गणपती – तथास्तु
मनोहर दाबक्यांनी पुनरागमनायचं म्हणत थरथरत्या हाताने गणपतीच्या शिरावर अक्षता टाकल्या तेव्हा त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्यांनी सावकाश चालत जात डोक्यावर काळी टोपी घातली. मूर्तीसमोर येऊन त्यांनी हात जोडले. डोळे बंद केले.
साधारण पंधरा वर्षांपूर्वी अक्षय इंजिनियर झाला. अक्षय म्हणजे त्यांचा आणि सीमाताईंचा एकुलता एक मुलगा. शाळेपासून पहिल्या तिघांत येणारा! दोघांचा खूप लाडका. त्याला साधी सर्दी झाली तरी मनोहरराव रात्रभर त्याच्या उशाशी बसून जागे राहात! इंजिनियरिंगच्या प्रत्येक सेमिस्टर परीक्षेच्या प्रत्येक पेपराच्या वेळी त्यांनी ऑफिसला सुट्टी घेऊन अक्षयची अक्षरशः सेवा केली. सीमाताई रात्र रात्र जागून त्याला कॉफी बनवून देत असत. बदाम, पिस्ते, अक्रोड ह्यांचे डबे घरात सतत भरलेले असत! शेवटी अक्षय इंजिनियर झाला आणि घराचा गणपती मनोहररावांच्या नवसाला पावला! तो फेडायला म्हणून त्यांनी वचन दिल्यानुसार त्या दिवसापासून गोड खाणं सोडलं. अर्थात त्यामुळे तब्येतही बरी राहील हा विचार होता. पण अगदी दोन्ही जेवणात काही नसेल तरी पोळीशी गुळाचा खडा हमखास लागणाऱ्या मनोहररावांसाठी तो मोठा निर्णय होता!
अक्षयला कॅम्पसमधून एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. मनोहरराव आणि सीमाताईंना आभाळ ठेंगणं झालं! वर्षभरात अक्षय अमेरिकेत प्रोजेक्टसाठी गेला. दहा दिवसांनी गणपती होते. मनोहररावांनी हौसेने दर वर्षीची ठराविक मूर्ती आणून यथासांग पूजा केली. यंदा आनंदाप्रीत्यर्थ गणपतीसाठी चांदीचं जानवं केलं. अक्षयला फोटो मेल केले. ह्या आनंदात दोन वर्षे गेली. त्यात दोघे अक्षयच्या वेस्ट कोस्टवरील घरी जाऊन आले आणि मग घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्यांचे फोटो दाखवत अमेरिकेचे वर्णन करण्यात सहा महिने सरले!
सीमाताईंच्या एका मैत्रिणीने अक्षयसाठी एक स्थळ सुचवले. मुलगी इंजिनियर. नोकरीत. एकुलती एक! मग चक्र पटापट फिरली. स्काईपमधून अक्षय आणि आरती एकमेकांना भेटले. पसंत केलं आणि तीन महिन्यांत अक्षय भारतात येऊन आरतीला घेऊन परत वेस्ट कोस्टला गेला पण! यंदा परत गणपती आले! उत्साह होता पण मनोहररावांचे हात भरून आले मूर्ती आणताना आणि चौपाटीवर विसर्जन करताना! आज अक्षय हवा होता असा विचार समुद्राकडे बघत बाप्पाला शेवटचा नमस्कार करताना त्यांच्या मनात आला!
त्यानंतर एका आठवड्यातच आरतीच्या आईचा फोन आला की अक्षय आणि आरती तीन महिन्यांत भारतात परत येत आहेत. त्यांना आणि सीमाताईंना आश्चर्य वाटलं की हे अक्षयने त्यांना का नाही कळवलं! मग अक्षयशी बोलल्यावर “मी ऑफशोअर सपोर्ट करणार आहे” वगैरे कारणं मिळाली!
खरं तर नव्याची नवलाई संपल्यावर आरती अमेरिकेला कंटाळली होती. फारसं सोशल लाईफ नाही, नोकरी तर तिला अजिबात करायची नव्हती, वरून घरात काम करावं लागतं आणि मुख्य म्हणजे तिच्या बाबांना हायपर टेन्शन झाल्याचे कळल्यावर तिने अक्षयच्या मागे भारतात परत जायचा तगादा लावला! त्यातून रोज होणाऱ्या वादांना कंटाळून अक्षयने भारतात यायचा निर्णय घेतला होता!
मनोहररावांनी नात्यातील एका इंटिरियरवाल्याला बोलावून साधं प्रसन्न घर मुलगा आणि सुनेसाठी चकचकीत करून घेतले! तीन महिन्यांनी दोघे भारतात आले. इथे आल्यावर आरतीचा जास्त वेळ माहेरी जाऊ लागला. अक्षयचं घर तिला बिलो स्टॅंडर्ड वाटू लागले. मग अक्षयने कर्ज काढून एका पॉश कॉम्प्लेक्समध्ये जागा बुक करून आईवडिलांना सरप्राईज दिले! हा निर्णय फारसा आवडलेला नसला तरी मुला आणि सुनेबरोबर राहता येईल ह्या विचाराने दोघांनी तोही हसत स्वीकार केला! पण शिफ्ट व्हायच्या आठवडाभर आधी त्यांना कळलं की नवीन घरात फक्त अक्षय आणि आरती जाणार आहेत! मनोहरराव आणि सीमाताईंनी तो धक्का देखील मुलाच्या प्रेमाखातर स्वीकारला!
पुढल्या गणपतीला आरती प्रेग्नन्ट होती म्हणून अक्षय एकटा पाहुण्यासारखा घरी येऊन दर्शन घेऊन तिच्या वडिलांना गणपतीत मदत करायला निघून गेला! ह्यावर्षी विसर्जनानंतर मनोहररावांचे हात चार दिवस दुखत होते! यथावकाश नातू झाला! दोन महिन्यांतून एखाद्या वीकेंडला नातवाला घेऊन अक्षय आणि आरती येत. नातवाचे मुख बघून, त्याची मस्ती अनुभवून दोघे म्हातारे लहान होऊन जात आणि तो गेल्यावर सगळं घर आणि एकाकीपणा खायला उठत असे!
तीन वर्षांपूर्वी आरतीचे वडील रिटायर झाले आणि दुसऱ्या शांत शहरात राहायला गेले! एक दिवस अक्षय येऊन म्हणाला की त्याची त्याच शहरात ट्रान्स्फर झाली आहे! ह्यावेळी मात्र मनोहरराव आणि सीमाताईंना आश्चर्य किंवा वाईट काहीच वाटलं नाही! सुखी रहा असा आशीर्वाद देऊन त्यांनी अक्षयला रवाना केलं! मग महिन्यातून एखादा फोन, नातवाचे बोबडे बोल, त्याचे व्हॉट्सअॅपवर येणारे फोटो असं आयुष्य सुरू झालं! गणपती परत महिन्यावर आले होते! मनोहररावांनी अजूनही मूर्ती नोंदवली नव्हती! कारखान्यातून फोन आला! ते म्हणाले, “यंदापासून मूर्ती नाही!” त्या वर्षी मनोहररावांनी पंचधातूंची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना केली आणि घराच्या बादलीत विसर्जन केलं! एक परंपरा संपली होती!
यंदा परत मनोहर दाबक्यांनी पुनरागमनायचं म्हणत थरथरत्या हाताने पंचधातूच्या गणपतीच्या शिरावर अक्षता टाकल्या तेव्हा त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्यांनी सावकाश चालत जात डोक्यावर काळी टोपी घातली. मूर्तीसमोर येऊन त्यांनी हात जोडले. डोळे बंद केले. मूर्तीचे आसन जरा हलवून परत नमस्कार करून मूर्ती उचलली! मागे सीमाताई एकट्याच झांज वाजवत होत्या! बादलीत विसर्जन करून दोघांनी हात जोडले! दोघांच्या मनात एकाच प्रार्थना होती, “गणपती बाप्पा मोरया! पुढलं वर्ष दाखवू नका!”
बादलीत विसर्जित होत असलेला गणपती अशा शेकडो वृद्धांना देत असलेला आशीर्वाद त्यांनाही देत होता आणि म्हणत होता, “तथास्तु!” – ©मंदार जोग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

खूप छान शब्दांत लिहिले आहे धन्यवाद
या कथेकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे..सध्या परदेशी स्थायिक झालेल्या मुलांच्या पालकांची थोड्याफार प्रमाणात अशीच अवस्था झाली आहे.मुलांच्या मनातील माया आटली, प्रेम राहील नाही मुलांची मन कोरडी झालीत .. इतीकर्तव्यता म्हणून तरी आपली संस्कृती जोपासावी.. असंच काहीसं असावं असं वाटतं असताना मनात आलं होतं तसाच कथेचा शेवट झाला..कथा वाचता वाचता मन भरून आलं.
karunyasabhar lekh dole datun ale …. but its reality we have to accept ……………..kadhitari nakki bad lel he sagle