मृगजळ भाग २३
ते सगळे गोवा फेस्टिव्हलच्या ठिकाणी पोहोचले. काळ्या उत्साहाने माहिती देत होता. सौरभ ती ऐकत होता. तिथे वेगवेगळे कार्यक्रम सुरू होते. मोठ्या मैदानात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अनेक लोक तिथे आलेले होते. वातावरण अत्यंत उत्साही आणि रंगीत होतं. श्रीरंग पण काळ्या देत असलेली माहिती ऐकत होता. त्याला प्रश्न विचारून आणखी माहिती घेत होता. एमिली त्याच्या दंडाला जवळजवळ लटकली होती. दोघेही मजेत होते. मानसी त्या दोघांना बघत होती. तिच्या मते त्यांचे जे काही “चाळे“ सुरू होते ते फार बालिश होते. पण गंमत अशी की त्यांच्याकडे मानसी सोडून इतर कोणाचंही लक्ष नव्हतं. सगळे आपापल्या मजेत होते.
तिथे भटकण्यात, खाण्या-पिण्यात तीन-चार तास कसे गेले कळलंच नाही. एमिलीची आता सर्वांशी छान मैत्री झाली होती. पण मानसी अजूनही थोडी lost होती. तिला शेवटी रोझीने विचारलं-
रोझी- मानसी, तुला बरं वाटत नाहीये का?
मानसी- नाही. मी ठीक आहे.
रोझी- मग अशी गप्प गप्प का आहेस? आल्यापासून मी बघते आहे.
मानसी- नाही. असं काही नाही. मी..मी ठीक आहे. मजा घेते आहे. मस्त आहे हे फेस्टिव्हल.
रोझी- नक्की ना?
मानसी- हो. काळजी नको करू. I am fine.
आपण डिस्टर्ब आहोत हे लोकांच्या लक्षात येत असल्याचं कळल्यावर मानसी प्रयत्नपूर्वक नॉर्मल वागू लागली. पार्टिसिपेट करू लागली. पण तिचं सतत लक्ष श्रीरंग आणि एमिलीवर होतं. एमिली श्रीरंगच्या गळ्यात पडते आहे असं वाटून तिला एमिलीचा राग येत होता. तो का येत होता हे तिचं तिलाच कळत नव्हतं. खरं तर ती आणि सौरभ मस्त एकत्र मजा करायला गोव्याला आले होते. त्या सुंदर फेस्टिव्हलच्या वातावरणात सगळेच एन्जॉय करत होते. श्रीरंग आणि एमिली पण एक कपल होते आणि ते पण एन्जॉय करत होते. मग मानसीला त्रास कशाचा होत होता? तिला उत्तर सापडत नव्हतं किंवा सापडत असलेलं उत्तर स्वीकार करायचं नव्हतं. म्हणून तिच्या मनात प्रचंड घालमेल सुरू होती. आणि तेवढ्यात सगळे एका जायंट व्हीलजवळ आले.
काळ्या- गाईज, giant wheel मध्ये कोण कोण बसणार?
रोझी- मी…
सौरभ- मी…
एमिली- मी…
श्रीरंग- मानसी नाही बसणार. ती लहानपणापासून घाबरते जायंट wheel मध्ये बसायला. So तुम्ही चौघे जा. मी इथे मानसीला कंपनी देतो.
हे ऐकून चिडलेली मानसी त्याचा हात धरून त्याला पुढे घेऊन गेली. तिकीट विंडो जवळ येऊन तिने दोन तिकीटं काढली आणि त्याला ओढत नेऊन ती त्याच्या बरोबर पाळण्यात बसली. पाळणा सुरू झाला. तो वर जाऊ लागल्यावर तिने त्याचा दंड घट्ट धरला आणि डोळे मिटून घेतले. श्रीरंगने तिला घट्ट धरून ठेवलं. पाळणा खाली येताना तिच्या पोटात प्रचंड खड्डा पडला आणि तिला उलटी होईल असं वाटू लागलं. तिची श्रीरंगच्या दंडावर असलेली पकड इतकी घट्ट झाली की तिची नखं त्याला लागून, खरचटून थोडं रक्त आलं.
श्रीरंग- मानसी..हे..हे काय आहे? तू अचानक giant wheel मध्ये…
मानसीने डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली-
मानसी- तू काय समजतोस रे स्वतःला? तुलाच सगळी अक्कल आहे? तुलाच सगळं कळतं? मी म्हणजे मूर्ख. घाबरट, आयुष्यात चुकीचे निर्णय घेणारी. बरोबर ना? मग सगळे निर्णय तू घेणार. माझ्या चुकीच्या निर्णयांवर एका शब्दानेही मला रागावणार नाही. आणि त्याला तू काय म्हणणार तर प्रेम…त्याग आणि काय काय…तू नेहमीच शांत, स्थितप्रज्ञ राहणार…मिस्टर cool राहणार आणि मी मात्र सतत चिडलेली, टेन्शनमध्ये…तुला मजा वाटते ना मला अशी बघून. एन्जॉय करतोस ना तू माझी अशी अवस्था. बदला घेतो आहेस ना तू मी तुला कधीतरी नकार दिला त्याचा?
मानसी भडाभडा बोलत होती. श्रीरंग शांतपणे ऐकत होता. तिचं बोलून झालं तेव्हा पाळणा सगळ्या फेऱ्या संपवून त्यांना जमिनीवर आणून थांबला होता. श्रीरंगने अचानक टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तो बाहेर पडला. त्याने मानसीला हात दिला. त्याचा हात धरून मानसी बाहेर पडली. दोघे सौरभ आणि काळ्या उभे होते तिथे आले. श्रीरंगने परत टाळ्या वाजवल्या आणि म्हणाला-
श्रीरंग- गाईज, कॉलेजमध्ये लागलेली आमची bet मानसी आज जिंकली आहे. Finally, ती न घाबरता giant wheel मध्ये आज बसली आणि मला तिच्या बरोबर बसवून तिने bet जिंकली. So a big round of applause for the brave girl मानसी.
हे ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. तिचं अभिनंदन केलं. मानसी श्रीरंगकडे रागाने बघत होती. मग दिवसभर भटकून सगळे रिसॉर्टवर परतले. आज रात्री बाहेर जाण्याची कोणाचीही इच्छा नव्हती आणि दमायलाही झालं होतं. रिसॉर्टवर आल्यावर सगळे आपापल्या रूममध्ये गेले. एमिली श्रीरंगबरोबर त्याच्या रूममध्ये आली. आत आल्यावर त्याला मिठी मारून त्याचा किस घेणार इतक्यात तिला लांब सारत श्रीरंग म्हणाला-
श्रीरंग- मी दमलो आहे…तू जा तुझ्या रूममध्ये..आपण नंतर भेटू…प्लीज..
एमिली- हे तू काय बोलतो आहेस? मी आहे ना. मी तुला एकदम रीलॅक्स करते. काळजी नको करू.
श्रीरंगने तिचा दंड धरला आणि तिला दाराजवळ नेऊन दार उघडत म्हणाला-
श्रीरंग- मी म्हणालो ना जा म्हणून? मग जा. मला हट्टी मुली आवडत नाहीत. नशिबात असेल तर आपण US मध्ये भेटू. आपले नंबर आहेत एकमेकांकडे. बाय…
असं म्हणून तिला बाहेर पाठवून श्रीरंगने दार लावून घेतलं आणि तो शॉवर घ्यायला बाथरूममध्ये गेला. शॉवर घेत असताना त्याला त्या giant wheel मधला सगळा प्रसंग आठवला. त्याच्या दंडावरच्या ओरखड्यावर आता धरलेली खपली त्याला जाणवली. तिथे त्याला बोलत असलेल्या मानसीचा चेहरा त्याला आठवला. बाहेर जाऊन अंग पुसून त्याने कपडे घातले आणि त्याने मानसीला मेसेज केला.
मेसेज- तुला वेळ मिळाला की भेट. कितीही वाजले तरी भेट.
इथे मानसी आणि सौरभ एकमेकांच्या बाहुपाशात बेडवर होते. सौरभ अगदी रंगात आला होता आणि मानसी मात्र अजूनही थोडी हरवलेली होती. काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. ते लक्षात येऊन तिच्या अंगावरून बाजूला होत सौरभ म्हणाला-
सौरभ- मानसी, ही काय नाटकं आहेत?
मानसी- नाटकं? म्हणजे?
सौरभ- सकाळपासून मी बघतोय. तू कुठेतरी हरवलेली आहेस. त्या फेस्टिव्हलमध्येही आम्ही सगळे धमाल करत होतो आणि तू मात्र स्वतःच्या विचारात होतीस. मग ती bet जिंकायला श्रीरंगला घेऊन giant wheel मध्ये काय बसलीस. What’s wrong with you? आपण इथे एकमेकांबरोबर वेळ घालवायला येतो ना? किती छान आठवणी आहेत आपल्या प्रत्येक गोवा ट्रिपच्या. मग ह्यावेळी तू अशी का वागते आहेस? आणि आता इथे तू जे वागते आहेस ना ते खूप frustrating आहे. Come on baby..
असं म्हणून तो परत तिला जवळ घेऊ लागला. मानसीने त्याला दूर ढकललं आणि म्हणाली-
मानसी- प्लीज सौरभ..मला मूड नाहीये.
सौरभ- मूड नाहीये? मग आपण काय इथे गोवा साईटसीइंग करायला आलोय का? आणि ते पण झालं ना दिवसभर. मग आता मूड का नाही? नक्की काय प्रॉब्लेम आहे मानसी?
मानसी- प्रॉब्लेम हा आहे सौरभ की तुला माझा प्रॉब्लेम लाधीच समजत नाही. तो समजला असता ना तर तू केव्हाच माझ्याशी लग्न केलं असतंस.
हे ऐकून सौरभ चिडला.
सौरभ- झाली सुरुवात. सगळे विषय लग्नावर आणून ठेवायचे.
मानसी- ठेवणारच मी. जगातला प्रत्येक विषय आपल्या लग्नाशी जोडलेला आहे कारण आपण दोघे सगळ्या जगाशी जोडलेले आहोत पण एकमेकांशी नाही. बाहेरच्या जगासाठी तू, तुझी बायको, तुझा मुलगा, तुझी आई, तुझं छान कुटुंब अशी सुंदर ओळख आहे. आणि मी एक डिव्होर्सी, सिंगल mother, एकटी असल्याने अव्हेलेबल, जिच्या घरी तिचा मित्र कितीही वाजता येतो आणि थंड झाला की निघून जातो अशी एक चालू बाई आहे मी.
सौरभ- काहीही बोलू नकोस.
मानसी- मी खरं तेच बोलते आहे सौरभ. मला मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवायला लग्न करायचं नाहीये. ती हौस मी कधीच भागवून घेतली आहे. बाईला स्टेटस हवं असतं. फक्त प्रेम नाही. आणि ज्या पुरुषाचं एखाद्या बाईवर प्रेम असतं ना तो तिच्याशी लग्न करतो. फक्त फिरायला आणि झोपायला जिला ठेवतो ना ती रखेल असते, प्रेमिका नाही.
सौरभ- तू हे नाटक परत सुरू करू नको. मी तुला कधीच रखेलीसारखं वागवलेलं नाही.
मानसी- पण लग्नही केलं नाहीस ना? आणि तू प्रेम वगैरेबद्दल तर बोलूच नको. प्रेमात caring असतं. स्त्रीला दिला जाणारा आदर असतो जो लहान लहान गोष्टीतून तिला जाणवतो. आणि तो जाणवून द्यायचा असतो. आम्हा बायकांना ते आवडतं. पण तुला ते कधीच कळणार नाही.
सौरभ- झालं बोलून मला? मला ना आता तुझ्यात आणि अंकितामध्ये काहीच फरक जाणवत नाही. ती पण अशीच डोकं खाते आणि तू पण तेच करते आहेस. सोड. जाऊ दे. माझं नशीब खराब आहे.
असं म्हणून तो त्याचा ग्लास भरून बाल्कनीत जाऊन उभा राहिला. इथे मानसीला श्रीरंगचा मेसेज दिसला. तिने एकदा बाल्कनीत उभ्या असलेल्या सौरभकडे पाहिलं आणि ती रूममधून निघून गेली.
मानसीने श्रीरंगच्या रूमची बेल वाजवली. त्याने दार उघडलं. मानसीला समोर पाहून तो स्माईल करत म्हणाला-
श्रीरंग- हाय..ये ना आत ये..
मानसी आत गेली. श्रीरंगने तिला ड्रिंक ऑफर केलं.
मानसी- नको…सिगारेट असेल तर पेटव.
श्रीरंग- of course..
त्याने सिगारेट पेटवून तिच्या हातात दिली. मानसीने एक झुरका घेतला. धूर बाहेर सोडत तिने विचारलं-
मानसी- तुझा मेसेज पाहिला. का बोलावलंस मला?
श्रीरंग- ते दुपारी तू जे केलंस ते काय होतं?
मानसी- हेच मी पण तुला विचारते. त्या एमिलीबरोबर काय चाळे करत होतास तू? लहान आहेस का आता? बाई पाहिली नाहीस का कधी?
श्रीरंग- चाळे? What चाळे? Come on. We wanted to hang out together आणि आम्ही तेच करत होतो.
मानसी- असे उघड्यावर एकमेकांना चिकटून?
श्रीरंग- what? एकमेकांना चिकटून म्हणजे?
मानसी – म्हणजे मी बघत होते त्या बाईकवर ती तुला किती चिकटली होती, तुझ्या गालावर गाल काय घासत होती, दोघे teenagers असल्यासारखे हातात हात घेऊन काय फिरत होते.
श्रीरंग- come on मानसी. ते आमच्या देशातलं कल्चर आहे. आम्हाला त्यात काहीच चूक वाटत नाही.
मानसी- हो का? म्हणजे त्या giant wheel मध्ये तर ती तुझ्या मांडीवर बसली असती किंवा तुझा कचकचून किस पण घेतला असता तिने.
श्रीरंग – so what?
मानसी- म्हणूनच मी बसले तुझ्या शेजारी. तुला दाखवून दिलं की मी त्या एमिलीपेक्षा कुठेही कमी नाहीये म्हणून.
श्रीरंग- पण तुझी आणि तिची comparison होऊच शकत नाही.
मानसी- नाही ना? मग तिला घेऊन का फिरत होतास? ते पण मुद्दाम माझ्या समोर? मला त्रास द्यायलाच ना?
श्रीरंग- तुला त्रास द्यायला? तुला का त्रास देईन मी? आणि माझ्याबरोबर एमिली किंवा बाकी कोणीही असली तरी तुला त्रास का होईल? तुझं चाललं आहे ना मस्त? एक नवरा झाला. आता एक बॉयफ्रेंड आहे जो गेली दहा वर्षं तुझ्याशी लहन करतोय. नोकरी आहे. मुलगा सेटल झालाय. दिसायला टवका आहेस. शिट्टी मारलीस तर दहा जण मागे येतील अजूनही. आणखी काय पाहिजे तुला. माझ्याबरोबर एखादी मुलगी पाहून तुला त्रास कसा काय होईल आणि का होईल?
मानसी- आता होतो ना मला त्रास. तू तिथे अमेरिकेत काय हवं ते कर. इथे माझ्या समोर काहीही नाटक चालणार नाहीत. मी आहे ना इथे.
श्रीरंग- तू आहेस म्हणून तर आलोय मी इंडियात. पण तू एकटी नाहीस मानसी. तुझ्याबरोबर आता सौरभ आहे, तुमचं १० वर्षांचं रिलेशन आहे.
मानसी- तू आपल्या मध्ये सौरभला नको आणू प्लीज. मी आणते का त्याला कधी आपल्या मध्ये? तू…तू आणि मी…आपलं एक वेगळं जग आहे ना? त्यात आणखी कोणीच नकोय मला. सौरभ पण नको आणि ती फालतू एमिली पण नको. तुला कळत कसं नाही? इतका मूर्ख कसा आहेस रे तू?
श्रीरंग तिच्या जवळ बसला. तिचा हात हातात घेत, तिच्या चेहऱ्यावर आलेली बट तिच्या कानामागे सारून तिच्या हातातली सिगारेट घेऊन एक झुरका मारत म्हणाला-
श्रीरंग- मला सगळं कळतं मानसी. कळत तुला नाहीये. बाकी कोणी काहीही सांगितलं तर तुला ते मान्य नाहीये.
मानसी- असं काही नाहीये. सांगून तर बघ.
श्रीरंग- लग्न कर माझ्याशी. माझ्याबरोबर यूएसला चल. करशील लग्न माझ्याशी?
हे ऐकून मानसी उठून लांब गेली.
श्रीरंग- तुझा प्रॉब्लेम काय आहे माहीतेय का? तुला मलाही सोडायचं नाहीये आणि सौरभलाही. मला सोडायचं नाहीये कारण तुला मी मनापासून आवडतो. आणि सौरभला सोडायचं नाहीये कारण तुला तुझा point prove करायचा आहे. दहा वर्षं तू जी वाट पाहिलीस त्याचा बदला घ्यायचा आहे किंवा जाब विचारायचा आहे किंवा you want him to pay for it. तुझ्या दहा वर्षांच्या वाट बघण्याचं बक्षीस, म्हणजे त्याच्याशी तुझं लग्न तुला हवं आहे.
मानसी- हो हवं आहे मला माझं बक्षीस. आणि काय चूक आहे माझी तशी अपेक्षा असेल तर?
श्रीरंग- अपेक्षा चुकीची नाहीये मानसी. माणूस चुकीचा आहे. तो कधीच तुझ्याशी लग्न करणार नाहीये.
हे त्याच्या तोंडून परत ऐकून मानसी चिडली.
मानसी- तू का आमच्या दोघांमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतोस असं बोलून. सौरभ नक्की लग्न करेल रे माझ्याशी….(तिला रडू येऊ लागलं)..माझा..माझा विश्वास आहे त्याच्यावर…तू प्लीज असं बोलून तो विश्वास तोडू नको रे रंगा…प्लीज…
श्रीरंगने तिला जवळ घेतलं आणि तो म्हणाला-
श्रीरंग- मानसी, चुकीचा विश्वास तुटणं कधीही चांगलं असतं. मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय की तू चुकीच्या माणसावर विश्वास ठेवते आहेस.
मानसी- ठीक आहे. मी त्याला आज फायनल काय ते विचारते.
श्रीरंग- आणि तो लग्न करणार नाही हे लक्षात आलं तर?
मानसी- तर मी तुझ्याशी लग्न करून अमेरिकेला येईन.
श्रीरंग- ठीक आहे. मी एअरपोर्टला जातो. मी मुंबईची २ तिकीटं काढेन. पहाटे पाचची फ्लाईट आहे. मी तुझी वाट बघेन. आलीस तर एकदम मुंबईला जाऊ. उद्या लग्न करू. पुढचं माझ्यावर सोड. आणि नाही आलीस तर मी उद्याचीच मिळेल ती फ्लाईट पकडून अमेरिकेला परत जाईन. इंडियात परत कधीच न येण्यासाठी आणि ही आपली शेवटची भेट ठरेल ह्या लाईफमधली.
असं म्हणून त्याने तिला मिठी मारली. ती पण त्याच्या मिठीत हरवून रडत होती.
श्रीरंग- एक एक ड्रिंक घेऊया. कदाचित एका नव्या beginning चं किंवा एका end चं. कशाचं ते तुझ्या हातात आहे.
असं म्हणून त्याने ग्लास भरायला घेतले.
इथे सौरभला अंकिताचा फोन आला होता.
अंकिता- आईंची तब्येत खूप खराब झाली आहे. सारख्या तुझं नाव घेत आहेत. तू लवकर नाही का येऊ शकत?
सौरभ- नाही…असं अचानक निघता येणार नाही. आणि आईची सवय माहीत आहे मला. तिची नाटकं जास्त असतात आणि आजार कमी असतो.
अंकिता- त्या म्हणत आहेत की आता आणखी धक्के सहन होणार नाहीत. त्यांचा जीव जाईल. मला काहीच कळत नाहीये. कसले धक्के आणि काय?
हे ऐकून सौरभ घाबरला.
सौरभ- अजून..अजून काय म्हणाली ती? काही सांगितलं का तुला?
अंकिता- नाही. काही सांगायचं होतं का त्यांना? मी विचारू का?
सौरभ- (घाबरून) न नको…काही…काही सांगायचं नव्हत…मी म्हणालो की तब्येतीबद्दल ती काही बोलली का? म्हणजे काही दुखतंय वगैरे…
अंकिता- नाही. पण जीव जाईल, जीव जाईल सौरभला सांग असं सतत सांगत होत्या मला.
सौरभ- ठीक आहे. ठेव आता. तिला म्हणावं सांगितलं सौरभला. तो काळजी घेईल तुझ्या जीवाची.
त्याने फोन कट केला आणि डोक्यावर हात मारून घेतला.
सौरभ- ह्या तीन बायका माझी वाट लावणार आहेत. एक ती अंकिता, एक आई आणि मानसी…कोणालाही माझी काहीच पर्वा नाहीये. पण एक नक्की. मी घर सोडून जाणार नाही. मानसीशी लग्न वगैरे इतक्यात शक्य नाही. काहीही करून मानसीला हे पटवून द्यायला पाहिजे. नाहीतर आईचा जीव जाईल. आणि आई इतकी नाटकी आहे की ती जीव देईलही मी घर सोडलं तर..
इतक्यात मानसी परत आली. सौरभ सावरून बसला. मानसी त्याच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली-
मानसी- सौरभ, माझ्या प्रश्नाचं हो किंवा नाही इतकंच उत्तर दे.
सौरभ- क…काय प्रश्न.
मानसी- तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही?
सौरभ- ऑफ कोर्स करणार आहे.
मानसी- कधी?
सौरभ- लवकरच.
मानसी- नाही. आपण परत गेल्यावर लगेच तू मला तुझ्या घरी न्यायचं आणि सगळ्यांना सांगून टाकायचं की आपण लग्न करतोय आणि डिव्होर्स फाईल करायचा. नाहीतर मी तुला आजच्या आज सोडून मुंबईला परत जाणार आहे.
हे ऐकून सौरभची फाटली. काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं. इथे आड आणि तिथे विहीर अशी गोची झाली होती. अचानक त्याला आई आठवली आणि तो ताडकन उठून उभा राहिला. तिथली बीयरची रिकामी बाटली त्याने बेडवर आपटून फोडली आणि हातात उरलेला धारदार भाग आपल्या मनगटावर घासल्यासारखा करत म्हणाला-
सौरभ- मला आता ह्या धमक्या सहन होत नाहीत. तू, आई, अंकिता, हे जग…सगळेच मला धमक्या देतात. मीच सगळीकडे व्हिलन आहे. आणि माझी चूक काय तर मी एक चांगला मुलगा, चांगला नवरा आहे. मी एका मुलीवर मनापासून प्रेम करतो. तिच्याशी मला लग्न करायचं आहे? घाई सगळ्यांनाच सगळ्याची आहे. प्रत्येकाचा इगो आहे आणि अजेंडा आहे. प्रत्येकाचा स्वार्थ आहे आणि माझ्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. मी कितीही प्रयत्न केले त्या पूर्ण करण्याचे तरी माझ्या हेतूवरच संशय आहे. सौरभ म्हणजे खोटारडा, सौरभ म्हणजे बेजबाबदार, सौरभ म्हणजे जबाबदारी न घेणारा. मी मुलगा, नवरा आणि आता lover म्हणूनचा fail आहे आणि पुढेही fail होत राहणार आहे. कंटाळा आलाय मला ह्या सगळ्या failure आणि प्रेशरचा. कंटाळा आलाय प्रत्येक वेळी स्वतःची बाजू मांडायचा. नको मला असं लाईफ. मी ते संपवून टाकतो.
असं म्हणून तो बाटलीचा धारदार भाग स्वतःच्या मनगटावरून फिरवल्यासारखं करू लागला. ते पाहून घाबरलेल्या मानसीने पुढे होत ती बाटली त्याच्या हातून काढून घेतली. ती काढता तिच्या बोटांना लागून त्यातून रक्त येऊ लागलं. मानसीने त्याला घट्ट मिठी मारली आणि ती रडत म्हणाली-
मानसी- सौरभ, I am sorry…प्लीज..मी कधीच तुझ्या मागे नाही लागणार, I trust you. माझा तुझ्या प्रेमावर विश्वास आहे. मी थांबेन…पण प्लीज तू असं काही नको करू. प्लीज सौरभ…मला माफ कर..प्लीज…
तिच्या तोंडून हे ऐकून तिच्या मिठीत असलेला सौरभ खुश झाला. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आलं. मानसी अजूनही त्याला मिठी मारून होती. सौरभची तिच्या भोवती असलेली मिठी घट्ट झाली. त्याने तिला बेडवर झोपवलं. तो तिच्या शरीराशी झोंबू लागला. मानसी द्विधा मनस्थितीत होती. पण तिला रिस्पॉन्स न देण्याची पण भीती वाटत असल्याने तिनेही त्याला मिठी मारली. दोघे एकमेकांच्या बाहुपाशात हरवून गेले.
सकाळचे पाच वाजले होते. श्रीरंगच्या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण भरलं. त्याने आज रात्रीच अमेरिकेचं एकच तिकीट काढलं होतं. विमानाच्या खिडकीतून तो खाली दिसणारा गोवा नजरेत साठून घेत होता. तिथे उभी राहून मानसी त्याला टाटा करते आहे असा भास होऊन त्याचे डोळे चुरचुरले आणि भरून आले.
इथे सौरभ आता तृप्त होऊन झोपला होता. मानसी छताकडे बघत विवस्त्र भकास जागी होती. तिला छताच्या वरून उडत असलेलं रंगाचं विमान आणि खिडकीतून तिच्याकडे बघत असलेला रंगा डोळ्यासमोर आले आणि तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू बेडमध्ये टिपले गेले. तिच्या बोटातून मगाशी आलेल्या रक्तासारखेच. ती अंगाभोवती चादर लपेटून खिडकीजवळ आली. तिला समोर बीच आणि विस्तीर्ण समुद्र दिसत होता. पण तिच्या मनात मात्र मृगजळ होतं…ज्यामागे धावायला ती परत एकदा तयार झाली होती. समोर आलेला समुद्र नाकारून!
समाप्त..
ह्या कथेचा सिझन २ लिहिता येईल तो लिहावा का हे कॉमेंट मध्ये सांगा.
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

[…] पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग २३- शेवटचा भाग […]
खूप छान लिहिता तुम्ही. मृगजळ 2 आलेला आहेच. सवडीने वाचून कसा वाटला ते नक्की सांगेन. विषय जुनाच असला तरीही त्याची हाताळणी महत्वाची असते. त्यामुळे कथा उत्कंठा वाढवते. छान वाटली. बाकीच्याही नक्की वाचेन. 🌹
या कथेच्या सिझन २ ची आतुरतेने वाट पाहतोय…. प्लीज….
नक्कीच लिहा!
लिखाण अप्रतिम असतच. त्यातील उत्सुकता टिकवून कलाटणी देण्याची कला चांगली अवगत आहे तुम्हाला!
या कथेच्या सिझन २ ची आतुरतेने वाट पाहतोय…. प्लीज…. लवकर लिहा.
Season पहिला पटला नाही चांगल्या सुशिक्षित विचारी बायका 10 वर्षे वाट बघतात शेवट पण नाही आवडला
सॉरी माझे मत असे आहे
shevti mrugajal chi vyakhya khari tharli ani mansi murkh ….. seaspm 2 lihach…. mag ti ranga kade jail ki nahi he nirale pan saurabh che khare rang tila kalavet…..
मानसी अशीच मृगजळामागे धावत राहणार…ती रंगा बरोबर जाणारच नव्हती..रंगा आणि मानसी ची ही या जन्मातली ती शेवटची भेट..हे मनाला चटका लावून गेले..मानसी सौरभ नात्याचा बंध हा मृगजळ आहे हे माहिती असुनही मानसी त्या मृगजळामागे धावत राहिली..इतका भयानक शेवट अपेक्षित नव्हता..सिझन२ जरुर लिहा..रंगा.. मानसी.. सौरभ या तिघांच्या आयुष्यातील पुढचे पर्व वाचायला आवडेल.
नक्कीच सीझन 2 येऊ द्या आणि श्रीरंग आणि मानसी ला एकत्र येऊ देत
Season 2 जरूर लिहा आम्ही वाचू
2 रा season लिहा.
मृगजळ टू वाचायला आवडेल. पण शेवट चांगलाच असावा हा आग्रह आहे.
मृगजळ चा भाग 2 वाचायला आवडेल.
पण मानसी ल आता सत्य लवकर लक्षात येऊ दे….आणि वागायची बुद्धी मिळू दे.
छान लिहिली आहेत ही कथा.. खूप आवडली. पुढचा भाग वाचायला आवडेल
शेवट आवडला नाही.. कथेचे नाव मृगजळ असले तरी मृगजळ हे नेहमी फसवे असते हे मानसिला कळणे अपेक्षित होते .. मानसीचे डोळे उघडलेले वाचायला आवडेल सीझन 2 मध्ये…