उष्टावण | Mandar Jog

उष्टावण – भयकथा

शिंदे मास्तर म्हणजे देव माणूस. गावातल्या पोरांना शाळेच्या अभ्यासाबरोबरच आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टींचे शिक्षण देऊन एक चांगली पिढी घडवायचे काम मास्तर करत होते. लग्नकार्य नाही. सडाफटिंग माणूस. त्यांचं घर म्हणजे दुसरी शाळाच जणू! पोरं केव्हाही यायची, शंका विचारायची, तिथेच बसून अभ्यास करायची, खेळायची. मस्त आयुष्य सुरू होतं मास्तरांचं आणि गावचंदेखील, जोवर….

मास्तरांची ख्याती दूरवर पसरली. अगदी मुंबई-पुण्यापर्यंत. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. एक दिवस मास्तर मुंबईला गेले. बक्षीस घेतले. त्यानंतर एक आठवड्याचे शिबिर होते. त्यातच तो नालायक मास्तरांना भेटला! सदानंद कुलकर्णी! काय तर म्हणे गावागावातून अंधश्रद्धा मिटवलीच पाहिजे. शिक्षकांनी त्यात पुढाकार आणि सहभाग घ्यायला पाहिजे! शिंदे मास्तर गावात आले ते अंधश्रद्धा घालवायचे नवीन खुळ डोक्यात रुजवूनच!

आमचं गाव तसं बरं होतं. जास्त देवदेव करणारे कोणी नव्हते. जी सामान्य श्रद्धा असते तितपत होती. बाकी काळी जादू, बाहेरचे, भूतप्रेत असल्या गोष्टींचा फार प्रसार नव्हता. फक्त एक गोष्ट सोडून! खुन्या चौकातला तो काळा दगड आणि विठू पाटलाचा जुना वाडा! त्याबद्दल कोणी काही बोलत नसे. फक्त त्या दगडाला पाय लावायचा नाही, प्रदक्षिणा घालायची नाही, असा एक नियम होता. लोक त्याकडे पाहणे देखील टाळत. तसेच विठू पाटलाचा जुनाट, अर्धवट जळका वाडा देखील लोकांनी बहिष्कार टाकल्याने अधिक भयानक दिसे. सभोवती वाढलेले जंगल, उडून गेलेली कौले, पोपडे पडलेल्या भिंती आणि अभद्र वाटणारे एक काळवंडलेलेपण. गावात असून नसल्यासारखी एक वास्तू! त्या वास्तूत फक्त एकच माणूस प्रवेश करी. गेली कित्येक वर्षं…. तो म्हणजे जख्ख म्हातारा नाग्या भगत! ते पण फक्त अमावस्येच्या रात्री! आपला सुरकुतलेला, कृश देह विवस्त्र करून! उष्टावण झाली ह्याची खात्री करायला!

विठू पाटलाचे लग्न होऊन बरीच वर्षं झाली तरी घरी पाळणा हलत नव्हता. पाटीलकीचा माज रोमारोमात भरलेल्या विठूच्या घरच्यांनी त्याच्या बायकोला, बायजाबाईला वांझ ठरवले. मग गावानेपण तिला वाळीत टाकले. टोमणे आणि छळाने बेजार झालेली बायजा वाड्यात बसून असे. त्यात विठू पाटलाने दुसरे लग्न केले आणि नवी बायको घरी आणली. त्या रात्री बायजाचे आणि विठूचे मोठे भांडण झाले. विठू कोयता घेऊन तिच्या मागे लागला. बायजा पळत गावात निघाली. ती ओरडत होती. मदत मागत होती! विठू मागे होता. गावकरी तमाशा पाहत होते. मध्ये पडायची हिंमत कोणात नव्हती. बायजा धावत खुन्या चौकात पोहोचली. एका दगडाला ठेचकाळून पडली. विठूने कोयता फेकला आणि तोच दगड बायजाच्या डोक्यात घातला! तोच खुन्या चौकातला दगड! बायजा क्षणात गतप्राण झाली. दोन दिवसांनी अमावस्या होती. त्या रात्री पाटलाच्या वाड्याला अचानक आग लागली. सगळे खानदान जळून गेले. बायजाला टोचून बोलणाऱ्या गावातील बाया-बाप्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. त्या वेळी तरुण असलेल्या नाग्याला बायजा दिसली. “मी गावाला सोडायची नाय,” असे म्हणाली. मग नाग्याने दर अमावस्येला विवस्त्र येऊन प्रसादाचा वायदा केला आणि गावावरचे संकट टळले! ह्या गोष्टीला आता सत्तर वर्षं उलटून गेली. पण दर अमावस्येला एका घरातून प्रसाद दिला जातो. नाग्या पत्रावळ दगडाजवळ ठेवतो. मग वाड्यात जाऊन उष्टावणीची खात्री करतो. उष्टावण म्हणजे बायजाच्या खोलीत त्या दिवशी दगडाजवळ वाढलेल्या प्रसादाची शिते असतात! हे फक्त नाग्या करतो आणि पाहतो. आजवर त्याला कोणी काही प्रश्न विचारलेला नाही! दर अमावस्येला प्रसादाची प्रथा सुरू आहे. गावात शांतता आहे!

गावात आल्यावर शिंदे मास्तरांनी नाग्याला बोलावून घेतले. “नाग्या, आता वय झालं तुझं. आता आराम कर. कशाला अंधश्रद्धा पसरवतोस? अरे, दोन वेळचे जेवण मी देईन तुला. पण हा प्रसाद आणि उष्टावण नावाचा प्रकार बंद कर. अरे, जग कुठे गेलं आहे आणि आपण ह्या कसल्या अंधश्रद्धेत गावाला अडकवतो आहोत! हा प्रकार ताबडतोब बंद करूया,” मास्तरांनी आज्ञा केली. नाग्या हटायला तयार नव्हता. मग विषय चावडीवर आला. मास्तरांनी नाग्याला आव्हान दिले. “ह्या अमावस्येला तू प्रसाद ठेव आणि मी वाड्यात जाऊन तिथे शिते वगैरे काही नसतात हे सिद्ध करेन.” नाग्या गयावया करत होता. पण मास्तर इरेला पेटले होते!

अखेर ती रात्र आली. गाव दरवाजे बंद करून गुडूप झाले होते. खुन्या चौकात फक्त नाग्या आणि मास्तर! नाग्याने पत्रावळ ठेवली आणि डोळे मिटून घेतले. मास्तर सायकलवरून वाड्याकडे निघाले. नाग्याला त्याचा इतक्या वर्षांचा शिरस्ता मोडायचा नव्हता. तो पण लंगडत वाड्याकडे निघाला……

आज अमावस्येची अभद्र रात्र! त्यात मास्तरांचं हे अक्रित वागणं! नाग्या नखशिखांत हादरला होता. अंधारात लंगडत, जोरात चालल्याने ठेचकाळत तो वाड्यावर पोहोचला! मास्तरांची सायकल फाटकाजवळ उभी होती. नाग्या वाड्यात शिरला. माडीवरच्या बायजाच्या खोलीत कंदिलाचा उजेड होता. नाग्याने ह्याआधी कधीच न पाहिलेला! नाग्या जीव मुठीत धरून खोलीच्या दारात पोहोचला. मास्तर पाठमोरे खाटल्यावर बसले होते. नाग्याने सगळा धीर एकवटून हळूच हाक मारली, “मास्तर….”

मास्तरांनी १८० अंशात मान फिरवली! नाग्याच्या पायाखालून जमीन सरकली. तो चेहरा नाग्याच्या ओळखीचा होता. बायजाचा चेहरा! दगडाने ठेचून भेसूर रक्तबंबाळ झालेला… मोडलेला… मेंदू बाहेर लटकत असलेला….. बायजा मास्तरांच्या वेशात होती!!! आज “महाप्रसाद” झाला होता! बायजाने अर्धवट खाऊन टाकलेली मास्तरांची बोटे हात खाऊन केलेल्या “उष्टावणाची” साक्ष देत होती! बायजा रक्ताळलेले दात दाखवत भेसूर हसत होती! नाग्याच्या छातीत डाव्या बाजूला जोरात कळ आली! त्याला रक्ताची उलटी झाली! नाग्याचा कृश देह कापरासारखा भुरभुरत जळून गेला!!!!

दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना मास्तरांचा डोकं ठेचलेला देह खुन्या चौकात त्या काळ्या दगडाशेजारी सापडला…. एक हात नसलेला!!!

………पुढल्या अमावस्येला गावातला भिक्या भगत ओरडत फिरत होता की त्याने तीन हातांचा नाग्या पाहिला म्हणून! गावकरी जमले! भिक्या सांगू लागला, “प्रसादाची प्रथा बंद नाही होता कामा. फक्त आता प्रसाद रक्ताचा पाहिजे!” अडाणी भिक्याच्या भाषेत आणि आवाजात गावकऱ्यांना मास्तरांचा भास होत होता इतकंच… तिन्ही सांज झाली होती…. प्रसादाची वेळ नजीक आली होती….. गावात शांतता होती…..©मंदार जोग

हे पण वाचा-

कादंबरी – सख्या रे …

कादंबरी- ट्वेंटी थ्री

दीर्घकथा – गुंतता हृदय – सर्व भाग

दीर्घकथा-मृगजळ- सर्व भाग

दीर्घकथा- व्हॅलेंटाईन डे- भाग १

दीर्घकथा- रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “उष्टावण – भयकथा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!