मृगजळ भाग १३
इतक्यात मागून कोणीतरी सौरभच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला—
आवाज — तू इथे गोव्यात मैत्रिणीबरोबर मजा करतो आहेस, हे वहिनींना सांगू का?
ते ऐकून सौरभने सर्रकन मागे वळून पाहिलं आणि त्या माणसाला पाहून सौरभ हादरला.
सौरभ — तू?
माणूस — हो, मी… कसा आहेस?
तो गजू होता. सौरभच्या बिल्डिंगमध्ये पूर्वी राहणारा त्याचा जुना शेजारी. अनेक वर्षांपूर्वी तो कुठेतरी नालासोपारा वगैरे ठिकाणी गेला होता. सौरभ त्याला आता विसरूनही गेला होता. तो अनपेक्षितपणे आज त्याच्यासमोर आला होता.
गजू — बघतो काय? बोल ना. कसा आहेस तू?
सौरभ — मी… मी मजेत. तू इथे कसा?
गजू — मी आमच्या बिल्डिंगच्या पोरांबरोबर आलोय रे, धमाल करायला. (मानसीकडे बघत) आणि तू?
सौरभ — मी पण कामासाठी आलोय. ही माझी कलीग…
मानसी — हाय…
गजू — हाय… कलीग आहे काय? मला वाटलं की काही सेटिंग-बिटिंग आहे.
आपल्याच पांचट जोकवर गजू हसला.
गजू — छान आहे हा कलीग. करा काम, करा. आणि अंकिता वहिनी कशा आहेत?
सौरभ — ती मजेत आहे.
गजू — त्यांना माहीत आहे ना तू इथे गोव्यात आहेस ते?
सौरभ — हो. तुला बोलायचं आहे का तिच्याशी? मी हवं तर आताच फोन लावून देतो. सांग तिला, तू मला इथे गोव्यात भेटला आहेस ते.
हे ऐकून गजूच्या डोळ्यातली “कसा पकडला तुला” अशी जी चमक होती, ती नाहीशी झाली.
गजू — नाही रे… मी… मी नंतर बोलेन कधीतरी… आता तू एन्जॉय कर आणि आम्ही पण एन्जॉय करतो. बाय… (आशाळभूतपणे मानसीकडे बघत) बाय…
गजू गेला आणि सौरभचा १५० पर्यंत गेलेला पल्स रेट खाली आला. त्याने एक सिगारेट पेटवली. त्याची ही घालमेल मानसी बघत होती. तो जरा शांत झाल्यावर मानसी म्हणाली—
मानसी — दहा वेळा खोटं बोलून निर्माण होणारा स्ट्रेस एक खरं कायमचं संपवून टाकतं. फक्त ते खरं बोलायला हिंमत जमा करावी लागते.
सौरभने तिच्याकडे रागाने पाहिलं. मानसी त्याच्या डोळ्यात बघत होती. सौरभने नजर चोरली आणि तोही समुद्राकडे बघू लागला.
त्या दिवशी संध्याकाळी सौरभ आणि काळ्या त्यांचा म्युच्युअल फंडचा व्यवहार करत बसले होते. मानसी रोझीबरोबर होती. रोझी तिला काळ्या आणि तिच्या आजवरच्या प्रवासाबद्दल सांगत होती. मानसी ऐकत होती. त्या दोघांचा एकत्र संसार, एकमेकांवर असलेलं प्रेम, विश्वास तिच्या तोंडून ऐकताना मानसीला बरं वाटत होतं. मनात कुठेतरी आपलाही असाच संसार असावा, असं वाटत होतं. तिला विचारात पडलेली पाहून रोझी तिला म्हणाली—
रोझी — मानसी, एक विचारू का?
मानसी — हो, विचार ना.
रोझी — तुझं आणि सौरभचं सगळं ओके आहे ना?
मानसी — हो. का?
रोझी — सहज ग… तू मला आल्यापासून थोडी विचारात असलेली, थोडी डिस्टर्ब असलेली वाटलीस म्हणून विचारलं की काही भांडण वगैरे झालं आहे का म्हणून.
मानसी — छे… तसं काही नाही. मला सवय आहे अशी विचार करायची. मधेच मी लॉस्ट होते.
रोझी — मग ठीक आहे. चल, तयार हो. आपल्याला काराओके बारमध्ये जायचं आहे.
त्या रात्री चौघे एका काराओके बारमध्ये गेले. तिथे तीन ड्रिंक डाऊन झाल्यावर सौरभने मानसीसाठी जाब कोई बात बिगड जाये हे गाणं गायलं. सौरभ खुश होता. काळ्याने खरंच दोन कोटी इन्व्हेस्ट केले होते. त्यामुळे सौरभचं वार्षिक दोन ते अडीच लाख रुपयांचं फिक्स्ड इन्कम सुरू होणार होतं, जे उत्तरोत्तर वाढत जाणार होतं. तो मानसीकडे बघत गाणं गात होता. सगळेच खुश होते.
गोव्यात दोन दिवस कसे गेले, त्यांनाही कळलं नाही. उद्या सकाळची फ्लाईट होती. मानसी, सौरभ, काळ्या आणि रोझी रिसॉर्टमध्ये बोलत होते. रात्रीचे दोन वाजले असावेत.
काळ्या — (थोडा नशेत) ए सौरभ, तू यार, ऑल द वे इकडे आलास माझ्यासाठी… तू खरा मित्र आहेस यार… आणि मानसी, तुला तर हॅट्स ऑफ आहे यार… तू पण ह्याच्या बरोबर आलीस म्हणून… कसं वाटलं गरीबचं रिसॉर्ट?
मानसी — गरीब काय म्हणता? एवढं मोठं, छान रिसॉर्ट आहे आणि रोझीसारखी छान बायको आहे. तुम्ही तर जगातले सर्वात श्रीमंत आहात.
काळ्या — ए सौरभ, तुझी बायको एकदम भारी बोलते यार… आता तुम्ही एक लक्षात ठेवायचं. वर्षातून चार-पाच वेळा इथे गोव्याला यायचं आणि इथेच माझ्या रिसॉर्टमध्ये राहायचं. हे तुमचं गोव्यातलं घर आहे समजा.
सौरभ — थँक्स यार काळ्या… तू मला इतका मोठा बिझनेस दिलास म्युच्युअल फंडचा. आम्हाला इथे एक पैसा खर्च करू दिला नाहीस. पण मी अजिबात येणार नाहीये गोव्याला. आणि आलो तरी इथे राहणार नाही.
काळ्या — का? काही कमी पडलं का इथे?
सौरभ — हो. भाडं. तू रिसॉर्टचं भाडं घेत नाहीयेस, मी हजारदा सांगूनही. अरे यार, तो तुझा बिझनेस आहे. रेंट घे ना.
काळ्या — तू माझा पाहुणा आहेस. घरी पाहुणे आले तर तू रेंट घेतोस का त्यांच्याकडून?
सौरभ — म्हणूनच मी परत इथे राहायला येणार नाहीये.
काळ्या — ठीक आहे. तू पुढच्या वेळी ये. मी रेंट घेईन. पण किती घ्यायचा हे मी ठरवणार, ओके?
सौरभ — ओके.
रोझी — तुम्ही झोपा आता. उद्या सकाळी लवकर फ्लाईट आहे ना तुमची? गुड नाईट.
मानसी — गुड नाईट.
मानसी आणि सौरभ रूममध्ये आले.
मानसी — सौरभ, तू अंकिताला आपल्याबद्दल सांगणार होतास. ते राहून गेलं.
सौरभ — हो… कामाच्या गडबडीत राहून गेलं.
मानसी — काम एक तास होतं सौरभ. बाकी वेळ आपण मजा करत होतो. तू सहज फोन करून सांगू शकत होतास.
सौरभ — हो? म्हणजे आपण फिरत असताना? किंवा काळ्या आणि रोझीबरोबर गप्पा मारत असताना? किंवा मी तुझ्यासाठी गाणं म्हणत असताना मधेच “टाइम प्लीज” म्हणायचं आणि अंकिताला फोन करून सांगायचं की मी डिव्होर्स देणार आहे? मग ती फोनवर माझी मारणार. ते ऐकून परत येऊन हसत गप्पांमध्ये सामील व्हायचं, असंच ना?
मानसी — हो, असंच. ती तुझी मारेल ह्या भीतीने तू माझ्या आयुष्याची का मारतो आहेस?
तिची ही भाषा ऐकून सौरभला आश्चर्य वाटलं.
सौरभ — हे… हे तू बोलते आहेस?
मानसी — हो. तुला हीच भाषा कळेल म्हणून.
सौरभ — मानसी, प्लीज यार. इतकी मस्त ट्रिप झाली आहे. मला बिझनेस मिळाला आहे. आपण खूप मजा केली आहे. ती आता भांडून स्पॉइल करू नकोस.
मानसी — ट्रिप तुझी मस्त झाली आहे, सौरभ. तुला बिझनेस मिळाला, तुला माझ्याबरोबर मजा करायला मिळाली, तुला एक चांगला ब्रेक झाला. माझं काय? मला फक्त एक खोटं प्रॉमिस मिळालं तुझ्याकडून, जे तू नेहमीप्रमाणे पूर्ण केलं नाहीस.
सौरभ — कारण ते शक्य झालं नाही.
मानसी — अजिबात तसं नाहीये. ते पूर्ण करण्याची इच्छा आणि हिंमत तुला झाली नाही, हे खरं कारण आहे.
सौरभ — बरं, मग काय? आता तू माझा मर्डर करणार का? घे हा चाकू, घे आणि घुसव माझ्या पोटात.
सौरभने तिथेच असलेली बटर नाइफ उचलून तिच्या समोर धरली.
मानसी — त्यापेक्षा मीच माझा जीव देते, की सगळा त्रास संपेल.
सौरभ — (ओरडून) बास मानसी, बास… कान किटला आहे मला तुझ्या ह्या कटकटीचा. सांगतो मी. उद्या अंकिताला सगळं सांगतो. उद्या आपण मुंबईत उतरलो ना की मी तुझ्या समोर फोन करतो आणि अंकिताला आपल्याबद्दल सांगतो.
असं म्हणून सौरभ चिडून बेडवर पडला. मानसी शांतपणे काचेतून बाहेर बघत होती. तिला थोडं गिल्टी वाटू लागलं. ती हळूच दिवा बंद करून सौरभच्या कुशीत शिरली.
सौरभ — आता का जवळ येतेस? त्रास देऊन झाला ना?
मानसी — हे बघ, भांडणाच्या वेळी भांडण आणि प्रेमाच्या वेळी प्रेम. मी दोन्ही मिक्स नाही करत. आता ही वेळ प्रेमाची आहे.
असं म्हणून तिने सौरभला मिठी मारली. सौरभला मात्र त्याने सत्य सांगितल्यावर चिडलेल्या अंकिताचा चेहरा डोळ्यासमोर येत होता… उद्याची सकाळ त्याच्या आयुष्याला नवीन वळण देणार होती.
क्रमशः
पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग १४
मृगजळ सर्व भाग एकत्र- मृगजळ- सर्व भाग
मृगजळ पहिल्या भागाची लिंक. तिथून सलग सगळे भाग वाचा. मृगजळ …भाग १

[…] पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग १३ […]