…..लॉबीच्या मागच्या बाजूला असलेल्या दोन प्रशस्त लिफ्ट्सपैकी एका लिफ्टचं दार धरून एक सिक्युरिटी गार्ड उभा होता. दांडेकर काकांना बघून त्याने कडक सल्यूट मारला. मुग्धा आणि काका लिफ्टपर्यंत आले. काकांनी हाताने तिला पुढे जायची विनंती केली. मुग्धा लिफ्टमध्ये आली. काकाही आत आले. लिफ्ट निघाली. मुग्धाला लिफ्टच्या बाहेर लिहिलेला “Directors Only” हा बोर्ड आठवत होता. दांडेकर काका तिच्याकडे कौतुकाने बघत होते.
लिफ्टमधून उतरून दोघे ऑफिसात आले. तिला दांडेकर काकांबरोबर हसत-खेळत येताना बघून सिक्युरिटीसकट रिसेप्शनिस्टला आश्चर्य वाटलं.
ऑफिसच्या प्रचंड लॉबीमध्ये आल्यावर काका म्हणाले—
दांडेकर – मुग्धा, मी बोलावतो तुला थोड्या वेळाने.
मुग्धा – ओके सर.
दांडेकर – सर? काका sounds better.
मुग्धा – (हसून) ओके… काका…
मुग्धा त्यांचा निरोप घेऊन आपल्या डेस्कवर गेली आणि दांडेकर काकांची, बाहेर सोनेरी अक्षरात “Chairman” असा बोर्ड असलेली प्रचंड केबिन त्यांच्या पीएने हलके, अदबीने उघडली. दांडेकर काका आपल्या डेस्कवर बसले.
त्यांना आणि मुग्धाला एकत्र येताना तेजसने सीसीटीव्हीवर पाहिलंच होतं. तेजसने फोन उचलला आणि बाबांचं एक्स्टेन्शन दाबलं.
दांडेकर – बोल तेजस.
तेजस – गुड मॉर्निंग, old fox.
दांडेकरांचं वय झालेलं असलं तरी त्यांची बुद्धी, विचार करायची तसेच निर्णय घ्यायची क्षमता, काही क्षणांत माणसाला स्कॅन करून ओळखायची पात्रता आणि त्यांचा दबदबा अजूनही तसाच होता. त्यांच्या हुशारीचं कौतुक म्हणून किंवा आदर म्हणून तेजस कधीतरी त्यांना old fox अर्थात म्हातारा कोल्हा म्हणत असे.
दांडेकर – काय चाललंय तेजस? रेनबो केमिकल्सची टेकओव्हर ऑफर रिव्हाइज कर. त्यांची पनवेलजवळ जमीन आहे. तिचे भाव येत्या दहा वर्षांत पाचपट होतील. ह्या डीलमध्ये प्लांटबरोबर ती जमीनही आपल्याला बाजारभावाने मिळते आहे. तू बगाडियाशी पर्सनली बोल आणि वीस कोटी वाढवून फायनल ऑफर दे. नाही बधला तर अजून पाच कोटी वाढव. आज क्लोज होईल डील.
तेजस – मी आत्ताच त्याला दहा कोटी एक्स्ट्रा ऑफर करून डील क्लोज केली आहे. तेच सांगायला फोन केला.
दांडेकर – ओह. I like it, young fox.
तेजस – (हसून) ओके old fox. Thanks.
दांडेकर – आता लिफ्टमध्ये मुग्धा भेटली. छान वाटलं तिला इथे भेटून.
ते ऐकून तेजसच्या डोक्यात अचानक शंभर ट्यूबलाईट चमकल्या. तो खुश होत म्हणाला—
तेजस – हो बाबा. नशीब तुम्ही आज आलात. काही दिवसांनी आला असता तर भेट झाली नसती तुमची.
दांडेकर – का?
तेजस – तिची ट्रान्स्फर होणार आहे ना पुण्याला.
दांडेकर – ओह. Okay.
तेजस – खरं तर तिला ते फार convenient होणार नाही. I mean, being a lady, a mother, मुलाची शाळा चेंज वगैरे जरा difficult होईल असं मला वाटतं. पण राधिका is right. आपली एचआर पॉलिसी का बदलायची आपण? हवं तर ती दुसरी नोकरी बघेल.
दांडेकर – तेजस, पॉलिसी, नियम हे माणसांसाठी असतात. शिस्तीसाठी असतात. उत्पादनक्षमता वाढावी म्हणून असतात. पण ते इम्प्लिमेंट करायला माणूस असायला हवा ना? मी ही कंपनी माझ्या माणसांच्या बळावर मोठी केली आहे. एम्प्लॉयी खुश नसतील तर कंपनीची ग्रोथ थांबेल. मी बोलतो राधिकाशी. आणि मुग्धा काही क्रिटिकल रिसोर्स विथ स्पेशल स्किल्स नाहीये. ती ज्या कामासाठी जाणार असेल ते काम पुण्यात एखाद्याला ट्रेन करून करता येईल.
तेजस – Right बाबा. पण मी हे तुम्हाला सांगितलं आहे हे राधिकाला सांगू नका. आणि हे त्या बिचाऱ्या मुग्धाला तर अजून माहीतच नाहीये.
दांडेकर – I will take care. तू रेनबोच्या agreement मागे लाग. अॅडव्होकेट लालवानींना ड्राफ्ट बनवायला सांग लगेच. बगाडिया जोवर सही करत नाही तोवर माझा त्याच्यावर विश्वास नाही.
तेजस – ओके बाबा. बाय.
दोघांनी फोन कट करून परत फोन लावले. दांडेकर काकांनी राधिकाला बोलावून घेतलं आणि तेजसने मुग्धाला.
मुग्धा तेजसच्या केबिनमध्ये आली. तेजस सिरीयस चेहरा करून म्हणाला—
तेजस – बस मुग्धा.
मुग्धा – काय झालं?
तेजस – बस. मी सांगतो.
मुग्धा जरा टेन्स होऊन बसली.
तेजस – मुग्धा, आपल्या पुण्याच्या ऑफिसात एक अर्जंट व्हेकन्सी आहे. जरा क्रिटिकल आहे. त्यामुळे नवीन माणूस हायर करायला वेळ नाहीये.
मुग्धा ऐकत होती.
तेजस – सो मुग्धा, कंपनीने तुला पुण्याला ट्रान्स्फर करायचा निर्णय घेतलाय. चार दिवसांत तुला पुणे ऑफिसला रिपोर्ट करावं लागेल.
हे ऐकून मुग्धा हादरली.
मुग्धा – काय? पुण्याला ट्रान्स्फर? चार दिवसांत… त… तेजस… अमेयची शाळा… आणि म… मी कशी जाणार पुण्याला तेजस? आय मीन… मला मान्य आहे की ऑफिसला अर्जन्सी आहे… पण… म… मी…
मुग्धाला काय बोलावं सुचत नव्हतं. डोळ्यासमोर अंधार दाटल्यासारखं वाटत होतं.
तेजस – हा असा आपला संवाद खरोखर होणार होता. पण आता नाही होणार.
मुग्धा – (आश्चर्याने) म… म्हणजे?
तेजस – म्हणजे तुझ्या मित्राने तुझ्या बॉसवर मात केली आहे. बॉसने तुझी ट्रान्स्फर approve केली पण मित्राने त्यात विघ्न आणलं आहे.
मुग्धा – हे तुम्ही काय बोलताय तेजस? मला काहीच कळत नाहीये.
मग तेजसने राधिकाने बनवलेला तिच्या ट्रान्स्फरचा प्लॅन आणि आज त्याने दांडेकर काकांशी बोलून तो कसा हाणून पाडला ह्याची कथा तिला सांगितली. ते ऐकून मुग्धा म्हणाली—
मुग्धा – Thanks तेजस. तुम्ही माझ्यासाठी हे केलंत म्हणून. मला खरंच अशक्य होतं इतक्या short notice वर पुण्याला जाणं.
तेजस – आणि मला अशक्य आहे तुला ह्या ऑफिसात न बघणं.
मुग्धा काहीच न बोलता खाली बघत उभी राहिली. तिला कालचा दिवस, तेजस तिच्या घरी आल्यावर त्यांची झालेली जवळीक आठवत होती. त्या आठवणीने तिच्या अंगावर रोमांच आले. ती थिजून उभी होती.
तेजस – काय झालं?
मुग्धा – काही नाही.
तेजस – हे बघ, तू अजिबात प्रेशर घेऊ नको, ओके? मला तुझ्याबद्दल जे वाटतंय ते तुलाही माझ्याबद्दल वाटावं हा माझा आग्रह नाहीये आणि कधीच नसेल. आपण चांगले मित्र आहोत आणि राहू. ओके ना?
मुग्धा – हम्म…
तेजस – आणि आज मी तुझं इतकं मोठं काम केलं, त्याची पार्टी कधी देणार मला?
मुग्धा – तुम्ही सांगाल तेव्हा.
तेजस – मग आज? स्काय लाउंज?
मुग्धा – ते कुठे आहे? मी आधी गेलेली नाही तिथे.
तेजस – तू त्याची काळजी करू नको. मी तुला नेतो. पण तिथे जरा वेस्टर्न ड्रेस कोड आहे. तुझ्याकडे आहेत का वेस्टर्न ड्रेसेस? नाहीतर आपण जागा चेंज करू.
मुग्धा – आहेत.
तेजस – ठीक आहे. शार्प आठ वाजता मी तुला पिकअप करतो.
मुग्धा – हम्म… आणि Thanks तेजस.
मुग्धा एक स्माईल देऊन गेली. तेजस ती गेली त्या दिशेने बघत ती आज रात्री वेस्टर्न ड्रेसमध्ये कशी दिसेल हे imagine करू लागला.
दांडेकर काकांच्या केबिनमध्ये जनरल एचआर रिव्ह्यू झाल्यावर राधिका manpower plan प्रेझेंट करत होती. दांडेकर काका black कॉफी sip करत स्लाईड बघत होते. त्यात त्यांना पुण्यातील ती पोझिशन, ज्यासाठी मुग्धाला राधिकाने निवडलं होतं, ती दिसली आणि त्यापुढे ‘मुग्धा साठे – to be transferred’ असं लिहिलेलं होतं. राधिका पुढली स्लाईड दाखवणार, त्या आधी दांडेकर म्हणाले—
दांडेकर – राधिका, हे काय?
राधिका – काय सर?
दांडेकर – ही मुग्धा साठे – to be transferred का?
राधिका – कारण तशी requirement आहे सर.
दांडेकर – असेल. पण म्हणून इथून पुण्याला रिसोर्स ट्रान्स्फर करायची काय गरज आहे? पुण्याच्या ऑफिसात घरत आहे ना? तो हे काम सहज करेल. त्याला पगार वाढवून दे. त्याला गरज आहे आता. तिसरी मुलगी झाली आहे त्याला गेल्या महिन्यात. आणि त्या मुग्धालाही ट्रान्स्फर त्रासदायक होईल असं वाटतं मला.
राधिका – पण सर, आपली policy सांगते की…
दांडेकर – राधिका, ही कंपनी, इथल्या policies मी बनवल्या आहेत. त्या लोकांना चांगलं work environment आणि कंपनीला आनंदी स्टाफ मिळावा म्हणून आहेत. आणि मी सांगत असलेलं solution कंपनी आणि दोन्ही employees च्या फायद्याचं आहे. आपल्या policy ला धरून आहे. काय वाटतं तुला?
राधिका – हो सर… पण…
दांडेकर – Next स्लाईड, प्लीज.
राधिका – ओके सर.
राधिकाने तिचं presentation सुरू ठेवलं. Old fox दांडेकर काका त्यांच्या सोनेरी चष्म्यातून त्या स्क्रीनवर अशा अनेक गोष्टी बघत होते, ज्यांची कल्पना राधिका, तेजस आणि मुग्धा आज करू शकत नव्हते. त्यांना दिसत असलेल्या चित्रात मुग्धाचा चेहरा मोठी जागा व्यापून होता.
राधिकाचं presentation झाल्यावर राधिका गेली आणि दांडेकर काकांनी काकूंना फोन लावला आणि म्हणाले—
“तुला ती मुलगी आठवते का? बंगलोरमध्ये आपल्या गाडीखाली येणार होती ती?…..”
तेजसने advocate लालवानींना agreement बद्दल सांगून फोन खाली ठेवला. आज त्याने एक मोठी कंपनी acquire केली होती. मुग्धाची पार्टी हे मुग्धाला बरोबर न्यायला एक कारण होतं. खरं तर त्यालाच तिला पार्टी द्यायची होती. आजच्या ह्या यशाची पार्टी. खरं तर त्याला मुग्धाबरोबर फिरायला, तिला भेटायला कोणत्याही कारणाची गरज नव्हती. पण मुग्धाला असू शकेल म्हणून त्याने तिच्याकडे पार्टी मागितली होती.
तिला बिचारीला कल्पनाही नव्हती की स्काय लाउंजमध्ये एका बिलात तिचा दहा दिवसांचा पगार खर्च होऊ शकतो. ह्या विचारांनी तेजसला हसू आलं. त्याने मुग्धाला मेसेज केला—
तेजस – आज पैसे घेऊन ठेव हां बरोबर. स्काय लाउंज तसं महाग आहे.
मुग्धा – ओके. बरं झालं सांगितलंत. तसं क्रेडिट कार्ड असतं माझ्याकडे. पण पैसे ठेवेन मी. तुम्ही काळजी करू नका.
तेजस – बघ हं. मी खूप खाणार आहे. आणि थोडी ड्रिंक पण.
मुग्धा – हरकत नाही. तुम्ही एन्जॉय करा.
तेजस – तू घेतेस की नाही ड्रिंक्स?
मुग्धा – नाही.
तेजस – म्हणजे कधी टेस्ट पण केलेलं नाही का?
मुग्धा – नाही. तसं नाही. टेस्ट केलं आहे मी. पण…
तेजस – ओके. मी सहज विचारलं. काय करते आहेस?
मुग्धा – काम. खूप सीव्ही आलेत आपल्या जाहिरातीला रिस्पॉन्स म्हणून. ते sort करते आहे.
तेजस – काय बोअरिंग काम दिलंय तुला राधिकाने? तू एक काम कर. तू इथे ये. माझ्या केबिनमध्ये. मी तुला खूप छान काम देतो.
मुग्धा – काय काम?
तेजस – माझ्या समोर बसून राहायचं.
मुग्धा – आणि?
तेजस – आणि मस्त हसायचं.
मुग्धा – आणि काम काय करायचं?
तेजस – हेच तर काम आहे. कंपनीच्या सीईओचा मूड फ्रेश ठेवायचा. राधिकाला employee ची strength कळत नाही.
मुग्धा – म्हणजे?
तेजस – म्हणजे तुझी strength ते सीव्ही बघणं ही नाहीये. तुझी strength आहे तुझे गहिरे डोळे, तुझे गुलाबी ओठ, तुझी कातिल फिगर, तुझा धुंद सहवास…
मुग्धा – तेजस…. प्लीज मला काम करू दे ना…
तेजस – तू कर ना काम. मी मला वाटतं ते मेसेज करून ठेवतो. तुला वेळ मिळाला की वाच.
मुग्धा – असं नका ना बोलू, प्लीज…
तेजस – कसं?
मुग्धा – हेच जे वर म्हणालात ते.
तेजस – का गं? राग आला का? सॉरी हं. मला माहीत नव्हतं तुला राग येईल हे वाचून.
मुग्धा – तसं नाही तेजस.
तेजस – पण मी खोटं बोललो का? जे आहे ते सांगितलं.
मुग्धा – (लाजून) काय?
तेजस – परत ऐकायचं?
मुग्धा – नाही. प्लीज.
तेजस – काय झालं?
मुग्धा – काही नाही. प्लीज तेजस, मला काम करू द्या ना.
तेजस – मग तू पण माझ्या आठवणीतून जा ना. काय होतं माहीत आहे का?
मुग्धा – काय?
तेजस – मी असा काम करत असतो आणि अचानक तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. मग माझं कामातून लक्ष उडतं. मग तू समोर प्रत्यक्ष दिसू लागतेस. मग मी उठून तुझ्या जवळ येतो…
मुग्धा – (प्रचंड लाजत) तेजस, मी डेटा बंद करते आहे. खूप वाईट आहात तुम्ही. बाय. मला काम करू दे.
तेजसने नंतर पाठवलेले दोन मेसेज डिलिव्हर झाले नाहीत. तेजसला खूप हसू आलं.
तेजस – (स्वतःशी बोलला) मुग्धा… तू मला वेडा करणार आहेस…
हे त्याच्या केबिनच्या दारातून आत येत असलेल्या आर्याने ऐकलं.
आर्या – कोण तुला वेडा करणार आहे माझ्याशिवाय?
तेजस – आर्या, तू?
आर्या – हो. मी. काल म्हणाले होते ना, आज येईन म्हणून. सो आले. कशी दिसते आहे मी ह्या short फ्रॉकमध्ये? आणि सेक्सी. हॉट वगैरे सोडून बोल, कारण ते मला इथे येईपर्यंत किमान पाचशे लोकांच्या नजरेतून कळलं आहे.
तेजसने तिला आपादमस्तक न्याहाळलं. ती खरंच खूप सेक्सी दिसत होती. तेजस बघत होता.
आर्या – तेजस, तुझ्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये ना?
तेजस – नाहीये. का?
ते ऐकून आर्या पुढे आली. तेजसला घट्ट मिठी मारून त्याच्या ओठांना हलकेच चावलं. मग त्याच्या गालाची एक पापी घेऊन म्हणाली—
आर्या – असंच… तू खूप क्युट दिसतो आहेस म्हणून. Hope you don’t mind.
तेजस – समजा मी I do mind म्हणालो, तरी तू गप्प बसणार आहेस का?
ते ऐकून परत आर्याने त्याचा अजून एक किस घेतला आणि म्हणाली—
आर्या – नाही. मी तू “Do it more” म्हणेपर्यंत तुला किस करत राहीन.
तेजस – झालीस ना खुश. आता बस आणि बोल.
आर्या – ह्याने मी काय खुश होणार तेजस? सोड. माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली आहे.
तेजस – काय?
आर्या – मला ना तुझी मूर्ती बनवायची आहे.
तेजस – What?
आर्या – हो तेजस. दगडाची मूर्ती. मी माझ्या हाताने कोरून बनवलेली मूर्ती.
तेजस – ए, तू वेडी आहेस का? माझी मूर्ती काय? म्हणजे माझा पुतळा ना? मी जिवंत आहे अजून.
आर्या – आमच्या फिल्डमध्ये जे जे आकर्षक आहे त्याची आम्ही कदर करतो. तुझी मूर्ती हा माझ्या करिअरमधला एक मोठा टप्पा ठरेल तेजस. मला त्याने फायदा होईल. प्लीज…
तेजस – What is the plan?
आर्या – तुझ्या शेड्यूलप्रमाणे आपण ठरावीक दिवशी ठरावीक वेळ ह्यासाठी देऊ. त्यावेळी तुला माझ्या स्टुडिओमध्ये यावं लागेल. माझ्यासमोर बसून राहावं लागेल. मला माहीत आहे की प्रत्यक्ष तू समोर असताना मी दगडाच्या निर्जीव पुतळ्यावर माझे हात चालवणं हा मूर्खपणा असेल. पण नाईलाज आहे.
आर्या जोरात हसते. तेजस तिला बघत असतो.
तेजस – आर्या, तू ना खरंच देवाने बनवलेला एक युनिक आयटम आहेस.
आर्या – पण तुला आवडते ना?
तेजस काही बोलत नाही.
आर्या – हो म्हण रे. एक हॉट मैत्रीण म्हणून आवडते की नाही मी?
तेजस – तसं नाहीये आर्या…
आर्या – काय नाहीये? मी मैत्रीण नाहीये? की मी हॉट नाहीये? की you hate me?
तेजस – तू अशक्य आहेस.
आर्या – काहीही काय? मी आत्ता इथे तुझ्या केबिनमध्ये पण शक्य आहे…
आर्या परत जोरात हसली. तेजसने डोक्याला हात लावला.
आर्या – तेजस, मी म्हणजे एकदम चालू, फुकट गेलेली, अनेक पुरुषांबरोबर झोपलेली मुलगी वाटत असेन ना तुला?
तेजस – अजिबात नाही. मला ना तू एक मनस्वी, निर्मळ मनाची, खूप क्रिएटिव्ह, confident, सुंदर आणि हो… नक्की good in bed असशील अशी मुलगी वाटतेस.
हे बोलून तेजस हसला. आर्या त्यात सामील झाली.
आर्या – Good in bed हं? I like it.
तेजस – काय?
आर्या – That we both are good in bed and we both know that. मग आज रात्री?
तेजस – ए गप ए. लगेच काय?
आर्या – काय म्हणाले मी? मी विचारलं, आज रात्री काय प्रोग्रॅम आहे? काही करत नसलास तर बाहेर जाऊ. तुझ्या मनात लगेच बेडचे विचार सुरू झाले. बरोबर ना?
तेजस – बेडचे विचार सुरू झाले हे बरोबर. पण आज रात्री शक्य नाही. आज मी आणि मुग्धा डिनरला जातोय.
आर्या – Wow! तू आणि मुग्धा? ऑफिस affair and all?
तेजस – आर्या… आम्ही चांगले मित्र आहोत आणि that’s it.
आर्या – चांगले मित्र आपण पण आहोत. पण तरीही दोघांच्या मनात बेड आहेच ना? फरक इतकाच आहे की मी willing आहे आणि तू अजून तरी willing नाहीयेस. तिच्या बाबतीत तुम्ही दोघे “good friends” willing असू शकता. तेजस, एक सुंदर बाई आणि एक हँडसम पुरुष कधीच फक्त good friends असू शकत नाहीत. त्यांच्यातील अंतराला भीती किंवा संधीचा अभाव ही दोन कारणं असू शकतात. आपल्या बाबतीत तुझ्या मनातली भीती कारणीभूत आहे. तुम्हा दोघांच्या बाबतीत संधीचा अभाव कारण असेल. हरकत नाही. Have fun. मी निघते आता. मला आपण कधीपासून सिटिंग करायची ते कळव, ओके?
तेजस – ओके.
आर्या निघून गेली. तेजस क्षणभर ती काय बोलली ते आठवत होता. मग त्याने मुग्धाला मेसेज केला—
तेजस – मुग्धा, तुला काय वाटतं? एक सेक्सी बाई आणि एक हँडसम माणूस कधी फक्त चांगले मित्र असू शकत नाहीत का?
मुग्धा – हे काय अचानक?
तेजस – उत्तर दे.
मुग्धा – हो, ते चांगले फ्रेंड्स असू शकतात. पण एकमेकांबद्दल त्यांना आकर्षणदेखील असू शकतं. पण ते कधीच मैत्रीची मर्यादा ओलांडत नाहीत.
तेजस – का? ते असं का करत असावेत?
मुग्धा – एकतर भीती किंवा संधीचा अभाव.
तिचं हे उत्तर ऐकून तेजस दचकला. हेच कारण आर्याने पण सांगितलं होतं.
तेजस – Are you serious?
मुग्धा – हो. सिरीयस आणि honest पण.
तेजस – ठीक आहे. रात्री आठ वाजता पिकअप करतो मी तुला. बाय.
मग दिवसभर मुग्धा आणि तेजस काम करत होते. राधिका मुग्धाला तेजसपासून लांब करायला आता काय करता येईल ह्याचा विचार करत होती.
रात्री बरोब्बर आठ वाजता तेजसची गाडी मुग्धाच्या बिल्डिंगसमोर थांबली. तेजसने मुग्धाला फोन केला आणि तो वाट बघू लागला. मुग्धा एक साधीशी cotton साडी नेसून येत असलेली त्याला दिसली. त्याच्या मनात विचार आला की, “स्काय लाउंजमध्ये वेस्टर्न ड्रेस कोड आहे हे सांगूनही मुग्धा आज साडी नेसून आली? ती पण इतकी साधी?” तोवर मुग्धा गाडीत त्याच्या शेजारी येऊन बसलीदेखील.
मुग्धा – चला.
तेजस – मुग्धा, अगं मी सांगितलं होतं ना की स्काय लाउंजमध्ये वेस्टर्न ड्रेस कोड आहे म्हणून? मग तू…
मुग्धा – तुम्ही इथून चला ना तेजस. मी सांगते तुम्हाला.
तेजसने गाडी सुरू केली. गल्ल्या सोडून गाडी हायवेला लागल्यावर मुग्धाने तिची सीट मागे सरकवली. मग नेसलेली साडी हाताने काढून मागच्या सीटवर टाकली. पर्समध्ये आणलेल्या लहानशा आरशात बघून पटकन लिपस्टिक लावली. केसांना बांधलेला क्लिप सोडून ब्रशने विंचरून केस मोकळे सोडले. प्रशांतचं आवडतं परफ्यूम तिने फवारलं.
मुग्धा आता त्या वनपीस spaghetti top मध्ये निखारा दिसत होती. त्या परफ्यूमचा वास तेजसला वेड लावत होता. सीटवर बसल्यामुळे तो short ड्रेस आणखी वर सरकून दिसत असलेल्या तिच्या मांड्या तेजसचं लक्ष वेधून घेत होत्या.
मुग्धा – हा ड्रेस ठीक आहे ना?
तेजसने न राहवून गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. मुग्धा त्याच्या डोळ्यात बघत होती. तेजसने मुग्धाचे केस डाव्या हाताने धरून तिचा चेहरा आपल्या जवळ आणला आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवले…..
त्यांच्या मागे असलेली आर्याची गाडी काही अंतरावर थांबली होती.
क्रमशः
© मंदार जोग
पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग २४)
सर्व भाग एकत्र लिंक- गुंतता हृदय – सर्व भाग

[…] पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग २३) […]