फोटोग्राफी | photography

फोटोग्राफी शास्त्र की कला?

सिनेमातील काही संवाद इतके समर्पक असतात की ते खऱ्या आयुष्यातही अनेक प्रसंगात चपखल बसतात. चायना गेट मध्ये जगिरा म्हणतो “हम से लडने की हिम्मत तो जुटा लोगे, पर कमिनापन कहां से लाओगे?” लै भारी! हा संवाद प्रतिभा आणि कौशल्याच्या बाबतीत  देखील किती परफेक्ट लागू होतो. कौशल्य हे शास्त्र आहे आणि प्रतिभा ही उपजत कला आहे असं मला वाटत. कौशल्य शिकवता येतं पण प्रतिभा जन्मजात असावी लागते. उदा. गाण्याच्या प्रतिभेच्या बाबतीत मी इतका वाईट आहे की जगातील सर्वोत्कृष्ट गुरूंनी मला गाण्यांच तांत्रिक कौशल्य शिकवलं तरी दर्दी श्रोत्यांना माझं गाणं आवडणार नाही. प्रत्येक कलेच्या अविष्कारासाठी सर्जनशीलता म्हणजेच प्रतिभा उपजत असावी लागते. त्याचं कौशल्य शिकून प्रतिभेला फुलवता, तांत्रिक दृष्ट्या सुधारता नक्कीच येतं!

आज जागतिक छायाचित्रण दिवस आहे. तिथेही जगिराचा तो संवाद चपखल लागू होतो. कसा ते बघू. हे कोणीही मान्य करेल की एकाच ऑब्जेक्टचे विविध फोटोग्राफरनी काढलेले फोटो वेगळे दिसतात. त्यातील मोजके मनाला भावतात आणि बाकी फक्त फोटो आहेत म्हणून नजरेसमोर येऊन विस्मरणात निघून जातात. हल्ली त्यातल्या त्यात अगदी ४०% सुरात गाणारे नल्ले देखील स्वतःला प्रती किशोर, प्रती रफी, प्रती लता वगैरे म्हणवून स्वतःच्या गाण्यांचे ऑडियो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर पोस्ट करत लोकप्रिय (??) वगैरे होतात त्या काळात मोबाईल आणि डिजिटल क्रांती नंतर स्वतःला फोटोग्राफर म्हणवणारे लाखो लोक गल्लोगल्ली आणि घरोघरी निर्माण झाले तर आश्चर्य काय? जिथे लाईक आणि कॉमेंट हेच दर्जाचे मापदंड झाले तिथे काहीही खपू शकतं हे सर्वश्रुत आहे. एकूणच लोकांच्या अभिरूचीला “इन्स्टंट”चा गंज लागल्यावर कला ही गोष्ट हलकी झाली आहे. फोटोग्राफी बद्दल बोलायचं तर गंजेड्या नट नट्यांच्या मागे “मॅम/ बाबा राईट लेफ्ट” म्हणत धावून त्यांचे काढलेले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून त्यातून चार पैसे कमावणारे समाज माध्यमांवर उठसुठ दिसू लागले आहेत!

त्याच बरोबर पन्नास साठ हजाराचा dslr गळ्यात लटकवून वधूच्या हातावरची मेहंदी किंवा काही डोंगर दऱ्या आणि जुनाट गॅरेज वगैरे मध्ये एखादी एस्पायारींग झगमगा मुरुमेश्वरी मॉडेल आणि गुटखाहारी छपरी गॉगल कुमार ह्यांचे पोर्टफोलिओ (wtf??) किंवा लग्नाआधी मिठ्या मारलेल्या, सार्वजनिक किस वगैरे घेणाऱ्या कपल्सचे प्रि वेडिंग शूट नामक फ्याड अश्या गोष्टी अगदी ड्रोन वगैरे वापरून शूट करणारे लोक त्या बाजारात सॉलिड फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध झाले. बाकी सोडा. माझ्यासारखे मोबाईल वर चार क्लिक करणारे देखील आपण लै भारी फोटो काढलेत असं समजून आपले फोटो पोस्ट करून लाईक ओरपू लागले. खरं तर इन्स्टाग्राम ने फोटोग्राफी ही कला हलक्या बाजारात बसवून तिची बटिक बनवली! असो. काळाचा महिमा म्हणून आपण ते स्वीकारायला हवं. 

पण प्रश्न परत तोच उरतो की उत्तम प्रतीचे जिन्नस उपलब्ध करून दिल्यावर सगळ्याच बायकांच्या हातचे पदार्थ अप्रतिम चवीचे बनतात का? तसेच चांगलं इक्विपमेंट, चांगला ऑब्जेक्ट, चांगला प्रकाश आणि चांगले तंत्रज्ञान असेल तर कोणीही काढलेला फोटो चांगला येतो का? इथे चांगला म्हणजे “मनाला भिडणारा”. तर त्याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल. फोटोग्राफि वर्कशॉप मध्ये जाऊन “चांगले” फोटो काढता येतात का? तर नाही. मनाला भिडेल असा फोटो, गाणं, लेखन, चित्र, स्वयंपाक ह्यातील तंत्र शिकता येईल कदाचित, पण ती कला शिकता नाही येत. ती उपजत असावी लागते. इक्विपमेंट, ट्रेनिंग ह्यांनी ती खुलवता येते! म्हणून तर ऑटो ट्युनिंग वापरत कोणीही आज पार्श्व गायक गायिका झालेत. पण लता, अशा, किशोर, रफी परत नाही बनू शकले! आज फोटोग्राफर अनेक निर्माण झाले पण गौतम राजाध्यक्ष, जगदीश माळी, राजेश श्रेष्ठ, सुमित चोप्रा, त्याचा शिष्य डब्बू रत्नानी तसेच त्यांच्या आणखी काही समकालीन फोटोग्राफर मंडळींच्या फोटोंची उंची, खोली आणि जिवंतपणा कोणीच गाठू नाही शकले! फोटो जिवंत वाटतो ह्याचा अनुभव खूप कमी लोक देऊ शकले!

म्हणूनच आज जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त कोणत्याही कॅमेराने बेस्ट फ्रेम, लाईट, फोकस, मूड आणि इम्पॅक्ट असलेले, मनाला भिडतील असे फोटो काढणाऱ्या, छायाचित्रण कलेतील जगिराचं कमिनापन जपणाऱ्या समस्त दुर्मिळ प्रतिभावंत फोटोग्राफरना तसेच लेन्सची लांब नाळकांडी, मोबाईलचे अमुक पिक्सेल आणि इतर अद्यावत तंत्रज्ञान बाळगून “जगिराची लडनेकी हिंमत” जमा करणाऱ्या हौशे नवशे आणि गौशे अश्या सर्वांनाच जागतिक छायाचित्रण दिनाच्या शुभेच्छा! आणि फोटोग्राफी मधील देवो के देव महादेव असलेल्या कै. गौतम राजाध्यक्ष ह्यांना कडक सॅल्युट! 

इतर ललित लेखांची लिंक- ललित

आमच्या दिर्घकथांची लिंक- दीर्घ कथा

लघु कथांची लिंक- लघुकथा

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

6 thoughts on “फोटोग्राफी शास्त्र की कला?”
  1. सर नमस्कार…
    लहान तोंडी मोठा घास घेतोय… लेख छान झालाय, त्यात फोटोग्राफी अस्मादिकांचा सुद्धा आवडता छंद आहे. आमचे छोटे काकाश्री एक चांगले इव्हेंट फोटोग्राफर आहेत त्यामुळे मला ते बाळकडू मिळालय.

    फक्त ते देवो के देव जे म्हटलंय आपण गौतमजींना ते काही पटलं नाही… ते बॉलीवूड किंवा सिने विश्वातले टॉप मोस्ट छायाचित्रकार असतील, पण देवो के देव कसे असतील???
    त्यांनी ओव्हरऑल फोटोग्राफी मध्ये portraits शिवाय इतर काही शाखांमध्ये भरीव काम केलेलं दिसलं नाहीये…
    तुमचं यावर काही वेगळं मत आहे का?

  2. खूप सुंदर लिहिलंय फोटोग्राफी दिनानिमित्त शुभेच्छा

  3. लेखाच्या सुरुवातीपासूनच गौतम राजधक्ष यांच्या उल्लेख कधी येतो याची खूप उत्सुकता आणि खात्री सुद्धा होती.. लेखाचा शेवट त्यांना salute देऊन झाला.. बेस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!