नवदुर्गा, म्हाळसा, अमृततुल्य अश्या अनेक नावाची मुख्यत्वे राजस्थानी लोकांची चहाची दुकाने मुंबईत गल्लोगल्ली दिसतात. पन्नास स्क्वेयर फूटापासून तीनशे फूटापर्यंत त्यांचे आकारमान असू शकते. दुकान जितके जुने तितके मोठे.
ह्या दुकानात कानात चांदणीचे पितळी टॉप्स घातलेला, जाड मिश्या असलेला एक मुख्य खानसामा सारखा “चहानसामा” असतो. रोज, सतत चहाचे भांडे उचलून आणि चहा धवळून त्याचे फोरआर्म्स खूप पुष्ट झालेले असतात. त्याच्या समोर जोरात सतत घणघणणारा स्टोव्ह किंवा गॅस ज्याचा आवाज त्या आसमंतात दिवसभर भरून राहीलेला असतो. त्या अग्नीवर ठेवलेले पितळेचे चकचकित अजस्त्र पातेले ज्याला काही वेळेला एक पितळी दांडा जोडलेला असतो किंवा ते उचलायला तश्याच अजस्त्र आकाराची गावी किंवा सांडशी असते. त्याच्या बाजूला अल्युमिनियमचे त्याहुनही दुप्पट आकाराचे पातेले. त्यात सकाळी तापवून झाकून ठेवलेले दूध असते. पुढ्यात पंधरा वीस काचेच्या छोट्या आकारच्या ग्लासांची रांग आणि गल्ल्याची पत्र्याची किंवा कधीतरी पितळी पेटी.
ह्या सरंजामात आणि त्या गॅस किंवा स्टोव्हच्या आवाजाच्या लयीत आपला “चहानसामा” दोन्ही हातात तलवार घेऊन लढणाऱ्या बाजी प्रभुच्या आवेशात आपले कौशल्य दाखवत असतो. साधा चहा जनरल क्याटेगरी प्रमाणे एका छोट्या स्टीलच्या पातेलीत बनवून ठेवालेला असतो. हाताखाली असलेली दोन चार पोरे तो येणाऱ्या सामान्य “कटिंग” वाल्या गिर्हाइकाला ग्लासात आतून देतात. ते रोजचे ब्रेड एण्ड बटर असल्याने चहानसामा त्याकडे फारसे लक्ष देत नाही. ती पिणारे गिर्हाईकचीसुद्धा कटिंग आणि बीड़ी मारणे ह्या पलीकडे त्या दुनियेशी घसट नसते!
पण जेव्हा काही हौशी, खास, जुने जाणते, ह्या चहानसाम्याचे वडील अमृततुल्य चहा बनवत तेव्हापासूनचे गिर्हाईक दुकानात येते तेव्हा ह्याचे कौशल्य आणि अदा पहात राहाव्या अश्या असतात. शक्यतो ह्याला त्यांची आवड माहीत असते. क्वांटिटी फक्त हाताच्या इशाऱ्याने सांगितली जाते. पानीकम, दूधपाक, उकाळा, एक नंबर, तीन नंबर, मसाला, तूफान ह्या नावांपलीकडे कीर्तिभाई, पाठक, जोशीला, मनुअंकल अश्या बोर्डावर न लिहिलेल्या व्यक्तिसापेक्ष चहाच्या जाती देखील खास गिर्हाईकांची फार्माइश म्हणून प्रचलित झालेल्या असतात. त्यातही गोरा कीर्तिभाई, फीका पाठक अश्या पोटजाती सुद्धा असतात. असे खास गिर्हाईक आपली ओळख किंवा वट दाखवायला आपल्या खास लोकांना इथे घेऊन येतात. मग हा चाणाक्ष चहानसामा ते बरोब्बर ओळखून ” पधारो सेठ किंवा आओ हुकुम” असे बोलून खास गिर्हाईकाची कॉलर आल्याआल्या टाईट करतो. मग पोऱ्या लगबगीने फडका मारतो. गिर्हाईक स्थानापन्न होते. समोर स्टीलच्या चंबूतून पोरगा पाणी ठेवतो. गिर्हाईक चंबू तोंडाला न लावता वरून पाणी पितो. बिड्या सिगारेटी शीलगावल्या जातात. त्याकरिता देखील गॅस किंवा स्टोव्हच्या बाजूला राहिल्याने गरम झालेली काडेपेटि चहानसामा न मागता हसत बरोब्बर नेम साधत गिर्हाईकाकडे टाकतो.
ह्या सरबराईने भारावून गेलेले खास गिर्हाईक आणि त्याच्या ख़ास पाहुण्याला मग प्रश्न येतो “मालिक क्या सेवा करूँ आज? वोही की साहब को कुछ और चखाऊ?” आपली आवड ह्याला कशी माहीत आहे ह्या अभिमानाने वन प्लस स्कोर केलेले स्पेशल गिर्हाईक पाहुण्याकडे छाती बाहेर काढून कटाक्ष टाकते. पाहुणा इंप्रेस झालेला असतो. मग सिगरेटचा खोल दम मारत आपली इथे किती सलगी आहे, आपण ह्याचा बाप इथे बसायचा तेव्हापासून कसे येतो, इथपासून येथील विविध चहाची नावे आणि त्यांची खासियत ह्यावर पाहुण्याचे बौद्धिक होते. मग “अपनाही पिला आज साब को भी. तबियत खुश हो जायेगी” अशी ऑर्डर स्पेशल गिर्हाईक सोडते. मग चहानसामा बाजूला मागे ठेवलेले खास लहान आकाराचे पितळेचे पातेले काढतो. गॅस किंवा स्टोव्हचा बर्नर वाढवतो. दुकानातील आवाज वाढतो. पातेल्यात फक्त थोडेसे दूध ओततो. साधा चहा गाळायच्या कापडात उरलेली रीसायकल भुकटी न घालता नवी भुकटी वापरतो. वळचणीला ठेवलेल्या काचेच्या किंवा पितळी छोट्या डब्यातील स्पेशल मसाला छोटा चमचा पातेल्यावर आपाटत टाकतो. ते मिश्रण उकळू लागले की हातातील लांब दांड्याच्या पळीने ते ढवळतो. ती पळी पातेल्याच्या कडेवर गोलाकार फिरवत अनेकदा घासतो. मग त्या उकळत्या चहात ती पळी बुडवून दोन थेंब स्वतःच्या तळ हातावर घेऊन चव बघतो. मग थोडीशी भुकटी किंवा साखर टाकून फायनल टचीस देत तो चवीचे परफेक्शन साधतो. त्याचे ते उकळते आचमन बघुन आवाक झालेल्या पाहुण्याची एक्सप्रेशन्स पाहून ख़ास गिर्हाईकाच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव येतात! चव जमल्याची खात्री झाली की गॅसची ज्योत मंद करत चहानसामा दुकानातील आवाजाची लेव्हलदेखील कमी करतो. मग स्पेशल फडक्यातून गाळलेला तो चहा समोर ठेवलेल्या स्वच्छ ग्लासात ओतताना चहानसाम्याचा वर जाणारा हात आणि बरोब्बर नेम धरल्यासारखा न सांडता ग्लासात पडणारा चहा ही कलाकारी पाहून पाहुणा परत आवाक होतो. हा चहा पोराकरवी न पाठवता चहानसामा स्वतः पेश करतो. मग ख़ास गिर्हाईक सलगी दाखवत आता जैसलमेरला असलेल्या त्याच्या वडिलांची उगाच आपुलकीने चौकशी करते. तो देखील जुजाबी उत्तर देतो.
गिर्हाईक प्रसन्न होऊन पैसे द्यायला गल्ल्यापाशी येते. परत काहीतरी चर्चा किंवा विनोद होऊन गिर्हाईक तृप्त होऊन निघुन जाते.
हे चहानसामे खरच अलौलिक रसायन आहेत. इतकी गिर्हाईके, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची नावे, त्यांचे स्वभाव, इगो हे सगळे त्याला ठावूक असते. चहा नामक एकच द्रव्य अनेक नावांनी आणि त्यानुसार अनेक चवींनी प्रत्येक वेळेला तस्सेच बनवण्याच्या त्याच्या कौशल्याला आणि कंसिस्टन्सिला तर आमच्यासारखे प्रत्येक वेळी वेगळ्या चव आणि रंगाचा चहा बनावणारे कुर्निसात करतील. गॅस किंवा स्टोव्हच्या दिवसभर सुरु असलेल्या गोंगाटात, गिर्हाईकांच्या आणि खास गिर्हाईकांच्या फार्माईशी आणि मूड दोन्ही सांभाळत, सतत चहाचे आधण पोटाशी बाळगत, पोरांना अखंडपणे इंस्ट्रक्शन्स देत, गल्ला सांभाळत आणि मुख्य म्हणजे त्याच्यासमोरील लाकडी बॉक्समध्ये ठेवलेल्या असंख्य “होम डिलिव्हरीच्या” डायर्यात नोंदी करत तसेच रबरबँडने लाकडी पॅडवर अडकवलेल्या उभ्या रेघा मारलेल्या कागदावर किंवा दगडी पाटीवर फक्त त्याला कळेल अश्या अगम्य भाषेत काहीतरी खरडत आणि पुसत असलेला, प्रचंड गोंगाटात अमृततुल्य चहाची रोज निर्मिति करणारा चहानसामा रात्री तरी शांत झोपेत असेल की तेव्हा सुद्धा त्याला गॅस किंवा स्टोव्हच्या बर्नरचा आवाज, उकळणाऱ्या चहाचा वास आणि दो गोरा कीर्तिभाई हे सगळे आठवत असेल?
