मृगजळ सीझन २ भाग २ | गिफ्ट
सौरभने हात पुढे करून उमेशशी हस्तांदोलन केलं. आता डोळे उघडलेली अंकिता त्या
दोघांना हस्तांदोलन करताना बघत होती. सौरभला क्षणभर काय बोलावं तेच लक्षात आलं
नाही. मग तो म्हणाला-
सौरभ- ओह thanks..मी..मी सौरभ..अंकिताचा नवरा.
उमेश- ओह ओके…
दोन क्षण awkward सायलेन्स होता. मग उमेश म्हणाला-
उमेश- madam मी येतो. आता तुमचे मिस्टर पण आले
आहेत..लवकर बऱ्या व्हा. आणि क्लासेसची काळजी करू नका. आम्ही manage करू सगळं व्यवस्थित. तुम्ही फार स्ट्रेस घेता. तो कमी करा. जान है तो जहान है.
Stress फक्त stress देतो. सोल्युशन नाही. स्ट्रेस कमी
करा. मग शुगर कमी होणार नाही.
हे बोलून तो हसला. अंकितालाही हसू आलं.
अंकिता- धन्यवाद उमेश सर. तुम्ही मला सावरलंत आणि इथे घेऊन आलात.
उमेश- त्यात धन्यवाद काय? आता मला सांगा तुम्ही माझ्या समोर
पडत असताना मी उभा राहून बघायचं का की madam कशा पडतात ते पाहूया म्हणून? बरं पडल्यावर पण बघत बसायचं का की कशा काय दिसतात madam पडल्यावर? मठ्ठ विद्यार्थी गणिताच्या पेपर
कडे असे बघत बसतात. मी गणिताचा शिक्षक आहे. माझ्याकडे उत्तरे असतात सगळ्यांची.
म्हणूनच मी तुम्हाला पडताना आणि पडल्यावर बघत न बसता जे आवश्यक होतं ते केलं. काय सौरभ
सर? बरोबर ना?
सौरभ- हो…अगदी बरोबर…
उमेश- चला. मग मी येतो. आता तुमचे मिस्टर आले आहेत. म्हणजे तयार उत्तर
पत्रिकाच मिळाली आहे तुम्हाला. आता शिक्षकाची, म्हणजे माझी गरज नाही.
असं म्हणून तो निघाला आणि अंकिताने त्याला हाक मारली-
अंकिता- सर…
तो थांबला. वळून म्हणाला-
उमेश- काय madam?
अंकिता- तू..तुम्ही जाऊ नका. बाहेर थांबा प्लीज. मला क्लासबद्दल बोलायचं आहे.
सौरभ दहा मिनिटांत जाईल.
उमेश- ओके.. मी बाहेर थांबतो.
हे बोलून उमेश बाहेर गेला. रूममध्ये सौरभ आणि अंकिता उरले. अंकिता आढ्याकडे
बघत पडून राहिली. सौरभ शेजारी बसून होता. काही सेकंद शांतता. मग सौरभ म्हणाला-
सौरभ- बरं वाटतंय ना आता?
अंकिता- कामवाल्या बाईला दोन हजार रुपये advance हवे होते. ते टीव्ही जवळ निळी डबी आहे ना त्यात ठेवलेत. संध्याकाळी ती येणार
आहे. तिला दे. हर्शुचा फोन आला होता. तो येतोय. त्याच्यासाठी मी सेकंड floor वर मंजिरीला डबा सांगितला आहे. पुण्यात बाहेरच खातो रोज. आज घरगुती खाऊ दे.
तू घरी जाताना मंजिरीकडून तो डबा घेऊन जा..
सौरभ- ओके..तू..
अंकिता- मला उद्या सोडणार म्हणालेत डॉक्टर..मी येईन घरी.
सौरभ- पण..
अंकिता- तू निघालास तरी चालेल. मला उमेश सरांशी क्लासबद्दल बोलायचं आहे.
कदाचित पुढले दोन दिवस मला जाता येणार नाही. मला त्याची arrangement करावी लागेल. जाताना सर बाहेर असतील तर त्यांना पाठवून दे आत.
सौरभ यांत्रिकपणे उठला. काहीही न बोलता निघाला. बाहेर उमेश होताच. दोघांनी
स्माईल एक्स्चेंज केलं. सौरभ गेल्यावर उमेशने दरवाजा हळूच ढकलला आणि तो रूममध्ये
आला. त्याला पाहून अंकिता बोलू लागली-
अंकिता- सर आता दोन दिवस कदाचित मी येऊ शकणार..
तिला मध्येच तोडत उमेश म्हणाला-
उमेश- madam तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये का?
अंकिता- म्हणजे?
उमेश- म्हणजे तुम्ही दोन दिवस आला नाहीत तर आम्ही क्लास चालवू शकणार नाही असं
वाटत का तुम्हाला? म्हणजे कदाचित तुमच्या इतका
सफाईदारपणे नाही चालवू शकतो नाही तरी रांगेल इतपत तरी काहीतरी करू आम्ही.
हे ऐकून अंकिताला जोरात हसू आलं. ते पाहून उमेश म्हणाला-
उमेश- आता कसं. हे बेस्ट आहे. हास्य, आनंद हे स्ट्रेसवर सगळ्यात उत्तम
औषध आहे. अशाच हसत राहा की परत कधीच आजारी पडणार नाही तुम्ही. पण एकूणच तुम्ही
फार कमी हसता madam. बघावं तेव्हा काम, टेन्शन आणि धावपळ करत असता. मी तर तुम्ही इतक्या मोकळेपणाने हसल्यावर क्षणभर
ओळखलं नाही तुम्हाला.
अंकिता- का?
उमेश- अहो किती छान दिसता तुम्ही हसल्यावर. आणि क्लासमध्ये सतत टेन्स असता.
त्यामुळे क्लासमधल्या अंकिता madam आणि ह्या हसणाऱ्या madam एकच आहेत का असा संभ्रम निर्माण झाला.
उमेश हे अगदी सहज बोलून गेला पण अंकिताने त्याच्याकडे चमकून पाहिलं. उमेश
म्हणजे सरळमार्गी मनुष्य. गणितातला पापड म्हणावा असा. जगात असं कोणतंच गणित नसेल जे
उमेशला सोडवता येणार नाही. मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय. गणित विषय अत्यंत खुलवून
शिकवणारा. गरज पडल्यास मुलांबरोबर क्लासनंतरही बसून त्यांचे प्रॉब्लेम सोडवणारा. अनेक
वर्षं अंथरुणाला खिळलेल्या आई-वडिलांची सेवा करत होता. लग्न करून बायको घरी आणली तर
ती कदाचित आई-वडिलांपासून आपल्याला तोडेल अशा भीतीने त्याने लग्नच केलं नव्हतं.
चार वर्षांपूर्वी वडील गेले आणि गेल्या वर्षी आई गेली आणि तो मोकळा झाला. पण आता
लग्नाचं वय पण निघून गेलं होतं. उमेश पन्नाशीकडे झुकला होता. त्यामुळे आता उरलेलं
आयुष्य विद्यार्थ्यांना गणित शिकवण्यात आणि गाणे शिकण्यात घालवायचं ठरवून त्याने
शास्त्रीय संगीताचा क्लास लावला होता. रोज सकाळी jogging, व्यायाम, मग अंकिताच्या क्लासमध्ये नोकरी
आणि संध्याकाळी साडेसात वाजता गाण्याचा क्लास, मग स्वतःच्या हाताने घरी स्वयंपाक, जेवण आणि झोप असा त्याचा दिनक्रम
होता. अंकिताच्या क्लासेसमधल्या सर्वात जुन्या शिक्षकांपैकी उमेश एक होता. अतिशय
नम्र, सभ्य. आणि तोच उमेश आज अंकिताला तोंडावर सुंदर म्हणाला होता त्यामुळे
अंकिताला आश्चर्य वाटलं होतं. मनातल्या मनात ती कुठेतरी सुखावली होती हे तिच्याही
लक्षात आलं नव्हतं. म्हणून ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती. इतक्यात उमेशने
खिशातून हळूच एक chocolate काढलं आणि अंकिताच्या समोर धरून
तो म्हणाला-
उमेश- madam, happy valentines day.
आपल्या डोळ्यासमोर दिसत असलेलं ते chocolate पाहून अंकिताचे डोळे
चुरचुरू लागले. त्यातून बाहेर यायला आतुर असलेले अश्रू तिने मोठ्या प्रयत्नांनी
रोखले. आज अनेक वर्षांनी कोणीतरी तिला valentines day साठी wish करून काहीतरी भेट देत होतं. तिने
घशात आलेला आवंढा गिळला आणि ते chocolate घेतलं.
अंकिता- thank you सर. तुम्हालाही शुभेच्छा.
उमेश- धन्यवाद. अहो गम्मत काय झाली, मी बाहेर थांबलो होतो ना तेव्हा
कॉरिडोरमध्ये एका माणसाने एका नर्सला wish करून गिफ्ट दिलं. तेव्हा लक्षात आलं
की आज valentines day आहे म्हणून. नाहीतर क्लासमध्ये
शिकवताना कुठला दिवस आहे तेच माहित नसतं. फक्त दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्ट्या
माहित असतात. म्हटलं पटकन खाली गेलो आणि केमिस्टच्या दुकानातून हे chocolate घेऊन आलो तुमच्यासाठी. म्हटलं, तुम्हाला wish करावं.
तो बोलत असताना अंकिता ऐकत त्याच्याकडे बघत होती. त्याच्या चेहऱ्यावर दिसत
असलेला सच्चेपणा, सज्जनपणा, पारदर्शकता आणि अर्थात हुशारी तिला सुखावत होती. आणि मगाशी येऊन गेलेल्या
सौरभच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या टेन्शन, खोटेपणा, चंचलता ह्याच्या अगदी विरुद्ध असे ते भाव होते. ती तिच्याच विचारात हरवून
उमेशकडे बघत होती तेव्हा उमेश म्हणाला-
उमेश- madam तू..तुम्ही रागावलात ना? म्हणजे मी तुम्हाला त्या अर्थाने chocolate देत नाहीये…म्हणजे valentines day ज्यासाठी साजरा करतात त्या
अर्थाने…मी वाचलेलं आहे…नुसती मैत्री असली किंवा आदर असला तरी ह्या दिवशी
गिफ्ट देता येतं…त्यामुळे…sorry तुम्हाला आवडलं नसेल तर…म्हणजे तुमच्या
सौरभ रावांनी तुम्हाला तसं गिफ्ट दिलंच असेल ना आता मगाशी…माझ chocolate म्हणजे आपला कलीग म्हणून शुभेच्छा म्हणून…पण..न..नको असेल तर नाही
देत…प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका,
असं म्हणून त्याने अंकितासमोर धरलेलं chocolate मागे घेतलं आणि खिशात टाकू लागला तेव्हा अंकिता म्हणाली-
अंकिता- अहो सर तसं काही नाही. मी अजिबात काहीही गैरसमज वगैरे करून घेतलेला
नाहीये. द्या ते chocolate इथे.
हे ऐकून उमेशने तिला chocolate दिलं. तिने ते उघडून
अर्धं स्वतः खाऊन अर्धं उमेशला दिलं आणि म्हणाली-
अंकिता- सर तुम्हालाही valentines day च्या शुभेच्छा.
दोघे chocolate खात एकमेकांना बघत स्माईल करत होते.
इथे मानसीची दोन ड्रिंक झाली होती. सौरभ अचानक निघून गेल्याने उरलेला दिवस
तिला खायला उठणार होता. तिच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं होतं. सौरभ तिचा असूनही
पूर्णपणे तिचा नव्हता. गेली दहा बारा वर्षं ती ज्या मृगजळाच्या मागे धावत होती ते
अजूनही खूप दूर होतं. तिने बिल पे केलं आणि रागातच घरी आली. कपडे बदलून एक सिगारेट
पेटवून विचार करत राहिली. तिला काय करावं सुचत नव्हतं. इतक्यात सौरभचा फोन आला.
त्याचं नाव डिस्प्ले होत होतं. तिने रागाने फोन कट करून त्याचा नंबर ब्लॉक केला. ती प्रचंड चिडली होती स्वतःवरच. तिने त्याच रागात श्रीरंगला व्हिडीओ
कॉल लावला. त्याच्याकडे आत्ता मध्यरात्र असेल हे विसरून. श्रीरंग गाढ झोपेत होता. एमिली
त्याच्या अंगावर एक हात आणि एक पाय टाकून त्याला मिठी मारून झोपली होती. मानसीचा
फोन आल्यावर श्रीरंग दचकून जागा झाला. मानसीचा फोन आहे पाहून एमिलीला बाजूला सारून
उठून तो बाल्कनीमध्ये आला आणि त्याने फोन घेतला.
श्रीरंग- काय ग, ह्यावेळी फोन? All well?
मानसी- रंगा..मी खूप दमले आहे…I am too tired..मला असं जगायची अजिबात इच्छा नाहीये. मला जायचं आहे.
असं म्हणून तिने हातात धरलेली सुरी फोन धरलेल्या हाताच्या मनगटाजवळ आणली. तिचा
चेहरा निर्विकार होता. ते पाहून श्रीरंग हादरला.
श्रीरंग- मानसी…एक..एक मिनिट…ऐक माझं…
मानसी ट्रान्समध्ये गेल्यासारखी फोनमध्ये बघत होती. श्रीरंग भीतीने थरथरत
होता. सुरा मानसीच्या मनगटाजवळ आला होता.
क्रमश:
पुढील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ३- आकर्षण
मागील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग १ | valentines day
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

Interesting
[…] मागील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग २ | गिफ्ट […]