मुग्धा काही वेळ बेडवर तशीच बसून होती. मग उठून तिने बाथरूममध्ये चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले. ती बाहेर येऊन बघते तर अमेयच्या अंगावर पांघरूण घातलेलं होतं. ती बाथरूममध्ये जाताना नसलेलं पांघरूण अमेयच्या अंगावर कोणी घातलं, ह्या विचाराने तिच्या अंगावर काटा आला. त्याच वेळी बेडरूमच्या खिडकीबाहेर एक पांढरी आकृती उडून जात होती! हे सर्व थोडं विचित्र वाटलं तरीही मुग्धाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती परत झोपली.
पहाटे दांडेकर काका आणि काकू रेसकोर्सवर वॉकला गेले होते. रोजचा वॉक झाल्यावर दोघे क्लबच्या कॅफेटेरियामध्ये येऊन बसले. वेटरने ठरलेला मेन्यू आणून ठेवला. काकांसाठी ब्लॅक कॉफी ओतत असताना काकू म्हणाल्या-
काकू- एक बोलू का?
काका- बोल की. विचारतेस का?
काकू- नाही, मला तेजस, आर्या आणि मुग्धाबद्दल बोलायचं आहे.
काका- तेजस आणि आर्या ठीक आहे. पण मुग्धाचा काय संबंध आता? आता ती आपल्या कंपनीत काम करत नाही.
काकू- मी कामाबद्दल बोलत नाहीये.
काका- कामाव्यतिरिक्त तिचा आपल्याशी संबंध नाहीये.
काकू- मी तसं कुठे म्हणते आहे?
काका- मग काय बोलायचं आहे तुला?
काकू- आर्या आणि तेजसचं लग्न ठरवण्यात आपण घाई नाही ना केली? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मुग्धावर आपल्याकडून काही अन्याय नाही ना झालेला?
काका- मला नाही वाटत. आर्या तेजसला साजेशी मुलगी आहे आणि मुग्धाला मी नॉर्मलपेक्षा जास्त कॉम्पेन्सेशन देऊन टर्मिनेट केलं आहे.
काकू- तुम्ही नात्यात पण धंदा बघणार का?
काका- धंद्यात नाती जोडणाऱ्या लोकांच्या बाबतीत तेच करावं लागतं. हा विषय इथेच संपला तर बरं होईल.
काकूंनी शांतपणे आपल्या कॉफीचा सिप घेतला. काका हातातील टोस्टचा एक बाईट घेऊन दूरवर बघत विचार करू लागले.
मुग्धाने सकाळी अमेयला शाळेच्या बसमध्ये बसवून दिलं आहे. आज त्याची स्पोर्ट्स प्रॅक्टिस असल्याने मुग्धा त्याला शाळेतून पिकप करणार आहे. मुग्धा मैत्रिणीच्या घरात आता पुढे काय करायचं, ह्या विचारात बसलेली आहे.
मैत्रीण- काय गं, आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू?
मुग्धा- माहित नाही खरंच. हे असं काही माझ्या आयुष्यात होईल हेच मला अपेक्षित नव्हतं.
मैत्रीण- काय, प्रेम?
मुग्धा- कसलं प्रेम?
मैत्रीण- तेजसबद्दल तुला जे वाटतं ते?
मुग्धा- ते प्रेम नव्हतं.
मैत्रीण- मग काय होतं मुग्धा? फक्त सेक्श्युअल आकर्षण?
मुग्धा- नाही. ते पण नव्हतं.
मैत्रीण- मला वाटतं की दोन्ही होतं. प्रॉब्लेम हा आहे की तू कन्फ्युज्ड होतीस आणि आहेस. तुला प्रशांतला विसरता येत नाहीये. तेजसला विसरायचं नाहीये. प्रशांत तुझा भूतकाळ होता हे स्वीकारायचं नाहीये आणि तेजस तुझा भविष्यकाळ बनू शकतो, तर ते होऊ द्यायचं नाहीये.
मुग्धा- माझ्या वाटण्याने काय फरक पडला असता? तूच सांग. तेजसला जे हवं होतं ते त्यांनी केलं ना? मला एका शब्दाने तरी विचारलं का?
मैत्रीण- तू त्याला एका शब्दाने विचारलंस का की जे काही झालं ते त्यानेच केलं आहे का? आणि केलं असेल तर का केलं आहे?
मुग्धा- काय गरज आहे विचारायची? मला दिलेल्या त्या चेकवर तेजसची सही होती. अजून काय विचारायचं मी? त्यांनी सही करताना मला विचारलं किंवा सांगितलं का?
मैत्रीण- मुग्धा, तेजस तुझ्या कंपनीचा एमडी आहे. जॉइंट सिग्नेटरी असू शकतो. त्याने सही केलेले अनेक चेक असू शकतात. तुला तो चेक दिला आहे हे त्याला कदाचित माहीतही नसेल.
मुग्धा- तू त्यांची इतकी का बाजू घेते आहेस? मी ते सर्व विसरले आहे. मला आता माझं आयुष्य पुढे कसं जगायचं, ह्याची चिंता आहे.
मैत्रीण- ती असती ना, तर तू वेड्यासारखा भावनेच्या भरात तो चेक फाडून टाकला नसतास.
मुग्धा- मी पूर्ण विचार करून चेक फाडला आहे. मला नको त्यांचे उपकार. मी काय रस्त्यावर पडलेली आहे का? की दिले पैसे आणि संपवलं नातं.
मैत्रीण- म्हणजे नातं होतं हे तरी मान्य आहे तुला.
मुग्धा- मी ते कधीच नाकारलं नाहीये. पण ते मैत्रीचं नातं होतं. तू म्हणते आहेस तसं काहीच नाही.
मैत्रीण- नाही ना? मग काय प्रॉब्लेम आहे? जा तुझ्या घरी बिनधास्त. तेजसला ब्लॉक नको करू. त्याने फोन केला तर सरळ सांगून टाक की ह्यापुढे बोलायला येऊ नको म्हणून. हे अटेन्शन सीकिंग कशाला?
मुग्धा- मी काय अटेन्शन सीकिंग केलं?
मैत्रीण- हेच त्याला ब्लॉक करणं, घर सोडून माझ्याकडे येऊन राहणं. जेणेकरून तो तुला शोधू शकणार नाही, कॉन्टॅक्ट करू शकणार नाही, काळजीत पडेल, तुला शोधायला लागेल, त्याला त्रास होईल आणि मग तू एकदम स्टायलिश एन्ट्री मारून त्याला तो किती नालायक आहे हे सांगून जिंकल्याचा आनंद मिळवणार. ते होईपर्यंत सतत त्याचं लक्ष तुझ्याकडे लागून राहणार. बरोबर ना?
मुग्धा- सरळ सांग ना की तुला माझ्या इथे राहण्याचा त्रास होतोय म्हणून. मी जाते निघून आजच्या आज.
मैत्रीण- ए नौटंकी, माझ्याशी लाडात यायचं नाही बरं का? ते सगळं तेजसकडे करायचं. आता मस्त ब्रेकफास्ट करूया आणि मग सिनेमाला जाऊया. प्रशांत गेल्यापासून आपण कुठेही गेलो नाही आहोत.
मुग्धा- सिनेमा? माझा खरंच मूड नाहीये.
मैत्रीण- हृतिकचा सिनेमा आहे. एकदा स्क्रीनवर दिसला ना की मग बघ काय काय करायचा मूड होतो ते. चल आता नाटकं पुरे.
तेजसच्या रूममध्ये तेजस बेंचवर बसलेला आहे. आर्या ओठात सिगारेट धरून तिच्यासमोर असलेल्या दगडाकडे बघत उभी आहे. विचार करते आहे. तेजसकडे बघते आहे. ती छिन्नीने दगडात कोरायला सुरुवात करते. तेजसचं लक्ष नाहीये. तो त्याच्याच विचारात आहे. आर्याच्या ते काही वेळात लक्षात आलं. ती काम थांबवून, सिगारेट विझवून त्याच्या जवळ आली. तेजस त्याच्याच तंद्रीत होता. आर्याने मागून जाऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कानात म्हणाली-
आर्या- काय झालं? लक्ष कुठाय?
तेजस- काही नाही. तू कर काम.
आर्या- तेजस, हे काम नाहीये. तुझं स्कल्प्चर करणं हे माझं स्वप्न आहे. आणि स्वप्न पूर्ण व्हायला ते जगावं लागतं. ह्या माझ्या स्वप्नात आपण दोघे आहोत. तेव्हा मी एकटीने ते जगून उपयोग नाही. तू पण त्यात तितकाच इन्व्हॉल्व्ह हवास. तुझ्या ह्याच इन्व्हॉल्व्हमेंटसाठी मी साखरपुडा आणि लग्नाचा निर्णय पुढे ढकलला.
तेजस- हम्म…
आर्या- ठीक आहे. एक काम करूया.
तेजस- काय?
आर्या- आपण दोघे मस्तपैकी एक सिनेमा बघू. मग लंच करू आणि मग परत आल्यावर स्कल्प्चर बनवायला घेऊ. काम किती झालं, पेक्षा कसं झालं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.
तेजस- नको. मला मूड नाहीये. मी लक्ष देतो तुझ्याकडे. तू कर सुरू.
आर्या- नक्की? Are you comfortable?
तेजस- येस.
आर्या- ओके. एकदम रिलॅक्स रहा, ओके?
तेजस- हम्म…
आर्या परत तिच्या टेबलजवळ आली. एक सिगारेट शिलगावून छिन्नीने काम करू लागली.
मुग्धा आणि तिची मैत्रीण सिनेमाला निघायच्या घाईत होत्या.
मुग्धा- सिनेमा नंतर आपण अमेयला पिकप करूया.
मैत्रीण- अगं नाही. नंतर माझी किटी आहे. तू त्याला पिकप कर आणि घरी ये. मी एक चावी तुला देऊन ठेवते.
मुग्धा- बरं. घरी आल्यावर मला पण काम आहे.
मैत्रीण- काय काम? बाई सगळं करून गेल्या आहेत.
मुग्धा- अगं बाई, काम शोधणं हे पण काम असतं. आजपासून परत माझा सीव्ही अपलोड करून नोकरी शोधायला सुरुवात करते.
मैत्रीण- बरं, ते सगळं नंतर. आता चांगली हसत पिक्चरला चल. आणि जर रडका ट्रॅक सुरू केलास तर माझ्याशी गाठ आहे.
मुग्धा- नाही बाई. माझं दुःख माझ्याकडे, ओके?
मैत्रीण- बघ, हीच सुरुवात असते.
मुग्धा- बरं सोड. निघूया का? हृतिक वाट बघत असेल, दोन हॉट बायका कधी एकदा येऊन समोर बसतात ह्याची.
मैत्रीण- आता कसं बोललीस.
दोघी हसत घरातून निघाल्या. थिएटरमध्ये मधला वार असल्याने फार गर्दी नव्हती. मुग्धाला त्या मल्टीप्लेक्समध्ये प्रशांतबरोबर बघितलेला शेवटचा सिनेमा आठवला. त्या सिनेमात एका प्रणय दृश्यात नायिकेने जो झुळझुळीत गाऊन घातला होता, सेम तसाच गाऊन प्रशांत दुसऱ्या दिवशी मुग्धासाठी घेऊन आला होता. आणि मग…. मुग्धा शहारली. इतक्यात मैत्रीण तिकीट आणि पॉपकॉर्न घेऊन आली.
मुग्धा- (पर्स उघडून) किती देऊ मी?
मैत्रीण- काय देतेस?
मुग्धा- अगं पैसे.
मैत्रीण- ओह. तू घराचं भाडं देशील ना तेव्हा त्याच्याबरोबरच दे.
मुग्धा- (गोंधळून) घराचं भाडं?
मैत्रीण- हो. सिनेमाच्या तिकिटाचे पैसे घेतले तर तुला माझ्या घरात राहू देते आहे, त्याचं भाडं नको का घ्यायला?
मुग्धाला हसू आलं. दोघी आत गेल्या. समोर पडद्यावर आगामी चित्रपटांचे ट्रेलर सुरू होते. आतल्या अंधारात असलेल्या गारव्याने मुग्धाच्या अंगावर काटा आला. ती हाताची घडी घालून बसली. मध्येच मैत्रिणीने मधोमध ठेवलेले पॉपकॉर्न ती खात होती. काही वेळात सिनेमा सुरू झाला. दोघी त्यात हरवून गेल्या. पडद्यावर दिसणाऱ्या पिळदार शरीराच्या हृतिक रोशनने नायिकेला मिठीत घेतल्यावर थिएटरमध्ये बसलेल्या बहुतांश बायकांची थंडी पळून गेली होती. असाच एक रोमँटिक सीन सुरू होता. मुग्धाला पडद्यावर हृतिकच्या जागी प्रशांत आणि नायिकेच्या जागी ती स्वतः दिसत होती. नायक-नायिकेची इंटिमसी वाढल्यावर तिला प्रशांतऐवजी तिथे तेजस दिसू लागला. मुग्धा त्यात पुरती हरवून गेली होती. तो सीन संपल्यावर तिला आपल्या शेजारी कोणीतरी बसलं आहे, तो पुरुष आहे आणि आपला दंड त्याला टेकला आहे, ह्याची जाणीव झाली. ती सावरून बसली आणि तिथे सहज वळून बघितलं तर तिच्या शेजारी तेजस बसला होता. त्याला शेजारी बघून मुग्धा शॉक झाली. तिचं सिनेमामधून लक्ष उडालं. काय करायचं हे न कळल्याने ती उठणार इतक्यात तेजसने त्याच्या हाताची घट्ट पकड तिच्या हातावर धरली. मुग्धा उठू शकत नव्हती. तेजस तिचा हात न सोडता तसाच बसून होता. त्याच्या बाजूला बसलेल्या आर्याला किंवा मुग्धाच्या मैत्रिणीला ह्याचा पत्ताच नव्हता. मध्यंतर होईपर्यंत मुग्धा आणि तेजस तसेच बसून होते. हाताच्या स्पर्शातून तेजस खूप काही सांगत होता. मुग्धा असंख्य प्रश्न विचारत होती. सिनेमात रोमान्स आणि अॅक्शन असून मुग्धाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. इतक्यात मध्यंतर झाला. थिएटरमध्ये दिवे लागले. मैत्रिणीने मुग्धाकडे हसून बघितलं तर मुग्धाचे डोळे रडून लाल झाले होते.
मैत्रीण- काय गं, काय झालं मुग्धा?
मुग्धा काहीच बोलली नाही. तिने वळून पाहिलं तर तेजस शेजारी नव्हता. आर्या तिच्याकडे शॉक होऊन बघत होती.
मैत्रीण- काय झालं मुग्धा? बरं वाटत नाहीये का?
मुग्धा- हो. जरा डोकं दुखतंय. मला वाटतं मी घरी जाते. तू ये नंतर.
मैत्रीण- अगं मी पण येते.
मुग्धा- नको. तू बघ सिनेमा. मी जाते. अमेयला घेऊन घरी जाते.
इतकं बोलून मुग्धा निघून गेली. मैत्रिणीला लक्षातच आलं नाही की नक्की काय झालं आहे. मुग्धा गेल्यावर आर्यापण तिच्या मागे गेली. मुग्धा थिएटरमधून बाहेर पडली. रिक्षा करून तिने अमेयच्या शाळेचा पत्ता सांगितला. मुग्धाला त्या वातावरणापासून लांब जायचं होतं. तिने रिक्षावाल्याला रिक्षा जोरात चालवायला सांगितली. मग तेजसने धरलेल्या तिच्या मनगटाकडे तिची नजर गेली. ते लाल झालं होतं. त्याने मागे एकदा किस घेतल्यावर तिचे ओठ जसे लाल झाले होते, तसंच. मुग्धाने डोळे मिटून घेतले. रिक्षा शाळेजवळ थांबली. मुग्धा पैसे देऊन उतरली. शाळेच्या गेटजवळ तेजस उभा होता. तिच्याकडे बघत होता. मुग्धाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती पुढे निघाली. तेजसने हाताने तिचा रस्ता अडवला.
मुग्धा- प्लीज मला जाऊ द्या.
तेजस- नाही. माझ्याशी बोलल्याशिवाय नाही जाऊ देणार मी.
मुग्धा- मला बोलायची इच्छा नाहीये.
तेजस- पण मला सांगायची इच्छा आहे.
मुग्धा- आता सांगण्या-ऐकण्यापलीकडे गेलेले आहे मी. प्लीज मला जाऊ दे. परत कधीच मला भेटू नका.
तेजस- मुग्धा, प्लीज ऐकून तर घे. काहीही माहित नसताना तू एकतर्फी निर्णय घेते आहेस. माझा नंबर ब्लॉक केला आहेस. घराला पण कुलूप आहे. कुठे आहेस तू?
मुग्धा- तुम्हाला काय करायचंय? मी मेले समजा आणि मजेत जगा आणि मला जगू द्या.
तेजस- मुग्धा, प्लीज माझं ऐकून तर घे.
मुग्धा- तेजस, अमेयची शाळा सुटेल. मला त्याला पिकप करायचा आहे. प्लीज मला जाऊ दे.
तेजस- मी थांबतो.
मुग्धा- गरज नाहीये. आणि प्लीज ह्यापुढे मला भेटू नका. तुम्हाला माझी शपथ आहे. प्लीज.
हे ऐकून तेजसने त्याचा हात बाजूला घेतला. मुग्धा तिरमिरीत गेटमधून आत गेली. तेजस गाडी सुरू करून निघून गेला.
त्या रात्री मुग्धाने अमेयला झोपवला. पुस्तक वाचायचा प्रयत्न केला, पण मन लागत नव्हतं. तिने मोबाईलवर गाणी ऐकायला सुरुवात केली. गाणी ऐकता ऐकता तिला झोप लागली. स्वप्नात तिला तेजसबरोबरचा तिचा सर्व प्रवास तिला दिसत होता. अगदी आज त्याला शपथ घालून ती निघून गेली तेव्हापर्यंतचा. मुग्धा दचकून जागी झाली. तिची झोप आता उडाली होती. ती उठून बसली. साडेबारा वाजले होते. बाहेरून येणाऱ्या हसण्या-खिदळण्याच्या आवाजाने तिचं लक्ष वेधलं. तिने हळूच बेडरूमचं दार उघडलं. ती लिव्हिंग रूममध्ये आली. तिथे अंधार होता. समोर असलेल्या मैत्रिणीच्या बेडरूममध्ये दिवा सुरू होता, हे बेडरूमच्या दाराच्या खालून दिसत असलेल्या प्रकाशावरून तिच्या लक्षात आलं. आवाज तिथूनच येत होता. मुग्धा बेडरूमजवळ चालत गेली. आवाज आतूनच येत होता. आता हसण्या-खिदळण्याची जागा सुस्कारे, नको ना, ह्यांनी घेतली होती. मुग्धा नकळत बाहेर उभी राहून ते ऐकू लागली. मग काही वेळात खोलीतून प्रणयाचे स्वर आणि शब्द ऐकू येऊ लागले. मुग्धा तिथेच थिजली होती. इतक्यात तिला तिच्या अंगावरून प्रशांतचा हात फिरतो आहे असा भास झाला. त्याचा उष्ण श्वास तिला तिच्या कानाशी जाणवला. त्याच्या ओठांचा ओलावा तिच्या मानेवर विसावला. मुग्धाने डोळे मिटून घेतले. डोळे मिटल्यावर मात्र तिला डोळ्यासमोर तेजस दिसू लागला. तिने क्षणार्धात डोळे उघडले. ती धावत बाथरूममध्ये गेली. थंड पाण्याच्या शॉवरखाली बसून रडू लागली. थंड पाण्याने तिच्या अंगावर काटा आला. इतक्यात शॉवरमधून गरम पाणी येऊ लागलं. आपण गिझर न लावताही पाणी गरम कसं झालं, ह्या विचारात मुग्धा होती आणि अचानक तिला प्रशांतने मिठीत घेतल्याची जाणीव झाली. तो नेहमी शॉवरमध्ये असताना तिला मिठीत घ्यायचा, तशीच मिठी. मुग्धाने डोळे मिटून घेतले. मुग्धा प्रशांतच्या स्पर्शात न्हाऊन निघत होती. बाथरूमच्या आरशावर जमलेली वाफ संपूर्ण बाथरूममध्ये पसरली होती. तेजसला त्याच वेळी तो आणि मुग्धा शॉवरमध्ये एकत्र असल्याचं स्वप्न पडत होतं.
क्रमश:
© मंदार जोग
सर्व भाग एकत्र – गुंतता हृदय – सर्व भाग
पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग २९)

[…] पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग २८) […]
लिंक ओपन केली, 30 च्या पुढचे भाग नाहीत
No. There is link at the end of episode 28 for epi 29 and at the end of 29 for epi 30. Please check.
Part no. 29 n 30 _ guntata hriday he is missing
No. There is link at the end of episode 28 for epi 29 and at the end of 29 for epi 30. Please check.