चांद मातला भाग ८
मीरा चा मेसेज बघुन आनंदीने फोन बाजुला ठेवला आणि तिच्या मनात विचार आला की का करतेय मी मीरा ला मदत? केवळ मैत्रीण म्हणुन का अजुन काही ? स्त्री रोग तज्ञ म्हणुन काम करताना नकळत मनुष्य… खरंतर स्त्री मनाचा धांडोळा घेण्याचा स्वभावच बनला आपला . प्रत्येक प्रेम आणि गर्भारपण फक्त आनंद घेऊन येत असं नाही …. तेवढ्यात हॉस्पिटलमधुन आलेल्या फोन ने आनंदीच्या विचारांची तंद्री भंगली .
इकडे आनंदी ला मेसेज करून मीरा ने फोन बंद केला पण मनातली शंका कुशंकांची वावटळ मात्र थांबता थांबेना. मीरा तशीच डोळे मिटुन अंथरुणावर पडली. धुळ्यासारख्या छोट्या शहरातली पोवळ्यांची सायली…अगदी नावा सारखी सुंदर, नाजुक, घरच्यांची लाडकी, लग्नानंतर मीरा मोहित वेदक बनुन मेट्रो सिटी पुण्यात आली. लग्नाची नवलाई ओसरत नाही तोच बाळाची चाहुल लागली. संसार आणि मानसच्या जबाबदारीला सरावलेल्या मीरा ने जरा कुठे स्वतःसाठी जगायचं ठरवलं आणि ….. मीराचे डोळे खाडकन उघडले. पलीकडे झोपलेल्या मोहित ला बघुन मीरा च्या मनात परत एक कळ उठली. नोकरीच्या व्यापातुन आपल्या आणि मानससाठी वेळ काढणारा मोहित खरा कि मॉल मध्ये ज्याला मानस ने माया सोबत पाहिल तो खरा? आणि जर हे खरं असेल तर आजवर आपल्याला एकटं सोडुन मोहित दौऱ्यावरच जात होता कि त्या प्रत्येकवेळी तो माया सोबतच…… मीराला पडणारा प्रत्येक प्रश्न तिला अजुनच खोल खोल गर्तेत नेत होता. तितक्यात झोप चाळवल्याने मानस हलला. त्याला कुशीत घेऊन थोपटताना मीरा ने मूकपणे आपल्या हुंदक्याला वाट करुन दिली .
मीरा ला सकाळी जाग आली ती मोहित वाजवत असलेल्या शिळेने. मूड विशेष चांगला असला की मोहित अशी शीळ वाजवतो आणि कारण विचारलं की पटकन कमरेत हात घालुन जवळ ओढणार आणि दुसरा हात हातात घेऊन त्याच शिळे च्या तालावर रूमभर नाचवणार आणि मानस समोर नसल्यावर तर ….
ह्या आठवणीने आपसुकच मीरा च्या अंगावर शिरशिरी आली आणि डोळे मिटले गेले. पण क्षणार्धातच तिचं मन भूतकाळातुन वर्तमानात आलं. अंगावरची शिरशिरी शिसारीत बदलली आणि मनात मोहित बद्दलच्या प्रेमापेक्षा अविश्वास, शंका आणि वैफल्याने गर्दी केली .
मीरा ने सहज मोबाईल हातात घेतला तर आधीच रोहन चा मेसेज आलेला होता.
” मनु , मी वाट बघतोय 11 वाजायची. लक्षात आहे ना? “
कालपरवा भेटलेल्या रोहनला आपण ‘मनु ‘ हाक मारायचा हक्क दिलाच कसा? मीराला स्वतः चाच राग आला.
रोहन च्या साथीने थोडंफार मोकळ्या आकाशाचा आनंद घेऊ पाहणाऱ्या आपण एका मोठ्या अडचणीत सापडलो आहोत ह्याची आता मीराला खात्री पटली होती. एकदा वाटलं मोहित जवळ जाऊन त्याला सगळं सांगावं म्हणजे मनावरचा ताण हलका होईल पण …. मोहितच्या बॅग मध्ये सापडलेल बिल आणि मायाचा मोहित ला आलेला मेसेज तिला तसं करू देत नव्हता. ह्या परिस्थितीत आनंदी सारखी खंबीर साथ देणारी मैत्रीण दिल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले .
गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अनपेक्षित घटनांनी मीराचं आयुष्यच ढवळून निघालं होत पण परिस्थितीला शरण न जाता कणखरपणाने सगळी परिस्थिती हाताळायचं तिने ठरवलं .
ऑफीसला जाताना किस करायला जवळ आलेल्या मोहितची तिला खुपच घृणा वाटली. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच मीराने असं तोंड दुसरीकडे वळवल्याने मोहित चकित झाला पण आता लवकरच आपला plan यशस्वी होणार ह्या खुशीत आणि मायाला भेटण्याच्या ओढीने तो बाहेर पडला .
घरातली आवश्यक तेवढीच कामं कशीबशी उरकुन मानस ची शाळेची तयारी झाल्यावर मीराने मानस ला जवळ घेतल आणि आज आईला कामासाठी बाहेर जायचं आहे त्यामुळे तु शेजारच्या प्रणाली मावशी कडे थांब. आज तीच तुला पिकअप करेल .
” आई, तुला काय काम आहे? तु लवकर ये. मला तुझ्या शिवाय करमत नाही .”
मानस च्या निरागस बोलांनी मीरा च्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती त्याला घट्ट कवटाळून म्हणाली, “नाही रे माझ्या सोन्या, मी तुला सोडुन कुठेही जाणार नाही .”
मानसचं हे निष्पाप प्रेम मीराला सगळ्या संकटांशी लढायला बळ देऊन गेलं.
मानसला शेजारच्या प्रणाली कडे सोडुन मीरा रिक्षात बसली . पहिल्यांदा रोहनला भेटायला आतुर झालेली मीरा आज त्याला स्वतः पासुन दूर कसं ठेवता येईल ह्याचा विचार करत होती. भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याची काळजी दोन्ही बाजुला ठेवुन तिला सगळं लक्ष केवळ वर्तमानावर केंद्रित करायचं होत .टॉप मॉडेल बनवण्याची स्वप्न दाखवणाऱ्या रोहन समोर मीराच्या अभिनयाचा कस लागणार होता .
मोहित कडुन आलेल्या पैश्यांच्या पाकिटाला जागुन रोहन आज अगदी वेळेत वाडेश्वरला हजर होता. रेस्टॉरंटमध्ये शिरणाऱ्या मीराला बसल्या जागेवरूनच हात दाखवत रोहनच्या मुरलेल्या नजरेने मीराच्या सर्वांगाची मापं घेतली.
मीरा साठी खुर्ची ओढायला उठलेल्या रोहनला तिने हातानेच थांबवलं. रोहनने चमकुन मीरा कडे पाहिलं पण मीरा एक ठेवणीतल स्माइल देऊन त्याच्या समोर बसली .
इकडे मीरा शब्दांची जुळवाजुळव करत होती तर रोहनला सावज आपल्या पूर्ण ताब्यात आल्याचा आनंद होत होता आणि त्याच वेळेला मोहित च्या वागण्याचं आश्चर्य देखील वाटत होतं. पण ‘अपना सपना मनी मनी ‘. बाकी आपल्याला काय करायचंय ? ह्या एकाच डील मुळे त्याचं बरंच एजुकेशन लोन फेडले जाणार होतं.
” I am sorry मीरा. please मला माफ कर. अगं, कमळाच्या फुलाला बघुन भुंगा जसा बेभान होतो आणि स्वतः ला विसरुन फुलात कैद होतो ना तसंच काहीसं माझं झालं. मी नाही थांबवु शकलो स्वतःला”. असं म्हणुन रोहन ने मीरा चे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. मीरा ला काय बोलावं ते सुचलं नाही पण दोन टपोरी आसवं मीरा च्या गुलाबी गालांवरुन ओघळत रोहन च्या हातांवर पडली तसा रोहन जरा सावध झाला. जास्त घाई केली तर शिकार निसटुन जाईल ह्या भीतीने त्याने हे प्रकरण थोडं सावकाश हाताळलं पाहिजे असं स्वतःला बजावलं.
अर्धं काम मीरा च्या डोळ्यातल्या पाण्याने केलंच होतं. रोहनच्या मनाचा अंदाज लावत मीरा म्हणाली, “रोहन, मी छोट्या गावातुन आलेली एक खुप साधी, फारसं व्यवहार ज्ञान नसलेली हाउसवाइफ आहे. केवळ वेळ जावा म्हणुन फ़ेसबुक चा वापर करणारी मी तुझ्या प्रशंसेच्या चार शब्दांनी मोहरून गेले. तुझ्या प्रेमाने मला माझ्या अस्तित्वाची नव्याने जाणीव करून दिली. तुझ्या डोळ्यात मी स्वतःला शोधते रे पण ……”
” पण …पण काय मनु?” रोहनचा जीव त्याच्या कानात गोळा झाला होता.
“आपण हे फोटो शूट वगैरे काही नको करायला. तुला हेच सांगायला मी इथे आले होते. चल निघते मी”. असं म्हणुन मीरा ने पर्स उचलली .
आपली नोटांची बंडलं अशी दूर जाताना बघुन आता काय करावं हे रोहनला सुचेना पण आत्तापर्यंतचा अनुभव कामी न आला तरच नवल. त्याने निघुन जाणाऱ्या मीरा चा हात धरला. त्याने हात धरताच पाठमोऱ्या मीरा च्या चेहऱ्यावर हसु उमटलं, पहिली खेळी यशस्वी झाल्याचं.
“मीरा नको ना गं एका कलाकाराला त्याच्या कलेपासुन दुर ठेवू. मला फक्त तुझ हे सौंदर्य माझ्या कॅमेऱ्यातुन जगासमोर आणायंय. त्यासाठी मला वाट्टेल ते करावं लागल तरी चालेल”. रोहन म्हणला.
“हो ना रो”. मीरा च्या तोंडुन ‘रो’ ऐकुन तो जरा गांगरला हे मीरा च्या नजरेने टिपले पण तिने तसं भासवले नाही .
रोहन विचारात पडला कारण त्याला ‘रो’ फक्त पूर्वा च म्हणायची आणि हे त्या दोघां व्यतिरिक्त इतर कोणालाही माहित नव्हतं.
“रोहन, अरे कुठे हरवलास ?” मीराच्या हाकेने रोहन ला भानावर आणलं.” रो, मी फोटो शूट च्या वेळी एका मैत्रिणीला सोबत आणलं तर चालेल ना? जास्त नाही पण मला जरा सवय होईपर्यंत. प्लीज़ नाही म्हणु नकोस .”
खरंतर रोहनला हि गोष्ट अजिबात आवडली नव्हती पण ‘दुर्घटना से देर भली’ असं म्हणुन त्याने मीरा ला तशी परवानगी दिली .
आधी मासा गळाला तर लागु दे , मग मार्ग शोधु काहितरी असा सुरक्षित विचार त्याने केला. काय सांगावं? देव एक पे एक फ्री ची ऑफर देणार असेल. रोहनला स्वतःच्या चार्मवर जरा जास्तच विश्वास होता .
रोहनचा ह्या गोष्टीला होकार मिळाल्याने मीरा ला जरा हायसं वाटलं. आता तिला काही दिवस तरी रोहनला स्वतः पासुन दूर ठेवणे सोप जाणार होतं आणि तेवढ्या वेळात तिला मोहित आणि माया ह्यांचा एकमेकांशी असलेला तसंच रोहनशी असलेला संबंध ह्या सगळ्याची शहानिशा करायची होती .
दोन दिवसानंतर ची वेळ फोटो शूट साठी ठरवुन मीरा निघाली. निघताना रोहनने तिच्या हातावर हलकेच किस केल .मीराची पाठ वळल्या बरोबर लगेच रोहनने मोहितला मेसेज केला, “plan is working. moving one step ahead”.
रेस्टॉरंटमधुन बाहेर येऊन मीरा ने रिक्षा केली. रिक्षाच्या वेगाबरोबरच मीरा च्या विचारांनी पण वेग पकडला होता. फोन बाहेर काढुन तिने आनंदी ला मेसेज केला “पहिलं टारगेट पूर्ण. आता पुढचं”.
रिक्षात लागणाऱ्या गार वाऱ्याने मीराचे डोळे मिटले गेले असंही गेल्या काही रात्री स्वस्थ झोप लागलीच नव्हती तिला .
तेवढ्यात रिक्षावाल्याने तिचा स्टॉप आल्याचं सांगितलं. मीरा ने पैसे दिले आणि खाली उतरुन समोर बघितलं. मीरा मॉल समोर उभी असली तरी तिच्या डोळ्यासमोर मात्र मॉल जवळ मोहित ला माया बरोबर पाहिल्याचं सांगणारा मानस आणि मोहित च्या बॅगेत सापडलेलं पर्सचं बिल तरळत होतं. रोहनला भेटायला जाताना मनाची झाली त्यापेक्षा जास्त घालमेल आता होत होती … ज्याच्यावर विश्वास ठेवुन आपण एका अनोळखी शहरात आलो, ज्याला सर्वस्व दिलं, ज्याच्या बरोबर संसार केला, जो आपल्या बाळाचा बाप आहे तो खरंच आपल्याला फसवतोय ? देव करो आणि हे सगळं खोटं ठरो. अशी मनोमन प्रार्थना करत मीरा त्या दुकानासमोर येऊन थांबली. पर्स मधुन बिल काढुन तिने दुकानदारा समोर धरले आणि विचारलं “हे बिल तुमच्याच दुकानाचे आहे ना? हया बिलातली पर्स इथुनच खरेदी झाली आहे ना ?” एवढं बोलुन मीरा थांबली आणि प्राण कानात आणुन उत्तराची वाट पहायला लागली .
काय उत्तर असेल दुकानदाराचे ? मोहित आणि माया विरुद्ध काही पुरावा हाती लागेल? मीरा फोटोशूट साठी कोणाला सोबत नेणार ? रोहनची काय प्रतिक्रिया असणार त्या मैत्रिणीला पाहुन ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील पुढच्या भागात….
क्रमशः
लेखिका – प्राजक्ता कुलकर्णी
पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग ९
मागील भागाची लिंक- चांद मातला भाग ७
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

[…] मागील भागाची लिंक- चांद मातला भाग ८ […]
[…] पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग ८ […]