…..असेच अजून दोन तास गेले. पहाटेचे साडेतीन चार वाजले. रोहित टॉयलेटला जाऊन येऊन बसला. नजर मुग्धावर होती. जे समोर दिसतंय ते आपलंसं करायच्या ओढीने, त्याला स्पर्श करायच्या विचाराने रोहित उभा राहिला. हळूच मुग्धाच्या शेजारी जाऊन बसला. त्याच्यात आणि मुग्धात आता सहा इंचांच अंतर होतं. तो आधाश्यासारखा तिला न्याहाळत होता. इतक्यात मुग्धा झर्रकन त्याच्याकडे वळली. तिचे डोळे त्याच्या डोळ्यात रोखलेले होते. ते पाहून रोहित प्रचंड दचकला! म्हणाला “मला वाटलं तुला झोप लागली आहे सो…” मुग्धा सावरून बसत म्हणाली “हम्म..जरा डोळा लागला होता. आलेच मी.” मुग्धा चेहऱ्यावर पाणी मारायला बाथरूम मध्ये गेली. रोहित तिच्या जागी बसून होता. अमेय झोपेत त्याला रेलल्यावर रोहित उठून बाजूला झाला. अमेय आधार सुटल्याने धापकन पडला आणि जागा झाला. तो जागा झाल्यावर रोहित लगेच त्याच्या जवळ जाऊन म्हणाला “अरे उठ. किती वेळ झोपणार?” तेवढ्यात मुग्धा परत आली. रोहित म्हणाला “हा बघ अमेय पण उठला आहे. हवं तर तुम्ही घरी जाऊन जरा आराम करून या. मी सोडतो तुम्हाला गाडीतून. मी इथे थांबतो. तू सकाळी ये मुग्धा!”
रोहित त्या दोघांना घरी सोडून आला. डॉक्टर वाट बघतच होते. त्यांच्या केबीन मध्ये एक वृद्ध दाम्पत्य बसल होतं. रोहितला बघून दोघे उभे राहिले. रोहित म्हणाला “काका प्लीज बसा तुम्ही!” डॉक्टर ने दरवाजा लावून घेतला. त्या केबिन मध्ये एक महत्वाची चर्चा सुरू झाली.
मुग्धाने घरी आल्यावर पहाटे अमेयला पोहे करून खायला घातले. तिचं मन कशातच लागत नव्हतं. डोळ्यासमोर प्रशांत येत होता. तिने शेजारच्या काकूंना परिस्थितीचा अंदाज दिला. त्यांना अमेय वर लक्ष ठेवायला सांगून, चेंज करून ती निघाली. अमेय म्हणाला “आई बाबा घरी कधी येईल?” मुग्धाला एक हुंदका आला. समोर भिंतीवर लावलेला त्या तिघांचा फोटो तिला दिसला. ती म्हणाली “येतील बाळा. बाबा आपल्याला असं सोडून जाऊ शकत नाहीत. तू देवाकडे प्रार्थना कर. ओके?” अमेय म्हणाला “आई मी करतो प्रार्थना.” मुग्धा निघाली.
डॉक्टरच्या केबिन मध्ये रोहितने डील फायनल केली होती. एक कोटी किंमत ठरली होती. डॉक्टरला त्यातले दहा लाख आणि हॉस्पिटलला वीस लाख डोनेशन देऊनही रोहितला सत्तर लाख मिळणार होते. ते वृद्ध दाम्पत्य म्हणजे दांडेकर इंडस्त्रीचे चेअरमन आप्पासाहेब दांडेकर आणि त्यांची बायको होते. त्यांनी बरोबर आणलेल्या सूट केस मधून एक कोटी कॅश काढून टेबलावर ठेवली. रोहित ती घेणार इतक्यात दांडेकर म्हणाले “दोन महत्त्वाच्या गोष्टी. पहिली म्हणजे आपण तिघे सोडून ह्या भेटीबद्दल कोणालाही कळताकामा नये. ह्यापुढे आपला काहीही संबंध नसेल. आणि दुसर म्हणजे मी आप्पासाहेब दांडेकर आहे. विश्वासाने एक कोटी कॅश देऊ शकतो आणि विश्वासघात झाला तर तो करणाऱ्याला विकून ते वसुलही करू शकतो. आम्ही आता बंगलोर फ्लाईट ने बंगलोरला जातोय. सगळी व्यवस्था तिथे केली आहे. आम्ही वाट बघू.” रोहित म्हणाला “दांडेकर सर तुम्ही काळजी करू नका. मी सर्व काम व्यवस्थित करतो.” दांडेकरांनी पैशांवर ठेवलेला हात काढून घेतला. ते दोघे निघाले. रोहितने डॉक्टरना तीस लाख दिले आणि सत्तर लाखाने भरलेली बॅग घेऊन तो केबिनच्या बाहेर पडला!
मुग्धाची लिफ्ट वर सरकत होती. मुग्धाला सर्व भविष्य अंधःकारमय दिसत होतं. लिफ्ट दहाव्या मजल्यावर थांबली. ती बाहेर येत असताना दांडेकर दाम्पत्य आत शिरले. त्यांनी रोहितचा निरोप घेतला. लिफ्ट बंद होऊन खाली गेली. रोहित मुग्धाला म्हणाला “काही खाल्लेस का?” ती म्हणाली “नको रोहित. इच्छा नाहीये!” रोहित म्हणाला “ते चालणार नाही. तुला इथे ऍडमिट करावं लागेल!” असे म्हणून त्याने त्याच्या बॅग मध्ये असलेली बिस्किटं काढली. त्यातली दोन बिस्कीट तिच्या समोर धरली. मुग्धाने तोंड फिरवलं. रोहितने एक हाताने तिची हनुवटी धरली आणि दुसऱ्या हाताने तिचे गुलाबी ओठ विलग करत ती बिस्किटं तिला भरवली. मुग्धाच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली “किती करतोस रे रोहित तू आमच्यासाठी. थँक्स!” रोहितने तिला मिठीत घेतली आणि म्हणाला “मी माझं कर्तव्य करतोय मुग्धा आणि तुलाही तुझं कर्तव्य करावं लागेल. मी तुझ्या बरोबरच आहे!”
मुग्धा आणि रोहित डॉक्टर समोर त्याच्या केबिन मध्ये बसले होते. डॉक्टरने एकदा रोहितकडे कटाक्ष टाकला आणि बोलायला सुरुवात केली. डॉक्टर म्हणाला “मिसेस साठे like i said, मिस्टर साठे आता ह्यातून परत येऊ शकत नाहीत. ते फक्त व्हेंटिलेटरमुळे श्वास चालू आहे म्हणून जिवंत आहेत इतकच!” हे ऐकून मुग्धाला हुंदका अनावर झाला. शेजारी बसलेल्या रोहितने तिच्या हातावर हात ठेवला. त्याला पूर्वीपासून आवडत असलेल्या तिच्या लांबसडक बोटात आपली बोट गुंफल्यावर त्याच्या शरीरात एक शिरशिरी आली. डॉक्टर बोलत होता. म्हणाला “मिसेस साठे, डिसीजन खूप कठीण आहे. हॉस्पिटलचं बिल रोज वाढत जाणार. सध्या रोहित साहेबांनी डिपॉझिट ठेवलं आहे म्हणून ठीक आहे. पण किती दिवस. मी डॉक्टर म्हणून सांगतो की “मेडिकली मिस्टर साठे आता परत येऊ शकत नाही. त्यांचा मेंदू मृत झालेला आहे!” मुग्धा ढसाढसा रडू लागली. रोहित आणि डॉक्टरनी एकमेकांकडे बघितलं. रोहितने मुग्धाचे डोळे आपल्या हातानी पुसून तिला जवळ घेतली आणि म्हणाला “मुग्धा तुला मी म्हणालो ना की तुलाहो तुझं कर्तव्य करायला हवं म्हणून? एक संधी आहे. बंगलोर मध्ये एक पेशंट आहे. त्याचं हार्ट खूप वीक आहे आणि त्याला ट्रान्सप्लांट करायची इच्छा आहे. डॉक्टर साहेबांनी मला सुचवलं की आपण जर प्रशांतच हार्ट त्याला दिलं तर एक जीव वाचवल्याच पुण्य तुला आणि अमेयला मिळेल!” डॉक्टर लगेच म्हणाला की “आणि ते दहा लाख रुपये पण द्यायला तयार आहेत. तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी त्याच्या बाबांची गिफ्ट समजा ते दहा लाख! आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही कंसेंट फॉर्म साइन केलात बाकी सर्व आम्ही करतो.”
मुग्धा शून्यात बघत बसून होती. डॉक्टर आणि रोहितची चलबिचल सुरू होती. मुग्धा म्हणाली “डॉक्टर मी प्रशांतला बघू इच्छिते!” डॉक्टर म्हणाले “of course” मुग्धा उठून आयसीसीयू कडे निघाली. मागे डॉक्टर आणि रोहित होते. मुग्धा आत येऊन प्रशांत समोर उभी राहिली. प्रशांतकडे रोखून बघत असताना तिच्या मनात त्यांचं लग्न झाल्यापासूनच्या सर्व आठवणी सिनेमासारख्या सरकत होत्या! तिने प्रशांतला मनातल्या मनात विचारलं “काय करू मी? तू जायचं ठरवलं आहेस का? मला उत्तर हवंय प्रशांत!” ती प्रशांतकडे टक लावून बघत होती. तिला त्यांच्यातील एक संवाद आठवला. एकदा प्रशांत तिला चिडवायला मेल्याचा अभिनय करत पडला होता. मुग्धा म्हणाली “असा कसा मरून देईन मी तुला?” तिला आपल्या जवळ घेत प्रशांत म्हणाला “मी पण तुला सोडून कसा मरेन? आणि ज्या दिवशी मृत्यू येईल ना त्या दिवशी तुझ्या गळ्यात असलेलं हे मंगळसूत्र आधी तुटेल आणि मग माझा प्राण जाईल!”
ते आठवून मुग्धाने मंगळसूत्र हात लावून तपासलं. ते व्यवस्थित होत. मुग्धाला बरं वाटलं. ती आनंदाने पुढे झाली. निपचित पडलेल्या प्रशांतच्या छातीवर डोकं ठेवलं. खूप रडली. पण आशा कायम होती. मंगळसूत्राच्या धड असण्याने. ती रोहित आणि डॉक्टरना नकार देऊन वाट बघायचा निर्णय घेऊन डोळे पुसत उठली. उठताना तीच मंगळसूत्र प्रशांतला लावलेल्या असंख्य नळ्यापैकी एका नळीत अडकल! तुटून प्रशांतच्या अंगावर पडलं! ते लक्षात आल्यावर मुग्धा नखशिखांत हादरली! तिला प्रशांतने उत्तर दिलं होतं! ती वळून रोहित आणि डॉक्टरला म्हणाली “कंसेंट फॉर्म द्या! मी तयार आहे!” डॉक्टर आणि रोहितच्या आनंदाला पारावर नव्हता! मुग्धाच्या डोळ्यासमोर प्रशांतचा धूसर होत जाणार हसरा चेहरा होता! तिचं तुटलेलं मंगळसूत्र घरंगळुन प्रशांतच्या हाताला लटकत होतं!
©मंदार जोग
क्रमशः

