मृगजळ सीझन २ भाग ५
श्रीरंग हॉटेलमध्ये चेक इन करून, फ्रेश होऊन मानसीच्या घरी पोहोचला. त्याने घराची बेल वाजवली. मानसीने दार उघडलं आणि श्रीरंगला दारात पाहून जोरात मिठी मारली आणि ती रडू लागली.
श्रीरंग- मानसी, शांत हो…मी आलोय ना…सगळं ठीक होईल…मी आत येऊ की इथेच आपण असेच उभे राहणार आहोत?
मानसीला त्यातही हसू आलं आणि तिने हाताला धरून श्रीरंगला आत घेऊन दरवाजा बंद केला. श्रीरंग आत येऊन बसला. मानसीने त्याला पाणी आणून दिलं.
मानसी- रंगा…तू आलास हे पाहूनच मला किती बरं वाटतंय काय सांगू तुला.
श्रीरंग- सगळं सांग जे वाटतंय ते सांग.
मानसी- मी सौरभशी खूप rude वागले. मला माझाच राग येतोय. अंकिता आजारी होती म्हणून त्याला जावं लागलं…आता ती त्याची बायको आहे ना? मग बायको आजारी असल्यावर तो जाणारच ना? मला रागवायचा काय अधिकार आहे?
श्रीरंग- तुला त्याच्या आयुष्यात कसला अधिकार नाहीये ह्यापेक्षा कसला अधिकार आहे हा प्रश्न जास्त योग्य ठरेल. तू तो स्वतःला विचार. त्याचं उत्तर मिळालं की तुला बऱ्याच न पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील. अंकिता त्याची बायको आहे मान्य. पण तिच्याशी भांडण होऊन, तिच्या संशयी स्वभावाला कंटाळून, तिने केलेल्या खोट्या आरोपामुळे सौरभ तुझ्या आयुष्यात आला ना? त्याने तुला तेव्हाच लग्नच प्रॉमिस दिलं होतं ना? मग बारा वर्षांत लग्न का नाही केलं? तू तर सतत विचारात होतीस ना?
मानसी- मला माहितीये सौरभ जरा घाबरतो. पण अरे त्याची आई…
श्रीरंग- त्याची आई, त्याची बायको, त्याचा मुलगा, त्याचा संसार, त्याचा कम्फर्ट…सगळं त्याचंच आहे. तुझं काय आहे मानसी? तू स्वतः पण आता स्वतःची राहिली नाहीयेस. Sorry मी जरा हार्श बोलत असेन तर. पण मी हजारो मैलांचा प्रवास करून इथे गुडीगुडी बोलायला आलेलो नाहीये. मी डिसिजन घ्यायला आलो आहे आणि तुलाही तो घ्यावा लागणार आहे.
मानसी- कसलं डिसिजन?
श्रीरंग- सौरभ की श्रीरंग हे डिसिजन. कारण तुला लग्न करावंच लागणार आहे. मी माझ्या मैत्रिणीला ह्यापुढे एकटी सोडून जाणार नाहीये. एकतर तिचं सौरभशी लग्न लावून जाईन किंवा मी स्वतः तिच्याशी लग्न करून तिला बरोबर घेऊन जाईन.
मानसी हे ऐकून थक्क होत म्हणाली-
मानसी- रंगा…पण…
श्रीरंग- मी एकदा ठरवलं की माझा निर्णय फायनल असतो हे तुला माहितीये मानसी. त्यामुळे आता तुझ्यापुढे फक्त दोन ऑप्शन आहेत. मी किंवा सौरभ. आणि ते ठरवायला दिवस कमी आहेत. शांतपणे, विचार करून निर्णय घे. आणि आता मला मस्त black coffee दे. माझा जेट lag सुरू आहे.
ते ऐकून मानसी एक स्माईल करून त्याच्यासाठी कॉफी बनवायला आत गेली. श्रीरंगने सिगारेट पेटवली आणि तो स्वतःशी म्हणाला-
श्रीरंग- ह्या सौरभचं खरं रूप मानसीला दाखवायला हवं. पण कसं? त्यासाठी अंकिताला भेटावं लागेल. तिला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी तिच्या क्लासमध्ये जायला पाहिजे. आज तेच करतो.
उमेश त्याचं लेक्चर संपवून नुकताच त्याच्या केबिनमध्ये येऊन बसला होता. त्याने चौकशी केली आणि अंकिता अजूनही क्लासला आलेली नसल्याचं त्याला कळलं. त्या व्हिडीओ कॉलनंतर त्याला अंकिताला फोन करायला पण जरा ऑकवर्ड वाटत होतं. तरी काळजीने लाजेवर मात केली आणि त्याने अंकिताला फोन लावला. अंकिता तिच्या बेडरूममध्ये शून्यात नजर लावून बसली होती. तिचा फोन रिंग झाला. त्यावर उमेश सर हे नाव दिसलं. तिला तो व्हिडीओ कॉल आठवला. खूप awkward वाटलं. उमेशचा फोन घ्यावा की घेऊ नये ह्या विचारात होती. पण कामाचा असणार असं वाटून तिने फोन घेतला.
अंकिता- हेलो…
उमेश- हेलो मॅडम. कशा आहात? तब्येत बरी आहे ना आता?
अंकिता- हो..
काही क्षण शांतता…
उमेश- मी सहज फोन केला…तब्येत कशी आहे विचारायला आणि तुम्ही आज क्लासला येणार का हे विचारायला. म्हणजे तसं काही urgent नाहीये…आम्ही सगळे आहोतच इथे…पण..
अंकिता- माहित नाही सर..तब्येत आता बरी आहे…पण थोडा थकवा आहे. बघू…कदाचित येईन देखील थोडं बरं वाटलं तर…
उमेश- नको madam तुम्ही प्लीज आराम करा. तुम्हाला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही…
काही क्षण सायलेन्स…मग उमेश हळूच म्हणाला-
उमेश- मला म्हणजे आम्हाला सर्वांनाच आवडणार नाही तुम्हाला त्रास झालेला…आराम करा तुम्ही…ठेऊ फोन?
अंकिता- हम्म..बाय…
अंकिताने फोन कट केला. पण उमेशचं “तुम्हाला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही…” हे वाक्य मात्र तिच्या मनातून जायला तयार नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू आणत होतं. अंकिताला त्याची कल्पनाही नव्हती. तिला उमेशने क्लासेस join केल्यापासूनचे त्याच्या बरोबरचे प्रसंग आठवत होते. दिसायला रुबाबदार, अतिशय संवेदनशील, तिचा आदर करणारा, मदतीला तत्पर असलेला, हुशार उमेश तिच्या मनाला व्यापून टाकत होता.
मानसीने श्रीरंगला कॉफी आणून दिली. त्याने पहिला घोट घेतला आणि तेवढ्यात मानसीला सौरभचा फोन आला. मानसीने घाईत फोन घेतला.
मानसी- हाय…
सौरभ- हाय…
मानसी- कसा आहेस?
सौरभ- ठीक आहे मी. तू कशी आहेस?
मानसी- तुझी काळजी करत होते. Sorry यार…तू माझा मेसेज वाचलास ना?
सौरभ- हम्म..म्हणूनच फोन केला मी…आणि प्लीज baby तू sorry नको बोलू. चूक माझी आहे. मी तुला तिथे एकटीला सोडून गेलो. तू किती hurt झाली असशील मला माहित आहे. पण मी हेल्पलेस आहे. पण चूक माझीच आहे ना? मी तुला लग्नच प्रॉमिस दिलंय आणि संसार अंकिता बरोबर करतोय. भले तो मोडलेला असेल. पण संपलेला नाहीये….आणि त्यामुळे तू suffer करते आहेस…
मानसी- हम्म…मी समजू शकते…पण तुझी आई ….तिला काय सांगणार ना? आणि मला आपलं लग्न कोणाचाही जीव घेऊन व्हायला नकोय.
सौरभ- किती understanding आहेस तू. म्हणूनच माझं प्रेम आहे तुझ्यावर. खूप कंटाळलो आहे मी. थकलो आहे. प्लीज आज रात्री तुझ्याकडे येऊ का राहायला?
त्याचा हा प्रश्न ऐकून मानसीने डोळ्याच्या कोपऱ्यातून श्रीरंगकडे पाहिलं. तिला कल्पना नव्हती श्रीरंग रात्री किती वाजता हॉटेलवर जाईल. तो असताना सौरभ आला तर श्रीरंग नक्की चिडेल हे तिला माहित होतं. त्यामुळे ती थोडी गोंधळली.
सौरभ- काय झालं? हेलो…
मानसी- न..नको…आज नको…
सौरभ- का काय झालं?
मानसी- काही झालं नाही. पण मलाच बरं वाटत नाहीये. मला लवकर झोपायचं आहे आज.
हे वाक्य ऐकून श्रीरंगने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला हसू आलं.
सौरभ- मग झोप ना..मी कुठे जागी ठेवणार आहे तुला.
आपल्याच जोकवर सौरभ हसला. मानसीला somehow तो जोक आवडला नाही. ती थोडी चिडून म्हणाली-
मानसी- मी म्हणाले ना नको म्हणून? मग ऐक ना.
सौरभ- ओके ठीक आहे. चिडायला काय झालं. बाय ठेवतो फोन. डोकं शांत झालं की फोन कर. तुम्ही बायका ना…कधीच सुधारणार नाही.
त्याने रागाने फोन कट केला. मानसी पण चिडली होती.
श्रीरंग- कोणाचा फोन? तुझ्या लग्नाच्या promise चा?
हे ऐकून मानसी आणखी चिडली आणि म्हणाली-
मानसी- ए रंगा…तुला मला त्रास द्यायचा असेल ना तर तू पण…
श्रीरंग- मी पण काय? मी पण नाहीये. मी एकटाच आहे. माझ्यासारखा दुसरं कोणीच नाहीये. त्यामुळे तू मला कधीची तू पण म्हणू नको. मी रंगा आहे. आणि रंगा आणि सौरभमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.
मानसी- ओके यार. Sorry. बास? तुझा आज प्लॅन काय आहे? इथेच थांबतो आहेस की इतर काही काम आहे आज?
श्रीरंग- आहे तर. महत्त्वाचं काम आहे.
मानसी- काय रे?
श्रीरंग- आपल्या लग्नाची तयारी.
मानसी- मार खाशील हा रंगा. नीट बोल ना रे प्लीज.
श्रीरंग- काही प्लॅन नाहीये. मला झोप येत्येय जेट lag मुळे. हॉटेलला जाऊन झोपणार आहे मी. चल पळतो. रात्री भेटू डिनरला जाऊ. तुझा लाडक्या सौरभबरोबर काही प्लॅन नाहीये ना?
मानसी- नाही…
श्रीरंग- cool…मी फोन करतो. साधारण सातला भेटू. ओके? बाय…
हे बोलून श्रीरंग निघून गेला. मानसी विचार करू लागली की आज उशिरा का होईना. पण ऑफिसला जाते. घरी बसून काय करू? हा निर्णय झाल्यावर तिने पटापट आवरायला सुरुवात केली.
श्रीरंगची कॅब अंकिताच्या क्लासजवळ थांबली. पायऱ्या चढून तो रिसेप्शनजवळ आला. तिथल्या मुलीने त्याचं स्वागत करून येण्याचं कारण विचारलं.
श्रीरंग- इथे अंकिता madam शिकवतात ना?
मुलगी- हो सर…हे त्यांचेच क्लासेस आहेत. तुम्ही?
श्रीरंग- मी…मी parent आहे. दहावी सायन्सला मुलाची admission करायची आहे. अंकिता madam भेटतील का?
मुलगी- नाही madam कोणाला भेटत नाहीत. तुम्ही उमेश सरांना भेटा. ते तुम्हाला माहिती देतील.
श्रीरंग- ओके. चालेल.
मुलीने श्रीरंगला मीटिंग रूममध्ये बसवलं आणि ती उमेशला बोलवायला गेली. श्रीरंग वाट बघत होता. प्यूनने पाणी आणून दिलं. ते पिऊन होतंय तोवर उमेश आला.
उमेश- हेलो सर. मी उमेश सर…
श्रीरंग- हेलो…मी श्रीरंग…
दोघांनी shake hand केला. समोरासमोर बसले.
उमेश- बोला सर. काय माहिती हवी आहे?
श्रीरंग- अंकिता madam…
उमेश- त्या क्लासच्या owner आहेत.
श्रीरंग- त्या भेटत नाहीत कोणाला असं ती मुलगी म्हणाली.
उमेश- नाही असं काही नाहीये. त्या पालकांना नेहमीच भेटतात. पण त्यांची तब्येत बरी नाहीये त्यामुळे त्या क्लासला आज आल्या नाहीयेत. मी देतो तुम्हाला सविस्तर माहिती.
श्रीरंग- तुम्ही पण इथे सुरुवातीपासून आहात का?
उमेश- अगदी सुरुवातीपासून नाही. पण बरीच वर्षं आहे मी इथे. अंकिता madamची मेहनत, त्याचं dedication मी जवळून पाहिलं आहे. हे क्लासेस म्हणजे त्यांचा श्वास आहेत.
श्रीरंग- अरे वा.. पण इतकी मोठी institute चालवणाऱ्या madam खूप strict असतील ना?
उमेश- अक्रोड..अक्रोड आहेत madam.
श्रीरंग- म्हणजे?
उमेश- म्हणजे त्या बाहेरून खूप कडक आणि strict आहेत. ते असायलाच हवं ना? आणि त्या फार स्पष्ट बोलतात. अगदी अनेक लोकांना फटकळ वाटावं इतकं स्पष्ट. हा त्यांचा स्वभाव आहे. चिडतात पण लवकर. पण आतून मात्र अक्रोड कसा मऊ असतो, तशा मऊ आहेत. सगळ्या स्टाफची काळजी घेतात. Madam काय आहेत ते फार थोड्या लोकांना माहितीये.
श्रीरंग- आणि तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात?
उमेश- नक्कीच…
अंकिताबद्दल बोलताना उमेशच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान, आनंद आणि प्रेम श्रीरंगने नोटीस केलं. उमेश नकळत क्लास ऐवजी अंकिताबद्दलच बोलत होता आणि श्रीरंगला तेच हवं होतं.
श्रीरंग- अरे वा. मस्तच. Madam एकट्याच क्लास चालवतात की त्यांचे husband किंवा कोणी नातेवाईक…
त्याच वाक्याच्या मधेच तोडत उमेश म्हणाला-
उमेश- आम्ही आहोत ना…कशाला madamचे नातेवाईक हवे इथे? आम्ही सगळे madamना मदत करतो हवी ती. आणि तशाही madam त्यांच्या family ला क्लासेसमध्ये involve करत नाहीत. सौरभ सर कधीच क्लासला आलेले नाहीत.
श्रीरंग- hmm..ओके…कदाचित त्याचं पटत नसेल एकमेकांशी.
उमेश- हम्म..पण काय करणार ना? लग्न झाल्यावर माणूस अडकतो. असं पटकन बाहेर पडता येत नाही मतभेद असले तरी.
उमेश हे बोलून गेला आणि त्याच्या लक्षात आलं की तो एका पालकाशी बोलतो आहे. तो पटकन सावरून घेत म्हणाला-
उमेश- ज्याचं त्याचं personal life. आपल्याला काय. तुम्हाला कोणाची admission करायची आहे?
श्रीरंग- नाही. मला कोणाचीच admission करायची नाहीये. मी अंकिताची माहिती घ्यायला…तिला भेटायला आलो होतो. पण आपली भेट झाली हे जास्त चांगलं झालंय. एक काम कर. तुझा…मी तुला अरे तुरे केलं तर चालेल ना? माझ्याहून लहान आहेस तू बहुतेक.
हे ऐकून उमेश चक्रावला होता. त्यातच तो म्हणून गेला.
उमेश- हो चालेल ना…
श्रीरंग- ग्रेट. तुला चार वाजता समोरच्या कॅफेमध्ये भेटता येईल का मला? आपण डिटेलमध्ये बोलू.
उमेश- पण तुम्ही…
श्रीरंग- चार वाजता सांगतो सगळं. आता निघतो. तुझा नंबर दे प्लीज.
उमेशने त्याचा नंबर दिला. श्रीरंगने त्याला कॉल केला.
श्रीरंग- माझा नंबर सेव्ह कर. भेटूया.
इतकं म्हणून श्रीरंग मीटिंग रूममधून बाहेर पडला. त्याच्या मागे उमेश होता आणि अंकिता त्याच वेळी क्लासमध्ये आली. श्रीरंग आणि उमेशला तिने बाहेर पडताना पाहिलं. ती श्रीरंगकडे टक लावून बघत होती आणि श्रीरंग तिच्याकडे..
क्रमश:
पुढील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ६- स्थळ आलं.
आधीच्या भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ४- The Guilt
हे पण वाचा- मृगजळ सीझन १ सर्व भाग- मृगजळ- सर्व भाग
गुंतता हृदय सर्व भाग – गुंतता हृदय – सर्व भाग
ट्वेंटी थ्री कादंबरी- ट्वेंटी थ्री
सख्या रे कादंबरी- सख्या रे …
आमच्या लघु कथा – लघुकथा
सिनेमा विषयक- फिल्लमबाजी

Waiting for hew twist.