलत होते.

काकू – काय हो, आर्या कशी वाटते मुलगी?

काका – छान आहे. हुशार आहे. दिसायलाही चांगली आहे.

काकू – तेजसला साजेशी वाटते का?

काका – मला वाटतं ते आपण तेजसवर सोपवावं. तो आता मोठा आहे. म्हणजे खरं तर लग्नाचं वय उलटून गेलंय, असं काही वर्षांनी म्हणता येईल इतका मोठा आहे तो. त्यामुळे त्याचे निर्णय त्यालाच घेऊ दे. आपण फक्त सुचवायचं.

काकू – हो. मी पण तेच म्हणते आहे ना. आपण फक्त सुचवायचं.

काका – ठीक आहे. बोल तू त्याच्याशी.


तेजसच्या केबिनमध्ये राधिका आली होती. दोघे कामाचं बोलत होते. ते झाल्यावर काही कागदांवर तेजसने सह्या केल्या आणि राधिका निघाली. मध्येच मागे वळून म्हणाली—

राधिका – आर्या कशी वाटते, तेजस?

तेजस – म्हणजे?

राधिका – म्हणजे ती artist आहे. तुझी पण मूर्ती बनवणार आहे ना? So मी विचारते आहे की तुला तिच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे का? बाकी काही नाही.

तेजस – हम्म… आहे म्हणून तर तयार झालो ना.

राधिका – तसं नाही. कधी कधी अंदाज चुकतात.

मग तेजसच्या समोरच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या मुग्धावर बोट ठेवून राधिका म्हणाली—

राधिका – For example, ही तुझी मैत्रीण… I mean तुझ्या मित्राची बायको… is a wrong hire. तो बुके बघ तिच्या बाजूला. आता ऑफिसात पण तिला बुके वगैरे येऊ लागले तर ते culturally खूप वाईट आहे कंपनीच्या दृष्टीने. तुला काय वाटतं?

तेजस – मला तरी बुकेमुळे culture खराब होतं असं वाटत नाही.

इतक्यात तेजसचा इंटरकॉम वाजला. तेजसने तो स्पीकरवर टाकला.

तेजस – हेलो…

दांडेकर काकू – तेजस, मी आणि बाबा आत्ता बोलत होतो. आम्हाला वाटतं की आर्या ही खूप छान मुलगी आहे तुझ्यासाठी. पण तू विचार कर आणि निर्णय घे. पण आम्हाला आर्या खूप छान वाटली आहे.

हे राधिकाने ऐकलं आणि ती खुश झाली. तेजसने घाबरून स्पीकर बंद करून फोन हातात घेतला आणि तो बोलू लागला.

तेजस – आई, काहीही काय? तुम्हाला दिसेल ती मुलगी तुम्ही माझ्यासाठी पसंत का करता? Leave it to me. Okay?

काकू – अरे, ओके. इतकं चिडायला काय झालं? फक्त सुचवलं तर?

तेजस – सॉरी आई. पण प्लीज… हा विषय नको ना.

काकू – ठीक आहे. पण तू निर्णय मात्र लवकर घे.

तेजस – हो आई. मी लवकरच कळवतो माझा निर्णय तुम्हाला.

तेजसने फोन कट केला.

राधिका – दांडेकर मॅडम आणि चेअरमन सरांचा choice खरंच चांगला आहे, तेजस. तू तुझा choice पण त्याच लेव्हलचा ठेवशील अशी माझी खात्री आहे.

इतकं बोलून राधिका एक स्माईल देऊन निघून गेली. तेजस टीव्हीवर दिसत असलेल्या मुग्धाकडे बघून म्हणाला—

तेजस – माझा choice पण उत्तमच आहे आणि मी ते एक दिवस सर्वांना पटवून देईन.


संध्याकाळी मुग्धा ऑफिसातून निघाली. ती लिफ्टमध्ये शिरली. त्या लिफ्टमध्ये तेजस होता. त्याने तिला पाहून एक स्मित दिलं. मुग्धाने त्याला इग्नोर केलं.

लिफ्ट लॉबीमध्ये आली. दोघे लिफ्टमधून बाहेर आले. मुग्धा पुढे आणि तेजस मागे असे चालू लागले. पोर्चमध्ये तेजसची गाडी उभी होती.

तेजसने मुग्धाला जोरात हाक मारली.

तेजस – हाय मुग्धा.

आजूबाजूला इतर लोक असल्याने त्याला उत्तर न देता जाणं शक्य नसल्याने मुग्धाने मागे वळून बघितलं. तेजसने तिथूनच तिला हात केला आणि जोरात म्हणाला—

तेजस – तू मगाशी जो manpower plan घेऊन आली होतीस ना? तो आपण गाडीत discuss करूया. ये पटकन.

मुग्धाला नाही म्हणणं विचित्र वाटलं. ती गाडीत जाऊन बसली. गाडी निघाली.

तेजस – मुग्धा, आता एक शब्द न बोलता ऐकून घे.

मुग्धा – कालच्या प्रकाराबद्दल असेल तर काहीच बोलायची किंवा ऐकायची गरज नाहीये.

तेजस – हे बघ, मी टेरेसवर उभा होतो आणि आर्या मागून येऊन मला बिलगली. आता मला स्वप्न पडलं होतं का की आर्या तिथे येईल म्हणून? मला वाटलं तूच आहेस. So मी तसाच उभा राहून बोलत राहिलो.

मुग्धा – हे तुम्ही मला आधीच सांगितलं आहे की तुम्हाला इतक्या मुलींच्या स्पर्शाची सवय आहे की कोणता स्पर्श कोणाचा हे पण लक्षात येत नाही. मला कळलंय ते. अजून काही बोलायचं आहे की दुसऱ्या विषयावर बोलूया आपण?

तेजस – (चिडून) मुग्धा, हे जरा अति नाही का होतंय? I mean, मी तुला समजावायचा प्रयत्न करतोय आणि तू भलत्याच tangent वर जाते आहेस.

मुग्धा – मी मान्यच करते ना की मी एक अक्कलशून्य आणि मूर्ख मुलगी आहे म्हणून? मग विषयच संपला. ह्यापुढे आपण एकमेकांकडून काही अपेक्षाच ठेवायच्या नाहीत की मग अपेक्षाभंगाचं दुःख व्हायचा प्रश्नच उद्भवणार नाही.

तेजसचं डोकं सणकलं होतं. गाडीचा वेग वाढत होता.

इथे राधिकाच्या केबिनमध्ये आर्या येऊन बसली होती. राधिकाने आज दांडेकर काकू काय बोलल्या ते तिला सांगितलं होतं.

राधिका – So आर्या, तू बरोब्बर track वर आहेस. फक्त ही मुग्धा कुठून मध्येच आली ते कळत नाहीये. तिला हटवायचा मी प्रयत्न केला, पण चेअरमन साहेबांनी माझा प्लॅन फ्लॉप केला. पण आर्या, तू आता मागे हटू नको. जर नीट खेळलीस तर काही महिन्यांत तेजसबरोबर लग्न करून दांडेकर इंडस्ट्रीची मालकीण बनशील.

आर्या – मावशी, आपला रस्ता एक असला तरी destinations वेगळी आहेत.

राधिका – म्हणजे?

आर्या – माझं destination आणि रस्ता दोन्ही फक्त तेजस आहेत. मग त्याची ती इंडस्ट्री, पैसा वगैरे नसला तरी मला फरक पडत नाही. लग्न वगैरे पण फार महत्त्वाचं नाही. मी माझ्यासाठी भरपूर पैसे कमावते. फक्त मला तेजस माझा म्हणून हवाय. त्याला माझ्यात कोणी मोहिनी, मुग्धा दिसलेली मला चालणार नाही. आणि म्हणून मग जी कोणी आमच्या दोघांच्या मध्ये येईल, तिला मी काहीही करून बाजूला सारणार.

राधिका – अजून तरुण आहेस ना म्हणून बोलते आहेस असं. लग्न नको काय? तुला तेजस फक्त तुझा व्हायला हवा आहे ना? मग लग्न हा एकच मार्ग आहे. कारण लग्न फक्त एकीशीच करू शकतो माणूस. So आर्या, आपलं ध्येय आणि रस्ता दोन्ही एक आहेत. फक्त तू मध्ये कुठेतरी हरवू नको. लक्ष्यावर फोकस ठेव. मी तुझ्या बरोबर आहे.

आर्या – मावशी, मी अजून convinced नाहीये लग्नासाठी. पण जर तोच उपाय असेल तेजसला फक्त माझा करायचा, तर मी ते पण करेन. पण सध्या मी त्याची मूर्ती बनवायचं काम सुरू करणार आहे. आहे का तेजस ऑफिसात? भेटून येते.

राधिका – नाही. तो मुग्धाच्या मागे गेला मगाशीच. मी पाहिलं ना ह्या स्क्रीनवर.

राधिका आणि आर्या दोघींच्या चेहऱ्यावर प्रचंड द्वेष आणि राग जमा झाला होता.


इथे तेजसची गाडी हायवेला लागली होती. स्पीडोमीटर शंभर ते एकशे चाळीसच्या मध्ये नाचत होता. मुग्धा तेजसला म्हणाली—

मुग्धा – आपण कुठे जातोय तेजस?

तेजस – माहीत नाही.

मुग्धा – तेजस, प्लीज मला घरी सोडा. सिटी केव्हाच मागे पडली आहे.

तेजस – तू मला समजून घे, मग आपण मागे जाऊ. सध्या माझं डोकं ताळ्यावर नाहीये.

मुग्धा – तेजस, प्लीज गाडी हळू चालवा. मगाशी दोन वेळा अॅक्सिडेंट होता होता वाचलो आपण.

तेजस – मुग्धा, तुझा माझ्यावर विश्वास आहे का?

मुग्धा काही न बोलता बसून राहिली. गाडीचा वेग आणखी वाढला.

तेजस – मुग्धा, माझ्यावर विश्वास ठेव. उद्या मी मेलो ना, तरी तुझ्यासाठी परत येईन.

हे ऐकून मुग्धाला हेच वाक्य प्रशांत म्हणाला होता ते आठवलं. आणि हे वाक्य त्याने म्हटल्यावर त्यांच्या गाडीला लोणावळ्यात एक लहानसा अपघात झाला होता, हे आठवून मुग्धाच्या काळजात चर्र झालं.

मुग्धा – काय म्हणालात तेजस? हे बघा… ऐका… माझा आहे विश्वास तुमच्यावर. पण प्लीज स्पीड कमी करा.

तिचं हे वाक्य ऐकून तेजस खुश झाला. त्याने रस्त्यावरची नजर हटवून मुग्धाकडे बघितलं. त्याच वेळी त्यांच्या गाडीपासून काही अंतरावर असलेल्या एका टेम्पोच्या दिशेने त्यांची गाडी ताशी दीडशे किलोमीटर वेगाने जात होती.

तेजस आणि मुग्धा एकमेकांच्या डोळ्यांत हरवले होते.

क्रमशः

© मंदार जोग

सर्व भाग एकत्र लिंक- गुंतता हृदय – सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “गुंतता हृदय….(भाग २५)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!