चांद मातला | Mandar Jog

चांद मातला भाग ४

सकाळी सात वाजता अलार्मच्या आवाजाने मीराला जाग आली. शेजारी मोहित आणि मानस गाढ झोपले होते. आज दोन वाजता आपण रोहनला फोटोशूट साठी कबुल केलाय हे आठवून ती पटकन उठली स्वतःचं सगळं आवरून तिने चहा आणि ब्रेकफास्ट रेडी केला तोपर्यंत साडे आठ वाजले होते.

मोहित स्वतःच आवरून ब्रेकफास्ट करायला टेबलवर येऊन बसला.

मीरा – “अरे वा, आज एवढ्या लवकर उठून तयार पण झालास? तेही मी न उठवता? नाही तर मला तुला उठवायला रोज दहा वेळा हाका मारायला लागतात”.

मोहित – “अग हो तुला काल सांगायचं राहून गेलं आज दहा वाजता माझी एक क्लायंट सोबत महत्त्वाची मीटिंग आहे. सो आज लवकर बाहेर पडेन. नंतर मग ट्रॅफिक मुळे उशीर होतो. तू आज संध्याकाळ नंतर घरीच आहेस ना? कारण आज पिंपरी वरून माझे आई-बाबा यायचेत. कालच त्यांचा फोन आलेला पण मी तुला सांगायचं विसरलो.”

हे ऐकुन मीरा एकदम विचारात पडली, कारण तिने दोन वाजता रोहनला फोटोशूट साठी वेळ दिली होती. आता काय कराव बरं अशा विचारात असताना मोहितने तिला टिचकी वाजवून विचारलं “हॅलो, काय गं कुठे हरवलीस”?

मीरा – हा.. क.. क काही नाही… “ठीक आहे किती वाजेपर्यंत येणार आहेत आई बाबा”?

मोहित – संध्याकाळी पाच नंतर येतील. तुझं लक्ष कुठे असतं हल्ली मीरा? कधी सोशल मीडियावर नाहीतर कधी स्वतःच्याच तंद्रीत असतेस. मला आज रात्री यायला थोडा उशीर होईल. तुम्ही पाहिजे तर लवकर जेवून घ्या. मी तुला फोन करेनच. असं सांगून एका हातात बॅग घेऊन आणि एका हाताने मीराला मिठीत घेऊन तिच्या कपाळावर हलकेच मोहितने त्याचे ओठ टेकले. नंतर मग तिला बाय करून मोहित घराबाहेर पडला. मीराला स्वतःशीचं हसू येत होतं. चार वर्ष झाली आपल्या लग्नाला पण मोहित आपल्याला नेहमी असेच बाय करतो किती प्रेम करतो मोहित आपल्यावर…त्याच शेड्युल बिझी आहे. पण जमेल तसा वेळ तो आपल्याला देतो आणि आपण त्याला न सांगता हे फोटोशूट वैगरे…

आता काय करावं बरं असा विचार मीरा करत होती तेवढ्यात तिचा मेसेंजर वाजला. रोहनचा मेसेज होता.

रोहन – हाय मनू, तुला मनू म्हटलं तर चालेल ना ? आज तू येतेस ना, दुपारी दोन वाजता फोटोशूटला ?? मी वाट बघतोय माझ्या फ्लॅटचा अड्रेस मी तुला मेसेज करतोय. बाय भेटू मग दुपारी दोन वाजता आणि हो येताना तुझे दोन तीन ड्रेस आणि मेक अप किट घेऊन ये .. आपण वेगवेगळ्या ड्रेसेस मध्ये तुझं फोटोशूट करूया.. बाय

मीरा – “ओके, येते मी तू अॅड्रेस पाठव” असा रिप्लाय करून मीराने मेसेंजेर बंद केला. मानसला उठवले त्याचं सगळ आवरून त्याला स्कूल मधे सोडून घरी आली. मानसची शाळा तशी त्यांच्या घरापासून जवळ होती. आता घड्याळात बारा वाजलेले होते. एकीकडे मीराच्या मनामध्ये धाकधुक सुरू झाली होती. ती असं फोटोशूट वगैरे एका अनोळख्या व्यक्ती कडून पहिल्यांदाच करून घेणार होती. “काय करावं? आपण येतो अस सांगितलं पण”… अशी मीराची द्विधा मनस्थितीत झाली होती.

इकडे दहा वाजता बरिस्ता कॅफे मध्ये बसलेला रोहन मोहितची वाट बघत बसला होता. मोहित आल्यावर रोहनने दोन कॉफीची ऑर्डर दिली. कॉफी घेऊन झाल्यावर रोहनने एक envelope मोहितच्या हातात दिले.

रोहन – “बॉस तुम्हाला हवंय ते या envelope मध्ये आहे. आता मला जे हवय ते कबुल केल्याप्रमाणे तुम्ही मला द्या. मी आज जरा घाईत आहे. आपल्या डील बद्दल साधारण तुम्हाला माहीतच आहे. आपण याबद्दल नंतर सविस्तर बोलुयात.”

मोहित – ओके, ठिक आहे दोन दिवसांनी परत भेटूया, कधी ते मी तुला कळवतो पण यावेळी उशीर करू नकोस. नाहीतर माझे बॉस पण माझ्यावर भडकतील…असं बोलून मोहितने त्याच्या हातातले envelope रोहनकडे दिले. रोहनने envelope साधारण उघडून बघून आत असलेल्या नोटांच्या पुडक्याकडे बघितले. रोहनने पैसे ओके आहेत अशी डोळ्यांनी खुण केल्यावर मोहित उठला आणि तिथून निघून गेला.

वर्षभरापूर्वी पुण्यात आलेला रोहन आज खूप खुश होता. रोहनची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. तो परदेशातून शिकून आला असला तरी त्याने शिक्षणासाठी लोन काढलेलं होतं. त्यामुळे आता त्याला लवकरात लवकर कर्ज फेडायचं होतं. तसंच त्याला स्वतःचा फोटो स्टुडिओ पण काढायचा होता. रोहन एक नंबरचा नालायक माणूस होता. सोशल मीडिया वर सुंदर दिसणाऱ्या आणि लग्न झालेल्या बायकांशी फ्रेंडशिप करून त्यांचे फोटो काढून त्यांना तो आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असे. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून पैसे सुद्धा उकळवत असे. बऱ्याच जणींना त्याने फोटोशूटच्या नावाखाली फसवलेलं होत आणि बदनामी होऊ नये म्हणून बायका गप्प राहून त्याला पैसे देत असत. आज नवीन सावज जाळ्यात फसणार असं म्हणून तो मीराचे सोशल मीडियावरचे फोटो बघून स्वतःशीच हसत होता.

रेड कलरचा वन पीस आणि त्यावर हलकासा मेकअप केलेली, छानसा हेअर कट केलेले केस मोकळे सोडलेली मीरा रिक्षात बसली आणि रोहनने सांगितलेल्या अॅड्रेसवर थोडं लवकरच म्हणजे दीड वाजता पोहोचली. सासू सासरे येणार असल्यामुळे लवकर फोटोशूट करून घरी जायचा तिचा विचार होता. रोहनच्या फ्लॅटला कुलूप होते. रोहनच्या एका रेंटच्या फ्लॅटमध्ये राहत होता. ती रोहनच्या फ्लॅटच्या दाराबाहेर उभी राहते. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून खाली येणारी एक बाई तिच्याकडे टक लावून बघत असते. मीराला फार ऑकवर्ड फिलिंग झाले होते. ती बाई निघून गेल्यावर पाच मिनिटांनी रोहन आला. मीराला दिलेल्या वेळेपेक्षा थोडं आधीच आलेलं बघून तो जास्तच खूष झाला.

रोहन – “अरे वा, मीरा तू तर वेळेआधीच आलीस. फोटो शूट करून घ्यायची खूपच उत्सुकता लागली आहे वाटतं तुला… असं बोलून त्याने तिला हळूच एक डोळा मारला. रेड कलरच्या ड्रेस मध्ये मीरा एकदम सुंदर दिसत होती. रोहन तिच्याकडे एकटक बघतच बसला. मीराला आता जरा टेन्शन आलं होतं. भानावर आल्यावर रोहनने दार उघडून तिला” ये मीरा..ये.. वेलकम टू माय होम.. असं म्हणून घरात घेतले.

रोहनचं घर तसं ठिक ठाक होतं. म्हणजे एखाद्या बॅचलरच असत तसंच होतं. घरात थोडाफार पसाराही होता. त्याचे फोटोशूट साठीचे एक दोन मोठे महागडे कॅमेरे होते.

रोहन – “मीरा, रिलॅक्स! तू बस ना मी जरा फ्रेश होऊन येतो. तू फोटोशूटसाठी तयार राहा”. असं म्हणून रोहन आत गेला. थोड्या वेळात मीराच्या फोटोशूट ला सुरुवात झाली. एक-दोन फोटो काढून झाल्यावर मग “अग थांब मी सांगतो कशी पोझ दे, मान तिरकी कर.. हनुवटी अशी जरा खाली कर”.. असं सांगत रोहन मुद्दाम मीराच्या जवळ यायचा प्रयत्न करू लागला. त्याच्या हाताच्या होणाऱ्या स्पर्शामुळे तिच्या अंगावर काटा आला. रोहन होताच हँडसम त्यामुळे समोरच्यावर त्याचं पटकन इम्प्रेशन पडायचं. रोहन आता मीराच्या डोळ्यात बघत होता. त्याचे हात तिच्या कमरेभोवती होते. मीरा सुद्धा त्याच्याकडे बघण्यात हरवून गेलेली होती. इतक्यात मीराचा फोन वाजला. तशी मीरा पटकन भानावर आली. रोहनला पटकन बाजूला ढकलून तीने तिचा फोन उचलला. मोहितचा फोन होता.

मोहित – “अग मीरा कुठे आहेस तु?? आई-बाबा पाच वाजता नाही आत्ताच तीन वाजता येत आहेत. ते ऑन द वे आहेत. ते तुला फोन करत होते पण तुझा फोन लागला नाहीये म्हणून त्यांनी मला फोन केला”…

मोहितचा असा अचानक आलेला फोन बघून मीरा गडबडली…ती काहीच बोलत नव्हती. तिला प्रचंड घाम फुटला होता…

मोहित – “हॅलो मीरा अगं आवाज येतोय ना माझा तू कुठे आहेस? बाहेर असशील तर लवकर घरी जा… आई बाबा येतात”…

मीरा – “हो मी घरीच आहे अस मोहितला खोटच सांगून, रोहनच्या सोफ्यावर असलेली तिची पर्स उचलून ती दरवाज्याकडे धावत सुटली. रोहनला काय झालं हे समजायच्या आतच मीरा रोहनच्या घरातून बाहेर पडून गेली आणि मासा गळाला लागत असतानाच हातातून निसटून गेल्याचे बघून रोहनने मनातल्या मनात चरफडत फ्लॅटचा दरवाजा जोरात लावला.

रिक्षा भरधाव वेगाने मीराच्या घराकडे निघालेली होती. रिक्षात बसलेली मीरा निदान आजच्या दिवशी तरी एका मृगजळात अडकता अडकता वाचली होती….

क्रमश:

लेखिका – केतकी देवधर विद्वांस

पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग ५

मागील भागाची लिंक- चांद मातला भाग ३

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “चांद मातला भाग ४”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!