नेपियन सी रोडवर प्रियदर्शिनी पार्कजवळ असलेल्या झोपडपट्टीत चूली पेटल्या होत्या. नरसम्मा आणि तिचा नवरा रघूची वयवर्ष आठ पासून तीन पर्यंतची पाच मुले झोपडीबाहेरच्या मातीच्या ढिगाऱ्यात खेळत होती. धाकटे दोघे नागड्याने उकिडवे बसून तिथेच शी करत होते. एक मुलगी मातीत मळलेले केळे किचवडून खात होती. आपल्या सहा महिन्याच्या बाळाला मांडीवर घेऊन नरसम्मा हिंडालियमच्या पोचे आलेल्या पातेल्यात पाणथळ तरकारी चूलीवर शिजवत होती. गेल्याच महिन्यात पोटात नवीन अंकुर फुलत असल्याची जाणीव तिला झाली होती! नरसम्मा रोड कॉंट्रॅक्टरकडे रोजंदारीवर रेतीची घमेली उचलून रोज थकून जात असे. तिने दिवसभर देशी दारू ढोसून बाहेर बाजल्यावर पडलेल्या रघूला हाक मारली. रघूने कुस बदलत ओ दिली. तिने रोजचे गाऱ्हाणे सुरु केले. ती त्याला सांगत होती की दिवसभर घरात बसू नको, कामाला जात जा, चार पैसे कमव! दारू पिऊ नको. तब्बेत खराब होईल. मुलांच्या भविष्याचा विचार कर. रघु ऐकून हळूहळू वैतागत होता. “तुला संसाराची, माझी, मुलांची काहीच किंमत नाही! सतत घरात बसून असतोस. पैसे कमवायला नको. मी तुझ्याशी लग्न करून घोडचूक केली!” हे तिचे बोचरे बोल ऐकून रघु रागाने तिरमिरित उठला. तिचे केस मागून धरून त्याने मागे ओढले. फरफटत तिला झोपडीबाहेर आणले. हातातील झाडूने तिला गुरासारखे बडवू लागला. पोरांना हे रोजचे होते. ती खेळण्यात मग्न होती. शेजारच्या झोपडीतील बाया पुढे झाल्या. मधे पडल्या. नरसम्माची सुटका झाली. रघू बाजेवर बसून देशी ढोसू लागला….

रात्री जेवून पोर झोपी गेली. नरसम्माने पोरांच्या पसाऱ्यात एका चादरीवर अंग टेकवले. इतक्यात पिऊन तर्र झालेला रघु झोपडीत शिरला. पोरांना बाजूला सारून नरसम्माच्या अंगाला झोंबू लागला. देशी दारुचा उग्र, किळसवाणा वास तिच्या नाकातोंडात, रोमारोमात शिरला! ती शांत पडून होती. झोपडीच्या फाटक्या छतातून तिला पहात असलेला चंद्र खिन्न हसत होता!

ह्याच झोपडपट्टीच्या समोरची उच्चभ्रू इमारत. कल्याणी किटीपार्टी आटपून घरी परतली होती. मेड ने दोघा मुलांना जेवायला घालून त्यांच्या बेडरूम मध्ये झोपवले होते. अरिजीत अजुन आला नव्हता. कल्याणीने शॉवर घेतला. डिनर पार्टीतच झाल्याने तिने झुळझुळीत गाऊन परिधान केला आणि बाल्कनीत उभी राहीली. सत्ताविसाव्या मजल्यावरील अजस्त्र फ्लॅटच्या बल्कनीतून अथांग समुद्र दिसत होता. वर्दळीने सतत व्यस्त असलेले मुंबईचे रस्ते दिसत होते. अगदी अरिजीत सारखे व्यस्त! घारी, गोरी, सुंदर कल्याणी खानदानी श्रीमंत अरिजीतला कॉलेजमध्ये पहिल्या भेटीत आवडली. श्रीमंतीचे तेज रुबाबदार, उमद्या अरिजीतला अधिकच खुलवत होते. त्याने लग्नाची मागणी घातली. मित्र मैत्रिणींच्या मते सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या कल्याणीला लॉटरी लागली होती. कॉलेज संपल्यावर लगेच लग्न झाले. कल्याणीचे शिक्षण तिथेच संपले. एक मूल कल्याणीच्या उदरात सोडून अरिजीत अमेरिकेला एमबीए करायला गेला. परत आल्यावर त्याच्या वडिलांनी निवृत्ती घेऊन व्यवसायाची धुरा त्याच्यावर सोपवली. व्यवसायवृद्धीच्या वेडाने झपाटलेल्या अरिजितने काही वर्षातच पसारा वाढवला. ह्यात दहा वर्ष निघून गेली. कल्याणीच्या पदरात फक्त आणखी एका अपत्याची भर टाकून!

अरिजितच्या फॉरेन टूर, कॉन्फरन्स, ऑफिस असेच सुरु होते. ऑफिस तसेच इतर सोशल कॉंटॅक्ट्स मधील काही स्त्रियांबरोबर त्याचे नाव जोडले असल्याचे हल्लीच तिच्या कानावर आले होते! तो घरी पाहुण्यासारखा काही दिवस येई. कल्याणीने स्वतःला किटी पार्टी, काही समाजसेवी संस्था ह्यात गुंतवून घेतले होते.  पण ती अरिजितचे आयुष्यातील अस्तित्व मिस करत होती! आज ती बोलणार होती!

बेल वाजली. अरिजीत आला. फ्रेश होऊन, ऑन द रॉक्स एक ड्रिंक बनवून बाल्कनीत आला. हॅलो, हाय झाल्यावर त्याने नवीन प्रोजेक्टबद्दल सांगायला सुरुवात केली. “मूल झोपली का, तू कशी आहेस?” ह्यातले काहीही न विचारता. तिने विषय काढला. ‘त्याने घरात लक्ष द्यायला हवे, चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण घर, संसार हे पण महत्वाचे आहेत’ अश्या पूर्वी अनेकदा सांगितलेल्या गोष्टी ती परत सांगत होती. कामाच्या स्ट्रेसने आधीच कावलेला अरिजीत इरिटेट होत होता. त्यात तिने कानावर आलेल्या “त्या” गोष्टीबद्दल बोलायला सुरुवात केली. अरिजितचा संयम सुटला. तो तिला अशिक्षित, छोट्या विचारांची, मिडलक्लास मेंटेलिटिची असे वाट्टेल ते म्हणाला. तिच्या अप ब्रिंगिंगचा उद्धार करत तिच्या आईवाडिलांनाही त्याने दोष लावला. इतका पैसा मिळवून सर्व सुखे देत असूनही तिला किंमत नाही, तिच्या ह्याच वागण्यामुळे तो घराबाहेर रहातो, ती हलक्या कानाची आहे, तिच्या मैत्रिणी चिप आहेत असे शाब्दिक फटके तो देत होता. त्या फटाक्यांनी कल्याणीच्या मनाला होणाऱ्या यातना नरसम्माच्या शरीराला झाडूच्या फटाक्यांनी होणाऱ्या यातनांपेक्षा तसूभरही कमी नव्हत्या!

कल्याणी डोळे पुसत बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडून हमसून रडू लागली. अरिजितने रागात दोन ड्रिंक संपवले आणि तो बेडरूममध्ये आला. हळूच कल्याणीच्या अंगावरून त्याचा हात फिरू लागला. ग्लेनफिडिचचा मंद वास आणि तुरट चव तिच्या नाकातोंडात, रोमारोमात शिरली. अश्रु भरलेल्या नेत्रांनी गुबगुबीत गादीवर पालथी पडून ती थंड ऐसी रूमच्या काचेबाहेर दिसणाऱ्या चंद्राला पहात होती. चंद्र तिलाही पाहून खिन्न हसत होता….नरासम्मला पाहून हसला होता तस्साच…..!

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!