……तेजस काहीतरी बोलणार इतक्यात त्याच्या हृदयात प्रचंड कळ आली आणि तो कोसळला. ते पाहून मुग्धा घाबरली. ती तेजसला हाक मारू लागली-मुग्धा- तेजस… तेजस… काय झालंय तुम्हाला? तेजस, उठा ना….
मुग्धाने तेजसच्या चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले. तेजस बेशुद्ध होता. मुग्धाने panic होऊन ॲम्ब्युलन्सला फोन लावला!
ॲम्ब्युलन्स आरोग्यनिधी हॉस्पिटलकडे निघाली होती. मुग्धा तेजसचा हात हातात धरून रडत त्याच्याकडे बघत होती. तिला कळत नव्हतं की तेजसच्या घरी कसं कळवायचं. तिने प्रसंगावधान राखून राधिकाला फोन केला. तिचा फोन आलेला बघून राधिकाला आश्चर्य वाटलं.
राधिका- हेलो….
मुग्धा- राधिका मॅम, मी मुग्धा बोलते आहे. मुग्धा साठे.
राधिका- काय काम आहे? मी बिझी आहे.
मुग्धा- मॅम, तेजस बेशुद्ध पडले आहेत. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेते आहे. तुम्ही प्लीज त्यांच्या घरी कळवाल का?
ते ऐकून राधिकाला धक्का बसला. त्याच वेळी तिला आर्याने सांगितलेलं सर्व आठवलं. मुग्धामुळे आर्या आणि तेजसचं जमत आलेलं नातं तुटलं होतं हे तिला आठवलं. अचानक राधिका म्हणाली-
राधिका- हेलो…. हेलो… मुग्धा, मला काही ऐकू येत नाहीये. इथे रेंज नाहीये बहुतेक…. हेलो, हेलो….
इतकं बोलून तिने फोन कट केला. ती विचार करू लागली. जर तेजस आर्याला नाही मिळाला तर मुग्धाला तरी का मिळावा? त्याचं काही बरं-वाईट झालं तर त्याचं खापर मुग्धावर फोडता येईल. राधिका खुश होती. तिने लगेच आर्याला फोन लावला.
आर्या- बोल मावशी.
राधिका- आर्या, बघ नशीब कसं असतं ते.
आर्या- काय झालं मावशी?
राधिका- मुग्धा तुझ्या आणि तेजसच्या मध्ये आली आणि आज तेजसच्या बिघडलेल्या तब्येतीला तीच जबाबदार आहे. तेजसला काही बरं-वाईट झालं तर आपण तिला त्यात trap करू.
हे ऐकून आर्याला शॉक बसला.
आर्या- मावशी, तू हे काय बोलते आहेस? काय झालंय तेजसला? कुठे आहे तो?
राधिका- तो बेशुद्ध आहे. मुग्धा त्याला आरोग्यनिधी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आहे. मला सांगत होती की दांडेकर सरांना कळव म्हणून. मी रेंज नाहीये असं नाटक करत फोन कट केला.
आर्या- मावशी, हे खूप वाईट आहे. तू असं करायला नको होतंस.
राधिका- अगं पण….
आर्या- मावशी, मी तुला माझे विचार सांगितले आहेत. मी स्वतःला तेजसवर फोर्स नाही करणार. असो. बाय.
आर्याने फोन कट केल्यावर राधिका विचार करू लागली की तिचं नक्की काय चुकलं आहे. इथे आर्याने दांडेकर काकूंना फोन करून लगेच आरोग्यनिधी हॉस्पिटलला पोहोचायला सांगितलं आणि आर्याही निघाली.
मुग्धाची ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेजसला घेतलेलं स्ट्रेचर वॉर्ड बॉय ढकलत नेऊ लागला. लिफ्टमध्ये मुग्धा स्ट्रेचरच्या शेजारी उभी होती. तेजस बेशुद्ध होता. लिफ्टमधून स्ट्रेचर कार्डियाक वॉर्डच्या मजल्यावर बाहेर काढून वॉर्ड बॉय ते पुढे नेऊ लागला. ड्युटीवरील डॉक्टर लगेच हजर झाले. त्यांनी तेजसची पल्स पाहिली. मग स्टेथोस्कोप लावून छातीचे ठोके ऐकले. मुग्धा डोळ्यात प्राण आणून त्यांना बघत होती. डॉक्टरांनी तिला बाहेर थांबायला सांगितलं.
मुग्धा- डॉक्टर, काय झालंय त्यांना? बरे आहेत ना ते?
डॉक्टर- आम्ही प्रयत्न करतोय. आमचे सर येऊन चेक करतील आणि मग आम्ही सांगतो तुम्हाला. तुम्ही प्लीज बाहेर थांबा.
मुग्धा नाईलाजाने बाहेर गेली. इतक्यात तिला समोरून येत असलेले डॉक्टर दिसले. तेच डॉक्टर ज्यांनी प्रशांतचं हार्ट डोनेट करायचा सल्ला देऊन तिच्याकडून कन्सेंट फॉर्म भरून घेतला होता. मुग्धाने त्यांना ओळखलं. मुग्धाच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू आलं. पण तिला पाहून डॉक्टर घाबरले. त्यांनी नजर चोरली. मुग्धा पुढे झाली. त्यांच्या समोर उभी राहून म्हणाली-
मुग्धा- डॉक्टर, मला ओळखलं का? मी मुग्धा. प्रशांत साठेंची बायको.
डॉक्टर- कोण प्रशांत साठे?
मुग्धा- डॉक्टर, असं काय करता. तुम्ही त्याचं हार्ट….
तिला जोरात बोलत असल्याचं लक्षात येऊन डॉक्टर घाबरले. आजूबाजूला बघून म्हणाले-
डॉक्टर- ओह, हा…. नमस्कार. ओळखलं मी. पण तुम्ही इथे कशा?
मुग्धा- माझे बॉस बेशुद्ध पडलेत. मी त्यांना घेऊन आले आहे. आत तुमचे ज्युनियर तुमची वाट बघत आहेत. प्लीज लवकर काहीतरी करा डॉक्टर.
डॉक्टर- ओके. बघतो मी.
त्या एसीतदेखील कपाळावर जमा झालेला घाम रुमालाने पुसत डॉक्टर एक्झामिनेशन रूममध्ये गेले. मुग्धा बाहेर वाट बघत होती. आत गेल्यावर डॉक्टरांनी ज्युनियरना विचारलं-
डॉक्टर- काय आहे कंडीशन?
ज्युनियर- सर, पल्स लागत नाहीये.
डॉक्टर- ओह… you mean…
ज्युनियर- येस सर. पण तुम्ही एकदा बघून कन्फर्म करावं म्हणून आम्ही रिलेटिव्हना अजून काही सांगितलं नाहीये.
डॉक्टरांनी तेजसला तपासलं. त्याची पल्स, हृदयाचे ठोके पाहिले. तेजस गेला होता!
डॉक्टर- ही डेथ बिफोर अॅडमिशन आहे. पोस्टमॉर्टेम करावं लागेल बॉडीचं. तुम्ही रिलेटिव्हना सांगा. आणि मला डिस्टर्ब करू नका. मी बिझी आहे.
असं म्हणून डॉक्टर दुसऱ्या दारातून हळूच निघून गेले. ज्युनियर डॉक्टर मुग्धाजवळ आले आणि म्हणाले-
ज्युनियर- मॅम, I am sorry. पण पेशंट इथे यायच्या आधीच….
हे ऐकून मुग्धा हादरली. म्हणाली-
मुग्धा- आधीच काय डॉक्टर?
ज्युनियर- This is a case of death before admission. Post mortem करावं लागेल बॉडीचं.
ते ऐकल्यावर प्रचंड हादरलेली मुग्धा अविश्वासाने एक्झामिनेशन रूममध्ये गेली आणि एकदा तेजसच्या बॉडीला बघून पायातले त्राण गेल्याने डोळे मिटून तिथल्या बाकावर थिजून बसली.
इथे दांडेकर काका आणि काकू हॉस्पिटलमध्ये आले. मागोमाग आर्याही आली. काकांनी रिसेप्शनवर भेटलेल्या ज्युनियर डॉक्टरला विचारलं की तेजस कुठे आहे.
ज्युनियर- सर… you are late. आम्ही सर्व प्रयत्न केले पण it was a massive cardiac arrest. Sorry….
हे ऐकून काका, काकू आणि आर्या हादरले.
काका- म्हणजे? What do you mean? हे… हे कसं शक्य आहे. तुमच्या मुख्य डॉक्टरना बोलवा.
ज्युनियर- सर, ते नाहीयेत.
काका- मग मी पोलिसांना बोलावतो. मग येतील ते? त्यांना सांगा, दांडेकरांनी बोलावलं आहे.
हे बोलताना दांडेकर काकांना अश्रू आवरत नव्हते. काकू पण त्या शॉकने सुन्न होऊन बसल्या होत्या. आर्या काकांना म्हणाली-
आर्या- काका, प्लीज तुम्ही शांत व्हा.
काका- आर्या, तू ह्यात पडू नको. तुला काही माहित नाहीये. तेजसला मी खूप प्रयत्न करून, मोठी किंमत मोजून जगवला आहे. मला सत्य माहित व्हायलाच हवं.
आर्या- कसलं सत्य काका?
काका- जे इथल्या मुख्य डॉक्टरने आमच्यापासून लपवलं होतं ते.
इतक्यात मुख्य डॉक्टर कॉरिडॉरमधून चालत येत असलेला काकांना दिसला. काका शांतपणे उभे राहिले आणि त्याला एकटक बघू लागले. डॉक्टर त्यांच्या जवळ आला.
काका- (त्याच्या डोळ्यात बघत) आम्हाला का फसवलं तुम्ही? तुम्ही मागितले तितके पैसे दिले होते ना मी?
डॉक्टर- मी नाही फसवलं सर तुम्हाला. पण प्रॉब्लेम काय आहे?
काका- आमची अट काय होती? तरुण आणि धडधाकट माणसाचं हार्ट पाहिजे. त्यासाठी आम्ही थांबलो होतो ना इतके महिने? मग?
डॉक्टर- सर, मी तरुण, निरोगी डोनरचं हार्टच दिलंय तुम्हाला. तो ॲक्सिडेंटमध्ये गेला होता. पण सर, नक्की झालंय काय? तुम्ही इथे का आला आहात?
काका- का आला आहात? आमचा मुलगा तुमच्या हॉस्पिटलमध्ये cardiac arrest ने गेला आहे. हे कसं शक्य आहे?
डॉक्टर- (अचानक प्रचंड घाबरून) तू… तुमचा मुलगा? कोण?
काका- तेजस दांडेकर….
डॉक्टर- त… तो… ते… तुमचा मुलगा आहेत?
काका- हो. आमचा तोच मुलगा ज्याला आम्ही तू दिलेलं हार्ट इंप्लांट केलं. पण तू आम्हाला फसवलंस. आम्हाला दिलेलं हार्ट एकतर तरुण माणसाचं नव्हतं किंवा निरोगी माणसाचं नव्हतं.
डॉक्टर- नाही सर. As I said, मी तरुण, निरोगी डोनरचं हार्टच दिलंय तुम्हाला. तो ॲक्सिडेंटमध्ये गेला होता.
काका- Then prove it. आता हे खोटं पुरे. मला एकतर डोनरची माहिती द्या ह्या क्षणी, नाहीतर उद्या सकाळी ह्या हॉस्पिटलला कायमचं कुलूप लागेल आणि मी तुम्हाला किमान दहा वर्षं आत पाठवेन.
डॉक्टर- पण सर….
काका- (कणखर आवाजात) डोनरची माहिती… प्लीज…
डॉक्टरला काकांच्या मागून येत असलेली मुग्धा दिसली. डॉक्टरच्या मणक्यावरून घामाचा एक थेंब ओघळत जात असल्याची त्याला जाणीव झाली. मुग्धा त्यांच्या जवळ पोहोचली. काका आणि काकूंना बघून तिला हुंदका आवरला नाही. त्या दोघांनी मुग्धाकडे तिरस्काराने बघितलं.
डॉक्टर- (काकांना) सर, ह्या तुमच्या डोनरच्या मिसेस आहेत. तू… तुम्ही ह्यांना विचारा, त्यांचे मिस्टर हेल्दी होते आणि ॲक्सिडेंटमध्ये गेले की नाही ते.
हे ऐकून काका, काकू, आर्या आणि मुग्धा प्रचंड शॉक झाले. त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. मुग्धाकडे बघत असलेल्या काका-काकूंच्या नजरेतल्या तिरस्काराची जागा अचानक कृतज्ञता, प्रेम ह्यांनी घेतली होती.
मुग्धा- डॉक्टर, म्हणजे…. म्हणजे प्रशांतचं हार्ट तेजसना लावलं आहे?
डॉक्टर- हो…
हे ऐकून मुग्धाच्या भोवती असलेली हॉस्पिटलची इमारत गोलगोल फिरत असल्याची तिला जाणीव झाली. कोणाला काही कळायच्या आत मुग्धा मूर्च्छित होऊन खाली कोसळली!
सकाळ झाली होती. मुग्धाने डोळे उघडले. खिडकीतून बाहेरचा उजेड दिसत होता. तिला कळत नव्हतं ती नक्की कुठे आहे. ती उठून बसली. तिचा ड्रेस जाऊन अंगावर हॉस्पिटलचा रुग्णाचा ड्रेस होता. तिला हळूहळू एक-एक घटना आठवू लागल्या. तेजस गेला आहे आणि त्याच्या बॉडीचं पोस्टमॉर्टेम आहे हे आठवलं. म्हणजे मध्ये सबंध रात्र गेली होती. मग तेजस आता कुठे आहे? आणि मी ॲडमिट का आहे? तिला काहीच कळत नव्हतं. ती तशीच निघून तिच्या रूमबाहेर आली. बाहेर दांडेकर काका आणि काकू बसले होते. त्यांच्या बाजूला आर्या होती. ती सावकाश चालत त्यांच्यापर्यंत पोहोचली. तिला पाहून दांडेकर काका शांतपणे उभे राहिले-
मुग्धा- काका….
त्यांनी काहीही न बोलता एका रूमकडे हात दाखवला. मुग्धा चालत त्या रूमकडे निघाली. मुग्धा रूमच्या दारापर्यंत आली. तिने थरथरत्या हाताने रूमच्या दाराची मूठ धरून दार ढकललं. आत एका बेडवर तेजसची बॉडी ठेवली होती. ते पाहून मुग्धाला रात्रीचा प्रसंग आठवला. तेजस तिच्यासमोर गेला होता आणि ती काहीच करू शकली नव्हती. ती चालत तेजसच्या बॉडीच्या शेजारी जाऊन उभी राहिली. तेजसचा चेहरा शांत होता. मुग्धाला मृत्यूच्या वेळी असलेला प्रशांतचा शांत चेहरा आठवला. तिला प्रचंड रडू फुटलं. ती तेजसच्या बॉडीवर पडून ओक्साबोक्शी रडत होती. मुग्धा म्हणाली-
मुग्धा- तेजस, मला वाटतं मीच वाईट आहे. माझ्यावर प्रेम करणारा प्रशांत गेला. आणि आता तुम्ही पण. तेजस, माझं तुमच्यावर प्रेम होतं. हो, मला तुमच्यात प्रशांत दिसायचा. मला माहित नाही नक्की कोणावर प्रेम केलं मी. तुमच्यात दिसणाऱ्या प्रशांतवर की प्रशांतचं अस्तित्व जाणवणाऱ्या तुमच्यावर. पण माझं प्रेम खरं होतं, तेजस. पण मी खरंच अपशकुनी आहे. प्रशांत आणि तुम्हाला दोघांना घालवून बसले मी. तेजस, आय लव्ह यू…. तुम्ही नका जाऊ तेजस. प्लीज….
मुग्धा रडत होती आणि अचानक तेजसचा हात तिच्या पाठीवर पडल्याचं जाणवून तिच्या मणक्यातून वीज गेल्यासारखं तिला वाटलं. अविश्वासाने ती उठू लागली, पण तेजसच्या घट्ट पकडीत ती अडकली होती. मुग्धा प्रचंड घाबरली. तिने घाबरत तेजसच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तेजस हसत होता. मुग्धाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
मुग्धा- त… तेजस….
तेजस- हाय मुग्धा….
मुग्धा- त… तेजस, तुम्ही जिवंत आहात?
तेजस- हो….
मुग्धा- प… पण….
तेजस- सांगतो सगळं. पण आधी तू काय म्हणालीस आत्ता ते परत म्हण.
मुग्धा- काय?
तेजस- ते काय आय लव्ह यू वगैरे…
मुग्धा- तेजस, आय लव्ह यू….
हे ऐकून तेजसने तिच्यावर असलेली आपली मिठी घट्ट केली. तिला आपल्या अंगावर घेतली. मुग्धाने प्रचंड आवेगाने आपले ओठ त्याच्या ओठांवर ठेवले. तिच्या मनातील आनंद तिच्या स्पर्शातून तेजसला जाणवत होता. दोघं पाच मिनिटं प्रेमाच्या सागरात डुंबत होते. सगळं टेन्शन, सगळा स्ट्रेस निघून गेला होता.
तेवढ्यात रूमचं दार उघडून आर्या आत आली. त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहून म्हणाली-
आर्या- हेलो, हे हॉस्पिटल आहे. हॉटेल नाही.
ते ऐकून मुग्धा दचकून बाजूला झाली. आर्या हसून म्हणाली-
आर्या- तेजस, काका आणि काकू वाट बघत आहेत. आपल्याला घरी जायचं आहे. तुमचे गुरुजी इथे येणार आहेत.
आर्या बाहेर गेली. मुग्धा तेजसला म्हणाली-
मुग्धा- पण तेजस, हे कसं काय? डॉक्टर तर म्हणाले होते की….
तेजस- हो मुग्धा. डॉक्टर बरोबरच म्हणाले होते. मी मेलो होतो. पण…..
तेजसने सांगायला सुरुवात केली. मुग्धाला ते चित्र समोर दिसू लागलं.
क्रमश:
© मंदार जोग
पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग ३४- शेवटचा भाग)
सर्व भाग एकत्र- गुंतता हृदय – सर्व भाग

[…] पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग ३३) […]