मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

मानसीच्या चेहऱ्यावर असलेलं सुंदर स्माईल तिच्या स्वच्छ मनाचा जणू आरसा झालं होतं आणि त्या आरशात सौरभला आज पहिल्यांदाच स्वतःचा चेहरा दिसत होता. पलीकडे सूर्य समुद्रात मावळत होता, एक नवीन उद्या घेऊन यायला. मानसीच्या सानिध्यात, तिच्या हाताच्या स्पर्शात, तिच्या नजरेत सौरभला खूप सकारात्मकता जाणवत होती. तिच्या बरोबर असताना तो स्वतःचं टेन्शन, स्ट्रेस विसरला होता, याची त्याला जाणीव झाली.

सौरभ- किती छान बोलतेस तू यार. कमाल positive आहेस.

मानसी- Negative राहून काहीच फायदा नाही म्हणून मी positive हा पर्याय निवडला आहे. आणि एकदा त्याची सवय झाली ना की, सौरभ, सगळ्यात फक्त चांगलं दिसू लागतं. वाईटाचा त्रास होत नाही, कारण ते दिसतच नाही.

सौरभ- हे मी तुझ्याकडून नक्की शिकणार. तुझ्या १० टक्के maturity, positivity जरी अंकितामध्ये असती ना, तर आमचा संसार सुखाचा झाला असता.

मानसी- Compare अजिबात करू नको आम्हाला. कारण ह्या जगात प्रत्येक माणूस स्वतःचं रूप, रंग आणि स्वभाव घेऊन येतो. त्यांची एकमेकांशी तुलना चुकीची आहे. कारण जर त्यांच्यात साम्य ठेवायचं असतं, तर देवाने एकाच साच्यातली माणसं बनवली असती ना? रोबोटसारखी. पण मग जग खूप निरस झालं नसतं का?

सौरभ- कमाल. ह्यातही तू फक्त positive विचार करते आहेस. Hats off.

मानसी- माझं कौतुक सोड. तू सांग. तू आता काय करायचं ठरवलं आहेस? नव्या जॉबचे काही चान्सेस आहेत का? इंटरव्ह्यू दिलेस का?

सौरभ- प्रयत्न सुरू आहेत. पण you know… जॉब मार्केट सध्या जाम बेकार आहे. बघू. पण मी म्युच्युअल फंडची एजन्सी घेणार आहे. त्यासाठी परीक्षा द्यावी लागते. त्याची तयारी उद्यापासून सुरू करणार आहे. म्युच्युअल फंडमध्ये सध्या लोकांना खूप इंटरेस्ट आहे. त्यांना थोडं मार्गदर्शन केलं, तर त्यांचाही फायदा होईल आणि मलाही income सुरू होईल. नोकरीचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे मी.

मानसी- Good decision. मी तुझी पहिली क्लायंट असेन. मी म्युच्युअल फंडमध्ये invest करायचा विचार तसाही करत होते. तू एजंट झालास की सांग. मी लगेच invest करेन.

सौरभ- That’s so sweet of you.

मानसी- नाही. माझा sweetness तितकाच नाहीये. आणखी पण एक sweet गोष्ट मी केली आहे, जी तुझ्या लक्षात आलेली नाही.

सौरभने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला-

सौरभ- कोणती गोष्ट?

मानसी- किती वाजले बघ.

सौरभ- साडेसात.

मानसी- आपण “माझ्या” लंच टाईमला भेटलो होतो ना? म्हणजे माझा लंच टाईम संपल्यावर मला ऑफिसला जायला हवं होतं ना? पण मी तर इथेच आहे.

सौरभच्या ते लक्षात आल्यावर त्याला फार वाईट वाटलं आणि तो म्हणाला-

सौरभ- हो यार… तू… तू गेली का नाहीस ऑफिसला? मी वेड्यासारखा बोलत राहिलो आणि…

मानसी- नाही. लंच टाईम संपला ना, तेव्हा तू नाही, मी बोलत होते. तू ऐकत होतास. ऑफिसला जायचं माझ्या लक्षात आलं होतं. पण आज तुझ्याशी बोलताना, तुला माझा past सांगताना मलाही कुठेतरी माझ्या मनावर असलेलं एक दडपण कमी होतंय, असं वाटत होतं. खूप मस्त वाटत होतं ते सगळं तुला सांगून. जणू मी थिएटरमध्ये बसून माझ्याच आयुष्याचा सिनेमा बघत होते, असं काहीतरी. मग रुपेशला मेसेज केला, “Not well. Taking half day.” आणि मग आपण इथेच आहोत.

सौरभ- काय बोलू मी? I am speechless.

सौरभ तिच्या डोळ्यात बघत होता. ती पण सौरभचा चेहरा न्याहाळत होती. बराच वेळ दोघे एकमेकांशी काहीच न बोलता फक्त एकमेकांकडे बघत होते. मानसीने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं-

मानसी- Do you want to hug me?

सौरभ- तू कसं ओळखलंस?

मानसी- तुझ्या चेहऱ्यावरच लिहिलं आहे की, “मानसी, प्लीज मला तुला मिठी मारायची आहे. मला खूप बरं वाटेल!”

हे बोलून मानसी हसली आणि उठून उभी राहिली. सौरभ पण उभा राहिला आणि त्याने तिला एक उबदार मिठी मारली. त्या मिठीत, त्या स्पर्शात कुठेही वासना नव्हती. फक्त एक warmth होता. कुठेतरी अस्पष्ट असा thanks होता… ते त्या अवस्थेत असतानाच आपल्या बॉससाठी पार्सल घ्यायला आलेल्या अंकिताच्या भावाने, अजयने, त्यांना एकमेकांच्या मिठीत पाहिलं!

सौरभ रात्री साधारण साडेनऊ वाजता घरी आला. अजय आणि अंकिता जणू त्याची वाटच बघत होते. तो बूट काढत असताना अंकिता अजयला म्हणाली-

अंकिता- काय रे अजय, कशी मिठी मारली होती ह्याने त्या बाजारबसवीला?

असं म्हणून ती उभी राहिली. तिने अजयचा हात धरून त्याला उठवलं आणि म्हणाली-

अंकिता- प्रात्यक्षिक दाखव मला. नक्की कशी मिठी मारली होती त्याने.

असं म्हणून तिने अजयला मिठी मारली.

अंकिता- आपण भाऊ-बहीण आहोत. आपण फक्त त्यांची acting करू शकतो. त्यांच्या मनात असलेल्या भावना आपल्या मनात नाही ना येऊ शकणार? ही अशी मिठी होती का? ती किती जवळ होती ह्याच्या? ह्याचे हात नक्की कुठे होते?

ती हे करत असलेलं पाहून सौरभ चिडून म्हणाला-

सौरभ- अंकिता, ही काय नाटकं आहेत?

अंकिता- नाटकं? मी माझ्या भावाला मिठी मारली, तर नाटकं? मी आईसारखी आहे त्याला. माझ्या लेकराला मी मिठी मारली. पण तू… तू त्या वेश्येला चार लोकांत मिठीत घेऊन आवळत होतास. ते नाटक नव्हतं, तर porn सिनेमा होता.

हे ऐकून सौरभचं डोकंच सटकलं. त्याने हात उगारला. अजयने त्याचा हात धरला आणि म्हणाला-

अजय- ओ… माझ्या बहिणीवर हात नाही टाकायचा. तुम्ही त्या ब्रिटिश बिस्त्रोमध्ये काय धंदे करत होतात ना, ते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. माझ्याकडे त्याचा व्हिडिओ पण आहे. हा बघा.

असं म्हणून त्याने shoot केलेला सौरभ आणि मानसीचा व्हिडिओ सौरभला दाखवला.

सौरभ- अजय… तू मूर्ख आहेस का जरा? It was just a casual hug… त्यात कोणतीही वाईट भावना आमच्या मनात नव्हती.

अंकिता- ऐकलं का अजय? भावना महत्त्वाची बरं का. कृती नाही. उद्या हा तिच्याबरोबर झोपेल आणि आपल्याला सांगेल, मनातल्या मनात आम्ही भजन करत होतो. आमच्या मनात तशी भावना नव्हती. It was a casual sex. आणि असा सत्संग सेक्स त्या दोघांनी हजारदा केलेलाही असेल. आपल्याला नाही जमणार. हा आणि ती मानसी दोघेही संतपदाला पोहोचले आहेत व्यभिचाराच्या बाबतीत.

सौरभ- (ओरडून) अंकिता, बास.

हे ऐकून अंकिता त्याच्या जवळ आली. त्याची कॉलर धरून म्हणाली-

अंकिता- काय? मला काय म्हणालास तू? मानसी? त्या तुझ्या रखेलीच्या नावाने मला हाक मारायची हिंमत कशी झाली तुझी? की तुला आता झोपताना, खाताना, पिताना, बोलताना, हगताना तीच दिसते सतत? मला तिच्या नावाने हाक मारायची तुझी हिंमत कशी झाली, नालायक माणसा? हे तुझ्यावर तुझ्या आई-बापांनी केलेले संस्कार आहेत? चूक झाली माझी, तुझ्यासारख्या माणसाशी लग्न केलं. पैसे कमवायची अक्कल नाही, पण लफडी करण्यात पुढे. नाही. ही नाटकं मी सहन नाही करू शकत. ती बाई मला त्रास देऊन आनंदाने नाही जगू शकणार. सौरभ, मला आत्ताच्या आत्ता तिच्या घरी घेऊन चल.

सौरभ- अंकिता… प्लीज… तू काय तमाशा करते आहेस? तुझा गैरसमज झालाय. प्लीज, माझं ऐकून घे.

अजय- काय ऐकून घे? मी माझ्या नजरेने पाहिलं आहे आणि हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे.

सौरभ- ए अजय, तुला अक्कल आहे का? ती असती ना, तर आयुष्यात काहीतरी करू शकला असतास तू. तू कशाला आगी लावतोस? आणि माझा व्हिडिओ काढायचा अधिकार तुला कोणी दिला रे चु@या? दे तो फोन इथे. मी व्हिडिओ delete करतो.

असं म्हणून सौरभ त्याचा फोन घेऊ लागल्यावर अंकिता मध्ये पडली. त्याचा हात धरून म्हणाली-

अंकिता- ए डुकरा. खबरदार माझ्या भावाला हात लावलास तर. जीव घेईन मी तुझा. आत्ताच्या आत्ता मला त्या बाईच्या घरी ने.

सौरभ- मी असं काहीही करणार नाहीये. मी झोपायला जातोय.

तो जाऊ लागल्यावर अंकिता किचनमध्ये गेली आणि काडेपेटी घेऊन आली व ओरडली-

अंकिता- तू जर मला घेऊन गेला नाहीस ना तिच्या घरी, तर मी स्वतःला जाळून घेईन.

असं म्हणत तिने काडी ओढली. ते पाहून सौरभ घाबरला. धावत मागे येऊन त्याने काडी विझवली.

सौरभ- अंकिता, हा काय वेडेपणा आहे?

अंकिता- तू मला नेतो आहेस की नाही, ते सांग.

सौरभ- नाही. तिच्या घरी तमाशा नको. तिच्या बिल्डिंगमध्ये तिचं नाव विनाकारण खराब होईल.

अंकिता- अजय, ह्याला तिची किती काळजी आहे बघ. पण बायको जाळून मेली तरी हरकत नाही. ठीक आहे. तुझ्या मनासारखं करते मी. जातेच मी आता.

असं म्हणून तिने आणखी एक काडी पेटवली. सौरभने पुढे येत ती काडीही विझवली आणि अगतिकपणे म्हणाला-

सौरभ- घरी नाही नेणार मी. फोन लावून देतो. फोनवर बोल तिच्याशी.

अंकिता- हो का? बरं. लाव फोन तिला आणि स्पीकरवर ठेव.

सौरभने फोन लावला.

मानसी- हाय. झोपला नाहीस अजून?

सौरभ- मानसी, तू स्पीकरवर आहेस. अंकिताला तुझ्याशी बोलायचं आहे.

मानसी सिरीयस झाली.

मानसी- हम्म… ओके… काय बोलायचं आहे?

अंकिता- आज तू माझ्या नवऱ्याला चारचौघांत मिठी मारली होतीस की नाही?

हे ऐकून मानसी हादरली. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.

अंकिता- काय गं ए भवाने? दातखिळी बसली का तुझी? काय विचारलं मी? माझ्या नवऱ्याला तू मिठी मारली होतीस की नाही? माझ्याकडे तुमच्या मिठीचा व्हिडिओ आहे.

मानसीला काय बोलावं, कळत नव्हतं.

अंकिता- हेलो… काय विचारलं मी? (ओरडून) उत्तर दे…

मानसी- ह… हो… म्हणजे मिठी त्या अर्थाने नाही… It was…

अंकिता- Casual hug… बरोबर ना? व्यभिचाराला platonic relation असं गुळगुळीत नाव दिल्याने त्यातलं पाप कमी होत नाही. जाऊ दे. तुझ्यासारख्या बाजारू बाईशी बोलणं म्हणजे मी माझा दर्जा सोडणं आहे. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. मला तुझ्या नवऱ्याचा नंबर दे.

हे मानसी आणि सौरभ दोघांनाही अनपेक्षित होतं.

सौरभ- अंकिता, बास. तिच्या नवऱ्याचा काय संबंध? तुला तिच्याशी बोलायचं होतं ना? झालं का बोलून? मग फोन कट करतो मी.

अंकिता- (तारस्वरात ओरडत) फोनला हात लावलास ना, तर मी स्वतःला पेटवून घेईन. ए मानसी… तुझ्या नवऱ्याचा नंबर देतेस की मी माझ्या पद्धतीने मिळवू तो?

मानसी- (स्वतःला सावरून शांतपणे) 98302764….

तिने सांगितलेला नंबर अजयने लगेच आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. अंकिताने फोन कट केला आणि ती अजयबरोबर स्वतःच्या बेडरूममध्ये निघून गेली. सौरभ हताश होऊन बसला होता. तिकडे मानसीही स्तिमित होऊन शून्यात बघत बसली होती.

त्याच वेळी स्वस्तिक बारमध्ये बसलेल्या यतीनच्या फोनची रिंग वाजू लागली. त्यावर unknown नंबर दिसत होता.

क्रमशः

पुढील भाग – मृगजळ भाग ६

मृगजळ सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा- मृगजळ- सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

4 thoughts on “मृगजळ – भाग ५”
  1. मंदार दादा आधी पेड गोष्टी वाचायच्या होत्या तेंव्हाही वाचल्याच होत्या आणि आत्ता तर पुन्हा तोच आनंद पुन्हा मिळणारे

  2. सौरभ, अंकिता, मानसी, यतीन, अजय…
    चार character आणि 4 ही स्वभाव छान रंगवले.
    फक्त हर्षद ल बापा पासून तोडू नका.
    उर्मिला.

    1. बघू कथा कशी पुढे जाते ते. वाचत रहा. वाचनाची आवड असलेल्या आपल्या सर्व मित्रमैत्रिणी आणि नातेवैकांना कथेची लिंक पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!