जिया बेकरार है- आमच्या खूप लहानपणी कॅसेट प्लेयर (टेप रेकॉर्डर) आणि त्यात चालणाऱ्या कॅसेट नामक वस्तू होत्या. रेडिओ आणि कॅसेट प्लेयर एकत्र असेल तर त्या यंत्राला टू इन वन म्हणत. कॅसेट टाकून कानाला इयरफोन लावायचे वॉकमॅन नामक यंत्रदेखील होतं. त्याची त्या वेळच्या तरुण लोकांत खूप क्रेझ होती. अनेक दादा-ताई वॉकमॅन घेऊन स्टाईल मारत.
त्यावेळी “कॅसेट भरणे” हा एक छंद आणि अनेकांचा व्यवसाय होता. आपल्या आवडत्या गाण्यांची लिस्ट करायची आणि ती एखाद्या कोपऱ्यावरच्या कॅसेटवाल्याला “भरायला” द्यायची. कधी त्यासाठी लागणारी नवीन रिकामी कॅसेट त्याच्याकडून घ्यायची किंवा आपली रिकामी अथवा भरलेली कॅसेट त्याला द्यायची. आधी भरलेली असेल तर ती जुनी गाणी पुसली जाऊन नवीन रेकॉर्ड होत असत. कॅसेटची गंमत म्हणजे दिसायला एक बाजू दिसत असली तरी कॅसेटला A आणि B अशा दोन बाजू असत. सरळ चालवली की A बाजू आणि तिथली गाणी आणि रिव्हर्स चालवली की B बाजू आणि वेगळी गाणी!
कॅसेट ३०, ६० आणि ९० मिनिटांच्या असतं असं मला वाटतं. कॅसेट भरून आणली की एकतर त्यात आपण दुकानात दिलेली लिस्ट फोल्ड करून ठेवलेली असे किंवा मग कॅसेटच्या कव्हरवर नावं लिहायला चौकट आखलेली असे. त्यात गाण्यांची अनुक्रमणिका लिहिली जात असे. कॅसेट एकावर एक रचल्यावर समोर दिसणाऱ्या पट्टीवर कॅसेटचे नाव लिहिले जाई. म्हणजे लता हिट्स, किशोर अमिताभ वगैरे. कॅसेट प्लेयरमध्ये अडकली की ती हलक्या हाताने ओढून सोडवणे हे जिकिरीचे काम असे. मग चुरगळलेला भाग कॅसेटच्या स्पूलमध्ये पेन्सिल टाकून हळुवार फिरवत परत जागेवर लावणे हे तर निगुतीने करायचं कार्य होतं. आणि त्यात जर कॅसेट तुटली तर ती सेलोटेपचा बारीक तुकडा आतल्या बाजूला लावून जोडणे, जेणेकरून प्लेयरच्या “हेड” ला टेप लागणार नाही, हे काम हृदय शस्त्रक्रियेइतकं जटिल होतं. मला ते लीलया जमत असे. आजही फाटलेली नोट सेलोटेपच्या बारीक तुकड्याने बेमालूम चिकटवून खपवण्यात माझा हातखंडा आहे!
त्यावेळी TDK आणि SONYच्या कॅसेट म्हणजे बेस्ट क्वालिटी. बाकी चालू देखील मिळत. पण त्यांचा दर्जादेखील तितकाच असे. त्यावेळी मग कस्टममध्ये वगैरे असलेले काका किंवा आतोबा “कंटेनर पकडला” की सोनी किंवा TDKचं एखादं कार्टून मनीष मार्केटपेक्षा स्वस्त दरात आणून देत. मग आपली कॉलर टाईट! एकदम सहा कॅसेट भरायला द्यायच्या. फ्रेंड सर्कल आवाक! साधा, सोपा पण मोठा आनंद होता तो!
म्युझिक कंपन्यांच्या प्री-रेकॉर्डेड कॅसेट पण मिळत तेव्हा. म्युझिक इंडिया आणि HMV ह्या त्यात अग्रगण्य. त्यावेळी Rhythm House नामक प्रसिद्ध दुकान होतं. तिथे विविध कॅसेट मिळत असत. इंग्रजी गाण्यांच्या कॅसेट ही त्याची खासियत होती. Rhythm Houseमध्ये इंग्रजी गाण्यांच्या कॅसेट विकत घेणे हे style statement होतं! अनेक म्युझिक कॉन्सर्टची तिकिटं वगैरे पण तिथे विक्रीला ठेवलेली असत.
आमच्या घरी माझ्या जन्माच्या आधीपासून रेडिओग्राम होता. म्हणजे एक मोठा खोका ज्यात तबकडीच्या रेकॉर्ड वाजत आणि मला वाटतं रेडिओ पण लागत असेल. मी कळत्या वयात यायच्या आधीच तो काढून टाकला होता. पण मला तो अंधुक आठवतो! मग अनेक वर्षांनी आमच्या घरी Sanyo कंपनीचा पहिला टू इन वन आला आणि त्याबरोबर बाबांनी काही “भरलेल्या” कॅसेट आणल्या. त्यात एक पिवळ्या रंगाचं कव्हर असलेली कॅसेट होती. त्यात लता मंगेशकरची काही अप्रतिम आणि अजरामर गाणी होती. अनेकदा रात्री झोपताना अंधार करून बाबा ती कॅसेट लावत असत. त्यामुळे ती गाणी कायमची मनावर कोरली गेली आहेत. त्याचबरोबर अनुप जलोटा, गुलाम अली, पंकज उधास, मेहंदी हसनपासून पु. लं., शंकर पाटील, वपु. ह्यांचं कथाकथन, तसंच जॉनी लिव्हरचे विनोद, शोलेचे संपूर्ण डायलॉग आणि गाणी ह्या सर्व कॅसेट आठवतात. आशा भोसलेची मराठी गाणी, मी कॉलेजला असताना स्टाईल मारायला घेतलेल्या काही इंग्रजी गाण्यांच्या कॅसेटदेखील आठवतात. बाबा रोज वेगवेगळ्या कॅसेट हौसेने ऐकायचे आणि आमच्याही कानावर ती गाणी पडत असत! त्यांना आणि आईला गाण्यांची प्रचंड आवड. आई तर अप्रतिम गायची!
आता बदललेल्या, ढगात म्हणजे क्लाउडमध्ये साठवलेल्या संगीताचे धबधबे मोबाईलमधून कानात सांडायच्या काळात टू इन वन, कॅसेट, ती भरून घेणे हे इसवी सनपूर्व काळातील वाटू लागलं आहे. तबकडीच्या रेकॉर्ड तर अश्मयुगीन अवशेष वाटत असतील. असो! आता बाबा नाहीत. तो त्यांचा टू इन वनसुद्धा गेल्या वर्षी काढून टाकला. कॅसेटही काढल्या. पण आजही कधीतरी वाटतं की ब्लूटूथ स्पीकरवर कधी लताच्या स्वर्गीय आवाजात “जिया बेकरार है” ऐकत मी जुन्या आठवणीत रमलेलो असेन तेव्हा कदाचित बाबा देखील तिथेच कुठेतरी बसून हाताने मांडीवर ताल धरून त्या कॅसेट प्लेयरच्या दिवसांच्या आठवणीत हरवलेले असतील!
- © मंदार जोग
