अस म्हणतात की जो बायकोचं ऐकतो तो सुखी असतो. असही म्हणतात की बायको कधी चुकत नाही. काळ मला ह्या दोन्ही वाक्यांचा दहा हजार पाचशे सत्ताविसाव्यांदा अनुभव आला. बायकोने recommend केलेली एक वेब सिरीज पाहिली आणि दोघांच्याही प्रेमात पडलो. म्हणजे त्या सिरीजच्या प्रेमात पहिल्यांदा आणि बायकोच्या प्रेमात एक लाख बेचाळीस हजार चारशे बाराव्या वेळी. ती मराठी वेबसीरिज म्हणजे ZEE5 वरील “बाई तुझ्यापाई”! मुलीला पाळी आली के लगेच तिचं लग्न लावून द्यायचं अशी अनिष्ट चाल (सतीची “चाल” प्रमाणे) असलेल्या गावात पंधरा वर्षाच्या एका मुलीला पाळी येण्याची वाट तिच्या घरच्यांसकट सगळं बघत असतं. तिचं पुढे काय होतं ह्याची कथा म्हणजे बाई तुझ्यापायी हि मालिका. छोटे छोटे आठ भाग आहेत.
भारतात वेब सिरीज हा प्रकार उदयाला आला तेव्हा काही वेब सिरीज चांगले कंटेंट देणाऱ्या, उत्तम कथानक सादरीकरण असणाऱ्या होत्या. अर्थात सेन्सोर नसलेल्या वेब विश्वातील सेक्स आणि हिंसेचा तडका तेव्हा अगदी ठसका लागेल इतका असायचा. आता तो तडका बर्यापैकी कमी झाला असला तरी कंटेंट दर्जा, मनोरंजन मूल्य, एखादा सामाजिक संदेश ह्या गोष्टी दहा HMI लावून शोधल्या तरी सिरीज मध्ये अभावाने आढळतात हल्ली. अनेक वेबसीरिजमध्ये कथा दुय्यम ठरते आणि शिवीगाळ, हिंसा, रक्तपात, सेक्स आणि (अनेकदा अजिबात धक्का न बसणार) धक्कातंत्र यांचाच भडिमार पाहायला मिळतो. त्यामुळे जेव्हा एखादी कलाकृती केवळ तिच्या आशयाच्या, संवेदनशीलतेच्या आणि तांत्रिक दर्जाच्या बळावर मन जिंकते, तेव्हा तिचं भरभरून कौतुक करावंसं वाटतं.
“बाई तुझ्यापाई” ही अशीच एक अप्रतिम कलाकृती आहे. अजूनही अनेक घरात tabu असलेला, कुजबुजत बोलला जाणारा बाईच्या पाळीचा विषय एखाद्या वेब सिरीजचा विषय बनवायला घेणे हेच धाडसच आहे. हे धाडस करणाऱ्या तमिळमधील गाजलेल्या “Ayali” या वेब सिरीजच मराठीत इतकं सहज आणि सुंदर रूपांतर करण्यात आलं आहे की ही कथा आपल्या गावातच घडत आहे असं वाटू लागतं. मुलींचं शिक्षण, परंपरा, रूढी, अंधश्रद्धा, त्या जिवंत ठेवण्यामागे असलेलं राजकारण तसेच एका मुलीची स्वप्नं आणि त्यासाठीचा संघर्ष असे अनेक विषय कुठेही बटबटीतपणा न आणता ही सिरीज प्रेक्षकांच्या समोर अलगद सदर करते. मूळ कथा अत्यंत वेगळी, सुंदर आहेच. पण त्याच मराठी adaptation देखील तितकंच अलवार आहे.
या मालिकेचा खरा आत्मा म्हणजे निपुण धर्माधिकारीचं दिग्दर्शन. प्रत्येक प्रसंगावर त्याची पकड जाणवते. पात्रांच्या भावना, सिच्युएशन, संवाद, प्रसंगांचा वेग आणि सायलेन्स देखील इतक्या सुंदर पद्धतीने त्याने हाताळला आहे की एकही प्रसंग कृत्रिम वाटत नाही. प्रेक्षकांना धक्का देण्यापेक्षा त्यांच्या मनाला स्पर्श करण्याची ताकद दिग्दर्शकात असेल तर काय घडू शकतं, याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
या मालिकेचं छायाचित्रण तर अक्षरशः प्रेमात पाडणारं आहे. खऱ्या गावात, खऱ्या लोकेशन्सवर केलेलं चित्रीकरण प्रत्येक फ्रेमला जिवंतपणा देतं. हिरवीगार शेतं, धुळीचे रस्ते, मातीची घरं, अंगणं, देवळं, सकाळचं धुके, संध्याकाळचा सोनेरी प्रकाश, आणि एकूणच मेंटेन केलेला गावातील rustic feel असलेली प्रत्येक फ्रेम एखाद्या चित्रकाराने रंगवलेल्या चित्रासारखी वाटते. कास्टिंग हे या मालिकेचं आणखी एक मोठं यश आहे. धुरंधर सिनेमा इतकाच ह्या मालिकेतील प्रत्येक कलाकार त्या त्या पत्रासाठी apt वाटतो. त्यामुळे पडद्यावर कलाकार दिसत नाहीत, तर त्या गावातली खरी माणसं दिसतात.
त्याच बरोबर वेशभूषा, मेकअप आणि नेपथ्य ह्यातील डिटेलिंगवर घेतलेली मेहनत थक्क करणारी आहे. पात्रांचे कपडे, दागिने, केसांची ठेवण, घरातील भांडी, भिंती, अंगण, गावातील वातावरण… प्रत्येक छोटा तपशील वास्तवाला इतका जवळचा आहे की मालिकेची विश्वासार्हता अनेक पटींनी वाढते. अशा बारकाव्यांमुळेच एखादी कलाकृती ‘चांगली’ न राहता ‘अविस्मरणीय’ बनते.
साजिरी जोशीने साकारलेली अहिल्या आपल्याच नात्यातील एक्खादी गोड माणसी, अंजली किंवा अपर्णा वाटते. तिच्या डोळ्यांतील स्वप्नं आणि जिद्द खरी वाटतात. एप्रिल मे ९९ मध्ये मला ती प्रचंड आवडली होती. बाई तुझ्यापायी मध्ये त्याहून जास्त आवडली. अभिनयाचा वारसा आणि ट्रेनिंग देखील तिला आईकडून उत्तम मिळालं आहे हे तिच्या अभिनायातीन नेहमीच लक्षात येत. क्षिती जोग बद्दल काय बोलावं? ती माहेरची जोग आहे ह्यातच सगळ आलं. Jokes apart. क्षिती सकारात असलेली प्रत्येक व्यक्तिरेखा सकारात नाही तर जगते अस गेल्या दहा बारा वर्षातीत तिच्या भूमिका पाहिल्यावर लक्षात येत. ह्या मालिकेतील अहिल्याची आई लक्ष्मी देखील क्षिती जगली आहे. तिचा चेहरा इतका झरझर बोलतो की काही प्रसंगात महिला प्रेक्षकांचे डोळे पाणावतात. विभावरी देशपांडेची शिक्षिका पण लाजवाब.
दक्षिणेकडे सिनेमा, सिरीज, साहित्य अश्या सर्वच क्षेत्रात प्रयोग केले जातात. पण ते प्रयोग मराठी संस्कार करून मराठीत सादर करण्याची कल्पनाच सुंदर आहे. बाई तुझ्यापायीच्या निमित्ताने ती कल्पना सत्यात आणणाऱ्या संपूर्ण टीमच कौतुक. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये रिलीज झालेली ही सिरीज मी उशिरा पाहिली असेल. कदाचित हा लेख वाचणार्या अनेकांनी ती आधीच पाहून तिचं कौतुकही केलं असेल. पण ज्यांनी पाहिली नाहीये त्यांनी थोडा वेळ काढा आणि ही वेबसीरिज नक्की बिंज वॉच करा.
Zee5, निपुण धर्माधिकारी, साजिरी जोशी, क्षिती जोग, विभावरी देशपांडे आणि संपूर्ण टीमच अभिनंदन आणि मला हि सिरीज बघायला सांगितल्याबद्दल माझ्या बायकोचे आभार!

मी मराठी सिरीयल पाहणे सोडून दिले होत्या आहेच म्हणजे पण तुम्ही जे विश्लेषण केलं त्यावरून हे बघण्याची इच्छा झालेली आहे बघेन मी नक्की 😊
धन्यवाद🙏
thanks