रेखा | Mandar Jog

रेखा

१९९० च्या दशकात जन्मलेल्या मुलांना माधुरी, श्रीदेवी, जुही, रवीना, करिश्मा यांच्याबद्दल जे वाटतं, तेच आमच्या दशकात जन्मलेल्या बहुतांश मुलांना रेखा, झीनत, परवीन आणि हेमाबद्दल वाटतं. म्हणजे आम्ही वयात यायाच्या आत त्या करिअरच्या उताराला लागल्या होत्या. नटी म्हणून आकर्षण न वाटण्याच्या वयात आम्ही परवीन आणि झीनत हे ‘आगडोंब’ थिएटरमध्ये जाऊन तीन तास बघून एकही चटका न बसता लीलया झेलत होतो! पण पुढे माधुरी, श्रीदेवी, रवीना, करिश्मा, अमृता, मीनाक्षी, सेकंद इनिंगमधली डिंपल यांचे सिनेमे बघत तारुण्यात प्रवेश करताना त्या झीनत, परवीन आणि येस, रेखा यांचे काही सिनेमे गणपतीत रस्त्यावर परत पाहिल्यावर, ‘ते थिएटरमध्ये बघितले तेव्हा आम्ही लहान होतो तेच बरं होतं’ असं वाटून गेलं! झीनत आणि परवीन फक्त सेक्स सायरन होत्या. पण रेखाला अभिनयाचं देखील अंग होतं. म्हणूनच ती पुढे टिकली आणि इतर दोघी कालौघात मागे पडल्या!

रेखा अभिनयाचा वारसा वडिलांकडून जन्मजात घेऊन आली होती. मला वाटतं नायिका म्हणून दखल घेण्यासारखा तिचा पहिला हिंदी सिनेमा ‘सावन भादो’ असावा. कदाचित आमच्या जन्माच्या आधी रिलीज झालेला. पण पुढे कधीतरी गणपतीत रस्त्यावर लावलेल्या पडद्यावर आम्ही तो पाहिला होता. त्यात गावरान रेखापेक्षाही ‘तेरा रंग है नशीला’ गाण्याच्या सुरुवातीला लाल (हो लाल) पँट आणि टर्टल नेक टी-शर्ट घालून, कढईत गरम वाळूवर तयार होणाऱ्या पॉपकॉर्नसारखा उडणारा मठ्ठ चेहऱ्याचा नवीन निश्चल अजूनही आठवतो आणि जाम हसू येतं! असो. विषय रेखाचा आहे! मला वाटतं सुरुवातीला पूर्वीच्या साऊथच्या हिरॉईनसारखी दणकट दिसणाऱ्या काळ्या-सावळ्या रेखाचा कायापालट ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये झाला असावा. त्या आधीचे तिचे सिनेमे पाहिल्यास ती त्याच दणकट रूपात वावरली आहे. किंवा कदाचित ‘घर’ या सिनेमामध्ये तिचा कायापालट झाला असेल. नक्की माहीत नाही. पण ‘घर’मध्ये ती अप्रतिम दिसली आहे आणि ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये मधाळ! ‘घर’मधील आर. डी. च्या अप्रतिम गाण्यांमध्ये खऱ्या आयुष्यातही तिच्या अनेक प्रेमांपैकी एक असलेल्या विनोद मेहराबरोबर ती अत्यंत सुंदर दिसली आहे. बलात्कार पीडितेची व्यथा तिने तिच्या अभिनयातून फार सुंदर मांडली आहे!

अनेकांना आयुष्यात एखादा गुरू, गाईड, आदर्श भेटतो आणि त्याच्या परिसस्पर्शाने त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. रेखाच्या आयुष्यात अमिताभ तो परीस बनून आला. रेखानेच तिच्या एका मुलाखतीत याचा उल्लेख केला आहे. ‘मुकद्दर का सिकंदर’मधील जोहराबाई कधीच विसरता येणार नाही. त्यातील ‘सलाम-ए-इश्क मेरी जान’ या गाण्यात कोरियोग्राफी दिसत नाही, तर अमिताभ आणि रेखा मधील केमिस्ट्री दिसते. त्यात दोघे एकमेकांकडे जे बघतात ती नजर बोलत असते. त्यात रेखाच्या घायाळ करणाऱ्या अदा! रेखाचा आवाज आणि डोळ्यांसारखं निव्वळ खल्लास आहे ते प्रकरण! पण ही केमिस्ट्री पुढे ‘सिलसिला’, थोडीफार ‘मिस्टर नटवरलाल’ सिनेमे वगळता मला तरी फार आढळली नाही. मला अमिताभ नेहमीच झीनत आणि परवीनबरोबर जास्त आवडला आहे.

पुढे रेखाने जितेंद्रपासून धर्मेंद्रपर्यंत आणि राकेश रोशनपासून शेखर सुमनपर्यंत अनेक नटांबरोबर काम केलं. पण ‘खूबसूरत’, ‘उत्सव’, ‘खून भरी मांग’, ‘इजाजत’, ‘आस्था’ (ह्यातही म्हातारा नवीन निश्चल रेखासोबत शय्यासोबत करताना दाखवला आहे), ‘उमराव जान’, ‘घर’, ‘बीवी हो तो ऐसी’, ‘संसार’, कदाचित ‘उत्सव’ आणि ‘खून भरी मांग’सारखे ऑथर-बॅक्ड भूमिका असलेले सिनेमे वगळले, तर तिच्या करिअरमधील इतर बहुतांश उल्लेखनीय सिनेमे अमिताभबरोबरच आहेत. त्या बाबतीत ती झीनत, परवीन, विनोद खन्ना, ऋषी कपूर, शशी कपूर, रणजित, निरुपा रॉय, सत्येन कप्पू, इफ्तेखार, अमजद खान यांच्या इतकीच नशीबवान आहे. त्यांच्या प्रमाणेच अमिताभ नामक कसदार जमिनीच्या यशाच्या सातबाऱ्यावर आपलं देखील नाव जोडून ॲक्टिंग करिअरमध्ये यश, पैसा मिळवणारी. अमिताभच्या लाटेत या सर्वांचं कल्याण झालं आहे. पण अर्थात रेखाला अमिताभच्या मनात विशेष स्थान होतं. ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘सुहाग’, ‘राम बलराम’, ‘दो अंजाने’, ‘मि. नटवरलाल’, ‘खून पसीना’, ‘आलाप’ आणि ‘सिलसिला’ अशा अनेक सिनेमांत दोघांनी काम केलं. त्यात ‘सिलसिला’मध्ये मला ते दोघे एकत्र सर्वात जास्त आवडले होते. अर्थात अमिताभने रेखा आयुष्यात यायाच्या आधीच जया नामक रडतोंड्या बाईशी लग्न केलं होतं. अन्यथा त्याला रेखा सर्वार्थाने साजेशी होती…आहे! असो!

बाकी अमिताभ व्यतिरिक्त नवीन निश्चल, विनोद मेहरा, नवरा मुकेश अग्रवाल, संजय दत्त, अक्षय कुमारपासून अगदी तिची सावली असलेल्या फरझानापर्यंत तिचं नाव सर्वांशी जोडलं गेलं. पण इतर समस्त नट्या त्यांची लफडी नाकारून “We are just good friends” म्हणत असताना रेखा मात्र हे काहीही न नाकारता आणि अमिताभ वगळता बाकी कशाचा उघडपणे स्वीकारही न करता गॉसिपमधून मिळणारा लाइमलाइट, त्यातून होणाऱ्या चर्चा आणि त्या चर्चेतून तिचं चर्चेत राहणं एन्जॉय करत होती असं मला वाटतं. पुढे चरित्र भूमिका करू लागल्यानंतर सार्वजनिक आयुष्यात रेखा तिचं वयस्क, खरं रूप सतत लपवायचा प्रयत्न करू लागली आणि हल्ली त्या प्रयत्नात अनेकदा हास्यास्पद, उथळ वागू लागली आहे. मात्र तिच्या समकालीन झीनत, हेमा, नीतू किंवा अगदी बिंदिया गोस्वामी आणि माझी आवडती दीप्ती नवल देखील ग्रेसफुली वय स्वीकारत प्रगल्भतेने वावरताना दिसतात. किंवा तिच्या आधीच्या पिढीतील शर्मिला टागोर, वहिदा रेहमान, आशा पारेखपासून आजच्या पिढीतील कियारा अडवाणीचा ग्रेसफुल वावर सिनेक्षेत्रातही ठळक उठून दिसतो. रेखाचा हल्लीचा अटेन्शन-सीकिंग करणारा सार्वजनिक वावर मला दयनीय वाटतो. विशेषतः तिने अमिताभबरोबर असलेल्या अफेअरचा वर्षानुवर्षे चर्चेत आणि लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी केलेला उपयोग पाहून हेच वाटतं. कोणीही अमिताभबद्दल विचारल्यावर अगदी ठरवून लाजून वगैरे आपण त्याच्या किती प्रेमात आहोत हे त्याचं नाव न घेता ठासून सांगणं हा मीडियाच्या चर्चेत राहण्याचा तिचा प्रयत्न असल्यासारखं वाटतं. हल्ली टीव्हीवरील रियालिटी शोमध्ये असो किंवा अवॉर्ड फंक्शन असोत, गेल्या काही वर्षांतील रेखाचा एकूणच सार्वजनिक वावर हा ‘झगमगा मला बघा’ छाप वाटतो. मग ते विनाकारण इतर नट-नट्यांच्या अंगचटीला जाणं असो किंवा आपण किती तरुण आहोत हे दाखवायला इतरांच्या गळ्यात पडून त्यांना अनकंफर्टेबल करत फोटोसाठी पोझ देणं असो. ते प्रचंड हास्यास्पद दिसतं!

बाकी नटी म्हणून रेखा कमाल होती आणि अजूनही आहे. तिचं ‘खूबसूरत’, ‘सिलसिला’ काळातील रूप, तिचं नृत्यकौशल्य, तिचा आवाज हे सगळंच टॉप हिरोईन बनायला पोषक होतं आणि म्हणूनच ती “द रेखा” बनली. तिच्या चेहऱ्यावरचे सरसर बदलणारे भाव निव्वळ कमाल होते. अर्थात रेखा काही लोकांना वाटते तशी सेक्सी वगैरे मला कधीच वाटली नाही. हो, ती आकर्षक नक्कीच होती. पण तिच्या समकालीन झीनत, परवीन जास्त सेक्सी वाटतात, तर हेमा मालिनी अत्यंत ग्रेसफुल आणि खऱ्या अर्थाने सुंदर होती..आहे. त्यामुळे मी रेखाचा फॅन वगैरे कधीच झालो नाही. तिच्या अभिनयाचा मात्र नक्कीच चाहता आहे. खरं तर ती करिअरमध्ये ज्या स्थानावर पोहोचली आहे, तिथे असताना तिने सार्वजनिक जीवनात विशेषतः या वयात परिपक्वता, मार्दव, शालीनता दाखवणं अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने ते दिसत नाही! असो.

वांद्रे येथे ‘सी स्प्रिंग्स’ या तिच्या घरावरून पूर्वी कधीतरी गेलो आहे एक-दोन वेळा! आज क्वचित मनात येतं की एक दिवस जावं तिच्या घरी आणि पाहावं की ते प्रचंड दागिने, भरजरी साड्या, मेकअपचे थर बाजूला काढलेली पांढऱ्या केसांची, सुरकुतलेल्या चेहऱ्याची, अदा न दाखवता सामान्य आजीसारखी वागणारी, “आला आहेस तर घोटभर चहा घेऊन जा” म्हणत चहाबरोबर एखादा अळीवाचा लाडू हातावर ठेवणारी, निघताना नमस्कार केल्यावर थरथरता हात माझ्या पाठीवर फिरवत तोंडभरून आशीर्वाद देणारी मऊ सुती लुगडं नसलेली रेखा आजी कशी दिसते ते! पण नंतर तेच मन नको म्हणतं! रेखा ही खरी असली तरी एका आख्यायिकेसारखी आहे. ती जे दाखवते तेच आपण बघावं आणि कुतूहलात सुख मानावं! कारण अगदी रेखाचे डोळे मिटल्यावरही शेकडो वर्षांनंतरही तिच्या चाहत्यांनी स्वतःचे डोळे मिटून ‘रेखा’ हे नाव घेतलं की त्यांच्या डोळ्यांसमोर ‘सलाम-ए-इश्क’, ‘मन क्यों बहका’, ‘परदेसिया’, ‘इन आँखों की मस्ती के’, ‘आपकी आँखों में कुछ’, ‘सुन सुन सुन दीदी’ अशा अनेक रूपातली सुंदर, आकर्षक, गूढ, अप्राप्य रेखाच यावी हीच रेखाची इच्छा असेल! आपण तिच्या इच्छेचा मान ठेवावा. तीन-चार पिढ्यांची क्रश असणाऱ्या, उत्कृष्ट अभिनेत्री आणि जिवंत आख्यायिका असलेल्या रेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!©मंदार जोग

पहिल्या सीझनच्या सर्व भागांची लिंक- मृगजळ- सर्व भाग

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

3 thoughts on “रेखा”
  1. रेखावरच छान लेख… तिच्यासारखाच मादक अन मधाळ.. खुबसुरत पण संयमी !!

  2. अप्रतिम लेख रेखाबद्दल सुरेख विश्लेषणात्मक विवेचन खूप आवडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!