त्याला काय फरक पडतो | Mandar Jog

त्याला काय फरक पडतो?

काल गाडीचा टायर पार्किंगमध्येच फ्लॅट झाल्याचं वॉचमनने घरी येऊन सांगितलं. हाऊसकीपिंगच्या मुलाने जवळच असलेल्या पंक्चर शॉपमधील माणसाला बोलावून आणलं. त्या माणसाने व्हील काढलं आणि त्याच्या स्कूटरवर ठेवलं. मी त्याच्या मागे बसलो आणि आम्ही निघालो. तिथे गेल्यावर पंक्चर अजिबात नसून व्हीलच्या कडेने फट निर्माण झाल्यामुळे हवा गेली असेल असं त्याने सांगून मला व्हील साफ करू का असं विचारलं. मी होकार दिल्यावर त्याने व्हील साफ वगैरे केलं आणि हवा भरून व्हील परत आणून लावलं. त्याचे दोनशे रुपये मागितले. मी इतके जास्त कसे विचारल्यावर व्हील साफ करण्याचे असं म्हणाला. थोडक्यात माझे पैसे अक्कलखाती जमा झाले होते. मी देऊन टाकले. वॉचमन तिथेच होता. माझी चिडचिड लक्षात येऊन तो म्हणाला, “साहेब जाऊ द्या. दोनशे रुपयांनी तुम्हाला काय फरक पडतो?”

हे ऐकल्यावर “त्याला काय फरक पडतो?” नामक एक वृत्ती परत माझ्यासमोर आली. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा खर्च झाला, नुकसान झालं, वस्तू, पैसे हरवले, लुबाडले गेले, फसवणूक झाली, फालतू खर्च झाला की अनेक लोक “त्याला काय फरक पडतो?” असं सहज बोलून जातात. अगदी नात्यात, मित्रांमध्ये एखादा श्रीमंत नातेवाईक किंवा मित्र असेल तर अनेकदा कुठेही गेल्यावर खर्च त्यानेच करायचा, खिशात हात त्यानेच घालायचा हे काही लोक गृहीत धरतात आणि बिल द्यायच्या वेळेला हातावर बडीशेप घेऊन चक्क निघतात. मनात हाच विचार की एवढंसं बिल देऊन “त्याला काय फरक पडतो?”

अनेकदा उधार, उसनेवार घेतलेले पैसे परत देण्यात टंगळमंगळ करणारे लोकही एवढीशी रक्कम लगेच नाही मिळाली तर “त्याला काय फरक पडतो?” असा विचार करून स्वतः बिनधास्त पैसे उडवतात पण त्याचे पैसे मात्र थकवतात. आपल्या लग्नाची पार्टीदेखील एखाद्या स्वस्तिक बारमध्ये किंवा शक्य झाल्यास घरच्या गच्चीवर देणारे, यशस्वी मित्राच्या ऑफिसातील प्रमोशनची पार्टी मात्र फाईन डायनिंगमध्ये मागतात. मनात विचार हाच की “त्याला काय फरक पडतो?”

शहरातले रिक्षावाले, पाणीपुरीवाले, भाजीवाले आणि कॅशमध्ये लाखो कमवून सरकारला एकही पैसा कर म्हणून न देता स्वतःला गरीब म्हणवून करदात्यांच्या पैशातून मिळणाऱ्या सरकारी सुविधा ओरपणारे हल्ली सर्वत्र दिसणारे pseudo गरीबदेखील नव्वद रुपये बिल झाल्यावर शंभराची नोट दिल्यावर दहा रुपये परत न करता लाल झालेले दात दाखवत आशाळभूत हसून त्याने “keep the change” म्हणावं अशी अपेक्षा ठेवतात तेव्हाही त्यांच्या मनात “ह्याला काय फरक पडतो?” हाच विचार असतो.

हल्ली अगदी ओला आणि उबरसारख्या “तुमच्या ड्रायव्हरला ३० रुपये टीप वाढवून द्या. तो लगेच येईल.” असे भिकार सजेशन देणाऱ्या अॅपपासून ते दहा हजारच्या ऐवजी वीस हजाराची साडी घेते असा विचार करणाऱ्या बायकोपर्यंत आणि अर्धा किलोमीटर अंतरासाठी रिक्षाला पंचवीस रुपये देणाऱ्या सख्ख्या मुलापासून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना पंखे आणि दिवे बंद न करणाऱ्या म्हाताऱ्या वडिलांपर्यंत सर्वांच्या मनात कुठेतरी हाच विचार असतो की एवढ्याशा अतिरिक्त खर्चाने “त्याला काय फरक पडतो?”

“त्याला काय फरक पडतो?” मधला जो तो असतो ना, त्याने खूप मेहनत करून, स्वतःच्या बुद्धी आणि हिंमतीच्या जोरावर “फरक पडणार नाही” इतपत पैसा, नाव आणि पत कमावलेली असते. त्यामुळे फालतू खर्च होणाऱ्या, अक्कलखाती जमा होणाऱ्या, टॅक्सचोर टीप म्हणून मागत असलेल्या, फुकट जाणाऱ्या विजेच्या प्रत्येक युनिट तसेच पेट्रोलच्या प्रत्येक थेंबात वाया जाणाऱ्या त्याच्या प्रत्येक पैशाने त्याला फरक पडत असतो. अंबानीपासून भरपूर अभ्यास करून बँकेत नोकरी करताना मोठ्या पदावर पोहोचलेल्या तन्मय लेलेपर्यंत सर्वांना त्यांच्या आर्थिक स्तरानुसार एखाद्या गोष्टीचा खिशाला पडत नसला तरी मनाला फरक पडतच असतो. फक्त प्रेम, दया, लोकलज्जा आणि pseudo गरीब नामक जमातीच सामाजिक उदात्तीकरण आणि इमेज ह्या कारणांनी तो ते बोलून दाखवत नाही, इतकंच.

थ्री इडियट सिनेमात बमन इराणी फळ्यावर लिहिलेल्या आकड्यातील एक एक शून्य पुसत त्या तिघांना त्यांच्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देतो तशी परिस्थिती मी कॉलेजात असताना होती. म्हणजे आमचे वडील अजिबात गरीब नव्हते पण माझ्या मित्रांचे वडील खूप श्रीमंत होते! मित्रांकडे कॉलेजात असतानाच गाड्या वगैरे होत्या. तेव्हा तर “ह्याला काय फरक पडतो?” असं समजून त्यांच्या पैशांवर सहज मजा करता आली असती. पण ते कधीच केलं नाही. कुठेही गेलो की आपलं “कॉन्ट्री” न चुकता दिलं. म्हणूनच ती मैत्री आणि त्यातला आदर आजवर टिकून आहे. आजही अनेक मित्र, नातेवाईक माझ्यापेक्षा वरच्या आर्थिक स्तरात आहेत. पण कधीच “ह्याला काय फरक पडतो?” असा विचार करून वागणूक होत नाही. कारण असाच विचार माझ्याबद्दल करून तसे वागणाऱ्या लोकांबद्दल मला काय वाटतं ते मलाच माहीत असल्याने माझ्याबद्दल तसं कोणालाही वाटू नये हीच भावना असते. आणि म्हणूनच मी “त्याला काय फरक पडतो?” हा विचार कोणाबद्दलही मनात येऊ देत नाही. कारण मला माहीत आहे की त्याला प्रत्येक वेळी फरक पडतो. आपण ही गोष्ट लक्षात घेऊन आपली वागणूक ठेवल्यास भले समाजातील pseudo गरिबांच्या भिकार वृत्तीत बदल करू शकत नसलो तरी किमान मैत्री आणि नात्यात तरी सुदृढता आणि आदर टिकवून ठेऊ शकतो.© मंदार जोग

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “त्याला काय फरक पडतो?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!