सचिन पिळगावकर- वो तो है अलबेला– मराठी सिनेमात सुपरस्टार वगैरे असणारे नट आणि नट्या हिंदीत अत्यंत दुय्यम भूमिका करताना आणि अनेक पॉडकास्टमध्ये स्वतःच्या मराठीतील कामापेक्षा हिंदी सिनेमातील दिग्दर्शक, नट यांनी मला कसं समजून घेतलं, मराठी कलाकारांबद्दल त्यांना कसा रिस्पेक्ट आहे वगैरेबद्दल जास्त उत्साहाने बोलताना एकेकाळी व्ही. शांताराम, अमोल पालेकर, त्यानंतर गेल्या काही वर्षांत नाना पाटेकर, रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे यांच्याव्यतिरिक्त हिंदी सिनेमात नायक तसेच सहनायकाच्या भूमिका करणारा मराठी अभिनेता म्हणजे सचिन पिळगावकर प्रकर्षाने आठवतात!
बालकलाकार म्हणून सचिनचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला त्यालाही आता तब्बल ६२ वर्षं उलटून गेली आहेत! आणि त्यांना बघून विश्वास बसत नसला तरी त्यांच्या वयाची ६८ वर्षं पूर्ण झालेली आहेत. इतक्या वर्षांत त्या माणसाने जवळपास ६५ सिनेमांत बालकलाकार म्हणून आणि मोठा झाल्यावर कदाचित त्याहून जास्त सिनेमांत नायक आणि सहनायक म्हणून काम केलं आहे. तसेच जवळपास २५ सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे आणि त्यातील अनेक सिनेमे सुपर-डुपर हिट आहेत. त्यातील गाणी आणि प्रसंग आपल्याला आजही आठवतात. “धनंजय माने”, “लिंबू कलरची साडी”, “हा माझा बायको”, “पैसे वारले” हे त्यांच्या सिनेमांतील संवाद आज मराठी बोलीभाषेचा जणू हिस्सा बनले आहेत.
हिंदी सिनेसृष्टीत जे काम राज कपूर, मनोज कुमार, फिरोज खान आणि गुरु दत्त यांनी केलंय, तेच काम मराठीत राजा परांजपे, दादा कोंडके तसेच सचिन आणि महेश कोठारे यांनी केलं आहे. हे सगळेच कलावंत नट आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिकांत सिनेसृष्टीत वावरले आहेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या सगळ्यांना सिनेमा या माध्यमाची प्रचंड जाण होती आणि आहे. पण त्यांची संगीताची जाणही त्यांच्या सिनेमांचं संगीत अप्रतिम बनवत आली आहे. त्यातील बहुतांश दिग्दर्शक चांगले संकलकदेखील असल्याने त्यांच्या चित्रपटांचा त्या आघाडीवरही दर्जा राहिला आहे. म्हणूनच सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत आहेत, हे कोणीही मान्य करेल.
वर उल्लेख केलेल्या व्यावसायिक गुणांव्यतिरिक्त मला आवडणारा सचिन पिळगावकर यांचा खूप महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचा प्रचंड उत्साह आणि सकारात्मकता. एखादी मुलाखत असो, नॉन-फिक्शन शो असो किंवा एखादा इव्हेंट असो, सचिन नेहमी हसतमुख, उत्साही दिसतात. त्यांच्याकडे माहिती आणि किस्से यांचा इतका प्रचंड खजिना आहे की अनेकदा ते बोलत राहतात आणि समोरचा नकळत मूक प्रेक्षक बनतो.
त्यांची मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे या माणसाला मी आजवर कुठेही एखाद्या व्यक्ती किंवा कलाकृतीबद्दल वाईट, नकारात्मक किंवा टीकात्मक बोलताना, लिहिताना किंवा व्यक्त होताना पाहिलं नाहीये. ते कधीही राजकीय भाष्य करताना आढळलेले नाहीत. तसंच त्यांना कधीही स्वतःच्या एखाद्या अपयशाबद्दल बोलताना निराश झालेलं, प्रेक्षकांना शिव्या घालताना ऐकलेलं नाहीये! Never! इतरांबद्दल कधीतरी नकारात्मक, टीकात्मक, नैराश्यपूर्ण बोलणारे अनेक दिग्गज कलावंत मी पाहिले आहेत. पण सचिन पिळगावकर आणि नकारात्मकता यांना कधीच एकत्र पाहिलं नाही!
कलाकार म्हणून, नट म्हणून, दिग्दर्शक म्हणून हिंदी तसेच मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रात स्वतःच्या खणखणीत कामाचा ढळढळीत ठसा उमटवणाऱ्या सचिन पिळगावकर यांचं प्रत्येक मराठी माणसाला मनापासून कौतुक आणि अभिमान वाटायला हवा. पण आपण मराठी लोक इतके कर्मदरिद्री आहोत की आपल्यातील काही लोक त्या मनस्वी माणसाला ट्रोल करण्यात धन्यता मानताना दिसतात. त्यात आयुष्यात स्वतःच्या हिंमतीवर फार काही न करू शकलेले, मोबाईल फोनसुद्धा ईएमआयवर घेणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे.
इन्स्टावर फुटकळ रील आणि व्हिडिओ टाकणाऱ्या भिकार लोकांना सेलिब्रिटी समजून त्यांना फॉलो करत, त्यांचे फॅन झालेले काही लोक सचिनसारख्या ६० वर्षांहून जास्त करिअर असून आजही रिलेव्हंट राहिलेल्या कलाकाराला ट्रोल करताना पाहून खरंच हसू येतं.
मान्य की किस्से, प्रसंग सांगताना सचिन स्वतःबद्दल बोलत असतात, ते अनेकांना रुचत नसेल. मान्य, काही लोकांना ती आत्मप्रौढी वाटत असेल. ते सांगत असलेल्या प्रसंगांवर विश्वास बसत नसेल. पण ते जे काही सांगतात त्यात ते इतर लोकांची नावं घेतात ना? अमुक ठिकाणी मी असं म्हणालो आणि मग तमुक तसं म्हणाला हे सांगतात ना? मग आजवर त्या त्या प्रसंगात सचिन यांनी उल्लेख केलेल्या कोणीही तो प्रसंग खोटा आहे किंवा मी त्यात नव्हतो, असं कधीच का सांगितलं नाहीये? की ते लोकसुद्धा खोटारडे आहेत? लोक हा विचार का करत नाहीत? आणि त्यामुळेच ते प्रसंग घडले तेव्हा जन्मालाही न आलेल्या अनेकांना ते खोटे आहेत किंवा आत्मप्रौढी करायला रचून सांगितले आहेत, याची माहिती कशी आणि कुठून मिळाली असेल?
आणि समजा सचिन जे बोलतात ते तुम्हाला पटलं नाही, तर सोडा की. नका बघू किंवा ऐकू त्यांना. पण म्हणून सिनेसृष्टीमधील त्यांची इतकी मोठी कारकीर्द, त्यांचं योगदान, त्यांचं कर्तृत्व सगळं एका क्षणात डिस्काउंट करून, हलक्यात घेऊन त्यांची सतत आणि फक्त खिल्ली उडवणं कितपत योग्य आहे? की हातात मोबाईल आहे, स्वस्त डेटा आहे, रिकामा वेळ आहे, समोर सॉफ्ट टार्गेट आहे आणि बेकारी, कडकी, महागाई, सहन करावे लागणारे अपमान या सगळ्यांचं मनात साठलेलं नैराश्य बाहेर काढायचा सोशल मीडिया नामक एक स्रोत मिळाला आहे म्हणून काही लोक नैराश्याची गरळ सतत ओकत आहेत?
X चा एक्स-एम्प्लॉयी असलेला माझा मित्र एकदा म्हणाला होता, “आमचं अस्तित्व लोकांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या तिरस्कारामुळे तसेच त्यांच्या नैराश्यामुळे टिकून आहे.” मला समाज माध्यमांवर विविध विषयांवर जे नकारात्मक वाचायला मिळत त्यावरून ते वाक्य अगदी योग्य असल्याची खात्री पटते.
असो. सचिन पिळगावकर यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट लिहायला घेतल्यावर गाडी थोडी वेगळ्या वाटेने गेली. पण मला हे कधीतरी बोलायचं होतं.
कुंदन शाह यांच्या कभी हाँ कभी ना सिनेमात एक अफलातून गाणं आहे, जे सिनेमात शाहरुखने साकारलेल्या पात्राबद्दल आहे. त्याचे बोल आहेत, “वो तो है अलबेला, हजारों में अकेला… सदा तुमने ऐब देखा, हुनर को न देखा!” सचिन पिळगावकर हा कलेच्या वेगवेगळ्या अंगांत पारंगत असलेला असाच एक अलबेला कलावंत आहे, असं मला वाटतं. टीकाकारांनी त्यांना ट्रोल करताना त्यांचे फक्त ऐब म्हणजे तथाकथित दोष न बघता त्यांचे हुनर म्हणजे गुण नक्की बघावेत.
गुण नीट लक्षात घेतले तर त्या व्यक्तीचं ज्येष्ठत्व, त्याच्या क्षेत्रातील त्याचं ज्ञान, त्याच्या क्राफ्टवर असलेली त्याची हुकूमत आणि ६९व्या वर्षीही त्यांनी राखलेला फिटनेस, ज्यात त्यांच्या सकारात्मक विचारसरणीचा आणि आनंदी जीवनशैलीचा मोठा वाटा असणार, अशा अनेक गोष्टी लक्षात येतील. मराठी मातीत जन्मलेल्या, मराठीशी नाळ घट्ट जोडलेल्या, हिंदी सिनेमात मुशाफिरी केलेल्या, अत्यंत सकारात्मक आणि आनंदी व्यक्तिमत्त्व असलेल्या अलबेला सचिन पिळगावकर यांना समस्त मराठी भाषिकांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
असेच फिट, आनंदी आणि उत्साही राहा. आम्हाला नवनवीन सिनेमे देत राहा!
©मंदार जोग
सिनेमा जगाशी निगडीत आणखी लेख वाचायला इथे क्लिक करा- फिल्लमबाजी
आमची व्यक्ती चित्रणे वाचली का? ही लिंक क्लिक करा आणि वाचा – व्यक्तिचित्रण
हे पण वाचा-

अगदी सूक्ष्म निरीक्षण व सुंदर शब्दांत लिहिले आहे शुभेच्छा
[…] पण वाचा- सचिन पिळगावकर- वो तो है अलबेला अभिमान… मृगजळ …भाग १ गुंतता हृदय – […]