तात्या | mandar jog

तात्या

साधारण तेरा वर्षांपूर्वी माझा मित्र त्या लोकरीच्या गुंड्याला घरी घेऊन आला.

जस्मिन तेव्हा वार्धक्याकडे झुकली होती. ती शांत, समंजस आणि अत्यंत प्रेमळ होतीच. पण आता वयानुसार प्रगल्भ देखील झाली होती. ती साधारण त्याच्या आजीच्या वयाची होती तो मित्राच्या घरी आला तेव्हा. जस्मिन म्हणजे Labrador मादी आणि हा pug बालक. मित्राच्या ओंजळीत मावणारा. तो यायच्या आधी मित्राच्या सगळ्या कुत्र्यांची नावं इंग्रजी होती. अगदी रॉबिनपासून लिझा, जेनेट आणि जस्मिनपर्यंत. पण ह्याचं नाव मात्र मित्राने तात्या असं ठेवलं. हो, कुत्र्याचं नाव तात्या! असं म्हणतात की कुत्र्यांवर प्रेम करणारे लोक पुण्यवान असतात. मित्राच्या घराचे सगळेच अति पुण्यवान लोक आहेत. त्याच्या घरी आलेल्या प्रत्येक कुत्र्याने गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलेलं असल्याने त्यांना माझ्या मित्राच्या घरासारखं घर मिळालं आहे. म्हणजे आमचा एक मित्र म्हणतो, पण कुत्रा म्हणून जन्माला यावं आणि ह्याच्या घरी जावं. आयुष्य सार्थकी लागेल!

तात्याही त्याला अपवाद नव्हता. मूर्ती लहान आणि आवाज, मस्ती महान असा तो लहानपणी होता. घरच्यांशी खेळायचा. त्यांना पळवायचा. आणि आजीच्या वयाच्या जस्मिनला जाम छळायचा. ती बिचारी एका कोपऱ्यात बसलेली असायची आणि हा तिचे कान ओढ, शेपूट ओढ, तिच्यासमोर उभा राहून भुंक असे चाळे करायचा. ती रागाने उठली की मित्राच्या पायाखाली येऊन लपायचा. पण जस्मिन आणि त्याचा एकमेकांवर जीव होता. ती गेल्यावर अनेक महिने तात्या ती बसायची त्या टेबलखाली जाऊन तिला शोधायचा, वास घ्यायचा.

दोघे एकत्र फिरायला जात. ती गेल्यावर त्याला पट्टा घालून माणूस फिरायला नेऊ लागला की तो भुंकून जस्मिनला हाक मारायचा!

हळूहळू तो घरातलेच नाही तर आम्हा मित्रांचा देखील लाडका बनला. शंकराच्या देवळात गेल्यावर आधी नंदीला नमस्कार करतात तसा मित्राच्या घरी गेल्यावर आधी तात्याशी खेळायचं. तो वास घेणार, अंगावर उड्या मारणार. त्याला गोंजारायचं, त्याची चौकशी करायची. तो शांत झाला की मग मित्राला भेटायचं. Pug असल्याने उंची कमी. सुरकुतलेला चेहरा, बाहेर आलेले डोळे असं त्याचं रूप आणि ढुंगण हलवत घरभर फिरायचा. मित्र, त्याची मुलगी आणि त्याची मेहुणी हे त्याला सर्वात प्रिय होते. कारण ते त्याला हवी तशी मस्ती करायचे. त्याचे लाड करायचे. मित्राची बायको मात्र कडक. तिला तो थोडा भीत असावा. पण तिचाही जीव होता त्याच्यावर.

मित्राच्या इमारतीत आणि परिसरातले लोक, गडीमाणसं, भाजीवाले, दूधवाले सगळेच त्याच्यावर प्रेम करत. तो होताच अतिशय क्युट आणि प्रेमळ आणि पहिल्याच भेटीत प्रेमात पडावं असा लाघवी. तितकाच हट्टी पण होता. तो काय “बोलायचा” हे फक्त मित्र आणि त्याच्या घरच्यांना कळायचं. हो, त्यांचे सगळे कुत्रे त्यांच्याशी बोलतात. भुंकत नाहीत. मला तो सेन्स नसल्याने तो नक्की काय सांगतोय ते कळायचं नाही. पण त्याच्या प्रत्येक भुंकण्यात फरक आहे आणि तो काहीतरी सांगतोय, मागतोय हे मला कळत असे. तो स्वतःचे जितके लाड करून घ्यायचा त्याहून कित्येक पट प्रेम तो घरातल्या सर्वांना द्यायचा.

जवळजवळ एक तप आणि काही वर्षं तो मित्राचे कुटुंब आणि त्यांचे आमच्यासारखे मित्र, नातेवाईक, हितचिंतक, ओळखीचे, नोकरवर्ग, व्हेंडर ह्या सर्वांच्या आयुष्याचा भाग झाला होता. त्याची मस्ती, त्याचा आळस, त्याची उत्सुकता, त्याचं चिडणं, त्याचा क्युटनेस, त्याचं प्रेम आणि त्याचं निर्मळ मन, purity सगळ्यांनाच आवडत होती. मालकाकडून फक्त प्रेमाची आणि जेवणाची अपेक्षा ठेवून त्याच्यावर फक्त आणि फक्त प्रेम करणारी कुत्रा ही जमात मला प्रचंड आवडते. त्यांना मालक गरीब आहे की श्रीमंत, हिंदू आहे की मुसलमान, बाई आहे की पुरुष, गोरा की काळा, धडधाकट की अपंग, चांगला की वाईट ह्याच्याशी देणं-घेणं नसतं. खरं निस्वार्थी प्रेम आणि loyalty कुत्र्यांची असते. तात्याही त्याला अपवाद नव्हता. गेल्या तेरा चौदा वर्षांत मित्र, त्याचे नातेवाईक, आम्ही मित्र ह्यांच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरे आली. पण तात्याचं प्रेम कधीच कमी झालं नाही.

शेवटी वार्धक्य कोणालाही चुकलेलं नाही. तात्या त्याच्या नावाला साजेसा म्हातारा झाला. शरीर साथ देईनासं झालं. मित्राने शक्य ते सर्व इलाज केले. पण तात्याचं वय माणसाच्या वयाशी तुलना केल्यास साधारण ९५ वर्षं होतं. त्याला काय त्रास झाले त्याचं वर्णन मी करणार नाही कारण ते आठवून मलाही त्रास होईल. मित्राने शेवटपर्यंत झुंज दिली, साथ दिली. पण काळ त्या छोट्याशा म्हाताऱ्याला, आमच्या तात्याला न्यायला आतुर झाला होता. त्याच्यासमोर मित्र आणि डॉक्टरांचे प्रयत्न, आमच्या प्रार्थना खुज्या ठरल्या. नियतीने डाव साधला आणि आज सकाळी तात्या गेला! मित्राने फोन करून ही बातमी दिल्यावर डोळ्यात टचकन पाणी आलं जे हे लिहिताना देखील येत आहे.

आता मित्राच्या घरी गेल्यावर मोठे डोळे करत माझ्या अंगावर उड्या मारणारा कोणी नसेल, आम्ही गाणी म्हणताना दारात बसून आमची गाणी ऐकणारा आमचा श्रोता नसेल, मित्राच्या मुलीच्या कुशीत झोपणारा तिचा लाडका तात्या नसेल. तीच शांतता परत अनुभवावी लागेल जी जस्मिन गेल्यावर जाणवली होती. निदान तेव्हा ती भेदायला तात्या तरी होता. आता मात्र ती शांतता असह्य असेल!

तात्या, आमच्या बाळा, असशील तिथे सुखात रहा. देव तुला प्रेम, आनंद आणि चिरतारुण्य देवो!

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “तात्या”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!