बोर्डरूम मध्ये सगळे जमले होते. सीईओ जगदीशने मीटिंग बोलावली होती त्यामुळे कारण देऊन कल्टी मारणे शक्य नव्हते. शार्प दहाच्या मिटिंगसाठी सगळे कॉफीचे मग हातात घेऊन पावणे दहा पासून तिष्ठत होते! बहुतेक जण हातातल्या फोन्सवर गेम खेळत किंवा आयटमशी चॅटींग करण्यात मग्न होते. सगळेच स्मार्ट, उच्च शिक्षित आणि तरुण. तीन वर्षात जगदिशच्या ह्या छोट्याश्या व्हेंचर कॅपिटल फर्मला वीस मिलियनचे फॉरेन इंव्हेस्टर्स आणि उत्तम क्लायंटल मिळवून देण्यात ह्या सर्व शहाण्या पोरांचा महत्वाचा वाटा होता. जगदीश पण गुण ग्राहक. सर्वांच्या घशात भरपूर पगार, बोनस आणि इंसेंटिव्ह कोंबून त्याने ह्या पैकी कोणीही कुठेही जाणार नाही ह्याची व्यवस्था केली होती! त्यामुळे छोटी पण डायनॅमिक टीम बनली होती. फक्त एकच खंत होती. सगळे मुरलेले शिकारी असून ऑफिसमध्ये सावज नव्हते! “साला जगदिशने एक बाई ठेऊ नये नोकारीला?” असा सर्वांचा सात्विक संताप होता. जगदीश हे ओळखून होता आणि पोरांचे गुण पण जोखुन होता. त्यामुळेच कदाचित त्याने ऑफिसमध्ये “डिस्ट्रॅक्शन” ठेवलेच नव्हते. इथे फक्त घासा, नोट कमवा आणि बाहेर जाऊन ती शिकारीवर उडवा असा सोपा सरळ हिशोब होता त्याचा! ह्यामुळेच सगळी पोर जगदिशला मागून जाम शिव्या घालायची. तो स्वतः क्लाएंट आणि इंव्हेस्टरकडच्या अनेक पोरी पटवायचा. पण ह्यांना चांसपण नाही मिळायचा!

अश्या कष्टी स्त्रिपात्र विरहित वातावरणात एकच आनंदी जीव होता. गजानन! रॉनी, क्रिश, आदि, व्हिकी असल्या कलिग्सच्या नामावळीत नावापासूनच न शोभाणारा! सामान्य कुटुंबात जन्मून मराठी शाळेत शिकुन फक्त उत्तम मार्कांच्या जोरावर उच्च शिक्षण पूर्ण करून शेवटी आय आय एम् करून इथे लागलेला. जगदिशने हुडाकून काढलेला हीरा! एखाद्या डीलवर सही करायच्या आधी जगदीश “गज” कडून त्याचे व्ह्यू री कन्फर्म करत असे!

गज हे जगदिशने इथे जीणे सुसह्य व्हावे म्हणून त्याचे केलेले बारसे त्याला फारसे रुचत नसे! त्यामुळे जगदिशला केव्हाही फोन केला की तो ” हाय जग्गी गजानन हियर” असे मुद्दाम सांगत असे आणि जगदीशदेखील “येस गज” असेच म्हणून संभाषण सुरु करत असे!

तात्यांची म्हणजे त्याच्या वडिलांची “साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी” ही शिकवण गजानन “जगत” होता. कलीग किंवा क्लायंट बरोबर देशात किंवा परदेशात ऑफिशियल डिनर किंवा पार्टीमध्ये इतर सगळे स्कॉच ढकलत असताना “फ्रेश लाइम वॉटर सॉल्टेड” ऑर्डर करताना समोरच्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्य किंवा रेयर कुत्सित भाव त्याला टेम्प्ट करत नसत! डीझाइनर आणि लेटेस्ट ट्रेंड पेक्षा स्वच्छ आणि नीटनेटके कपडे ह्याला तो प्राधान्य देत असे! कलिग्सच्या लोन काढून घेतलेल्या एल्टिस, सुपर्ब आणि फॉर्च्यूनर पेक्षा डाऊन पेमेंट केलेली त्याची होंडा सिटी त्याला पटत होती. होम लोनचे हप्ते भरत फोर बेडरूम मध्ये राहाण्यापेक्षा तात्या आणि माईंच्या उपकाराची परतफेड करत त्यांच्या बरोबर रहाणे त्याला प्यारे होते! मात्र त्याचा मितभाषीपणा इतर कलीग आणि जग्गीच्या अग्रेशनपुढे त्याला अनेकदा झाकोळून टाकत असे! पण त्याला त्याची फारशी फिकिर नव्हती!

तर सगळे जग्गीची वाट पहात होते! जग्गी आला आणि मागे काशीराम प्युन हातात त्याच्या ब्लॅक कॉफिचा ट्रे घेऊन आला. सगळे उभे राहीले. “गुड मॉर्निंग गाइज” म्हणत जग्गी त्याच्या गुबगुबित खुर्चीत स्थिरावला! सगळे बसले! जग्गीने ट्रे मधून पाकिट उचलून सिगरेट शीलगावली आणि बोलू लागला….
बॉयज आय हॅव ऍन अनौंसमेंट टू मेक! आपल्या टीम मध्ये एक नवीन मेंबर add होणार आहे.” त्याने इंटरकॉम वरुन “प्लीज कम इन म्हटले” काही मिनिटे शांततेत गेली, बोर्ड रूमचा दरवाजा उघडला आणि ती आली!

लायल्याक कलरची शिफॉन साडी, toned दंड दाखवणारा स्लीव्हलेस ब्लाऊज, पाच फुट पाच इंच ऊंची, सडपातळ कमनीय बांधा, लांब सडक बोटे, मऊ रेशमी केस, सरळ नाक, आरस्पानि चेहऱ्यावर ओथंबून वाहाणारे हुशारीचे तेज आणि व्यक्तिमत्वात झळकणारा प्रचंड आत्मविश्वास! सगळे शिकारी आ वासून पहात होते! तिला त्याची सवय असावी. ती वीज चमकावी तशी हसून “good morning” म्हणाली आणि सर्वांची तंद्री भंग झाली. एकाला सोडून. तो म्हणजे गजानन! गजाननला हार्ट बीट प्रचंड वाढल्यासारखी वाटत होती. मती सुन्न झाली होती. तो वेड्यासारखा तिच्याकडे पहात होता! “मीट साक्षी…अवर न्यू व्ही पी ऑप्स एंड न्यू इनिशिएटिव्हस्! तिला आपल्या कॉम्पिटिटरकडे चार वर्षांचा अनुभव आहे. शी विल बी वर्किंग डायरेक्टली अंडर मी!” ह्यातल्या “अंडर मी” म्हणताना जग्गीच्या चेहऱ्यावरील नॉटी भाव पाहून पोर काय समजायच ते समजली! थोडक्यात ही पण जग्गीचीच शिकार! आम्ही फक्त उसासे टाकायचे आणि एखाद्या पार्टीत दोन ड्रिंक जास्त झालेल्या जग्गीकडून शिकारीचे किस्से ऐकायचे! पोर खाटटू झाली! गजाननला काहीच ऐकू आले नव्हते! तो तिच्यातच हरवला होता! जग्गी ओरडून म्हणाला “गज यु कॅन से हाय टू द लेडी इफ यु हॅव फिनिश्ड ऑगलिंग!” गजानन ओशाळून, मान खाली ठेऊन हळुच हाय म्हणाला! जग्गीने मुद्दाम तसे बोलून “आय ऍम दी बॉस हियर” असे तिला दाखवत एक प्यादे पुढे सरकवले होते! साक्षी चार पावले चालत गजानन जवळ आली आणि त्याला शेक हैण्ड करत “प्लेजर मीटिंग यु मिस्टर….?” “गजानन” गज आपसूक बोलून गेला! “ग्रेट, नाईस टू मीट यू गजानन!” ती हसत जग्गिकडे एक कटाक्ष टाकत हसत म्हणाली आणि त्याचा हात सोडला!

गजानन आणि साक्षी एकाच प्रोजेक्टवर काम करू लागले. जग्गीने “सेफ्टी”च्या दृष्टीने तिला गज बरोबर ठेवले होते. बाकी पोरांच्या नियतवर त्याचा जेवढा अविश्वास तेवढाच विश्वास गजच्या सभ्यतेवर! जवळ जवळ पंधरा दिवस झाले तरी गज कामाशिवाय तिच्याशी काहीच बोलायला घाबरत होता. पहिल्याच भेटीत झालेली फजीती त्याला आठवत होती! साक्षी मात्र मोकळेपणाने जोक क्रॅक करत, मजा करत काम करायची! पहिल्याच भेटीत आवडलेली आयुष्यातील पहिली मुलगी रोज इतक्या जवळ असताना सुद्धा गज गप्प होता! मनात प्रचंड वादळ होते! तिच्या शेजारी असण्याचा आनंद, तिचे रूप, हुशारी, मनमोकळे हसणे त्याला रोज वेड लावत असे! पण काहीही बोलायची हिम्मत नव्हती!

इतक्यात जग्गीने “क्लायंटला इंट्रोड्यूस करायला” म्हणून तिला घेऊन आठवडयाभराची यूरोप टूर काढली. जग्गी आणि साक्षी दोघेच! दोन दिवसात आइटनरी ठरून ते गेले देखील! कामाचे निर्णय दहादा विचार करून घेणारा जग्गी असल्या मामल्यात किती फास्ट आहे हे सगळ्यांना माहीत होते! मग ऑफिसमध्ये “अन्याय झालेले उपाशी शिकारी” जग्गीच्या आइटनरीला समांतर असे कल्पनांचे शेड्यूल जोडून लाळ घोटत जग्गी आणि साक्षीच्या रोमांसचे स्वप्नरंजन करू लागले! गजानन ह्या चर्चा सहन होत नसल्याने त्यापासून दूर राही!

ते आठवड्याने परत आले. दोघेही नॉर्मल वागत होते. पण गजाननचे साक्षीशी वागणे बदलले. तो कामापुरतेही बोलणे टाळू लागला. जनरली ज़रा चिड़चिड़ा झाला! साक्षी काम से काम ठेऊन होती. त्याच्या वागण्यातील बदल लक्षात येऊन देखील त्याला कारण विचारायची तिला गरज वाटत नसावी!

आज व्हॅलेंटाईन डे! आज जग्गी तिला काहीतरी गिफ्ट देणार, मग डिनर आणि नंतर त्याच्या जुहुच्या पेंट हाऊसमध्ये पार्टी कंटिन्यू होणार! साला विचारांनी गाडी चालवणे कठीण झाले होते गजाननला! इतक्यात महालक्ष्मीच्या सिग्नलला साक्षीने त्याला हात दाखवला! त्याने अविश्वासाने गाडी थांबवली! ती गाडीत बसली. तो गाडी चालवू लागला! पोटात मळमळत असलेले नकळत त्याच्या ओठी आले….

तो: कशी झाली यूरोप टूर?

ती: (काचेतून समोर पहात…हसत) मस्त!

तो: होणारच ना! जग्गी होता ना बरोबर!

ती: oh yes….खूप काळजी घेतली त्याने माझी. ही ट्रिप विसरता येणार नाही!

तो: I thought you are different! But i was wrong!

ती: म्हणजे? बोलून टाक एकदा मनात काय आहे ते! मी परत आल्यापासून पहाते आहे. तुझे वागणे नॉर्मल नाहीये. तेच बोलायला मी मुद्दाम भेटले तुला on the way….

तो: oh is it? जग्गी कसा आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याच्या अब्रॉड टूरचा अर्थपण सर्वांना माहिती आहे. तू त्याच्या बरोबर एक विक जाऊन आलीस. लोक काय बोलतात माहिती तरी आहे का तुला?

ती: सध्या तू काय बोलतोस ते ऐकायच आहे मला. लोकांना मी सेपरेट हॅंडल करीन. तू काय म्हणतोस ते सांग!

तो: मला तू तशी वाटली नाहीस म्हणून मी…..

ती: बोल ना….तू काय?

तो: मी तुझ्या प्रेमात पडलो! अगदी पाहताक्षणी….पण तुला जग्गी आणि त्याला खुश ठेवून मिळणारे करीयर महत्वाचे आहे. So I gave up! I withdrew!

ती: You withdrew? अरे तू होतासच केव्हा? पंधरा दिवसात एकदा तरी जाणवून दिलंस का मला तुझ्या मनात काय आहे ते? मी जग्गीबरोबर गेल्यावर facts माहीत करून न घेता वाट्टेल ती कन्क्लूजन काढणारे ऑफीस मधले इतर आणि तुझ्यात फरक काय? Now listen to me! मी जग्गीची ख्याती ओळखून आहे. कॉर्पोरेट मधे कस वागायच हे कळत मला. आमच्या ट्रिपचे कळल्यावर मी आमच्या एका कॉमन मैत्रिणी मार्फत जग्गीच्या बायकोला ट्रिपची कल्पना दीली. ती जग्गीच्या मागे लागून यूरोपला आली होती! सगळ्याच “शिकार” नसतात हे त्याला दाखवून दिले. आता आम्ही दोघी चांगल्या फ्रेंड्स आहोत and जग्गीला ते माहीत आहे! बाकी राहिलास तू….तुझी हुशारी, साधेपणा मला भावला होता! पण इतके कोते विचार आणि मनातले बोलून न दाखवायचा स्वभाव नाही आवडले! गाडी बाजूला घे!

तो: साक्षी प्लीज….

ती: प्लीज गाडी थांबव!

तो गाडी थांबवतो. ती उतरून निघून जाते…

लॅपटॉपमधून वर न पहाता साक्षी “कम इन” म्हणते. काशीराम एक प्रचंड मोठा लाल गुलाबांचा बूके घेऊन येतो त्यात एक चिठ्ठी असते! “हे माझे आयुष्यातील पाहिले आणि शेवटचे प्रेम पत्र! माझ्याशी लग्न करशील? Will you be my valentine?” ती चिठ्ठी बाजूला करते तर समोर गजानन हसत उभा असतो. हातात अंगठीचा बॉक्स घेऊन! कान धरून तो दोन उठाबश्या काढतो. ती लाजून हसते….लाल होते….अगदी तिच्या केबीनच्या काचेतून दिसणाऱ्या व्हॅलेंटाईन डे च्या मावळतीच्या सूर्य बिंबासारखी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!