मृगजळ सीझन २ भाग ८
श्रीरंग ने नेमलेला वेटर रेस्टोरेंट त्याला दिलेलं काम करायला तत्पर होता. एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसलेला श्रीरंग वेटरकडे असलेल्या ब्लूटूथ माईकचं कनेक्शन आपल्या हातात असलेल्या फोनला नीट जोडलेलं आहे ह्याची खात्री करत होता.
वेटर- हेलो हेलो…सर आवाज येतोय ना…
श्रीरंग ने थम्ब्स् अप दाखवून आवाज येत असल्याचं सांगितलं. ठरल्यानुसार उमेश आणि अंकिता आले. ठरल्यानुसार वेटरने त्यांना indoor जागेत टेबल दिलं. दोघे आत बसले.
उमेश- madam तुम्ही आलात ह्याचा मला खूप आनंद आहे.
अंकिता- आता तुम्ही आग्रहच इतका केला की मी नाही म्हणूच शकले नाही.
दोघांनी मॉकटेल ऑर्डर केली. दोघेही पहिल्यांदाच असे क्लासच्या बाहेर काहीही काम नसताना भेटत होते. त्यामुळे बोलायला विषय सापडत नव्हते. नजरानजर झाल्यावर फक्त स्माईल. शेवटी न राहवून उमेश म्हणाला-
उमेश- उकाडा खूप आहे ना आज?
त्यावर अंकिता तिच्या फटकळ स्वभावाला जागत म्हणाली-
अंकिता- सर आपण इथे हवामानाची चर्चा करायला आलो आहोत का? जरा वेगळं बोला की काहीतरी. ऑफिसात मी तुमची बॉस असले तरी इथे मला तुमची मैत्रीण समजा. मी आजवर कधीच कोणत्याही male स्टाफ बरोबर बाहेर गेलेली नाही.
उमेश- मग माझ्याबरोबर का आलात?
अंकिता- म्हणाले ना की तुम्ही आग्रहच इतका केलात आणि नंतर मी नाही म्हणाल्यावर इतके हताश झालात की मी यायला तयार झाले.
उमेश- अच्छा. म्हणजे माझ्यावर दया आली म्हणून आला आहात तुम्ही.
अंकिता- नाही हो सर. दया काय? तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. सज्जन आहात. मला इतकी मदत करता. त्यामुळे तुम्हाला दुखवायचं नव्हत मला.
उमेश- म्हणजे उद्या आणखी कोणी सज्जन, तुम्हाला मदत करणारा टीचर क्लासमध्ये आला तर त्याच्याही बरोबर जाल तुम्ही?
अंकिता- नाही हो सर. मला वेड लागलंय का असं कोणाच्याही बरोबर जेवायला जायला.
उमेश- म्हणजे माझ्याबाबत काहीतरी विशेष आहे ना?
हे ऐकून अंकिताला हसू आलं. ती हसताना फार गोड दिसते हे उमेशला माहित होतं पण ती मुळी हसायचीच खूप कमी. आज तिला हसताना पाहून उमेश नकळत बोलून गेला.
उमेश- madam तुम्ही नेहमी हसत रहा. हसताना खूप सुंदर दिसता तुम्ही.
त्याच हे वाक्य ऐकल्यावर अंकिताच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक नाहीसं झालं. तिचा चेहरा सिरीयस झाला. तो बदल लक्षात येऊन उमेश घाबरला. आता सगळा प्लान फेल होणार, अंकिता चिडणार अशी भीती त्याला वाटू लागली. त्याची पल्स फेरारी च्या वेगाने पळू लागली. हे सर्व बदल त्याच्या चेहऱ्यावर पाहून अंकिता जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली-
अंकिता- सर अहो किती घाबरता तुम्ही. मला काय समजता? तुम्हाला काय वाटलं आता मी चिडेन, तुम्हाला काहीतरी बोलेन..बरोबर ना?
उमेश- हो..म्हणजे…
अंकिता- म्हणजे सर्वांनाच मी तशी वाटते. आणि मी तशीच आहे बरीचशी. थोडी चिडकी, थोडी संशयी, स्वतःच खरं करणारी, विचार न करता बोलणारी आणि त्यामुळेच सर्वात जास्त misunderstood. पण आता फरक पडत नाही सर. चाळीशी उलटली माझी पण. मुलगा मोठा झालाय. घरची जबाबदारी म्हणून सुरु केलेला क्लास आता स्वतःच एक जबाबदारी बनलाय. आपल्या शेकडो students च्या शिक्षणाची जबाबदारी. आपल्या स्टाफची जबाबदारी. मग आता त्यातच स्वतःला गुंतवते. हसायला, मोकळेपणाने फिरायला वेळच मिळत नाही. आज किती वर्षांनी मी अशी हॉटेलात जेवायला आले आहे हे आठवावं लागेल सर. पण माझ्या स्वभावातल्या ह्याच दोषांमुळे मी कोणालाच फारशी आवडत नाही. लोक माझ्यापासून लांब राहतात.
अचानक तिच्या लक्षात आलं की ती नकळत मनातलं बोलून गेली. स्वतःला सावरत ती म्हणाली-
अंकिता- माझं सोडा. तुम्ही तुमचं सांगा.
उमेश- माझं जे काही आहे ते तुम्हाला माहीतच आहे madam. कारण माझं आयुष्य हे open book आहे. योग्य वयात लग्न केल नाही आणि आता करायचं आहे तर कोणी योग्य मुलगी सापडत नाहीये. बाकी तब्बेत उत्तम आहे, पगार तुम्हीच देता त्यामुळे तो तुम्हाला माहित आहेच. आणि स्वभाव, आवडी निवडी पण तुम्हाला माहित आहेत.
अंकिता- कशी मुलगी हवी आहे तुम्हाला?
उमेश- तुमच्यासारखी…
तो हे बोलल्यावर अंकिताच्या अंगावर सर्रकन काटा आला. लाजेने ती खाली पाहू लागली. उमेश पुढे म्हणाला-
उमेश- madam तुम्ही मघाशी स्वतः बद्दल जे बोललात ना त्या पलीकडे मला तुमच्यात अनेक गोष्टी दिसतात. मला दिसते एक जबाबदार स्त्री जी घराची जबाबदारी घेऊन स्वतःच्या हिमतीवर एक व्यवसाय उभा करते, मला दिसते एक बिझनेस वूमन जी आपला स्टाफ आणि विद्यार्थी ह्यांच्या भविष्याची काळजी करते, एक उत्कृष्ट शिक्षिका जी विद्यार्थी घडवते, एक सुंदर स्त्री जी कामाच्या धावपळीत स्वतःच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करते आणि माझी एक mentor एक मैत्रीण जिला मी कधीच दु:खी पाहू शकत नाही. जिच्या सुखासाठी मी काहीही करू शकतो. आता तुमच्यासारखे इतके गुण असलेली मुलगी मला मिळाली तर मला लॉटरीच लागेल ना? आहे का तुमची एखादी अविवाहित बहिण वगैरे?
उमेशच्या तोंडून कौतुक ऐकून सुखावलेली अंकिता त्याला म्हणाली-
अंकिता- क्लास मध्ये शांत शांत असणारे उमेश सर इतके बोलू शकतात, फ्लर्ट च्या अलीकडे पण नॉर्मल कॉन्व्हर्सेशनच्या पलीकडे राहणाऱ्या गप्पांच्या मर्यादेच्या बारीक भिंतीवर लीलया चालू शकतात हे नवीन आहे माझ्यासाठी.
उमेश- फ्लर्ट नाही madam. खरंच विचारतो आहे मी. आता तुमचं लग्न झालेलं आहे म्हणून तुमचा पत्ता कट आहे. म्हणजे तुम्ही लग्न मोडून माझ्याशी लग्न केल तरी मला फरक पडणार नाही. तुम्ही म्हणजे तुमच्यासारखे गुण असलेली कोणीही मुलगी. पण ते काही शक्य नाहीये. म्हणूनच सेम गुण असणारी कोणी बहिण आहे का विचारतोय.
अंकिता- सर हे खूप थेट होत नाहीये का?
उमेश- (तिच्या डोळ्यात बघत) सत्य नेहमीच थेट असत. आता बघा ना. तुमच्यासारखी गुणी, सुंदर स्त्री मला बायको म्हणून आवडेल हे सत्य आहे. तुमच लग्न झालेलं आहे हे सत्य आहे. ते तुम्ही मोडणार नाही हे सत्य आहे. त्यामुळे आपल काहीही होऊ शकत नाही हे सत्य आहे. म्हणूनच तुमच्या ओळखीत कोणी गुणी मुलगी असेल तर तुम्ही मला सुचवाल अशी माझी अपेक्षा हे देखील सत्य आहे. सगळी सत्य थेट आहेत.
हे बोलताना तो अंकिताच्या डोळ्यात बघत होता. अंकिता देखील संमोहित झाल्यासारखी त्याच्या डोळ्यात बघत होती.
इथे बाहेर मानसी आणि सौरभ आले. श्रीरंग अलर्ट झाला. त्याने वेटरला इशारा केला. वेटर ने त्यांना गार्डन भागात रिझर्व केलेलं टेबल दिलं. दोघे तिथे बसले. त्यांच्या मध्ये असलेल्या फुलदाणी मधला माईक सुरु असल्याची खात्री दूर बसून त्यांना बघत असलेल्या रंगाने करून घेतली आणि वेटरला अंगठा दाखवला. त्यांनी आपापली ड्रिंक ऑर्डर केली. वेटरने ती आणून दिली. वेटर श्रीरंगच्या जवळ आला. श्रीरंग ने माईकला जोडलेला फोन त्याच्या हातात दिला. वेटर तो फोन घेऊन आत गेला आणि अंकिताच्या जवळ जाऊन म्हणाला-
वेटर- madam…
अंकिता- yes?
वेटर- हा फोन तुमच्यासाठी आहे. कोणाला तरी तुमच्याशी बोलायचं आहे.
अंकिता- what? कोणाला?
वेटर- माहित नाही. एक सर होते. त्यांनी हा फोन तुम्हाला द्यायला सांगितला आणि गेले. बोला त्यांच्याशी.
वेटरने फोन तिच्या पुढ्यात ठेवला आणी तो निघून गेला. उमेश नाटक करत म्हणाला-
उमेश- हे काय नाटक आहे? असा फोन कोण देईल? आणि काय बोलायचं असेल इतक? थांबा madam. तुम्ही काही बोलू नका. मी तो स्पीकरवर टाकतो. बघुया काय गडबड आहे ते.
त्याने फोन स्पीकरवर टाकला आणि त्यातून मानसी आणि सौरभचा संवाद ऐकू येऊ लागला.
मानसी- सौरभ बास झालं! तू, तुझी अंकिता, तुझी आई, तुझा संसार, तुझं रेप्युटेशन…मला कंटाळा आला आहे त्याचा.
हे ऐकून अंकिता शॉक झाली. उमेश तिच्याकडे बघत होता, अंकिता ऐकत होती.
सौरभ- मानसी प्लीज यार. तू हि जुनी कॅसेट ऐकवायला इथे बोलावलं आहेस का मला? तुला माहित्येय ना की मी अंकिताला किती hate करतो ते? पण काय करू? आपण लग्न केलं तर आई मरेल माझी. अंकिता बद्दल मला काहीही वाटत नाही. ती मरणार असती तर मी कधीच तिला सोडून तुझ्याशी लग्न केलं असतं. पण आई…
मानसी- किती खोटं बोलतोस तू सौरभ. तू अंकिताचा तिरस्कार करतोस आणि तिच्याच बरोबर झोपतोस? वरून मला हे स्वतःच्या तोंडाने सांगतोस? लाज वाटत नाही का? तिला आणि मला, आम्हा दोघींना तू गेली बारा वर्ष फसवतो आहेस. तिला लग्न करून आणि मला लग्न न करून.
हे ऐकणाऱ्या अंकिताच्या चेहऱ्यावर आता शॉक ची जागा रागाने घेतली होती. ती रागाने थरथरत उठली. उमेशने तिचा हात धरला आणि म्हणाला-
उमेश- madam थांबा…रागाच्या भरात काही करू नका. ऐका. अजून काय ऐकायला मिळतंय ते ऐका. मी आहे ना तुमच्या बरोबर…
अंकिता बसली आणि ऐकू लागली.
सौरभ- मानसी प्लीज. मी कोणालाही फसवत नाहीये. मी स्वतःच फसलो आहे. अंकिताशी लग्न करून आणि तुझ्याशी अफेयर करून. ना ती मला सुखाने जगू देते ना तू.
मानसी- हो? मग तिझ्या बरोबर झोपलास ते काय दु:ख मिळावं म्हणून का? की माझ्या बरोबर जितक्या रात्री घालवतोस, गोव्याला नेऊन मजा करतोस त्यात तुला दु:ख मिळतं? ही नाटकं बास झाली तुझी. आता तिला डिव्होर्स दे आणि माझ्याशी लग्न कर. मी ताई आणि जिजाजींना सगळं सांगितलं आहे. तू उद्याच्या उद्या डिव्होर्स फाईलींग ची प्रोसेस सुरु केली नाहीस तर परवा ताई आणि जिजाजी अंकिताला भेटून सगळं सांगतील.
सौरभ- प्लीज असं काही करू नको. तू मला black mail करते आहेस.
मानसी- तू काहीही समज. पण आता ह्यापुढे मी हे सहन करणार नाहीये. माझी बारा वर्ष बरबाद करून तू त्या अंकिता बरोबर मजा मारत दोन दगडांवर पाय ठेवून सुखात राहू शकणार नाहीस. मी पोलिसात पण तक्रार करू शकते. तुला मी आत टाकेन.
सौरभ- अच्छा? तू मला पोलिसात देणार? ठीक आहे. दे पोलिसात. मी आत जाईन. तुझी पण बदनामी होईल.
मानसी- माझी कसली बदनामी? मी माझं आणि तुझं अफेयर कधीच लपवलं नाही. भीती तुला असते हा बघेल, त्याला कळेल, फेसबुकवर नको, घरी कळायला नको. मला काहीच फरक नाही पडणार. उलट मला तर हवंच आहे की सगळ्या जगाला आपल्याबद्दल कळावं.
सौरभ- मानसी, मी डिव्होर्स दिला ना तर ती अंकिता माझ घर, माझा बँक balance सगळं काढून घेईल. मला तिच्यात एका काडीचाही इंटरेस्ट नाहीये.
मानसी- आणि माझ्यातही नाहीये. तुला तुझं घर, तुझे पैसे ह्यात इंटरेस्ट आहे. बरोबर ना?
सौरभ- मला थोडा वेळ दे. उद्याच्या उद्या शक्य नाही.
मानसी- ठीक आहे. वन वीक. पण त्यापेक्षा जास्त नाही. मला डिव्होर्स नोटीस बघायची आहे.
सौरभ- ठीक आहे. मान्य. आता दुसरा विषय बोलूया का? त्या पनवती अंकिता व्यतिरिक्त?
हे ऐकुन अंकिताला रडू कोसळलं. तिने फोन कट केला. उमेशने तिचा हात हातात घेतला. अंकिता जोरजोरात रडत होती. उमेश तिच्या शेजारी बसला. तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करू लागला.
उमेश- madam…
अंकिता तशीच पाचेक मिनिटं रडली. मग अचानक शांत होत म्हणाली-
अंकिता- सर एक रिक्वेस्ट आहे.
उमेश- सांगा ना madam.
अंकिता- हे जे आत्ता तुम्ही ऐकलं त्याबद्दल कोणालाही काहीही सांगू नका.
उमेश – अर्थात madam. पण तुम्ही पण प्लीज रडू नका. म्हणजे मला कळतंय की..
अंकिता- नाही सर. मी ठीक आहे. ते रडणं होतं त्या रात्रीसाठी जी मी एका मोहाच्या क्षणी त्याच्या बरोबर घालवली..दहा बारा वर्षांनी. ते रडणं होतं माझ्या कंट्रोल न झालेल्या भावनिक आणि शारीरिक भुकेला बळी पडलेल्या माझ्यातल्या weak बाईसाठी. पण ते रडून झालंय माझं आणि निर्णय देखील झालाय.
उमेश- काय निर्णय madam?
अंकिताने त्याच्याकडे वळून पाहिलं आणि म्हणाली-
अंकिता- सर माझी एक बहिण आहे. माझाच आरशातलं रूप समजा. पण तिचा डिव्होर्स होणार आहे एका वर्षात. ती स्वतःच तिच्या नालायक नवऱ्याला, त्याच्या घराला, त्याच्या पैशांना डिव्होर्स देणार आहे. तुम्ही कराल तिच्याशी लग्न?
हे बोलताना अंकिता उमेशच्या डोळ्यात बघत होती. उमेश तिच्या नजरेला नजर देत म्हणाला-
उमेश- मी वाट पाहीन तिच्या डिव्होर्सची. आणि त्याच्या आधीही तिला कोणतीही मदत लागली तर मला भेटायला सांगा. माझा नंबर द्या तिला.
हे बोलून त्याने अंकिताच्या हातावर आपले हात ठेवले. आणि तिला थोपटले. अंकिताच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू आता घळाघळा वाहू लागले. ती न राहवून बोलली-
अंकिता- सर मी खरंच इतकी वाईट आहे का? मी पनवती आहे का हो?
हे ऐकल्यावर उमेश तिच्या शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला-
उमेश- madam तुम्ही काय आहात हे तुमचे हजारो विद्यार्थी आणि आम्ही जाणतो. प्लीज सौरभ सर काय म्हणाले त्यावरून स्वतःला जज करू नका.
अंकिता- thank you sir
इतकं बोलून ती त्याच्या कुशीत शिरून रडू लागली. तिच्या मनात काय वादळ सुरु आहे ह्याची पूर्ण कल्पना असलेला उमेश तिला पाठीवर थोपटत होता. त्याच्या थोपटण्यात, त्याच्या त्या स्पर्शात अंकिताला खूप मोठा आधार जाणवत होता.
इथे सौरभ आणि मानसी बिल पे करून निघाले. वेटरने माईक काढून श्रीरंगला आणून दिला. श्रीरंग आत गेला. उमेश आणि अंकिता अजून तिथेच होते. उमेश तिच्या पाठीवर थोपटत होता. त्यांना एकत्र पाहून श्रीरंगला बरं वाटलं. उमेशला टाटा करून तो निघून गेला.
उमेश आणि अंकिताला जवळ आणणारी नियती आता आपला पुढचा डाव खेळायला आसुसलेली होती. पण त्या डावात मानसी श्रीरंग बरोबर अमेरिकेला जाणार की इतक सगळ होऊनही सौरभ बरोबर लग्न ह्या मृगजळाच्या मागे धावत राहणार ह्या प्रश्नावर लटकून नियती भेसूर हसत होती.
क्रमश:
पुढील न्हागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ९- डिव्होर्स?
मागील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ७ – मानसीचे कांदेपोहे
पहिल्या सीझनच्या सर्व भागांची लिंक- मृगजळ- सर्व भाग
मृगजळ सीझन २ चे सर्व भाग – मृगजळ- सिझन २- सर्व भाग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण
