चांद मातला भाग ९ –
जिग्नेशशेट…. गेली कित्येक वर्षं गिफ्ट आर्टिकल्सचा व्यवसाय यशस्वीपणे करत होते, त्यांच्या यशाचं गमक त्यांच्या स्वभावात होतं, समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला एका नजरेनं पारखण्याची आणि त्याची गरज ओळखण्याची जबरदस्त ताकद त्यांच्या नजरेत होती, भावनिक होऊन पर्स खरेदीचे बिल दाखवणारी मीरा आणि तिच्या डोळ्यात न लपवता येणारी आर्तता त्यांना तिच्यावर येणाऱ्या संकटाचा जणू आभासच देत होती, त्यांनी तिच्या हातचे बिल घेतले, सागरने कालच्या दिवशी पर्सविक्रीचे काउंटर सांभाळले होते, ती पर्स घेण्यासाठी आलेली ती जोडगोळीही त्यांना चांगलीच आठवली, कालच आलेली ती जोडगोळी त्यांना अजिबात सभ्य वाटली नव्हती, त्या युवतीची सोबतच्या तरुणावर छाप पाडण्याची धडपड, त्याची तिच्या सर्वांगावर फिरत असलेली नजर, त्याने तिच्यासमोर धरलेलं नोटांचं बंडल, तिचा अधाशीपणा, स्वतःला न शोभणारी उंची आणि महागडी पर्स घेण्याचा तिचा अट्टहास हे सर्व निमिषार्धात जिग्नेशशेटला जाणवलं होतं आणि आत्ता समोर उभ्या ठाकलेल्या युवतीचा चेहरा त्यांना भेदरलेल्या सशासारखा दिसत होता, बिलाबाबत काहीही सांगण्याआधी वेळ काढण्यासाठी जिग्नेशशेट तिला म्हणाले, “बेटा, रोज यहां सैकडो लोग आते है, उनमेंसे सारे खरिदार याद रखना तो मुश्किल है, आप यहां बैठो, मै काऊंटर संभालनेवाले लडकेसे पूछताछ करता हूं, शायद उसे याद होगा”, काहीशा नाईलाजाने मीरा तेथील जवळच्या खुर्चीवर बसली, जिग्नेशशेटने सागरला हाक मारली, जीवाची तगमग असह्य होऊन मीरा ते दोघे काय बोलत आहेत ते ऐकू लागली, सागर येताच जिग्नेशशेटने सागरच्या हातात बिल ठेवले आणि तिच्या नकळत अलगदपणे काहीशी नकारार्थी मान हलवत सागरला म्हणाले “ये बिटीया इस बिलके बारेमें कुछ जानना चाहती है, देखो तुम्हे कुछ याद है तो”, मीराला दिसत होते की ते बिल त्या दुकानचेच आहे आणि मोहितच्या बॅगमध्ये सापडले तर तो निव्वळ योगायोग नसावा, त्याने लेडिजपर्स खरेदी केली तर ती त्याने तिलाही दिली नव्हती आणि घरीही आणली नव्हती, मुंबईला जातो असे सांगूनही तो पुण्यातच होता शिवाय मायाही त्याच्याबरोबरच होती तीसुद्धा कारमध्ये, हा काही योगायोग होता की मोहित तिची फसवणूक करतोय… वारंवार प्रयत्न करुनही मीराच्या डोक्यातील प्रश्नांचा भडीमार थांबत नव्हता, समोरचा काउंटर सांभाळणारा सागरही नीट उत्तरे देईना, नाईलाजाने मीरा तेथून निघाली, लिफ्टऐवजी एस्केलेटरवरुन एक मजला खाली आली, समोरच मॉकटेलचे काउंटर दिसले, या साऱ्या टेन्शनमध्ये तिने मगाशी हॉटेलमध्ये पाणीही पिले नव्हते, थोडा घसा ओला करावा म्हणून ती त्या काउंटरवर वळली, पैसे भरुन तिने ब्लूबेरी लेमोनेड विथ जिंजर घेतले. जेव्हा पहिल्यांदा ती या मॉलमध्ये मोहितबरोबर आली होती, तेव्हा त्याने मोठ्या आवडीने तिला हे मॉकटेल टेस्ट करायला घेतले होते आणि त्यातल्या त्यात तेच मॉकटेल स्वस्तही होते… टेबलवर बसताना मीराला थोडे गरगरल्यासारखे वाटले, धप्पकन खुर्चीवर मांडी घालून ती लेमोनेड पिऊ लागली… छोट्याछोट्या गोष्टीत काटकसर करणारा आणि तिलाही काटकसर शिकवणारा मोहित अचानक मायाला अशी ब्रँडेड पर्स घेऊन का देतो, ती ब्रँडेड पर्स त्याने मायालाच दिली असेल की घरात लपवून ठेवून नंतर तिला – मीराला देणार असेल की अॅाफिसच्या गाडीतच ठेवली असेल का, मानसला मोहित आणि माया एकत्रित दिसले हे खोटेही ठरु शकते …
अचानक मीराच्या डोळ्यासमोर अंधेरी आली… उठून बघते तर तिच्या आसपास बरीच गर्दी जमलेली दिसली… काहीशा संकोचाने मीरा धडपडत उठली… मघाशी तिच्या तोंडावर पाणी मारत असलेली महिला तिला खुर्चीवर बस् खुर्चीवर बस् म्हणू लागली… अचानक त्या गर्दीत तिला मघाशी दुकानात भेटलेला सागर दिसला, तिच्याशी नजरानजर होताच् तो तिथून निघून जाऊ लागला, अंगातले बळ एकवटून ती त्याच्या मागे धावली, इतर सर्वजण तिच्याकडे अवाक् होऊन बघू लागले… कदाचित ते दोघे बरोबर असतील, बघून घेतील काय त्याचे ते असे समजून गर्दी पांगू लागली… झपाट्याने निघून जाणार्या सागरला मीराने अडवलेच्,
“क्या तुमको बिलकुलच याद नही आ रहा है वो पर्स लेने कौन कौन आया था… ” मीराने सवय नसल्याने थोड्या तोडक्यामोडक्या हिंदीत आणि त्याच्यावर नजर रोखत त्याला विचारले.
“नही…”
“मगर मुझे चेहरा पढना आता है, तुम झूठ बोल रहे हो…”
“देखो मालिक मुझे डांटेंगें, तुम्हारी निजी बातोंमें मै पडना नही चाहता।”
“देखो, मेरे पति मुझे धोखा दे रहे है, अगर तुमने मुझे सच बता दिया तो मै तुम्हे कुछ और नही पुछूंगी और किसीको तुम्हारे बारेमें बोलूंगी भी नही।”
“….क्या …वो तुम्हारे पति है, वो किसी और महिलाके साथ हमारे दुकानमें आए थे, उस महिलाने अपने लिए बहोत महंगी हैन्डबैग खरीदी, दोनोकों देखकरही पता चल रहा था की वो दोनो पतीपत्नी नहीं हैं और उनका आपस में कोई रिश्ताभी नही था। दोनोंका एक दुसरेके प्रति जो बर्ताव था वो देखके कोईभी अच्छा ईन्सान लज्जित हो जाता।”
मघाशी खरं ऐकण्यासाठी आतूर असलेल्या मीराला तिच्या कानात कोणीतरी गरम शिसे ओतत आहे असा भास होऊ लागला, सारे बळ एकवटून तिने वॉट्सअपवरील मायाचा तिच्यापाशी असलेला नंबर शोधला, त्यावरील तिचा स्टेट्सचा फोटो आणि मोहितचाही फोनमधील फोटो सागरला दाखवत तिने त्याच्याकडून कालच ‘ते’ दोघे म्हणजे मोहित आणि मायाच असल्याची खातरजमा करुन घेतली, घशात दाटलेला हुंदका दाबत खाली मान घालून सागरचे आभार अथवा निरोपादाखल शब्दही न बोलता ती तेथून निघाली…
एका छोट्या शहरातून मोठ्या शहरांत येऊन स्वप्नांच्या दुनियेत वावरणारी मीरा… काहीतरी चमकदार कामगिरी करुन दाखवण्यासाठी धडपडणारी मीरा… रोहनने केलेल्या सौदर्याच्या प्रशंसेने विरघळून जाऊन त्याच्याकडून फोटो काढून घेण्यास होकार देणारी मीरा… मोहितला आवडेल की नाही अशा भीतीने त्याच्या नकळत एकटीच साहस करुन मॉडेलिंगच्या जगात प्रवेश करु पाहणारी मीरा… आज अचानक निराशेच्या खोल खोल गर्तेत बुडून गेली… मनावर आलेले मणामणाचे ओझे दूर करण्याचा प्रयत्न करत त्या मॉलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागली… पण.. पण तेथून बाहेर पडण्याचा मार्गच तिला सापडेना…
“मिसेस वेदक?” अचानक कानी पडलेल्या हाकेने मीरा गर्रकन् वळली, समोर मोहितच्या कंपनीचे CEO मि. अभिसागर वर्धक उभे होते, खूपच जॉली माणूस, एवढ्या मोठ्या पदावर असूनसुद्धा माणुसकी आणि सेन्स अॅाफ ह्यूमरच्या बळावर साऱ्याच स्टाफचे मन जिंकून मोठ्या खुबीने स्टाफकडून कामे करुन घेत असत, कंपनीची झपाट्याने प्रगती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, मोहित त्यांच्या वन् अॅाफ द फेव्हरिट स्टाफपैकी होता, मोहित जेव्हा लग्नाआधी नुकताच या नव्या कंपनीत कामाला लागला होता तेव्हा त्याचा कष्टाळू स्वभाव, उत्साह, नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती बघून अभिसागरनेच त्याला चांगली संधी आणि बढती झपाट्याने देऊ केली होती, साध्या मार्केटिंग एजंटपासून मार्केटिंग हेड पदापर्यंत जाण्यास वाव दिला होता, लग्न आणि छोकरा झाल्यानंतर स्वतःची केबिन, पर्सनल असिस्टंट माया, अॅाफिसची गाडी, शिवाय कमाईत घसघशीत वाढ या सर्व गोष्टी मोहितला अभिसागरच्या वरदहस्तानेच बहाल झाल्या होत्या, अर्थात मोहितचे स्वतःचे कष्टही त्यामागे कारणीभूत होतेच, सह्रदयी अभिसागर मोहितच्या आणि इतरही स्टाफच्या बढतीनंतर त्यांचेकडून घसघशीत पार्टी मात्र घ्यायचाच, अद्याप अविवाहित असणार्या अभिसागरसाठी अशा पार्ट्या वर्कबूस्टर असायच्या, अशाच पार्ट्यांमध्ये त्याची मीराशी ओळख होत गेली, त्या सुंदर आणि निष्पाप दिसणाऱ्या मीरावर त्याचा अक्षरशः जीव जडला होता, तरीपण कधीही मर्यादेचे उल्लंघन न करता त्याने तिच्याशी जुजबी ओळख ठेवली होती… आता समोर तिला एकटेच बघून तो थोडा बुचकळ्यात पडला होता, मानस कुठे वगैरे थोडी चौकशी करुन पुढे निघावे याकरताच त्याने तिला हाक मारली होती…
एरवी भेटणाऱ्या मीरात आणि आत्ता समोर उभ्या असलेल्या मीरामध्ये त्याला जमीनअस्मानाचा फरक जाणवला, पण तिला तसे जाणवून न देता त्याने तिला मानसविषयी विचारणा केली, काही वेळापूर्वी रोहनसमोर अगदी सराईतपणे, सहजपणे, स्वतःला अगदी शांत ठेवून बोलणाऱ्या मीराची सर्व अॅक्टींग पर्सवाल्या दुकानातच संपली होती, अभिसागरसमोर ती जवळजवळ कोसळायचीच बाकी होती, अभिसागरबरोबर असणारे त्याचे मित्र पाहून तिच्या तोंडून शब्दच उमटेनात, बावरलेली तिची ती अवस्था पाहून अभिसागरने त्याच्या मित्रांना तेथून जाण्याची खूण केली, मीरा थोडा अवधी मिळताच सावरली, काहीसे ओशाळून त्याला म्हणाली, “काय करु? मला या मॉलमधून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाहीए…”
“चला ना, मी तुम्हाला बाहेर सोडतो”, मीरा हायसे वाटून त्याचेबरोबर जाऊ लागली,
“आणि काय आहे ना मिसेस वेदक, इथे असे हरवून जायला झाले तर येथे जागोजागी मॅप लावलेले आहेत ते बघायचे, म्हणजे गोंधळ होत नाही,”
पण मीराचे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नाहीए हे चाणाक्षपणे त्याने जाणले, मॉलच्या बाहेर पडताच त्याने तिला घरी सोडण्यासाठी विचारले, मीरा विचारात एवढी हरवली होती की तिला ते ऐकायलाच आले नाही…
“काल मोहित मुंबईला कोणत्या कारणासाठी गेला होता?” मीराच्या अचानक आलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी अभिसागरने तिच्या डोळ्यात डोकावून पाहिले, डोळयातील हतबलता आणि किंचित पाणावलेल्या कडा पाहून अभिसागर अणिकच स्तब्ध झाला, “सांगतो तुला मी मीरा… ” अभिसागर त्याच्याही नकळत तिच्याशी एकेरीत बोलू लागला, “पण तत्पूर्वी तू हे का विचारत आहेस ते तुला मला सांगावे लागेल”.
अभिसागरला उत्तर देण्यापूर्वी मीरा विचार करु लागली, आपल्या घरच्यांना, मोहितच्या आईबाबांना आणि इतरही कुणाला या सर्व प्रकरणाचा छडा लागण्याअगोदर आपणच या सर्व प्रकाराचा सोक्षमोक्ष लावावा, जमलेच तर मोहितला परत आपल्यापाशी खेचून आणावे, यातच मोहितच्या आणि पर्यायाने आपल्या जीवनाचे सार्थक आहे या विचारावर ठाम होतंच तिने मोहित, त्याची मुंबईची थाप, मायाबरोबर त्याचे मॉलमधील शॉपिंग, मानसने त्या दोघांना एकत्रित बघणे या सर्व प्रकरणाचा इत्यंभूत खुलासा केला. एव्हाना अभिसागरच्या डोळ्यातील मीराविषयी असलेल्या सहानुभूतीची जागा मोहितविषयी निर्माण झालेल्या अविश्वासाने घेतली होती, आपल्या भावना अजिबात न लपवता तो बोलला, “वेट मीरा, आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल, मला माहित आहे मोहित आत्ता कुठे भेटेल, मायाबरोबर अॅाफिसबाहेर आहे, मार्केटिंग साठी एका साईटचे फोटोशूट चालू आहे, नक्की तिथेच आहेत ते दोघेही, तत्पूर्वी पाच मिनीटे मला दे, ही घे माझ्या गाडीची चावी, ती ब्लॅक मर्सिडिझ आहे ना त्यात बस, मी आलोच.”
मीराला आत्यंतिक हूरहूर जाणवू लागली, काहीतरी अघटित घडणार की आपले जीवन पूर्ववत होणार याचा नक्की काहीच अंदाज तिला बांधता येईना, जड पावलांनी ती अभिसागरच्या गाडीकडे वळली, परंतू गाडीत न बसता ड्रायव्हिंग शेजारच्या सिटबाहेर दाराला रेलून उभी राहिली, चौकस नजरेने अभिसागर गेला त्या दिशेने बघत त्याची वाट पाहू लागली. पाचेक् मिनीटात अभिसागर तिच्या दिशेने येताना तिला दिसला, त्याच्या एका हातात कसलेतरी पॅकेट आणि दुसर्या हातात बिस्लेरीची बाटली होती, तिच्या जवळ येताच त्याने ते पॅकेट आणि बाटली तिच्या हातात सोपवत म्हटले, “मीरा हे खाऊन घे गाडीत बसल्यावर, मला माझ्या गाडीत बसून कुणीही काहीही खाल्लेले आवडत नाही, पण आपण इथे वेळ न घालवता साईटवर जाऊ, काय प्रकरण आहे हे याची शहानिशा करुन घेऊ, चल, क्विक्…. ” इतकेच म्हणत अभिसागरने तिच्या हातून चावी घेऊन गाडी बटनस्टार्ट केलीसुद्धा, तिच्यासाठी दार उघडून देत तिला फ्रंट सीटवर बसवून स्वतः लगबगीने ड्रायव्हिंग सीटवर बसण्यासाठी वळला…. गाडी स्टार्ट करुन समोर बघत तिच्याशी बोलू लागला, “हे बघ मीरा, तू जे काही मला सांगितले आहेस त्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे, मोहित असे काही करेल असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते, पण गेल्या काही दिवसातला त्याच्या वागण्यातला बदल आत्ता माझ्या ध्यानात येतो आहे, एनीवेज्, माझ्याकडून तुला जितकी मदत करता येईल तितकी मी तुला करेन, तूर्तास तू हे बर्गर आणि फ्राईज खाऊन घे, मला माहीत आहे तुझे खाण्यापिण्याकडे आज दुर्लक्ष झाले असणार, पण फार काळजी करु नकोस, जिथे प्रश्न आपली वाट पहात असतात तिथेच उत्तरेही निश्चित असतातच्, फक्त ती आपल्याला प्रयत्न करुन शोधावी लागतात.”
खरेतर अभिसागरच्या मनात विचारांचा एक सागर निर्माण झाला होता, पण कुशलपूर्वक त्या सागराला बांध घालून आत्यंतिक शांत मनाने नेहमीप्रमाणे तो गाडी चालवू लागला, पुणे शहराच्या अगडबंब ट्रॅफिकमधून ताशी ४० च्या स्पीडने ती ब्लॅक मर्सिडिझ अत्यंत कुशलपणे वाघोलीकडे धावू लागली…
तिकडे वाघोलीच्या साईटवर मोहित, माया आणि रोहनचे फोटोशूट हसतखेळत चालू होते, त्याचबरोबर त्यांच्या गप्पांनाही ऊत आला होता…
अभिसागरच्या शेजारी बसून मीरा त्याने दिलेले फूडपॅकेट सावकाशीने संपवू लागली, मोहित, माया आणि रोहन साईटवर, अभिसागर आणि मीरा पुण्याच्या ट्रॅफिकमधे, आईच्या मैत्रिणीबरोबर प्रणालीबरोबर हात धरुन तिच्या घराकडे मजेत उड्या मारत कूच करणारा मानस या कुणालाही कल्पना किवा जाणीव नव्हती की आजच्या दिवशी कोजागरी पौर्णिमा होती, पण या वर्षीच्या कोजागरीचा चांद मातला होता….
काय होता आजच्या कोजागरीच्या चंद्राचा कल?
काय वाढून ठेवलंय मीराच्या आयुष्यात?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील पुढच्या भागात….
क्रमशः
लेखिका – दीपाली प्रसाद बोधे
मागील भागाची लिंक- चांद मातला भाग ८
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

[…] पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग ९ […]
[…] मागील भागाची लिंक- चांद मातला भाग ९ […]