वडापाव | Mandar Jog

वडापाव

आम्ही शाळेत असताना गिरगावातील विनय, प्रल्हाद भुवन, नाफडे, तांबे, पणशिकर, वीरकर अश्या हॉटेलात देखील खायला वर्षातून एक किंवा दोन वेळा प्लानिंग करून सहकुटुंब जात असू. त्यावेळी जेवण, झोप, अंघोळ ह्या गोष्टी घरातच करायची पद्धत होती. बाहेर खाणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती. त्यावेळी शाळेत देखील डबा न्यायचो आम्ही. व्यवस्थित पोळी भाजी, उपमा, पोहे, दहीभात, गूळ पोळीची गुंडाळी असे ऐवज डब्यात असत. पॉकेट मनीची गरजच नव्हती. चालत शाळेत जायचं आणि परत यायचं. पैसे लागतात कशाला? 

तेव्हा शाळेतील काही मुलं शाळेच्या कॅन्टीन मधून विविध पदार्थ घेऊन खाताना बघून प्रचंड वैषम्य वाटत असे. अर्थात आजही हजारो रुपये देऊन टेबलावर लावलेल्या बार्बीक्यु मधील चार चिकनचे किंवा बटाटा, मशरूम आणि फ्लॉवर चे तुकडे खात त्या ठिकाणी चेक इन करून फोटो पोस्ट करणारे लोक बघून सेम वैषम्य वाटतं. असो. तर लहानपणी हळू हळू त्या वैषम्याची जागा कुतूहलाने घेतली आणि मग आकर्षणाने. मग घरी मागे लागून एक दिवस शाळेत डब्या ऐवजी चार आणे घेऊन गेलो आणि कॅन्टीन मधल्या गर्दीत शिरून एक वडापाव असं सांगून हातात पडलेला तो पदार्थ पहिल्यांदा खाल्ला आणि ब्रह्मानंदी टाळी लागली! वाह! त्या शाळेतल्या वडापावची चव आजही जिभेवर रेंगाळते आहे. तसा वडापाव जगात कुठेही खाल्ला नाही परत! 

पुढे शाळेत आठवड्यातून एकदा पैसे घेऊन जाऊ लागलो. वडापाव व्यतिरिक्त क्वचित ब्रेड भजी खाऊ लागलो. मग मला वाटतं आठ आण्याला मिळणारी आणि थोडे मोठे दादा लोक खात असलेली काळा वाटाणा उसळ आणि पाव एकदा खाऊन पाहिलं. तेव्हा उगाच मोठं झाल्याचा फील आला. पण शाळेत काय खायचं तर वडापाव. तो पातळ आवरण असलेला, आलं लसूण मिरची वाटून बरोब्बर प्रमाणात मिसळून केलेल्या स्वर्गीय चवीच्या भाजीचा चपटा वडा. पावाच्या आणि वड्याच्या मधोमध घातलेली अवर्णनीय चवीची हिरवी चटणी आणि बाहेर असलेला ताजा लुसलुशीत पाव. चार आण्यात चार धाम फिरल्याचा आनंद आणि समाधान म्हणजे आमच्या शाळेतला वडापाव. त्याची इतकी सवय झाली की एक दोन वेळा पैसे नव्हते तरीही गर्दीत हात पुढे करून एक वडापाव असं ओरडून हातात वडापाव मिळाल्यावर पळून गेलो होतो. मग मोठा झाल्यावर परत शाळेत गेलो तेव्हा कॅन्टीन मध्ये एक वडापाव खाऊन कॅन्टीन वाल्याचं लक्ष नाही बघून पन्नास रुपयांची नोट काउंटर पलीकडे हळूच सरकवली होती. त्यावेळच्या पंचवीस पैशांची किंमत आजच्या पन्नास रुपयांच्या कित्येक पट जास्त होती! 

पुढे वडापाव हा कडकी, घाई, पाऊस, भूक, टाईमपास, काहीतरी चमचमीत खायची इच्छा अश्या सर्व इच्छांचा इच्छापूर्ती साथी बनला. मग एकेकाळी मराठी पदार्थ असलेला वडापाव हळू हळू कोणीही विकू लागला. सचिन ने त्याला एक ग्लॅमर मिळवून दिलं. गरिबांच अन्न असलेला वडापाव मग पाव भाजी सारखा श्रीमंतांच फॅड बनला. नाक्या नाक्यावर वडापावच्या गाड्या लागल्या. ब्रँडेड वडापावची दुकानं निघाली. वडापाव बरोबर चटणी ऐवजी चीज, बटर, शेजवान सॉस अशी विजोड नावं जोडली गेली. गोपाळकाला सणाची जशी दहीहंडी स्पर्धा अशी घसरण झाली आहे तशीच वेळ वडापाव वर आली. मुंबईची बंबई झाल्यावर कोळणींच्या जागी हिंडालियमच्या भांड्यात परप्रांतीय माश्यांऐवजी मछली विकू लागले आणि मराठमोळ्या वडापावचा परप्रांतीय पाववडा झाला. दोन चिमूट शिळ्या भाजीला अर्धा इंच जाड आवरण लावून तयार केलेलं पिवळट रंगाचे कच्चट गोल कित्येक दिवस वापरलेल्या काळ्या तेलात तळून वडा म्हणून शिळ्या ठिसूळ पावात कोंबून त्यात तळणीतला गाळ चुरून त्यात लाल रंग मिसळून बनवलेला चटणी नामक पदार्थ घुसडून तो ओंगळ पदार्थ तळलेल्या मिरची बरोबर अनधिकृत ठेल्यांवर वर्तमान पत्रात दिला जाऊ लागला तेव्हा मुंबईत अस्सल वडापाव बहुतांश ठिकाणी वारला!

पण मराठी माणसासारखा तो काही भागात उरला होता. आपली चव टिकवून होता. गिरगावात बोरकर, परशुराम वाडी, सरकार तबेल्यासमोर शाखेच्या बाहेर, कुटुंब सखी केंद्रात, दादर ला कीर्ती कॉलेज जवळ, पार्ल्यात पार्ले टिळक शाळेजवळ आणि आणखी काही ठिकाणी तो जिवंत होता. मूळ मराठमोळ्या रुपात. बाकी कधी तो दिवाडकर बनून कर्जत स्थानकावर भेटतो तर कधी परप्रांतीय चालवत असलेल्या मराठी माणसाच्या राजकीय वडापाव गाडीवर त्याच्या भेसूर रुपात आढळतो. सोशल मीडियामुळे हल्ली सगळेच लेखक आणि कवी झाल्यामुळे चांगलं लिहिणारे सापडणं दुर्मिळ झालं. फोन मध्ये कॅमेरा आल्यावर सगळेच फोटोग्राफर झाल्यावर चांगले फोटोग्राफर सापडणं दुरापास्त झालं. गाण्याची ऍप आणि काराओके मुळे सगळेच डुप्लिकेट आणि भिकार किशोर कुमार बनल्यावर किशोरचा मूळ आवाज शोधायची वेळ आली तसंच गल्लोगल्ली आणि नाक्यानाक्यावर कोणीही “पाववडा” नामक थुकपट्टी पदार्थ विकू लागल्यावर मराठमोळा अस्सल वडापाव दुर्मिळ झाला. 

मग आज कधी मूड झाला की आम्ही ओरिजनल वडापाव चे दर्दी जुन्या वडापाव वाल्याकडे जातो. तो आता म्हातारा झालेला असतो. आम्हाला म्हणतो “आता वीस रुपयात पण नाही रे परवडत मंदार. गिर्हाईक कमी झालं. त्यांना पंधरा रुपयात मिळणारे बेसनाचे बटाटा घातलेले तिखट लाडू आवडतात. पण अस्सल वडापाव वीस रुपयात नको!” त्यांना आम्ही सांगतो “काका अश्वत्थाम्याला दुधाची चव कळणार नाही! लक्ष देऊ नका. वीसला परवडत नाही तर तीस रुपये घ्या. ह्या मंदार जोगची पिढी आहे तोवर तुमच्या वडापावला मागणी असेल.!” 

साला आज वडापाव दिनी शाळेच्या वडापावची चव खूप आठवते आहे. लवकरच शाळेत जाऊन वडापाव नक्की खाणार आहे. तोवर रस्तोरस्ती दिसणाऱ्या गाड्या आणि त्यावर मिळणारा भंगार पाववडा (वडापाव नाही) खाणाऱ्या वेड्या लोकांना मनातल्या मनात टुकटुक करत “हाय कंबख्त तुने पी ही नहीं” असं म्हणत मनातल्या मनात हसणार आहे! बाकी आजच्या जागतिक वडापाव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! लेख आवडल्यास खाली असलेली लेखाची लिंक कॉपी करून whatsapp समुहात शेयर करा. सर्वाना ह्या मोबाईल वाचनालयाचा आनंद घेऊ द्या.

इतर ललित लेख- ललित

मृगजळ दीर्घ कथा मृगजळ …भाग १

लघुकथा लघुकथा

मनोरंजन विश्वातील लेख फिल्लमबाजी

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “वडापाव”
  1. खूप छान
    वडापाव म्हणलं कि अजूनही जीव कि प्राण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!