हॅप्पी दिवाळी
हॅप्पी दिवाळी
लहानपणी सहामाही परीक्षा संपली की दिवाळीचे वेध लागत. नेहमीच्या उनाडक्या करतानाच गेल्या वर्षीच्या उरलेल्या केपा, रोल फडताळाचा तळ धुंडाळून बाहेर काढायचे. मग थोडा वेळ सर्दावलेल्या केपा एक एक करत हातोडीने फोडायचे प्रयत्न निष्फळ झाले की केपा आणि रोलची डबी समोर ठेवायची आणि हातोडीचा एकच घाव. उरल्या-सुरल्या केपा एका घावात ढम्म! मग गेल्या वर्षीच्या पिस्तुलात तेल टाकून त्याचा गंज घालवून ते परत सुस्थितीत आणायचा कार्यक्रम. बरं, हे सर्व कार्यक्रम घाऊक. चाळीतील प्रत्येक पोर ह्या कार्यक्रमात आपापल्या केपा, हातोड्या, बत्ते, वरवंटे आणि पिस्तुले घेऊन हजर असे!
मग दिवाळीच्या चार दिवस आधी एका संध्याकाळी बाबांबरोबर जाऊन फटाके आणायचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम. ह्या दिवशी दिवसभर आदर्श पुत्र असा किताब सहज मिळेल अशी दृष्ट लागावी अशी माझी आणि माझ्या भावाची वर्तणूक असे. म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत दिलेला अभ्यास कोणतीही तक्रार न करता निमूटपणे करणे, नेहमीच्या काही भोचक आणि आगाऊ शेजाऱ्यांचा त्यांना समजेल अशा भाषेत समाचार न घेणे, वेळेवर जेवणे, ताटात वाढलेले सर्व पदार्थ कोणतीही खळखळ न करता संपवणे ह्या सर्वांचा त्यात समावेश असे. मातोश्री कोपिष्ट होऊन फटाक्याच्या पवित्र कार्यात विघ्न आणू नयेत ह्यासाठी केलेला हा अट्टाहास असे! मग संध्याकाळी फटाक्याच्या त्या प्रचंड दुकानातील गर्दीत बाबांबरोबर हरवून फटाके खरेदी! घरी येताना छाती चार इंच फुगलेली. बिल्डिंगच्या पायऱ्या चढताना इतर मुलांनी कुतूहलाने “आयला, आणले का फटाके? काय काय आणलेस?” असे विचारल्यावर अंगावर चढणारे मूठभर मांस ह्याचा आनंदच विरळा होता!
दुसऱ्या दिवशी ते फटाके “वाळवायच्या(?)” नावाखाली सार्वजनिक गॅलरीत वर्तमानपत्रावर पसरून उन्हात ठेवायचे. इतर पोरांना ते दिसावे आणि त्यांच्या पोटात दुखावे हा त्यामागील सुप्त हेतू असावा असे आज जाणवते. पण फटाके “वाळवणे” हा कार्यक्रम कित्येक वर्षे सुरू होता! तसेच चाळीत असलेले एक भैय्या कुटुंब दिवाळीत रस्त्यावर कॅरम उलटा ठेवून त्यावर फटाक्याचा स्टॉल लावत असे. त्यांना रिलिव्हर म्हणून तेथे बसून फटाक्यांचा फुटकळ व्यापार करण्यात एक वेगळीच बहार होती! आमच्या चाळीतील तमाम भटाब्राह्मणांच्या पोरांनी केलेला तो पहिला आणि शेवटचा व्यापार!
दिवाळी पहाट म्हणजे गाणी, मैफल वगैरे फ्याडं गेल्या काही वर्षांमध्ये बोकाळली. सकाळी सकाळी छान तयार होऊन एखाद्या नाट्यगृहात गाणीबिणी ऐकायला जाण्याची कल्पनाच अळणी वाटते. आम्ही लहान असताना गिरगावात पहाटे चार-साडेचारला मागच्या चाळीत सुतळी बॉम्ब फुटायचा आणि त्या आवाजाने दचकून जाग आली की दिवाळी पहाटेची चाहूल लागायची. आदल्या रात्री उशिरापर्यंत बाबांबरोबर बांबूच्या काड्या बांधून, त्यावर कागद आणि झिरमिळ्या चिकटवून घराबाहेर आकाशकंदील लावेपर्यंत झोपायला उशीर झालेला असे. पण बाबा आणि चाळीतले सगळे काकालोक नोकरी करत असल्याने वेळात वेळ काढून कंदिलाच्या ताड्या तासण्यापासून थोडीथोडी तयारी अनेक दिवस सुरू असे. दिवाळीच्या पहाटे चाळीचाळीतून मग सुतळी आणि बॉक्स बॉम्ब फोडले जायचे. त्यांच्या आवाजाने जुन्या चाळींच्या कौलातून टॉप फ्लोअरवरील घरांमध्ये माती पडायची. सर्वत्र धुराचा वास पसरायचा आणि दिवाळीचं आगमन व्हायचं!
आई आम्हाला उघडबंब पाटावर बसवून मस्तपैकी तेल लावायची आणि मग कारिट पायाने फोडून नरकासुराचा वध केला की वाटीत कालवलेलं उटणं अंगाला चोळून अंघोळ व्हायची. आईने नोकरी सांभाळत रात्र रात्र जागून केलेल्या चविष्ट फराळावर ताव मारला की आम्ही गाव उंडारायला मोकळे.
त्यावेळी दिवाळीच्या सुट्टीत शाळा अभ्यास देत असे. त्याचबरोबर एक पुस्तक देत असे. रिसीट बुक. शाळेसाठी वर्गणी गोळा करून त्यातील रिसीट लोकांना द्यायच्या. त्यासाठी मग चाळीत, वाडीतील वाणी, टेलर ह्यांच्याकडे आम्ही ते पुस्तक घेऊन फिरत असू. मला वाटतं एक एक रिसीट पाच रुपयांची होती. एका पुस्तकात वीस रिसीट म्हणजे शंभर रुपये. आता सगळ्याच शाळा त्यांच्या मुलांना अशी पुस्तकं देत असल्याने चाळीतील लोक आणि वाडीतील दुकानवाले ह्यांची पंचाईत होत असे. तेव्हा लोकांकडे फार पैसे नव्हते, पण मनं खूप श्रीमंत होती. लोक दहा-बारा पोरांना पैसे देऊन रिसीट फाडत असत.
लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी आम्ही नवे कपडे घालून गिरगावातील व्यापाऱ्यांच्या दुकानात अगोचरपणे जाऊन, चोपडा पूजनाला नमस्कार वगैरे करून त्यांच्या सोफ्यावर बसायचो. आशा असायची “थंडा” प्यायची. मग गोल्ड स्पॉट, थम्स अप असा थंडा मिळाला की पुढल्या दुकानात. पोटाला तडस लागायची. ढेकरा येत असायच्या, पण थंड्याची अपूर्वाई संपायची नाही! मग अगदी ढेकरा येऊन पोट फुटेस्तोपर्यंत थंडा पिऊन झाला की आम्ही पोरं घरी येऊन फटाके वाजवायचो. ते झालं की रात्री वाडीतील थोड्या मोठ्या टवाळ पोरांची धम्माल बघायला चाळीच्या दिंडीत उभे राहायचो. टेलिफोनची फेकाफेक, आडवे लावलेले बाण, हातात पेटवून एकमेकांवर फेकलेल्या लवंगी माळा ह्या गोष्टींचे खूप अप्रूप होते तेव्हा! पण हे चूक आहे, हे आपण करायचे नाही ह्याचेही तितकेच भान होते! त्यामुळे ते फक्त बघायचं, आपण करायचं नाही, हे तेव्हाही समजेल इतकी संस्कारांची मुळं खोलवर रुजलेली होती आणि आजही आहेत!
पाडव्याला आईने बाबांना ओवाळताना पाहणे ही एक पर्वणी होती. आई खूप छान तयार व्हायची. बाबा टोपी घालून पाटावर बसायचे. आई त्यांना छान ओवाळायची. मग बाबा ताम्हनात कधी नोटा, एखादं एन्व्हलप किंवा दागिना ठेवायचे. मला अनेक वर्षं (न कळत्या वयात) आई आणि बाबा पण एकमेकांचे भाऊ-बहीण आहेत आणि दिवाळीत त्यांची भाऊबीज एक दिवस आधी असते आणि त्याला पाडवा म्हणतात असं वाटायचं!
आमच्या तमाम खानदानात आम्ही सगळेच भाऊ होतो. फक्त माझ्या एका आत्याला मुलगी होती. मग तिच्या घरी संध्याकाळी भाऊबीज असे. त्या आधी माझे मामा घरी येत. आई त्यांना ओवाळत असे. मग मामा ओवाळणी देत. आम्ही पण दोन्ही मामांकडून पाच-पाच रुपये घेऊन शाळेची रिसीट फाडायचो आणि आमची “भाचेबीज” साजरी करायचो! मग मामा छान जेवून सावकाश परत जात. ते निघाले की आई तोंडाला पदर का लावायची, हे तेव्हा आम्हाला कळत नसे! पण भाऊबीजेला खूप मज्जा येत असे! एकुलत्या एका बहिणीची तर चंगळ असे!
तेव्हा दिवाळी म्हणजे ग्रीटिंग कार्ड्स पाठवणे, एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देणे, कंदील बनवणे, नवे कपडे शिवणे, आईने केलेला फराळ खाणे, फटाक्यांच्या धुरात नाचणे, सर्वांनी एकत्र येऊन सण आणि आनंद साजरा करणे होते! तेव्हा पैसे कमी होते, पण आपुलकीचे शेजारी आणि नातेवाईक होते. फेसबुक आणि इंटरनेट नव्हते, पण लोक एकमेकांना शुभेच्छा द्यायला भेटत होते! तेव्हा दिवाळी म्हणजे “फेस्टिव्हल किंवा ओकेजन टू गेट इन टच” नव्हते, तर एक सण होता! तेव्हा लोकांना “Happy Diwali to you and your loved ones” असे संदेश आणि आकर्षक चित्र हे ईमेल, मेसेज किंवा इतर माध्यमांतून यांत्रिकपणे पाठवून “विश” केल्याची फॉर्मॅलिटी कम्प्लीट करण्यात इतिकर्तव्यता वाटत नव्हती. एकमेकांना भेटून दीपावलीचे “अभिष्टचिंतन” करण्याची पद्धत होती! तेव्हा “हॅपीवाली दिवाली”चे मेसेज पाठवत नसत. आज एखाद्या फॅन्सी फटाक्याची जितकी किंमत असेल, त्यात त्या काळी एखाद्या चाळीतील संपूर्ण कुटुंबाची सबंध दिवाळी साजरी होत असे! बरं, गोष्ट फार जुनी नाही! काही वर्षांपूर्वीचीच आहे, जेव्हा सण हे सण म्हणून “साजरे” होत. ते “फेस्टिव्हल” म्हणून सेलिब्रेट करायची औपचारिकता जेव्हा बोकाळली नव्हती! – ©मंदार जोग
आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com
आम्हाला फेसबुकवर फॉलो करा- https://www.facebook.com/mandar.jog.31
हे पण वाचा- वेळ
