“….आणि अचानक ब्लॅक आउट झाला. आम्ही बारीक चिमण्या लावून घरात लपून बसलो. अख्खी चाळ शांत झाली. आकाशात विमाने घिरट्या घालू लागली. ती रात्र कशीबशी गेली. मग दुसऱ्या दिवशी पळापळ. मुंबई रिकामी झाली. अप्पा आम्हा पाच जणांना माईबरोबर घेऊन कोकणात आले. मग वर्षभर इथेच मुक्काम. वर्षभराने मुंबईला परत आलो. आता पुढल्या महिन्यात माधवचे लग्न. वसु वहिनी छान आहे दिसायला….”
“माधव कालच गेला….अगदी यमी नंतर एका महिन्यात. दोघेही लवकर गेले! आम्हा तिघांना सोडून. अप्पा आधीच गेले होते म्हणून बरे. त्यांना हा धक्का सहन झाला नसता…पोटची दोन पोर महिन्याच्या अंतराने जायचा. आमची माई बघा. खूप धीराची. तुम्हीही त्रास करून घेऊ नका. आपला मुकुंद लहान आहे अजुन. खूप करायच आहे त्यांच्यासाठी. तुम्ही हातपाय धुवून घ्या. मी चहा टाकते.” मग लाजून “आज गजरा नाही आणलात?”
मुकुंद: (तिचा सुरकुतलेला हात हातात घेत) मी कोण आहे सांग बर?
सुमन: (निर्विकार चेहऱ्याने) कोण आपण? मी नाही ओळखल आपल्याला. ह्यांचे मित्र का? हे कोर्टात गेलेत. संध्याकाळी येतील……
इतके बोलून सुमन हातातील टर्किशच्या टॉवेलची उरलेली सुते काढण्यात गुंगून गेली. मुकुंदने तिच्या कृष देहावरची अस्ताव्यस्त झालेली साडी नीट केली आणि तो तिच्या बेडरूम मधून बाहेर पडला. अल्झायमरने आजारी असलेली त्याची आई सुमन दाते गेल्या दोन वर्षात वर्तमानापासून हळूहळू दूर होत होती. मुकुंद हा वर्तमान आणि तिच्यातील शेवटचा दुवा होता. आज तो ही निखळला! इतके दिवस ती फक्त त्याला ओळखू शकत होती. आता तो दोर कापून ती भूतकाळाच्या डोहात उतरली होती. कधीच परत न येण्यासाठी!
दोन वर्षांपूर्वी छोट्या छोट्या गोष्टी विसरण्यापासून झालेली सुरुवात गॅस वर ठेवलेले दूध उतू जाणे, गिझर दिवसभर सुरु असणे, फ्रीझ उघडा रहाणे इथवर जाऊन शेवटी एक दिवस शेजारील गल्लीतील देवळातून परत येताना रस्ता विसरून हरवून ओळखीच्यांनी घरी सोडण्यापर्यंत वेळ आली. सुमनचे बाहेर पडणे त्या दिवसापासून बंद झाले. यथावकाश ती घरी येणाऱ्या लोकांना जुन्या नात्यांच्या किंवा लोकांच्या संदर्भानेच ओळखू लागली. मितालीला, तिच्या सख्ख्या सुनेला ती “मुकुंदची बायको” म्हणून ओळखायची. सगळी नाती, लोक विसरून गेलेल्या तिला लहानपण, तिचे आईबाबा, कोकणातले दिवस हे लक्ख आठवायचे. आताशा तर ती फक्त भूतकाळ वर्तमानात जगत होती. खऱ्या वर्तमानातील फक्त मुकुंदला ओळखायची. ते पण लहानपणी ठेवलेल्या “पल्या” ह्या लाडाच्या नावाने हाक मारून. पण आज तिने त्यालाही ओळखले नाही!
त्या दिवसानंतर हळूहळू सुमनला वेळ, काळ, स्थळ ह्याचे भान रहात नसे. मुकुंदचा मुलगा मिहिर कॉलेजात जाऊ लागला होता. नेसलेली साडी कमोडमध्ये “धुवायला भिजवून” ती अनेकदा तशीच बाहेर येई. मिताली पटकन चादर वगैरे लपेटून वेळ निभावून नेई. पण मिहिरला फार ऑक्वर्ड होई. आणि त्यामुळे मितालीलासुद्धा! अनेकदा तर नेसलेल्या कपड्यात निसर्ग विधी होऊन तिला कळत देखील नसे. शेवटी नाइलाजाने तिला वृद्धाश्रमात ठेवायचा कटू निर्णय मुकुंदला घ्यावा लागला. तिला सोडून परत येताना तो हमसून हमसून लहान मुलासारखा रडला. पण जिला तिथे एकटे रहायचे होते. ती तिच्या भूतकाळात सुखात होती. निर्विकार होती. मुकुंदचा निरोपही अनोळखी माणसाशी औपचारिकता दाखवावी तसा तिने घेतला!
त्यानंतर मुकुंद महिन्यातून दोनदा तरी जाऊन तिला “बघून” येत असे. “ओळख” संपल्याने भेटण्याला अर्थ नव्हता. तो अर्धा तास बसून तिच्या लहानपणीच्या असंबद्ध गोष्टी ऐकून, तिला प्रेमाने जवळ घेऊन, डोक्यावरून हात फिरवून, डोळे पुसत निघत असे.
जवळपास सहा महीने होऊन गेले होते सुमनला आश्रमात जाऊन. तब्बेत ठीक होती. काळजी व्यवस्थित घेत असत तिची तिथे. सत्तरी पार करूनही खुटखुटीत होती ती. आणि एका रात्री दोन वाजता मुकुंदचा फोन वाजला. समोरचा आवाज “आजी सीरियस आहेत. लगेच या” इतके म्हणाला. मुकुंद, मिताली आणि मिहिर गाडी काढून तडक निघाले. दीड तासात पनवेल गाठले. सुमन पलंगावर पडून होती. फक्त तिच्या खोलीत दिवा सुरु होता. तिचे डोळे बंद होते. एक सेविका शेजारी बसली होती. साऱ्या आसमंतात एक उदास शांतता आणि उकाडा भरून राहीला होता!
मुकुंद तिच्या शेजारी बसला. तिचा हात हातात घेऊन “आई बघ मी आलोय” असे म्हणाला. तिने डोळे उघडले नाही. फक्त क्षीण श्वास सुरु होता. मुकुंदला हुंदका अनावर झाला. मितालीनेही तोंडाला पदर लावला. दोघे खोलीबाहेर गेले. मिहिर आजीच्या शेजारी बसला. त्याने आजीचा हात हातात घेतला. तिच्या गोऱ्या, तेजस्वी, शांत चेहऱ्याकडे तो निरखून पहात होता. त्याच्या बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या. आजीने केलेले लाड, पुरवलेले हट्ट आठवून त्याचे डोळे पाणावाले! इतक्यात सुमनने डोळे उघडले. मिहिरला समोर पाहून मोठ्या कष्टाने ती बोलली “बाबा कुठाय रे?” मिहिरचा डोळ्यावर आणि कानावर विश्वास बसत नव्हता. त्याने मुकुंदला हाक मारली. मुकुंद धावत येऊन पलंगावर तिच्या शेजारी बसला. “पल्या माझ्यासाठी खूप केलस रे तू. माझी काही तक्रार नाही. मिहिरची काळजी घे. तुझ्यासारखाच कर त्याला!” तिने दाखवलेली ओळख ऐकून मुकुंद त्या दुःखद क्षणी देखील खूप आनंदी झाला. मग ती मुकुंदच्या मागे हवेत कुठेतरी पहात पुढे बोलू लागली “तुम्ही कशाला हसताय मिशितल्या मिशित? गजरा आणलात का? हो येत्येय मी लगेच. माहित्येय खारेपाटणची होडी गेली की चार तास वाट पहावी लागेल! जरा हात द्या नाहीतर मी मेली खाडित पडेन” इतके म्हणून तिने डोळे मिटले. मुकुंदच्या हातावरील तिची पकड ढीली झाली….इतर कोणीतरी तिचा हात धरून तिला आधार दिल्यासारखी! इतके दिवस भूतकाळातील आठवणीत रमलेली ती स्वतःच क्षणभरात उरलेल्यांसाठी कायमची आठवण बनून निघून गेली….. सुटली… एक पर्व संपले. मुकुंदला एकच समाधान होते की इतके दिवस अनोळखी झालेली आई जाताना मात्र प्रेमाची ओळख पटवून गेली!!!
