भालचंद्र नागरे त्याचं नाव. पण ऐंशीच्या दशकात पोरांसाठी तो भालूदादा होता. प्रसादच्या बॅचचा देखील तो भालुदादा होता. खाकी शर्ट, खाकी पॅन्ट आणि डोक्यावर खाकी टोपी असा गणवेश. ओठांवर बारीक मिशी, कायम कपाळवर आणि गळ्यावर चंदनाचा टिळा. नेहमी हसरी मुद्रा. असा भालू दादा प्रसादच्या शाळेत प्युन होता. तो वर्गात नोटीस घेऊन येई, ट्रीपला पोरं सांभाळायला बाईंना मदत करी, वह्यांचे गठ्ठे ने आण करे आणि सर्वात मुख्य काम त्याच्या विशिष्ट शैलीने शाळेची घंटा वाजवे. एखाद्या दिवशी तो रजेवर असला आणि कोणी दुसऱ्या प्युन ने घंटा वाजवली तर पोरं ओळखत की आज भालू दादा रजेवर आहे. पोरांमध्ये तो लोकप्रिय होता. कोणी शाळेत आजारी पडला तर त्याला घरी सोडायला भालू दादा जाई. कोणाचं ढोपर खेळताना पडून फुटलं तर भालू दादा लाल औषध लावी. हाच भालू दादा दर वर्षी दहावीच्या बॅचच्या सेंड ऑफला हमसा हमशी रडायचा. “कशाला रे येता पोरांनो शाळेत जीव लावायला?” असं विचारून सगळ्या मुलांना त्याच्या तर्फे लिमलेट गोळ्या द्यायचा!

प्रसाद पास आउट झाला. कॉलेज संपून नोकरीला लागला. लग्न होऊन त्याला मुलगा झाला. मध्ये पंधरा वर्षे गेली. प्रसाद बाप झाला आणि भालू दादा भालू काका झाला पोरांचा! त्याने आता पन्नाशी ओलांडली होती. पण शाळेत पोरांबरोबर तो अजूनही रमायचा. भालू काका पोरांचा आजही लाडका होता आणि पोरं भालू काकाचा जीव होती. 

प्रसाद चा मुलगा मिहीर यंदा शाळेत जाणार. प्रसाद त्याला शाळेतील गंमती सांगायचा. त्यात तो मिहिरला एक किस्सा जाम रंगवून सांगत असे. प्रसादला शाळेत प्रायमरीत असताना घंटेबद्दल प्रचंड कुतूहल होतं. तो अनेकदा मधल्या सुट्टीत त्या प्रचंड घंटेखाली उभा राहून तिला बघत असे. एकदा भालू दादाने त्याला घंटेकडे बघताना पाहिलं आणि काय बघतो आहेस विचारलं. प्रसादने एकदा घंटा वाजवायची इच्छा असल्याचं सांगितलं. भालू म्हणाला “घंटा वाजवली की शाळा सुटते किंवा भरते! शाळा सुटताना तू वर्गात असतोस. शाळा भरायच्या आधी ये एक दिवस. घंटा वाजवं आणि शाळा भरली की धावत जा वर्गात बाई यायच्या आधी!” प्रसादला ती कल्पना भन्नाट आवडली. दुसऱ्याच दिवशी तो बाबांच्या मागे लागून शाळेत लवकर आला. भालू दादाने त्याचा शब्द पाळला. त्याने प्रसाद ला उचलून घेतला आणि त्याचा हात हातात धरून घंटा वाजवली! प्रसाद प्रचंड खुश झाला. मधल्या सुट्टीत प्रसाद प्युन लोक जेवायला बसायचे तिथे गेला आणि आपल्या डब्यातील गुंडाळी केलेली एक तूप साखर पोळी त्याने भालू दादाला दिली! भालुला भरून आलं. त्याने प्रसादचा पापा घेतला आणि “जेव्हा इच्छा होईल तेव्हा घंटा वाजवायला येत जा” अस सांगितलं! शाळा संपेपर्यंत दर वर्षी प्रसादने अनेक महत्त्वाच्या दिवशी शाळेत घंटा वाजवली. मोठा झाल्यावर त्याचा हात पोहोचू लागला आणि घंटा वाजवता तर केव्हापासून येत होती. ही कथा सांगताना प्रसाद मिहिरला म्हणाला “आमच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी शेवटचा तास संपल्यावर शाळा कायमची सुटायची घंटा मी वाजवली होती!” त्यावर मिहीर म्हणाला “बाबा माझ्या शाळेच्या पाहिल्या दिवसाची शाळा सुरू व्हायची घंटा मला वाजवायला आवडेल!” 

मिहिराची ऍडमिशन करायला प्रसाद शाळेत गेला होता तेव्हा भालू दादा भेटला. प्रसाद ने प्रेमाने चौकशी केली. भालू देखील त्याला भेटून खुश झाला. मग प्रसाद ने तो घंटा वाजवायचा ह्याची आठवण करून देत मिहिरची इच्छा भालुला सांगितली. भालू म्हणाला “अजूनही घंटा मीच वाजवतो. तुझ्या पोराची इच्छा मी पूर्ण करेन. अरे तुम्ही पोरांनी मला इतका आनंद दिला आहे तुमच्या प्रेमातून आणि निरागसपणातून की मी तुमच्यासाठी काहीही केलं तरी ते कमी आहे! पाठव तुझ्या मिहिरला!”

आज शाळेचा पहिला दिवस. मिहीर शाळेत निघाला. त्याला पोहोचवायला प्रसाद स्वतः शाळेत गेला. मिहिरला कडेवर घेतलेला प्रसाद भालू दादाला शोधत होता. मिहीर घंटा वाजवायला मिळणार की नाही ह्या भीतीने अस्वस्थ होता. आजचा शाळेचा पहिला दिवस मिहिरच्या आयुष्यात परत कधीच येणार नव्हता! इतक्यात भालू दादा आला. मिहिरला पाहून म्हणाला “हा आहे का छोटा प्रसाद? अगदी तुझ्यासारखा दिसतो. म्हणजे तू शाळेत असताना दिसायचास ना अगदी तस्सा!” तिथे मिहीर त्याला म्हणाला “काका घंटा?” भालू हसून म्हणाला “आहे हो लक्षात. ये माझ्याकडे!” भालु ने मिहिरला आपल्या कडेवर घेतला. प्रसाद म्हणाला “दादा..” भालू म्हणाला “काळजी नको करू. मी सोडेन त्याला वर्गात. जा तू बिनधास्त!”

प्रसाद मिहिरचा निरोप घेऊन निघाला. भालू मिहिरला घंटेजवळ घेऊन गेला. शाळा भरायच्या वेळेवर मिहिरचा हात हातात धरून त्याने घंटा वाजवली. प्रचंड खुश झालेल्या मिहिरला त्याच्या वर्गात सोडताना त्याने लिमलेटच्या गोळ्या दिल्या ज्या मिहीरने खिशात टाकल्या! शाळा सुटताना प्रसाद मिहिरला घ्यायला आला. मिहिरने खिशात आता दमट झालेल्या दोन गोळ्या बाहेर काढल्या आणि प्रसादला म्हणाला “बाबा घंटा वाजवून झाल्यावर भालू काकाने ह्या दोन गोळ्या मला दिल्या आणि म्हणाला एक तुझ्या बाबाला दे. त्याला ऑरेंज आवडते ती त्याला दे!” हे ऐकून प्रसादला भरून आलं. त्याने मिहिरच्या हातातून ती ओलसर गोळी घेऊन खाल्ली आणि त्याचे डोळे भरून आले. त्याने मिहिरला उचलला आणि दोघे निघाले. इतक्यात मिहीर ने विचारलं-

मिहीर- बाबा श्रद्धांजली म्हणजे काय रे?

प्रसाद- तुला कुठे कळला हा शब्द?

मिहीर- आज शाळा भरताना टीचर ने आम्हाला दोन मिनिटे शांत उभे राहून भालू काकाला श्रद्धांजली वाहायला सांगितली!

प्रसाद- (हादरून) काय?

मिहीर- हो. घंटेच्या खाली एका खुर्चीवर भालू काकाचा फोटो आहे आणि त्याला हार घातला आहे. 

हे ऐकून प्रसाद अविश्वासाने गर्रकन वळला आणि घंटेसमोर आला. तिथे भालू दादाचा फोटो ठेवला होता हार घातलेला आणि शेजारी बोर्ड होता “विद्यार्थ्यांवर जीव लावणारे आपल्या शाळेतील सहाय्यक भालचंद्र नागरे ह्यांचे काल रात्री निधन झाले! ईश्वर आत्म्यास शांती देवो!” हे वाचून प्रसादाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तोंडात भालू काकाने दिलेली लिमलेट गोळी फुटून तीच जुनी आंबट चव पसरली होती!” मिहीर म्हणाला “बाबा घंटा तर हलत नाहीये पण वाजते कशी आहे?” तो घंटेचा आवाज प्रसादला देखील ऐकू येत होता. प्रसाद त्याला उचलून घेऊन मैदानात येत आकाशात बोट दाखवत म्हणाला “ती घंटा भालू काकाला टाटा करते आहे. तो बघ तो वर चालला आहे!” मिहिरला एक धूसर आकृती खाकी युनिफॉर्म मध्ये हवेत विरळ होताना दिसत होती. मागे फक्त त्या दोघांना ऐकू येत असलेली घंटा वाजत होती!©मंदार जोग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!