मृगजळ सीझन २ भाग १ | valentines day
गोव्याहून परत आल्यावर मानसीचं रुटीन सुरू झालं. सौरभ देखील त्याच्या कामात गढून गेला. सौरभच्या आईने त्याला स्वतःची शपथ घातली होती. तिने त्याला बजावून सांगितलं होतं की त्याने जर अंकिताला डिव्होर्स दिला आणि मानसीशी लग्न केलं तर ती जीव देईल. सौरभने तिला स्पष्ट सांगितलं होतं की तो मानसीशी लग्न करणार नाही. त्याने मानसीला आईच्या तब्येतीचं कारण सांगितलं. आपल्या लग्नाच्या निर्णयाबद्दल कळलं तर आईला heart attack येईल असं सांगून त्याने मानसीकडून आई जिवंत असेपर्यंतचा वेळ मागून घेतला होता. मानसीला त्याचा प्रचंड त्रास होत होता पण आईच्या जीवाचा प्रश्न असल्याने ती गप्प बसली होती.
त्या दिवशी Valentine’s Day होता. मानसीने ऑफिसला रजा घेतली होती. सकाळी उठून तिने सौरभला मेसेज केला.
मानसी- Happy Valentine’s Day.
सौरभ- Thanks. Wish you the same.
मानसी- लंचला भेटूया ना? Garden रेस्टॉरंटमध्ये?
सौरभ- हो. शार्प १ वाजता भेटू.
मानसी- माझं गिफ्ट तयार आहे ना? काय घेतलं आहेस सांग ना प्लीज.
हे ऐकून सौरभने जीभ चावली. तो गिफ्ट घ्यायला विसरला होता.
सौरभ- ते.. ते.. सरप्राईज आहे. भेटू तेव्हा स्वतःच बघ.
मानसी- ए प्लीज सांगा ना काय आहे ते.
सौरभ- नाही. सांगितलं तर सरप्राईज कसं राहील? थोड्या तासांचा प्रश्न आहे. मग बघशीलच. आणि माझ्यासाठी काय गिफ्ट घेतलं आहेस तू?
मानसी- ते मी पण का सांगू? भेटू तेव्हा बघ.
मानसी- ओके ठीक आहे. Happy Valentine’s Day.
सौरभ- बाय…
तिच्याशी बोलून झाल्यावर सौरभ टेन्शनमध्ये आला.
सौरभ- आय आता हिला गिफ्ट काय देऊ? कशाला हे असले फालतू दिवस सेलिब्रेट करतात काय माहित. आता गिफ्टसाठी होणारा खर्च काय तो सेंट Valentine स्वतः देणार आहे का आम्हाला? आणि सेलिब्रेट करू नको म्हणालो तर मानसी लगेच चिडणार. गेल्या दहा वर्षांचा इतिहास काढणार. मी किती वाईट आहे ह्याचे पाढे वाचणार. श्या… काय गिफ्ट घेऊ आता. स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ पाहिजे.
सौरभ चिडून डोक्याला हात लावून बसला असतानाच त्याला काहीतरी सुचलं. ते आठवून तो खुश झाला.
इथे मानसीच्या घरी ती आरशासमोर उभी होती. तिने घातलेला नवीन ड्रेस कसा दिसतोय ते बघत होती. इतक्यात तिला श्रीरंगचा फोन आला.
मानसी- हाय…
श्रीरंग- Happy Valentine’s Day.
मानसी- Thank you. एमिलीला wish केलंस की नाही?
श्रीरंग- ती इथेच आहे माझ्याबरोबर. आम्ही दोघे एका आयलंडवर आलोय सेलिब्रेट करायला.
मानसी- हो का? मस्तच.
श्रीरंग- ड्रेस कसा वाटला सांग.
मानसी- खूप सुंदर आहे. परफेक्ट बसला. पण तू…
श्रीरंग- मी कशाला इतका महागडा ड्रेस पाठवला असंच ना?
मानसी- हो… एमिलीला द्यायचा ना ड्रेस. मला कशाला उगाच. मी काय तुझी Valentine आहे का?
श्रीरंग- तू माझी काय आहेस ते तुला माहित आहे मानसी. आणि तुला भेटून आल्यापासून तर इतकी वर्षं विसरलेलं प्रेम आणखी जास्त जाणवू लागलं आहे. One-sided असलं तरी माझं प्रेम genuine आहे. तुला सगळं माहित आहे. त्यामुळे गिफ्ट का दिल हा प्रश्न प्लीज विचारू नको.
मानसी- (त्याची मस्करी करत) अरे पण मी असं म्हणताच नव्हते. तू माझं वाक्य तोडून मध्ये बोललास. मी विचारात होते की तू इतका परफेक्ट साईझचा ड्रेस कसा काय ऑर्डर केलास?
श्रीरंगने तिचा चेष्टेचा मूड ओळखला आणि तो म्हणाला-
श्रीरंग- त्याचं काय आहे ना… तुला इतक्या वर्षांनी भेटलो, नीट पाहून डोळ्यात साठवून ठेवली आहे. मग ड्रेस ऑर्डर करताना डोळे बंद करून तुला फक्त आठवली. हळूहळू तुला न्याहाळत साईझ नीट बघत अंदाज लावला. आणि बघ फक्त नजरेने लावलेला माझा अंदाज किती परफेक्ट आला ते.
हे ऐकून मानसी लाजली आणि खोट्या रागाने म्हणाली-
मानसी- नालायका. लाज नाही वाटत आपल्या मैत्रिणीबद्दल असं बोलायला? फेकू नको तू. सांग ना.. कसं कळलं ते.
श्रीरंग- त्या दिवशी तुझ्या घरी होतो ना तेव्हा बघ, तुझे इस्त्रीचे कपडे आणून दिले त्या माणसाने?
मानसी- हम्म…
श्रीरंग- तेव्हा त्यात सर्वात वर एक maroon रंगाचा ड्रेस होता इस्त्री केलेला. मी त्याचं लेबल पाहिलं. आणि लक्षात ठेवलं. मी पाठवलेला ड्रेस सेम brand आणि सेम साईझचा आहे.
मानसी- ओह… कमाल आहेस तू रंगा.
श्रीरंग- तो तर आहेच मी. प्लीज आज मी दिलेला ड्रेस घालशील?
मानसी- घातला आहे ऑलरेडी.
श्रीरंग- मग फोटो पाठव मला. त्या ड्रेसमध्ये कशी दिसतेस बघायचं आहे.
मानसी- पाठवते. आणि thank you.. ड्रेस खूप छान आहे.
श्रीरंग- ड्रेसपेक्षा माझी Valentine छान आहे. म्हणून तो ड्रेस छान वाटतोय.
मानसी- बास आता लाईन मारणं. एमिली चिडेल.
श्रीरंग- अजिबात नाही. मी तिला लग्न वगैरे प्रॉमिस केलेलं नाहीये. जे आहे ते स्पष्ट आहे आमच्यात. त्यामुळे आमचं sorted आहे. तुमच्या लग्नाला मला नक्की बोलाव.
हे ऐकून मानसी जरा गप्प बसली. तिचा मूड ठीक करायला श्रीरंग म्हणाला-
श्रीरंग- आज प्लॅन काय आहे तुमचा?
मानसी- लंच… आणि नंतर मूव्ही. नंतर काय ते तेव्हाच ठरवू.
श्रीरंग- ओके बाय.. एन्जॉय…
मानसी- बाय…
मानसीने फोन कट केल्यावर आरशात पाहिलं. ड्रेस खरंच खूप सुंदर होता. तिने आरशात दिसणाऱ्या स्वतःचा फोटो काढला आणि श्रीरंगला पाठवला. श्रीरंगशी बोलल्यावर तिला छान वाटत होतं. मग सौरभची आठवण होऊन ती त्याला भेटायला बाहेर पडली.
सौरभ गार्डन रेस्टॉरंटमध्ये मानसीची वाट बघत होता. मानसी आली. श्रीरंगने दिलेल्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. सौरभ तिच्याकडे बघत हरवून गेला. मानसी त्याच्या समोर आली. त्याला मिठी मारून तिने wish केलं.
मानसी- Happy Valentine’s Day baby..
सौरभ- Wishing you the same..
दोघे टेबलवर येऊन बसले.
सौरभ- हा ड्रेस मस्त आहे. कधी घेतलास?
मानसी- मस्त आहे ना? रंगाने गिफ्ट दिला आहे. Valentine’s Day गिफ्ट.
ते ऐकताच सौरभचा चेहरा उतरला. ते मानसीच्या लक्षात आलं. ती म्हणाली-
मानसी- जेलस? How sweet… अरे वेड्या, आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस आहे. आपल्याला आवडणाऱ्या कोणालाही गिफ्ट देता येतं. म्हणजे आईने मुलाला, मुलांनी वडिलांना, मित्राने मैत्रिणीला.. फक्त romantic रिलेशनवाल्या लोकांचा नाहीये आजचा दिवस. रंगा माझा चांगला मित्र आहे आणि त्याने गिफ्ट दिलंय.
सौरभ- त्याने दिलं आणि तू घेतलंस.
मानसी- सौरभ प्लीज. मी तुला सहज सांगू शकले असते की मी हा ड्रेस विकत घेतला म्हणून. पण मी तुझ्याशी खोटं बोलत नाही म्हणून मी तुला जे आहे ते सांगितलं. आता प्लीज काहीतरी वाद काढून आपला दिवस स्पॉईल करू नको. प्लीज यार…
असं बोलून तिने पर्समधून गिफ्ट wrap केलेला बॉक्स काढून त्याला दिला.
मानसी – हे तुझं गिफ्ट. माझं गिफ्ट कुठे आहे?
सौरभ तिने दिलेलं गिफ्ट उघडू लागला. त्यात दोन महागडे टी-शर्ट, एक जीन्स आणि एक इम्पोर्टेड परफ्युम होते. किंमत नक्कीच पंधरा ते वीस हजार असेल.
सौरभ- Wow. खूप मस्त गिफ्ट आहे. Thanks.
मानसी- आणि माझं गिफ्ट?
हे ऐकल्यावर सौरभने खिशातून एक एन्व्हलप काढून तिच्यासमोर धरलं. मानसीने ते घाईत घेऊन उघडलं. त्यात सिनेमाची दोन तिकिटं होती.
सौरभ- आज माझ्या Valentine ला माझ्यातर्फे हा लंच, संध्याकाळी सिनेमा, संपूर्ण दिवस माझी साथ आणि रात्री माझ्या प्रेमाची बरसात असं गिफ्ट मी देत आहे.
ते पाहून मानसी क्षणभर जरा अपसेट झाली. पण दिवसभर सौरभबरोबर घालवायला मिळणार ह्या विचाराने खुश होत म्हणाली.
मानसी- Wow सौरभ… खूप सुंदर गिफ्ट आहे. आजचा सबंध दिवस आपण एकत्र घालवणार आहोत ही कल्पनाच सुंदर आहे.
सौरभ- मग ऑर्डर करूया?
असं म्हणून सौरभने मेन्यू कार्ड बघायला सुरुवात केली. मानसी एका हातात असलेली सिनेमाची तिकिटं आणि तिने परिधान केलेला महागडा ड्रेस दोघांनाही बघत विचार करत होती.
अंकिताच्या क्लासमध्ये आज बरेच टीचर Valentine’s Day म्हणून रजेवर होते, उशिरा येणार होते, लवकर जाणार होते. अंकिता त्यामुळे वैतागलेली होती. तिला त्यांचे क्लास स्वतः घ्यावे लागल्याने आज सकाळपासून जवळजवळ चार तास सतत तिला शिकवावं लागलं होतं. ती चिडूनच तिच्या केबिनमध्ये बसली होती.
तेवढ्यात एक तरुण टीचर आली. अंकिताला wish करत म्हणाली-
टीचर- Happy Valentine’s Day mam.
अंकिता- ए एक मिनिट. तुझं लग्न झालंय का?
टीचर- नाही mam.
अंकिता- मग बरोबर आहे तुला आज प्रेमाच्या दिवशी इतकी एक्साईटमेंट वाटते आहे ते. एक लक्षात घे. हे प्रेम बीम काही नसतं जगात. पुरुष नावाची जमात एक नंबर खोटारडी आणि स्वार्थी असते.
टीचर- तुम्ही असं का म्हणता mam?
अंकिता- कारण माझं लग्न झालंय. तुझं झाल्यावर दोन वर्षांनी भेट. तेव्हा तू हेच म्हणत असशील.
ती बिचारी मुलगी खट्टू होऊन केबिनमधून बाहेर पडली. अंकिता वैतागलेली होती. तिला चक्कर आल्यासारखं वाटू लागलं. सकाळपासून असलेल्या कामाच्या स्ट्रेसमुळे तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती तशीच बाहेर आली आणि एक पायरी उतरू लागली. पण तिला तिथेच चक्कर आली आणि ती पडणार इतक्यात कोणीतरी तिला आधार दिला आणि तिची शुद्ध गेली.
मानसी आणि सौरभचा लंच झाला होता. दोघेही गप्पा मारत होते. सौरभ त्याला मिळालेली गिफ्ट पाहून खुश होता. मानसी सौरभबरोबर संपूर्ण दिवस मिळतोय म्हणून समाधानी होती. अर्थात रंगाने दिलेल्या ड्रेसमुळे खुश पण होती. इतक्यात त्याला हर्षदचा फोन आला.
सौरभ- बोल रे…
हर्षद- बाबा, आईला सिटी हॉस्पिटलमध्ये नेलंय.
सौरभ- काय? काय झालं?
हर्षद- चक्कर आली तिला क्लासमध्ये. तिथून स्टाफने तिला admit केली आहे. मला फोन आला आणि मी तुम्हाला करतोय. तुम्ही कुठे आहात?
हे ऐकून सौरभ चपापला.
सौरभ- मी ना? मी.. मी एका क्लायंटबरोबर आहे.
हर्षद- प्लीज तुम्ही हॉस्पिटलला जा. मी पुण्याहून निघतोय लगेच. पण मला यायला चार तास लागतील.
सौरभ- ओके ठीक आहे…
त्याने फोन कट केला आणि घाईत उठत तो म्हणाला-
सौरभ- अंकिता… ती.. तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. मला जावं लागेल. Sorry…
मानसी- ओह… तू.. तू जा लगेच… मी बिलच बघते…
सौरभ घाईत निघून गेला. मानसी शांत बसून होती. तिने एक ड्रिंक ऑर्डर केलं.
सौरभ सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. अंकिता कोणत्या रूममध्ये आहे विचारून तिथे धावत गेला. रूमचा दरवाजा उघडला तर अंकिता बेडवर झोपलेली होती. तिच्या शेजारी एक पन्नाशीतला माणूस तिचा हात हातात घेऊन बसला होता.
माणूस- mam, तुम्ही ठीक आहात ना? डॉक्टर म्हणालेत की काळजीचं कारण नाहीये… तुमची शुगर low झाली होती…
इतक्यात त्याचं लक्ष सौरभकडे गेलं. त्याने अंकिताचा हात सोडला आणि तो उभा राहिला आणि स्माईल करून सौरभकडे बघू लागला. सौरभ घाईत पुढे गेला आणि अंकिताला म्हणाला-
सौरभ- काय झालं अंकिता? तू ठीक आहेस ना?
माणूस- हो, त्या ठीक आहेत. काळजीचं कारण नाहीये. शुगर drop झाली होती पण आता ठीक आहेत.
सौरभने त्याच्याकडे वळून पाहिलं. त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला आणि तो म्हणाला-
माणूस- हाय. मी उमेश दिवेकर. Mam च्या क्लासेसमध्ये math शिकवतो. त्या माझ्या समोरच पडत होत्या. पण नशीब मला दिसल्या आणि मी त्यांना पडू दिलं नाही. मग लगेच इथे घेऊन आलो.
सौरभने हात पुढे करून उमेशशी हस्तांदोलन केलं. आता डोळे उघडलेली अंकिता त्या दोघांना हस्तांदोलन करताना बघत होती. नियती एका नवीन डावाचे पत्ते पिसत कर्कश्य हसत होती.
क्रमश:
पहिल्या सीझनच्या सर्व भागांची लिंक- मृगजळ- सर्व भाग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

खूप छान continuation.
एकदम पर्फेक्ट एकत्रीकरण!
कुठेही वेगळेपणा जाणवत नाहिये.
तुमचा नैसर्गिक, उत्स्फुर्तपणा जाणवतोय!
लिहत रहा!
धन्यवाद 🙏
आणखी एका नवीन पत्राची entry झाली आहे कथेत . पुढच्या भागाची उत्सुकता आहे .
मृगजळ सिझन १ चा शेवट माझं मन हेलावून गेला..मानसी आणि रंगा हे दोघे पुन्हा भेटणार नाही हे अगदी कुठे तरी मनाला लागून गेलं.. मृगजळ सिझन २ची घाबरत घाबरतच वाचायला सुरुवात केली.. सौरभ grey shaded character आहे..मानसी सौरभ नावाच्या मृगजळामागे धावत राहणार.. पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे..
Second part chi surwat chhan zaliye …..
[…] मागील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग १ | valentines day […]