मानसीने कॉफीचा एक सिप घेतला. सिगारेट पेटवली आणि सौरभच्या नजरेला नजर मिळवत ती बोलू लागली.
मानसी- वीस वर्षांपूर्वी मी आणि यतीन भेटलो. यतीन रिक्षा चालवायचा. आमच्या घराजवळ रिक्षा स्टँड होता. तिथे असायचा. दिसायला देखणा होता. मी घरातून बाहेर पडल्यावर माझ्याकडे बघायचा. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते. त्याच्यावर भाळले. ते वयच असं होतं की स्वतःचं बरं-वाईट कळत नव्हतं. घरून अर्थात विरोध होता. पण ग्रॅज्युएट झाल्यावर लगेच पळून जाऊन त्याच्याशी लग्न केलं आणि त्याच्या लहानशा घरात राहू लागले. मला एका कार्गो कंपनीत नोकरी लागली. यतीन रिक्षा चालवत होता. पण मनात येईल तेव्हाच. बाकी मित्रांबरोबर भटकायचा. त्याला सिरीयलमध्ये काम करायची इच्छा होती. त्यासाठी तो निर्मात्यांच्या ऑफिसात जायचा. स्वतःचे पोर्टफोलिओ तयार करायचा. त्यासाठी भरपूर खर्च करायचा. काम मिळालं नाही की चिडायचा. निराश व्हायचा आणि दारू प्यायचा.
सौरभ- ओह…
मानसी- तो घराची काहीच जबाबदारी घेत नव्हता. पण त्याला मूल हवं होतं. मी अजिबात तयार नव्हते. त्यावरून आमचे खटके उडत होते. अशीच तीन वर्षं गेली आणि एका बेसावध क्षणी मला दिवस राहिले. तोवर यतीनने रिक्षा विकून टॅक्सी टाकली होती. त्याला पैसे मी दिले होते. ती ड्रायव्हरना चालवायला देऊन तो स्वतः सिरीयलमध्ये फुटकळ रोल करत होता. शूटिंग संपलं की चौथा अंक सुरू. आणि त्याच परिस्थितीत आदित्यचा, माझ्या मुलाचा जन्म झाला. आदित्यची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. त्यात घरची जबाबदारी पण माझ्यावर होती. माझ्या पगारात घर चालत होतं. आणि त्यातच यतीनने टीव्ही सिरीयल प्रोड्यूस करायचा निर्णय घेतला.
सौरभ- बापरे… वेडा आहे का तो? सोपं असतं का सिरीयल प्रोड्यूस करणं? आणि पैसे? ते कुठून आणले?
मानसी- माझ्याकडे मागत होता. मी स्पष्ट नाही सांगितलं. मला आदित्यची शाळेची फी होती, घरचे खर्च होते. पैसे उरतच नव्हते माझ्याकडे. मग मला माझ्या वडिलांकडून घ्यायला सांगितलं त्याने. मी स्पष्ट नकार दिला. त्या रात्री तो खूप पिऊन आला आणि त्याने पहिल्यांदाच माझ्या अंगावर हात टाकला. मी रात्रीच आदित्यला घेऊन घरातून बाहेर पडले. माझ्या बाबांच्या घरी गेले. बाबा म्हणाले मला, “आम्ही नको सांगत असताना त्याच्याबरोबर पळून लग्न केलंस. आता भोग त्याची फळं.” पण आईने मला ठेवून घेतलं. माझी बहिण, तिचा नवरा पण आले तिथे आणि मला स्पष्ट सांगितलं की आता परत जायचं नाही त्याच्याकडे.
सौरभ- बरोबरच आहे. अंगावर हात टाकतो म्हणजे काय?
मानसी- दुसऱ्या दिवशी सकाळी तो आला. माझी आणि बाबांची माफी मागितली. सिरीयलचं टेन्शन आहे म्हणून हात उठला, म्हणाला. परत कधीच हात उचलणार नाही, असं वचन दिलं त्याने.
सौरभ- खोटं… खोटं बोलत होता तो.
मानसी- त्याचं वागणं, बोलणं खोटं असलं तरी त्याचं प्रेम खरं होतं… असं मला त्यावेळी वाटलं… आणि कदाचित होतं त्याचं माझ्यावर प्रेम तेव्हा… त्या हक्कानेच त्याने कदाचित हात उचलला होता. त्याला अपेक्षा होती की मी पैसे नक्की देईन. पण मी नाही म्हणाल्यावर त्याचा अपेक्षाभंग झाला. मी त्याच्याबरोबर घरी आले. घरी आल्यावर मलाच गिल्टी वाटलं. मी त्याला विचारलं, किती पैसे हवे आहेत? त्याला वीस लाख हवे होते. ती रक्कम खूप मोठी होती. मी बाबांच्या मागे लागून पाच लाख आणि माझ्या आईच्या पतपेढी मधून लोन घेऊन पाच लाख, असे दहा लाख त्याला दिले.
सौरभ- (चिडून) What? तू… तू मूर्ख आहेस का जरा? का दिलेस तू त्याला पैसे? तो ते उडवणार. ते परत कधीच येणार नाहीत.
मानसी- (हसून) हम्म… मला पैसे देताना बाबा पण हेच म्हणाले होते. ते दहा लाख आणि घर गहाण ठेवून, मला गॅरंटर ठेवून यतीनने आणखी दहा लाखांचं कर्ज काढून सिरीयलचे पायलट एपिसोड बनवले.
सौरभ- Oh God… मग?
मानसी- (हसून) मग काय? जे सर्वांना दिसलं होतं, पण मला दिसलं नव्हतं, तेच झालं. त्याचे पायलट सगळ्या चॅनेल्सनी रिजेक्ट केले. यतीन प्रचंड फ्रस्ट्रेट झाला. टॅक्सीचं मेंटेनन्स, सर्व्हिसिंग परवडत नसल्याने ती पण दारात उभी राहून सडत होती. बँकेचे फोन येत होते हप्ते भरण्यासाठी आणि घरावर जप्तीची धमकी द्यायला. आदित्यची फी वाढली होती. त्याची ट्युशन, स्कूल बस, कपडे, बूट, वह्या, पुस्तकं, पिकनिक, पॉकेट मनी… माझे खर्च वाढत होते. आणि एक दिवस बँकेचे लोक घरी आले. वसुलीवाले गुंड. त्यांना पाहून यतीन पळून गेला. मी आणि आदित्य त्यांच्या घाणेरड्या शिव्या आणि धमक्या ऐकत उभे होतो. त्यांची प्रत्येक शिवी मला टोचत होती. माझ्याबद्दल ते जे घाण बोलत होते ते ऐकून आदित्य हादरला होता. आणि ज्याच्यासाठी ते लोन घेतलं होतं, तो आम्हाला सोडून पळून गेला होता.
सौरभ- What a ba@tard… Bloody coward…
मानसी- जीजाजी… म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर… ते पण हेच म्हणाले, जे घडलं ते ऐकल्यावर. त्यांनी मला सांगितलं की ते बँक आणि पतपेढी दोन्हीचं लोन फेडतील. पण यतीनने आमची राहती जागा माझ्या नावावर करायची. यतीनजवळ दुसरा पर्याय नव्हता. त्याला गुंड मारणार होते आणि पोलीस उचलून नेणार होते. तो तयार झाला. जीजाजींनी दोन्ही लोन व्याजासकट फेडली आणि जागा माझ्या नावावर झाली.
सौरभ- तुझे जीजाजी खूप चांगले माणूस आहेत.
मानसी- चांगुलपणा कधीच निरपेक्ष नसतो.
सौरभ- म्हणजे?
मानसी- म्हणजे ते लोन फेडल्यावर जीजाजींनी आई-बाबांचं घर बहिणीच्या नावावर करायला माझी हरकत नाही, असा कागद करून घेतला माझ्याकडून. NOC to transfer.
सौरभ- बापरे…
मानसी- ते म्हणाले देखील की, “तू माझं लोन परत केलंस की हा कागद फाडून टाकणार.” आणि मला ते योग्य वाटलं. ते व्यावसायिक आहेत. त्यांनी त्यांचे पैसे सुरक्षित केले. हा व्यवहार आहे. त्यांनी मला वाचवलं, ते माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मी NOC वर सही केली.
सौरभ- मग?
मानसी- मग माझ्या आयुष्यातून यतीन कायचा गेला. म्हणजे आम्ही एका घरात राहत होतो. तो फुटकळ काही करायचा किंवा काहीच करायचा नाही. आम्ही जुजबी बोलत होतो. त्याला दोन वेळा जेवायला घालायची जबाबदारी मी घेतली होती. आदित्य मोठा होत होता आणि मी दर एक-दीड वर्षांनी नोकरी बदलत, २० ते ३०% पगारवाढ घेत नवी नोकरी पकडून जीजाजींचं कर्ज फेडत होते. कर्जाच्या त्या काळात मी एकही दागिना सोड, मेकअपचं सामानही घेतलं नाही. साधी लिपस्टिकसुद्धा नाही. दोन-तीन जोडी कपडे होते, त्यावर दिवस काढले. आदित्यला कशाचीच कमी पडू दिली नाही. दर महिन्याला जीजाजींचं कर्ज फेडत होते. जवळजवळ दहा वर्षं लागली मला त्यांचं कर्ज व्याजासकट फेडायला.
सौरभ- आणि ती NOC? ती फाडली का तुझ्या जीजाजींनी पैसे परत मिळाल्यावर?
मानसी- हो, ते फाडणार होते. पण मीच नको म्हणाले. मी त्यांना म्हणाले की बाबांचं घर ताईच्या नावावर होऊ द्या. मला ते नको. फक्त कधी माहेरी आले तर माझ्यासाठी एक खोली ठेवा.
सौरभ- हा काय वेडेपणा आहे मानसी?
मानसी- वेडेपणा नाही सौरभ. म्हणजे तुला तो वेडेपणा वाटू शकतो. पण खरं सांगू का? मी जेव्हा ती NOC सही केली ना, तेव्हाच मी बाबांच्या घरापासून मनाने लांब गेले. माझ्या भावना संपल्या त्या घराबद्दलच्या. ते माझं माहेर होतं आणि NOC सही केल्यावर ते एक collateral झालं. माझे आई-बाबा त्या घरात आनंदात होते, इतकाच मला आनंद होता. बाकी ती वास्तू माझ्यासाठी खूप परकी होती. आणि पैशाचं म्हणशील तर मी कधीच आयुष्यात पैशाला महत्त्व दिलं नाही. आजही देत नाही. माझ्यासाठी माणसं, नाती आणि आज मी जे जगते आहे ना, ते महत्त्वाचं असतं. त्यात मी आनंद शोधते. अगदी लहान-लहान गोष्टींत. माझ्यासाठी आनंद महत्त्वाचा आहे. पैसे, व्यवहार हे दुय्यम आहेत. आणि पैशांचे इतके वाईट अनुभव आल्यावर तर मला त्याबद्दल आकर्षण वाटत नाही. पैसा हे आनंद मिळवण्याचं निव्वळ माध्यम आहे… पैसा म्हणजे आनंद नाही. पुढे बाबा गेले, आई गेली… जीजाजी आणि ताई बाबांचं घर छान मेंटेन करतात.
सौरभ- पण डिव्होर्स का?
मानसी- तो पण ऑर्गॅनिक आहे. यतीनशी लग्न करणे ही माझी चूक होती आणि पुढल्या आयुष्यात दररोज त्याची जाणीव मला होत होती. पण त्यात यतीनची काहीही चूक नाहीये. कारण यतीन लग्नाच्या आधी होता तसाच पुढे आणि आजही आहे. बेजबाबदार, मनाला वाटेल ते करणारा, फक्त स्वतःवर प्रेम करणारा… चूक माझी की त्याला लग्नाआधी ओळखू शकले नाही. त्याने कधीच तो तसा नाहीये हे दाखवायचा प्रयत्न केला नाही मला. आमच्यातला संवाद, प्रेम, आपुलकी सगळंच संपत गेलं हळूहळू… आणि डिव्होर्स म्हणजे संपलेल्या नात्याला मी दिलेला औपचारिक निरोप आहे. त्याचं घर पण मी त्याच्या नावावर केलं आहे.
सौरभ- काय? तू… तू ना… तुला एक मारायची इच्छा होते आहे मला. तू त्याचं कर्ज फेडलंस. त्याने तुला एक छदाम दिला नाही. तुझ्या पैशावर तो जगतो आहे आणि डिव्होर्सनंतर घर त्याला मिळणार? अगं, तो ते विकून खाईल.
मानसी- Exactly. म्हणूनच मी ते त्याला दिलंय. माझ्याकडे नोकरी आहे. उत्तम पगार आहे. पण त्याच्याकडे फक्त ते घर आहे. उद्या ते विकून तो जगू शकेल. दोन वेळा जेवू शकेल. आणि त्या घरासाठीदेखील माझ्या मनात काहीच भावना नाहीत. मग ज्यात मनच रमत नाही, अशी गोष्ट स्वतःजवळ का बाळगू मी? आणि ती पण माझ्यापेक्षा त्याची गरज यतीनला जास्त आहे हे माहीत असताना? त्या घराबरोबर यतीनच्या आठवणीसुद्धा मी त्याला परत केल्या. आता फक्त आदित्य आहे माझ्या जगण्याचं कारण. आमच्या डिव्होर्सनंतर आदित्य त्याला हवं तितके दिवस यतीनकडे राहील. मनात येईल तेव्हा माझ्याकडे राहील. मी त्याला त्याच्या बापापासून तोडणार नाहीये. पण आता डिव्होर्स झाला की एक चॅप्टर संपेल माझ्या आयुष्यातून.
हे बोलून मानसीने थोटकापर्यंत आलेली, तिच्या लिपस्टिकचा रंग फिल्टरला लागलेली सिगारेट विझवली आणि डोळ्यांतून बाहेर पडणाऱ्या अश्रूंना त्याआधीच बोटाने पुसत सौरभकडे बघत एक स्माईल केली. सौरभने हळूच तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला-
सौरभ- मला कळत नाहीये मानसी की मी माझ्या सिच्युएशनवर रडू, की तुझ्या आयुष्यात जे झालं आहे त्यावर हळहळ व्यक्त करू, की तू अशी वेडी आहेस म्हणून तुला एक ठेवून देऊ… काय करू मी?
मानसीने त्याच्या हातावर तिचा दुसरा हात ठेवला आणि म्हणाली-
मानसी- तू ना तुझा आज जगायला शिक. कारण आज आपला असतो. काल आधीच निघून गेलेला असतो, आपल्याला काहीतरी शिकवून. त्यावर रडून काहीच होत नाही. आणि उद्या अजून आलेला नाहीये. त्याला anticipate करून रडण्यातही काही अर्थ नाही. कारण तो उद्या आपल्या आयुष्यात येईल की नाही, हे उद्याच कळणार आहे. म्हणून मी ठरवलं आहे की आजमध्ये जगायचं. आयुष्य मस्त आहे. जे आहे त्यात आनंद शोधायचा. कोणाबद्दलही राग नाही, असूया नाही. सगळ्यांना माफ करून टाकायचं आणि आपण सर्वांशी चांगलं वागायचं.
मानसीच्या चेहऱ्यावर असलेलं सुंदर स्माईल तिच्या स्वच्छ मनाचा जणू आरसा झाला होतं आणि त्या आरशात सौरभला आज पहिल्यांदा स्वतःचा चेहरा दिसत होता. पलीकडे सूर्य समुद्रात मावळत होता, एक नवीन उद्या घेऊन यायला.
क्रमश:
पुढील भाग मृगजळ – भाग ५
मृगजळ सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा- मृगजळ- सर्व भाग

Interesting
पुढच्या भागाची उत्सुकता लागली….interested
[…] पुढील भाग मृगजळ – भाग ४ […]