हॉस्पिटलच्या थंड कॉरीडॉरमधून डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट खांदे पाडून येत होते. बाजूच्या काचेतून येणारी मावळत्या संधीप्रकाशाची किरणे कॉरीडॉरला उगाच रुक्ष आणि करूण बनवत होती. कॉरीडॉरच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सोफ्यावर बसलेल्या चिंतामणरावांना रडून धूसर झालेल्या आपल्या चश्म्यातून ते दिसत होते. डॉक्टरांच्या देहबोलीवरून मनात संशयाची पाल चुकचुकली. ऐंशी वर्षांचा त्यांचा कृष देह हादरला. डॉक्टर जवळ आले. चिंतामणराव हातातील काठीच्या आधाराने उभे राहीले. डॉक्टर “I am sorry” म्हणून त्यांना खांद्यावर थोपटून निघुन गेले!!!

काल रात्रीच तर सेलिब्रेशन झाले. लग्नाचा हीरक महोत्सव! काय तो केक, केवढे खाण्याचे पदार्थ, फोटो काढण्याची सर्वांची घाई, ती रोषणाई आणि त्यात सुंदर पैठणीत अप्रतिम दिसत असलेली गोदा. अगदी साठ वर्षांपूर्वी लग्नात दिसत होती तशीच गोड, सुंदर आणि निरागस!

लग्न करून खर्यांची आनंदी पटवर्धनांची गोदावरी झाली. दहा वर्षांची पोर. चिंतामणराव नोकरीला मुंबईत आणि कोकणात भरल्या घरात गोदा. वर्ष पटापट सरली. गिरगावात पागडीची डबल रूम मिळाली. सोळा वर्षांची अल्लड गोदा मुंबापुरीत आली. राजा राणीचा संसार सुरु झाला. गावाकडून बाबांची पत्र यायची की गोड बातमी कधी देणार? पण राजाराणीच्या संसारात राजकन्या किंवा राजकुमार यायला तयार नव्हते. शेजारपाजार्यांच्या घरात सहा सात पोरांचे गोकुळ पण इथे एकही नाही! रोज घरी येताना चाळीतल्या पोरांसाठी लिमलेटच्या गोळ्या आणणाऱ्या चिंतामणला स्वतःचे मूल नाही. इतरांच्या पोरांना सणासुदिला गोडधोड करून खाऊ घालणाऱ्या गोदेच्या हातचे खायला तिचे स्वतःचे पोर नाही! अनेक वर्ष गेली. सर्व उपाय थकले. दोष कोणात होता हा मुद्दा गौण होता. चिंतामण आणि गोदाच प्रेमच इतक उत्कट होत की असल्या गोष्टीना त्यात जागा नव्हती. त्यांनी आहे त्यात आनंद मानून आयुष्य समधानाने जगायचा करार केला!

आपल्याकडे असलेले लोकांना विशेषतः मुलांना देणे हा शिरस्ता झाला. मग ते ज्ञान असो, प्रेम असो, आर्थिक मदत असो, आसरा असो, शिक्षणाची जबाबदारी असो. सर्व बाबतीत हे दोघे विशेषतः गोदाबाई आघाडीवर होत्या. अनेक गरजू मुलांची आई होताहोता चिंतामणराव त्यांचे मूल केव्हा झाले ते दोघांच्याही लक्षात नाही आले. चिंतामणराव पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहू लागले. अगदी सकाळच्या चहा पासून रात्री गजर लावण्यापर्यंत. कचेरीत साहेब असलेले चिंतामणराव घरी लहान मूल बनत. गोदाबाईंची माया होतीच तशी. सर्वांना सामावून घेणारी, ऊब देणारी.

त्या मायेच्या सावलीला येणाऱ्या पिल्लांची संख्या वर्षानुवर्ष वाढत होती. त्यातूनच मग गोदाई अनाथाश्रमाची कल्पना चिंतामणरावांना सुचली. हे नाव सुद्धा त्यांनीच दिलेल! मग विचार पक्का झाल्यावर नोकरीची सहा वर्ष बाकी असतानाच त्यांनी नोकरी सोडली. मिळालेल्या पैशातून ठाण्यात बदलापुरला एक जमिनीचा तुकडा विकत घेतला. तिथे बांधकाम केले. गिरगावातील खोली विकुन आलेले पैसे डिपॉज़िटला टाकले. त्याचे व्याज आणि पेंशन ह्यातून गोदाई आश्रमाचा कारभार सुरु झाला.

वर्ष सरत होती. दोघांच्या उतरत्या वयाबरोबर आश्रमाचा पसारा वाढत्या आलेखाने पसरत होता! आश्रमात राहून शिकलेली ह्या “विनापत्य आईबापांची” अनेक मुले आज मोठ्या पदावर पोहोचली होती. साधारण दहा वर्षांपूर्वी रोजच्याप्रमाणे एका रात्री आश्रमाच्या गच्चीत गप्पा मारताना चिंतामणराव गोदाबाईंना म्हणाले ” गोदा तुला पोर नाही झाले पण तू अनेक पोरांची आई झालीस. अगदी माझी सुद्धा. एक वचन दे आज. मी जिवंत असे पर्यंत माझ्या डोक्यावर मातृछत्र राहील. आपल्या दोघांपैकी मी आधी जाईन.” गोदाबाई आईच्या मायेने ह्या हळव्या पोराच्या डोळ्यात पहात म्हणाल्या “दिल वचन”. त्यावर चिंतामणराव म्हणाले “तू आधी गेलीस तर तो माझा देखील शेवटचा दिवस असेल!” गोदबाई फक्त हसल्या.

….हॉस्पिटलच्या तळ मजल्यावर मानस पुत्र आणि पुत्री ह्यांची गर्दी उसळली होती. त्यांची आई आयसीयू मध्ये क्रिटिकल होती. वर डॉक्टर बातमी देऊन निघुन गेले. चिंतामणराव काठी टेकत, सावकाश चालत आइसीयूकडे निघाले. संधीप्रकाशाचा अंधार दाटत होता. त्यांच्या आयुष्यात सूऱ्यास्त झाला होता.

आयसीयूचे दार ढकलून ते आत आले. गोदाबाई बेडवर निपचित पडल्या होत्या. चेहऱ्यावर तेच प्रसन्न हास्य. वेदनेचा लवलेश नाही. आयुष्यभर हसत आणि जगाला आनंद देत असलेल्या बाईला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो? की आनंद आणि समधानाचा अतिरेक झाला तरी हृदयाला तो झेपत नाही? चिंतामणराव विचार करत होते. बेडच्या शेजारील स्टूलावर ते बसले. काठी बाजूला ठेवली. गोदाबाईंचा थंड पडलेला हात हातात घेतला. “तू वचन मोडलस. माझ्या आधी गेलीस. पण मी माझा शब्द नाही मोडणार. माझ्या खोलीत बाटली तयार आहे. दोन थेंब आणि मी तुझ्याकडे. अगदी सांगितल्याप्रमाणे!” अश्रु पुसून, दोन मिनिट गोदाबाईंचा चेहरा न्याहाळून, त्यांच्या कपाळावरून हात फिरवून ते उठले. काठी हातात घेतली. आता पोरांना खाली जाऊन बातमी द्यायची आणि घरी जाऊन दोन थेंब. निघताना दाराशी पोहोचल्यावर त्यांना उगाच गोदाबाईंनी “अहो ऐकल का?” अशी नेहमीची हाक मारल्याचा भास झाला. वळून पाहीले तर त्या निपचित पडून होत्या! चिंतामणराव साश्रु नायनांनी आयसीयूमधून बाहेर पडले!

चिंतामणराव लिफ्टमधून खाली आले. शंभर एक पोरापोरींची गर्दी लॉबीत वाट पहात होती. “आई गेली रे पोरांनो!” इतके म्हणून चिंतामणराव मटकन खाली बसले. पोरांच्या हुंदक्यांनी हॉस्पिटलची वास्तु गहिवरली. चिंतामणराव अनेक तास तसेच शांत बसून होते. फोनाफोन्या होऊन आणखी पोर जमत होती. आघातातून थोड सावरल्यावर दोघेजण म्हणाले ” बाबा खूप उशीर झालाय. तुम्ही पुढे व्हा आश्रमात. आम्ही फॉर्मेलिटीज पूर्ण करून आईला घेऊन येतो!” चिंतामणराव जड पावलांनी एका पोराच्या गाडीत बसले. 

गाडी आश्रमात आली. त्यांनी पोरांना ज़रा एकांत द्या सांगून बाहेर पिटाळले. काठी टेकत ते त्या दोघांच्या खोलीत आले. गोदाबाईंची आवडती रॉकिंग आरामखुर्ची आज रिकामी, भकास वाटत होती. पोरांबरोबरच्या फोटोंनी भरलेल्या समोरच्या भिंतीवर माधोमध असलेल्या त्यांच्या व गोदाबाईंच्या फोटोकडे ते पहात होते. ते सावकाश फोटोच्या जवळ गेले. गोदाबाईंच्या सात्विक, वात्सल्यपूर्ण छबीकडे पहात ते म्हणाले “गोदा तू वचन मोडलेस. मला आणि आपल्या सर्व मुलांना पोरके करून अचानक आमच्यातून निघून गेलीस! पण मी माझे वचन पाळणार.” इतके म्हणून त्यांनी समोरच्या कपाटातील त्यांचा ड्रॉवर उघडला. अगदी मागे हात घालून तिथे ठेवलेली बाटली काढली. मन घट्ट करून परत एकदा फोटोकडे पाहीले. बाटलीचे झाकण उघडले. 

ती तोंडाला लावणार इतक्यात “अहो ऐकल का?” अशी गोदाबाईंची साद ऐकू आली. त्यांनी मागे वळून पाहीले. आरामखुर्चीत गोदाबाई बसल्या होत्या. गोदाबाई म्हणाल्या “मी लग्नानंतर तुम्हाला बाप बनायचे सुख नाही देऊ शकले. दोष माझ्यात होता हे माहित असून तुम्ही तो दोष आयुष्यभर “आपला” मानून मला आपल्या आश्रमातल्या सर्व पोरांची आई व्ह्यायचा आनंद दिलात. अगदी स्वतः सुद्धा नकळत माझे मूल झालात! त्या बदल्यात मागितलेत काय तर एक वचन? मी तुमच्या आधी जायचे नाही हे वचन? मग विश्वास नव्हता का माझ्यावर? हॉस्पिटलमधून तुम्ही निघताना मी हाक मारली होती. का नाही आलात परत?” गोदाबाई डोळ्यातून गालावर ओघळत असलेले अश्रु न थांबवता आर्ततेने बोलत होत्या! चिंतामणराव हातातील बाटली टाकून आराम खुर्चीकडे सरसावले. गोदाबाईंचा हात हातात घ्यायला पुढे वाकले तर पुढेमागे हेलकावे घेत असलेली रॉकिंग आराम खुर्ची रिकामी होती. फक्त गोदाबाई रोज माळत असलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध त्या खुर्चीच्या कापडातून येत होता! त्या आत्ताच तिथे बसून गेल्यासारखा! चिंतामणराव चरकले! 

इतक्यात फोन वाजला. त्यांनी फोन घेतला. समोरून माधव, त्यांच्या आश्रमातील मुलांपैकी एक बोलत होता “बाबा it’s a miracle! आई गेली नाहीये. हार्ट अचानक सुरु झाले आहे समहाऊ. अजून शुद्धित नाहीये. डॉक्टर काहीच सांगू शकत नाहियेत. मी गाडी पाठवतो. तुम्ही या तिला बघायला. कारण त्यांनी लाईफ सपोर्ट सुरु केले आहेत पण ती तशी किती वेळ राहील हे डॉक्टर्सनाही माहित नाहीये. She is alive but critical! तुम्ही प्लीज निघा लगेच! वेळ खूप कमी आहे!”  हे ऐकून म्हाताऱ्या डोळ्यात अश्रु आणि सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्य असलेले चिंतामणराव आराम खुर्चीकडे पहात शांतपणे म्हणाले “माधवा, घाई नको करू. गाडी नको पाठवू. तिथेच ठेव गाडी आणि गोदाला घरी घेऊन ये त्यातून दोन दिवसांनी!” इतके म्हणून त्यांनी शांतपणे फोन कट केला.

माधवाला त्यांच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध नाही झाला. पण चिंतामणराव शांतपणे त्या आरामखुर्चीत बसले. आईच्या कुशीत बसल्याचा आनंद त्यांना मिळत होता. युगानयुग पृथ्वीला दिलेले वचन पाळायला, अंधाराला छेदत पूर्वेच्या क्षितिजावर पहाटेचे सूर्यबिंब उगवत होते. गोदाने मृत्युवर मात करून तिचे वचन पाळले होते!!!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!