अमोघ उठून बाथरूममध्ये गेला. अनन्या तशीच त्या अस्ताव्यस्त बेडवर पडून राहीली होती. काही क्षणांपूर्वी अमोघच्या बाहुपाशात सर्वोच्च आनंद मिळवताना गेले काही तास खोलीभर भरून राहिलेला सुगंधी मेणबत्त्यांचा धुंद गंध, मनाला आणि रोमारोमाला आलेले उधाण आणि ती ऊब हळूहळू उतरत होती. सभोवार लावलेल्या सुगंधी मेणबत्त्या सुरुवातीची लगबग, तगमग संपून अर्ध्यावर येऊन शांत तेवत होत्या! आता तिला रूम मधील एसीच्या थंडाव्याची जाणीव होऊन अंगावर काटा आला, अपरिमित आनंदाने डोळ्यातून आलेले, सुकलेले अश्रु आता गालाला थंड भासले आणि तिने गोळा झालेले ब्लैंकेट ओढून घेतले!

अमोघने बाथरूम मधून बाहेर येऊन तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन एक स्मित दिले आणि तो खोलीभर विखुरलेले त्याचे कपडे जमा करू लागला. मेणबत्त्यांच्या उजेडात कपडे सापडत नसल्याने त्याने भस्स्कन रूम मधला दिवा लावला आणि तो कपड़े शोधू लागला.

-“चल आटप लवकर. Let’s get out of here as soon as possible!” कपडे शोधताना तिच्याकडे न बघता तो म्हणाला.

-“अरे थांब ना जरा अमोघ. काय घाई आहे इतकी? मला निघावेसे वाटत नाहीये.

-अग आज माझा brother in law आणि त्याची फॅमिली येणार आहेत घरी. त्यांच्याबरोबर डिनरला जायचे आहे. I had told you. Please make it fast baby!

अमोघने कपडे घालायला सुरुवात देखील केली होती. ती बळेच उठली. बाथरूममध्ये गेली. तोंडावर पाण्याचे हपके मारून समोरच्या आरशात तिने पाहीले. दोन मुलांची आई असलेली पस्तीशीची अनन्या अजूनही खूप आकर्षक होती. आणि ते तिला ठावूक होते. बाथरूममधील आरशातील आपले रूप न्याहाळताना तिला दहा वर्षांपूर्वी मधुचंद्राला गेले असताना अश्याच प्रसंगी रोहितने मागून अचानक बाथरूममध्ये येऊन मारलेली मीठी आठवली.

रोहित आणि अनन्याचे अरेंज्ड मॅरेज. अनन्या मनस्वी, भावुक, कलेची आवड असलेली, रोमॅन्टिक आणि रोहित सडतोड, भावनांना जास्त किंमत न देणारा, सर्वच गोष्टीत प्रॅक्टिकल अप्रोच असलेला. अनन्याला गाडीत त्याचा हात हातात धरून, त्याच्या शेजारी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून रोमॅंटिक गाणी ऐकत प्रवास करायला आवडत असे आणि तो “लोक काय म्हणतील?” असे म्हणत तिला सरळ बसायला सांगे. ह्या स्वभाव आणि आयुष्याकडे पहायच्या दृष्टिकोनाचा फंडामेंटल फरक सोडला आणि रूप, शिक्षण, संस्कार ह्या सर्व निकशांवर पाहीले तर दोघेही अगदी “अनुरूप”!

वर्षभरात त्यांना पहिला मुलगा झाला. तो देखील अनन्याच्या हट्टामुळे. रोहितला मूल हे फायनांशियल प्लानिंगचा भाग वाटत असल्याने त्याच्या शेड्यूल मधे ते इतक्या लवकर बसत नव्हते. पण अनन्याच्या इच्छेपुढे त्याने नमते घेतले. मूल झाल्यावर रोहितने व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. घरी यायला उशीर व्ह्यायचा त्याला. आल्यावर दमलेला असायचा. जेउन लगेच झोपून जायचा. अनन्या खूप खट्टू व्हायची. अशीच दुराव्याची, विरहाची, हट्टाने मागून मिळवलेल्या दुर्मिळ प्रणयाची तीन वर्ष गेली. लोक सर्व उपाय करून थकतात, प्रयत्न हात टेकतात आणि शेवटी ज्यात अयशस्वी होतात अशी निसर्गाची भेट देव काहींना सहज देऊन जातो. ह्यांच्या बाबतीतही तेच घडले! वर्षभरातील मोजक्या प्रणयातून अनन्याला अनपेक्षितपणे परत दिवस राहीले. रोहित जाम वैतागला. “मी प्रिकॉशन घ्यायला सांगतो तरी तू नाही म्हणतेस! बघ आता काय झाले! This wasn’t planned! हे मूल आपल्याला नको! You abort it immediately!” अनन्या हे ऐकून खूप हर्ट झाली. तिने ते मूल तिच्या जबाबदारीवर वाढवायचा निर्धार करून, रोहितच्या विरोधाला न जुमानता दुसऱ्या मुलाला जन्म दिला!

तेव्हापासून रोहित तिच्यापासून थोडा दूर गेला. शरीराने आणि मनाने देखील. आधीच शृंगार आणि प्रणयाचा दुष्काळ असलेल्या तिच्या आयुष्यातून तो जवळजवळ निघुन गेला. मग उरल्या त्या जुन्या आठवणी आणि वर्षातून क्वचित, रोहितच्या मागे लागून, त्याच्या “प्रोकोशन्स” पाळून “उरकलेला” टेक्नीकल संभोग! अनन्याच्या प्रणयाच्या आणि समाधानाच्या व्याख्या, अपेक्षांपासून कित्येक मैल दूर असलेली एक औपचारिकता…ओढून ताणून मिळवलेली!

मुले मोठी होत होती. अनन्या संसाराच्या जबाबदारीत गुरफटली होती. रोहित कामानिमित्त अनेक दिवस लांब, परदेशात असायचा. घराच्या सर्व जबाबदाऱ्या तो उत्तम पार पडायचा. मुलांना चांगल्या शाळेत भरपूर डोनेशन देऊन प्रवेश घेऊन दिला, घरात नोकर चाकर होते, कुटुंबाला घेऊन एखाद दोन हॉलीडे सुद्धा होत. कशाचीच कमी नव्हती. फक्त अनन्याचा आनंद सोडून! तो तिला औपचारिकता म्हणूनच मिळवावा लागे! त्यात तिला सहा महिन्यांपूर्वी कॉलेजच्या रियुनियनच्या निमित्ताने अमोघ भेटला. त्याचा मोकळेपणा, आक्रमकपणा, बायका समोर आहेत ह्याची तमा न बाळगता त्याने बिनधास्त सांगितलेले नॉन व्हेज जोक्स आणि त्याला सर्वांचा मिळालेला प्रतिसाद, “तू आजही कॉलेजमध्ये जाऊन बसलीस तर स्टूडंट म्हणून सहज खपून जाशील” अशी अनन्याच्या टिकून असलेल्या फॉर्मला त्याने दिलेली दिलखुलास दाद अनन्याला कुठेतरी आवडून गेली. आपापल्या लाईफ पार्टनरबद्दल सांगताना त्याने सर्वांसमोर बिनधास्त उल्लेख केलेले काही इंटीमेट क्षण तिला आकर्षीत करून गेले!

त्यानंतर कॉलेजच्या कॉमन ग्रुपमधील चॅट वैयक्तिक होऊन तिने आपले मन अमोघसमोर कधी मोकळे केले ते तिच्याही लक्षात नाही आले. मग झालेल्या काही भेटी, लॉन्ग ड्राइव्ह ह्यातून वाढलेली जवळीक आजची दुपार तिच्या आयुष्यात घेऊन आली!

आरशात बघताना आलेल्या रोहितच्या आठवणीने किंचित अपराधी वाटल्याने तिने चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले. “आपण रोहितने तुला वंचित ठेवलेल्या आनंदासाठी हे पाऊल उचलले आणि ते योग्यच आहे!” असे अमोघने तिला सांगितलेले तत्वज्ञान आरशातील स्वतःच्या प्रतिमेला सांगून ती बाहेर आली. अमोघ तयार होता, चित्रपट संपून दिवे लागले की थेटरातून बाहेर पडायची घाई असलेल्या प्रेक्षकांसारखा तो निघायच्या घाईत होता. अनन्या तयार झाली. दोघे होटेलातून वेगवेगळे बाहेर पडले. अमोघ रिक्शा पकडून तिला साधे बाय देखील न म्हणता निघुन गेला. अनन्या आनंद, समाधान, अपराधीपणा आणि त्यावर अमोघच्या फिलोसॉफिने केलेली मात अश्या मिश्र भावना घेऊन, अंगावर अमोघच्या खुणा लेवून घरी आली!

त्या रात्री जेवण झाल्यावर मुले झोपायला गेली. अनन्या वेगळ्याच मूड मध्ये होती. थोडी गोंधळलेली, थोडी अपराधी, खूप आनंदी आणि समाधानी! ती निवांत बेडवर पडली. रोहित थोड्याच वेळापूर्वी फॉरेन ट्रिपवरून परत आला होता. तो शॉवर घेऊन आला. आज नेहमीप्रमाणे लॅपटॉप उघडून न बसता तो अनन्याला म्हणाला “मला ज़रा बोलायचे आहे!”

– (अनन्या आश्चऱ्याने) काय रे?

– मी आणि राधिका, आपली बिझिनेस हेड सिंगपूरला गेलो होतो हे तुला माहिती आहे.

-हो. मग?

– ह्यावेळी राधिका जरा विचित्र वागली.

– म्हणजे?

– काल रात्री मीटिंग संपवून आम्ही हॉटेलला परतून डिनर घेतला. दोन दोन ड्रिंक्स झाले. And she got emotional. ती माझ्या रूम मध्ये आली. तिचा नवरा तिला सुख देत नाही, she is dissatisfied असे म्हणून माझ्या गळ्यात पडून रडू लागली. मी धीर द्यायला पाठीवरून हात फिरवाला तर she kissed me!

अनन्या उठून बसली! रोहित बोलत होता- I also got lost for a while…पण मला तू आठवलीस आणि मी तिला मागे लोटली. I told her this is not right! ती म्हणाली “सर इथे आपल्याला कोण बघते आहे? प्लीज नाही म्हणू नका. I beg of you! फक्त एकदाच मला जवळ घ्या, परत नाही मागणार मी. मला दुहेरी आनंद मिळेल. एक म्हणजे नवऱ्याने मला नाकारलेला आनंद आणि दुसरा मी त्याच्यावर घेतलेल्या सूडाचा आनंद!”

– I was amazed! How can lust take someone to this extent?! आमच्या समोर आरसा होता. त्यात आम्ही दोघेही दिसत होतो. मग मी तिला समजावले की लग्नाच नात म्हणजे तो समोरचा स्वच्छ आरसा आहे असे समज. काळानुसार त्यावर धूळ जमू शकते, काही ठिकाणी पारा उडू शकतो, कधी काच ओबड धोबड होऊ शकते, कधी आकार विचित्र असू शकतो, कधी आपल्या आवडीची चौकट नसू शकते, कधी आवडलेली फ्रेम मोडू शकते, अगदी चरे देखील पडू शकतात! पण लग्न झालेल्या दोघांनीही त्या आरशाची देखभाल करून, नीट पुसून स्वच्छ न ठेवणे हे महत्वाचे असते. कधी कोणाकडून ती काळजी जाणता अजाणता घेतली जात नाही आणि आरसा काळवंडतो. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट अशी की कोणत्याही परिस्थितीत त्या आरशात आपली एकच प्रतिमा दिसणे आवश्यक आहे. त्या विश्वासरूपी आरशाला एकदा तडा गेला की आपल्याच आपल्या दोन किंवा तड्यांनुसार अधिक प्रतिमा दिसू लागतात. तो तडा कधीच बुजवता येत नाही! त्यामुळे तू तुमच्या आरशाला आज तडा न देता तो अधीक स्वच्छ करायचा प्रयत्न कर आणि मी देखील. उद्या सकाळी आरशात बघशील तेव्हा तुझी एकच प्रतिमा पाहून तुला खूप बरे वाटेल आणि माझे म्हणणे पटेल! ती तिच्या रूम मध्ये निघुन गेली!

And I realised की मी देखील आपल्या आरशावर किती धूळ जमवली आहे! किती चरे पाडले आहेत! पण त्यातही तुझे कौतुक आणि अभिमान वाटला की ह्या परिस्थितितही तू तुझी प्रतिमा आपल्या मळक्या, चरे पडलेल्या आरशात का होईना, दुभांगून दिली नाहीस! माझी चूक मला उमगली आहे. आज पासून मी आपला आरसा लक्ख राहील ह्याची काळजी घेणार आहे!”

इतके म्हणून रोहितने आवेगाने तिला जवळ ओढली. बेडरूममध्ये तिच्या समोर असलेल्या आरशात तिला पाठमोऱ्या रोहितची खूप मोठी, स्वच्छ, उजळ प्रतिमा दिसत होती आणि दिसत होत्या त्याच्या बाहूत विसावालेल्या तिच्या स्वतःच्या दोन कुरूप प्रतिमा, विक्राळ हसत असलेली नियती आणि आरशाला माधोमध गेलेला एक तडा!!! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!