मी सेकंड इयर लॉ शिकत असतांची गोष्ट आहे. आमच्या चाळीतील तिसऱ्या मजल्यावरील एक खोली आम्ही अभ्यासासाठी भाड्यावर घेतली होती. रात्री माझा मुक्काम तिथेच असायचा. अभ्यास करून रात्री उशिरा झोपत असे मी.

दिवस पावसाचे होते. तिसऱ्या मजल्यावरील घरांवर कौले होती. त्यामुळे पावसाचा खोल आवाज ऐकू यायचा. पण सवय झाली होती. त्या रात्री अमावस्या होती. मी मित्राच्या घरी नोट्स काढून घरी यायला निघालो. जवळजवळ रात्रीचे दोन वाजले असावे. एकतर मुसळधार पाऊस त्यात अमावस्या. विचित्र वातावण होतं. मित्र म्हणत देखिल होता की थांब सकाळी जा. पण सकाळी कॉलेज असल्याने मी निघालो. छत्री आणि ब्याग सांभाळत चालत होतो. मुनिसिपालटीच्या दिव्यांच्या उजेडात पाऊस खूप “गर्द” वाटत होता. दहा फुटावर दिसत नव्हतं. एवढ्या पावसामुळे रस्त्यावर झोपणारे सुद्धा कुठल्यातरी आडोश्याला गेले होते. रस्त्यावर मी, पाऊस आणि अमावस्या इतके तिघेच होतो. दहा मिनिटे चालत मी चाळीच्या दारातून आत प्रवेश केला आणि पाऊस अचानक एकदम थांबला. जणू माझी घरी पोहोचायची वाटच पहात होता. मला पण थोडं आश्चर्य वाटलं. पण छत्री असून देखिल भरपूर भिजलेला मी जास्त विचार न करता तिसऱ्या मजल्यावर पोहोचलो. इतका वेळ पावसाचा आवाज ऐकलेल्या कानांना ती अचानक शांतता जास्तच जाणवत होती. मग अगदी तळ मजल्यावर पडणाऱ्या उरल्या सुरल्या पागोळ्यांच्या थेंबांचे आवाज देखिल स्पष्ट ऐकू येऊ लागले. मी कपडे बदलून, दिवा बंद करून पलंगावर आडवा झालो.

माझा पलंग त्या कॉमन ग्यालारीमध्ये उघडणाऱ्या खिडकीच्या जवळ होता. झोपल्यावर खिडकी बरोब्बर माझ्या डोक्यामागे येत असे. तर मी आडवा झालो. डोक्यात मगाशी काढलेल्या नोट्सचे विचार घोळत होते. पागोळ्यांच्या थेंबांचे आता अगदी कमी झालेले आवाज मधूनच येत होते. बाकी निरव शांतता आणि काळोख होता. मी डोळे मिटून झोप यायची वाट पहात होतो. थोडी ग्लानी आलीच होती. इतक्यात माझ्या डोक्याजवळ “टण” असा आवाज झाला. मी खाडकन डोळे उघडले. खरंच आवाज झाला होता की तो भास होता? मी डोळे उघडे ठेऊन पडून राहिलो. पाच मिनिटांनी परत तोच आवाज. माझ्या डोक्यापालीकडून… खिडकीतून किंवा खिडकी बाहेरून ग्यालेरीतून आला. आवाज नक्की आला होता. तो भास नव्हता. मी उठून दिवा लावला. अडीच वाजले होते. आतला दिवा लावल्यावर आधीच अमावास्येच्या अंधारात असलेली ग्यालेरी पूर्ण अंधारात बुडाली. मला बाहेरचे काहीच दिसत नव्हते. मी काय करायचे न कळल्याने घरातच उभा होतो. नकळतपणे त्या आवाजाची वाट पहात होतो. दहा मिनिटे झाली. आवाज आला नाही. मला परत झोप येऊ लागली. मी दिवा मालवायला जाणार इतक्यात परत तोच आवाज!!!!

माझा भूतांवर विश्वास आहे पण आणि नाही पण. बाहेर पूर्ण अंधार आणि मला तो आवाज ऐकू येत होता. एवढ्या रात्री चाळीतील टारगट पोरं मस्ती करायचा प्रश्नच नव्हता. मग तो आवाज कसला? एव्हाना मी हातात काठी घेतली होती. ह्यावेळी दोन मिनिटात तो आवाज आला. जणू मला घरातून बाहेर यायचं आव्हान देत होता. मी तिरमिरत दरवाजा उघडून ग्यालेरीत गेलो. दोन्ही बाजूला पाहिल. फक्त अंधार होता. ओला थंडावा होता. अंगावर सर्र्कन काटा आला. परत आत जावं आणि कडी लाऊन घ्यावी असं वाटलं. किंवा असच आपल्या घरी पहिल्या मजल्यावर जावं. तिथे सगळे आहेत. किंवा जोरात ओरडून चाळीतील सर्वाना जागं करावं असे अनेक विचार मनात येऊन गेले. मी ग्यालेरीच्या कठड्याला टेकून विचार करत उभा होतो आणि तो आवाज परत आला. ह्या वेळी एका मिनिटात. माझ्या पासून काही इंचांच्या अंतरावर असल्यासारखा. मला घाबरवत असल्यासारखा. मी सर्वत्र पाहिलं. माझ्या जवळपास कोणीच नव्हतं. मग तो आवाज कोण करत होतं? बी पी वाढणं म्हणजे काय त्याचा अनुभव मला त्या वेळी आला. आपल्यापासून काही इंचांच्या अंतरावर कोणीतरी आवाज करत आहे आणि आपल्याला दिसत नाही ही भावना किती भयावह असू शकते त्याचा प्रत्यय आला. तो जो कोणी होता तो माझ्या शेजारीच होता. पण मला दिसत नव्हता. मला पळून जावसं वाटत होतं. पण पाय थिजल्यासारखे झाले होते. खूप जड झाल्यासारखे. जणू मला कोणीतरी बांधून ठेवल होते. मी त्या अंधारात कठड्याला टेकून बराच वेळ तसाच उभा होतो. कोणीतरी जखडून ठेवल्यासारखा. किती वेळ गेला माहित नाही. आणि परत तो आवाज आला. ह्यावेळी माझ्या कानाच्या अगदी मागून!! मी झटकन वळून पाहिलं. कठड्याच्या पलीकडे अवकाश होतं आणि पलीकडे दुसरी चाळ. तिथे उभं राहायला जागाच नव्हती. मग हवेत उभं राहून कोण आवाज करत होतं? अमावास्येच्या त्या अंधाऱ्या रात्री त्याला माझ्याकडून काय हवं होतं?

कसं कोण जाणे पण माझ्या अंगात थोडी हिम्मत आली. मुख्य म्हणजे डोकं चालू लागलं. मी खोलीत जाऊन दिवा बंद केला आणि परत ग्यालेरीत आलो. थोड्याच वेळात अंधाराला डोळे सरावले आणि अंधुक दिसू लागले. मी काठीवरची पकड घट्ट करून कठड्याला टेकून उभा राहिलो. त्या आवाजाची वाट पहात. बराच वेळ वाट पाहून काहीच हालचाल नव्हती. मी कठड्याकडे तोंड करून दूरवर दिसणाऱ्या इमारतींचे दिवे न्याहाळत होतो. इतक्यात माझ्या डाव्या कानाजवळ तो आवाज झाला. ह्या वेळी आणखी जोरात. त्या अंधारात मी हातातील काठी हवेत गोल फिरवली आणि परत तोच आवाज झाला. मी काठी परत फिरवली आणि परत तोच आवाज लगेच झाला. माझ्या अगदी जवळ. मीच केल्यासारखा…..

मीच केल्यासारखा??? मी आता काठी हळूच फिरवली. “टण” आवाज झाला!!!

आमच्या शेजारच्या चाळीत रस्त्याकडे एक मिठाईचे दुकान होते. त्याचा मालक ह्या तिसऱ्या मजल्यावरील आमच्या शेजारच्या खोलीत रहात असे. चाळीच्या ग्यालारीचे खांब लोखंडाचे होते. माझ्या खिडकीच्या बरोब्बर बाहेर एक खांब होता. त्या खांबाला त्या शेजाऱ्याने मिठाई बनवायचा लोखंडी ट्रे दोरीने बांधला होता. पाऊस संपल्यावर वारा जोरात होता. एखादी खूप जोराची झुळूक आली की तो जड लोखंडी ट्रे थोSSडा हलत होता आणि खांबावर आपटत होता. मी फिरवलेली काठी लागून तो ट्रे हलला आणि खांबावर आपटला आणि मला इतकावेळ त्रास देणारा तोच आवाज झाला. मी डोक्यावर हात मारत तो ट्रे काढून ठेवला आणि खोलीत येऊन पलंगावर आडवा झालो.

आता पाऊस सुरु झाला होता. कोसळू लागला होता. कौलांचा खोल आवाज येत होता. मला जवळजवळ झोप लागली होती. तेवढ्यात घरातच मला बांगड्यांचा किणकीणाट ऐकू आला. कोणीतरी पैंजण घालून धावत असल्याचा भास झाला. मी काळोखात उठून बसलो…. अमावास्या होती….रात्र पावसाची होती……. :-)©मंदार जोग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!