काळ्या आणि रोझी लंचसाठी त्या दोघांना एका गोवन फूड मिळणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले. ते एक छान पोर्तुगीज पद्धतीच्या बंगल्यात थाटलेलं रेस्टॉरंट होतं. चौघांनी ड्रिंक्स मागवली.
सौरभ- मला गोव्यात हे आवडतं. ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर कधीही ड्रिंक मागवता येतं. तुम्हाला कोणी जज करत नाही.
रोझी- ड्रिंक घेतो किंवा घेते की नाही ह्यावरून जज करणे हे गोव्याचं कल्चर नाही. कदाचित युरोपियन लोकांनी अनेक वर्षं राज्य केल्यामुळे भारतात असूनही गोव्यावर अजूनही थोडे युरोपियन संस्कार बाकी आहेत.
मानसी- हो, अगदी बरोबर बोललीस. पण गोवा खूप छान आहे. मला इथला vibe आवडतो.
काळ्या- मला पण. कारण मला रोझी इथेच भेटली. आमच्या ऑफिसची ऑफ साईट होती ताजला. रोझी तिथे front deskला होती. मी तिला पाहिलं तेव्हाच घंटी वाजली.
सौरभ- Wow.
काळ्या- मी पण तेच म्हणालो. Wow.
रोझी- हो, हा माझ्या समोर उभा राहून मला बघत माझ्या तोंडावर wow म्हणत होता. दुसरा कोणी असता तर मी कानाखाली वाजवली असती. पण हा…
काळ्या- हा आमचा काळ्या तुला पहिल्या नजरेत आवडला?
रोझी- हो… kind of… मला त्याचे डोळे खूप जेन्युईन वाटले.
काळ्या- आम्ही तीन दिवस होतो इथे. मी तीन दिवसांत हिला पटवली.
रोझी- पटवली नाही… मी पटले म्हण. मग एक महिन्यात लग्न आणि मी दिल्लीला हयातमध्ये जॉईन केलं. शॉर्ट अँड स्वीट लव्ह स्टोरी.
मानसी- असं का? पुढे सांग की.
काळ्या- पुढे काही नाही. एका वर्षात पहिला मुलगा झाला आणि त्यानंतर दीड वर्षांनी मुलगी. रोझी माझी बायको कमी आणि त्यांची आई जास्त झाली.
सौरभ- ओह येस. किड्स कुठे असतात?
काळ्या- त्यांना नैनितालला होस्टेलमध्ये ठेवलं आहे. इथे गोव्यात आम्ही बिझी असणार. साले काही गर्दुल्ले, येडे लोक पण येतात. इथेही आहेत. पोरांवर लक्ष ठेवायला आम्हाला वेळ नाही. त्यामुळे तिथे ठेवले. ही किंवा मी महिन्यातून एकदा जाऊन भेटून येतो त्यांना. आणि मानसी, तू नोकरी आणि मुलं कसं काय मॅनेज करतेस? तुम्हाला एक मुलगा ना? नाव काय त्याचं?
हे ऐकून मानसीने सौरभकडे पाहिलं.
सौरभ- अरे, त्याची गंमतच आहे. म्हणजे मला हर्षद ठेवायचं होतं आणि हिला आदित्य. मग दोन्ही ठेवली. मी त्याला हर्षद म्हणतो आणि ही आदित्य म्हणते. शेवटी नावात काय आहे. प्रेम महत्त्वाचं.
इतक्यात जेवण आलं. सगळे जेवू लागले. जेवत असतानाच सौरभला अंकिताचा फोन आला. त्याने कट केला. तिने परत फोन केला. त्याने कट केला. परत तिचा फोन आला. आता सगळे त्याच्याकडे बघू लागले. सौरभला फार awkward झालं.
सौरभ- मला हा call घ्यावा लागेल.
काळ्या- मग घे की. इतका फॉर्मल काय होतोस? ऑफिसची मीटिंग सुरू नाहीये आपली. घे कॉल. Unless तो तुझ्या गर्लफ्रेंडचा नसेल तर.
ह्या जोकवर काळ्या आणि रोझी हसले. मानसी सौरभकडे बघत होती. फोन वाजत होता.
सौरभ- एक्स्क्यूज मी…
असं म्हणून सौरभ उठून लांब गेला आणि त्याने फोन घेतला.
सौरभ- हेलो…
अंकिता- तू फोन केला होतास ना?
सौरभ- हो… पण म्हणून तू दहा फोन करशील?
अंकिता- ए, मला हौस नाहीये तुला फोन करायची. तू केलास म्हणून मी कॉल रिटर्न केला.
सौरभ- आणि मी उचलला नाही म्हणजे मी बिझी आहे हे तुला कळलं नाही? नंतर करायचा होता. एकदा घेतला नाही कळल्यावर.
अंकिता- मी तुझी नोकर नाहीये दिवसभर तुला फोन ट्राय करत बसायला. मला माझी कामं आहेत. फोन का केलास ते सांग.
सौरभ- लक्षात नाही, विसरलो. बाय…
सौरभने फोन कट केला आणि तो आपल्या जागेवर येऊन बसला. थोडा अस्वस्थ होता.
काळ्या- ए मानसी, नक्कीच फोन ह्याच्या गर्लफ्रेंडचा होता. नाहीतर अशी काय गोष्ट आहे जी हा आपल्या समोर बोलू शकत नाही? आमचं सोड, तुझ्यासमोर बोलू शकत नाही. हो की नाही, रोझी?
रोझी- तुम्ही पुरुष असताच असे. एका बाईवर तुमचं समाधान होत नाही. जरा कारण मिळालं की लगेच अफेयर सुरू. आणि blame बायकोला करणार. ए मानसी, काळजी घे हा तू. मी बघ ह्याला असा बांधून ठेवला आहे की…
काळ्या- की एकही रात्र शांत झोपू देत नाही.
रोझी हे ऐकून प्रचंड लाजली. काळ्या जोरात हसला.
रोझी- तू ह्याच्याकडे लक्ष देऊ नको. आता गोव्यात आमच्या रिसॉर्टला इतक्या गोऱ्या पोरी येतात आणि सगळं दाखवणारे कपडे घालून फिरतात. ह्याला त्यांचा फिव्हर लागू नये म्हणून रोज ह्याला देशी डोस द्यावा लागतो.
आता ते दोघेही जोरजोरात हसले. मानसी आणि सौरभ जबरदस्तीने हसत त्यांच्या हसण्यात सामील झाले.
काळ्या- Guys, आता मी आणि रोझी रिसॉर्टला परत जातो. तुमच्यासाठी बाईक मागवली आहे. तुम्ही दोघे मस्त भटकून या. आणि उन्हात बीचवर समुद्रात जाऊ नका. काळे पडाल. ऊन कमी होईपर्यंत एखाद्या shackमध्ये बसून मस्त beer प्या आणि संध्याकाळी बीचवर आणि समुद्रात जा. ओके?
इतक्यात बिल आलं. काळ्याने ते पटकन घेतलं आणि आपलं कार्ड वेटरला दिलं.
सौरभ- ए काळ्या, हे काय यार?
काळ्या- तुम्ही आमचे गेस्ट आहात आणि गोव्यात गेस्टकडून पैसे घेत नाहीत.
चौघे बाहेर पडले. काळ्या आणि रोझी त्यांच्या गाडीत बसून निघून गेले. सौरभ आणि मानसी तिथे उभी असलेल्या बाईकजवळ आले.
सौरभ- Wow, किती वर्षांनी मी बाईक चालवणार आहे. चल, निघूया.
मानसी- अंकिता काय म्हणाली?
सौरभ- काही नाही. कॉल रिटर्न करायला फोन केला होता.
मानसी- ओके, ग्रेट. मग आता फोन कर तिला आणि सांगून टाक.
सौरभ- Are you mad? मी तिला आता सांगितल्यावर ती काय म्हणेल असं वाटतं तुला? की छान, तुम्ही दोघे गोव्यात आहात ना? मग मज्जा करा. तू परत आलास की मी डिव्होर्स देते लगेच. मानसी, प्लीज यार. आपण आता मस्त राईड करायला जातोय. मजा करणार आहोत. त्यात हा असा मूड घेऊन मजा करता येईल का? तू आता एक लक्षात ठेव. मी गोव्याहून निघायच्या आधी तिला सांगेन. In fact, आपण परवा एअरपोर्टवर जायला निघू ना, तेव्हा गाडीतून फोन करून सांगतो. पण तोवर प्लीज ट्रिप एन्जॉय कर. हे सारखं तिला सांग, तिला सांग नको.
मानसी- हम्म… ठीक आहे. हरकत नाही. आपण trip एन्जॉय करूया. Let’s go.
दोघेही बाईकवर बसून निघाले. मानसी त्याला बिलगून बसली होती. त्याच्या कानात हळूच बोलत होती. सौरभ प्रचंड खुश होता. दोघे अंजुनाच्या शेजारी असलेल्या एका shackमध्ये बसले. बीअर मागवून सिप करत समोर दिसत असलेला विस्तीर्ण समुद्र बघत आपल्या भविष्याची स्वप्नं रंगवत होते.
तेवढ्यात मानसीच्या फोनमध्ये अलर्ट आला. तिने पाहिलं तर काळ्याने तिला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती.
मानसी- संदीपची फ्रेंड रिक्वेस्ट. काय करू?
सौरभ- कोण संदीप?
मानसी- अरे बाबा, काळ्या. मी त्याला काळ्या म्हणू का? मी संदिपच म्हणते ना? काय करू सांग आता.
हे ऐकून सौरभ विचारात पडला. त्याने स्वतःचा फोन पाहिला. त्यालाही रिक्वेस्ट आली होती.
सौरभ- एक काम करूया. तू तुझ्या प्रोफाईलमधले आदित्यबरोबर असलेले सगळे फोटो हाईड कर आणि मी पण माझ्या प्रोफाईलवर असलेले अंकिताबरोबरचे सगळे जुने फोटो हाईड करतो. आपली प्रोफाईल लॉक्ड असली तरी आपण रिक्वेस्ट घेतल्यावर काळ्याला आपले सगळे फोटो दिसणार. आणि त्याला आपण नवरा-बायको नाही आहोत कळणार.
मानसी- हे करायलाच हवं का? मला अशी लपवाछपवी आवडत नाही. म्हणूनच म्हणते लग्न करूया की हे असले चाळे करावे लागणार नाहीत.
सौरभ- प्लीज यार, मानसी. तू खूप बिनधास्त आहेस. तुला फरक पडत नाही. कारण तुझा डिव्होर्स झालाय.
मानसी- नाही, डिव्होर्स झाला नसता आणि मी तुझ्याबरोबर रिलेशनमध्ये असते तर मी यातीनला सगळं लगेच सांगून टाकलं असतं.
सौरभ- बरं. पण सध्या मी सांगतो ते कर. नाहीतर माझी वाट लागेल.
मानसी- तुझी वाट लागेल, तुझी बायको चिडेल, तुझ्या मित्राला कळेल… सगळं तुला प्रोटेक्ट करायला सुरू आहे. आणि किती दिवस असा पळणार आहेस तू? त्यापेक्षा सांगून टाक अंकिताला आणि डिव्होर्स दे. आपण लग्न करू की हा लपवाछपवीचा स्ट्रेसच नको.
सौरभ हे ऐकत असताना आपले फेसबुकवरचे अंकिताबरोबर असलेले फोटो हाईड करत होता. तिचा कोणताही ट्रेस राहणार नाही ह्याची काळजी घेत होता. ते करताना म्हणाला-
सौरभ- प्लीज, मानसी… मी सांगतो ते कर. माझा दोन कोटींचा बिझनेस स्पॉइल व्हायला नको.
मानसीने देखील मनाविरुद्ध तिचे आणि आदित्यचे सगळे फोटो हाईड केले.
सौरभने काळ्याची रिक्वेस्ट घेतली. मानसीला पण घ्यायला लावली. मानसी जरा वैतागली होती. सौरभने तिला जवळ घेऊन तिची एक पापी घातली आणि दोघे परत बिअर पीत बीच बघू लागले.
इतक्यात मागून कोणीतरी सौरभच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला-
आवाज- तू इथे गोव्यात मैत्रिणीबरोबर मजा करतो आहेस हे वहिनींना सांगू का?
ते ऐकून सौरभने सर्रकन मागे वळून पाहिलं आणि त्या माणसाला पाहून सौरभ हादरला.
सौरभ – तू?
क्रमश:
सर्व भाग एकत्र- मृगजळ- सर्व भाग

[…] पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग १२ […]