सन्नी देओल
आम्ही शाळेत होतो तेव्हाची गोष्ट आहे. अमिताभ बच्चनचं करियर पीक वर होतं. विनोद खन्ना, ऋषी, शशी, धर्मेंद्र आळीपाळीने त्याच्या बरोबरच सिनेमे करून आपल्या नावावर हिट सिनेमे लावून घेत होते. बच्चन व्यतिरिक्त इतर सोलो हिरोचे सिनेमे फार कमी प्रमाणात येत होते. आणि तेव्हाच त्याचा सिनेमा आला. म्हणजे धर्मेंद्रने शोले मध्ये हेमा मालिनीला आमराई मध्ये बंदूक चालवायला शिकवायच्या निमित्ताने चान्स मारून दहा वर्षही झाली नव्हती. तो स्वतः अजूनही पडद्यावर हिरोईन बरोबर रोमान्स करत होता आणि चक्क त्याच्या मुलाचा सिनेमा आला होता! बेताब असं सिनेमाचं नाव. सन्नीच्या त्या लाँच पॅडला राहुल रवेलचं दिग्दर्शन आणि आरडीच म्युझिक हा राजेंद्र कुमारने आपल्या मक्ख चेहऱ्याच्या ठोम्ब्या मुलाला लव्ह स्टोरी मधून लॉन्च करताना वापरलेला हिट फॉर्म्युला धर्मेंद्रने वापरला होता. त्यात लेखक म्हणून जावेद अख्तर आणि छायालेखक मनमोहन सिंग हे दणकट टेकू वाढवले होते. कारण सन्नी होताच वजनदार, पिळदार. सन्नी बरोबर सिनेमात अत्यंत लोकप्रिय अखिल भारतीय बेजबादार माता निरुपा रॉय, चरित्र भूमिकेत स्थिरावलेला शम्मी कपूर आणि प्रेम चोप्राला घेतलं होतं. आणि हिरोईन म्हणून घट्ट पंजाबी लस्सी सारखी, मौशुमी चटर्जीच्या सौष्ठव आणि त्या एक्स्ट्रा सुळ्याशी साधर्म्य सांगणारी, पुढे मेकड्या शास्त्री पासून अमिताभ पर्यंत भराऱ्या घेऊन अखेर राहाच्या चुलत आतोबांशी लग्न करून विभक्त झालेली, पापराझी प्रिय माननीय तैमुरची बाबाची दणकट सावत्र आई अमृता सिंग होती. सिनेमा सुपर हिट झाला. आजच्या काळाशी तुलना करायची तर सिनेमाने तेव्हा २७० कोटींचा गल्ला जमा केला. कडक गाणी, फॉर्म्युला स्टोरी, फ्रेश जोडी, रोमान्स, मारामारी. पैसा वसूल. सन्नी एका रात्रीत सुपर स्टार झाला. तेव्हा सन्नीच्या बापापासून अमिताभ पर्यंत सगळे हिरो सरळ केसांचे होते. कुरळ्या केसांचा, गोबऱ्या गालांचा, पिळदार दंडांचा, थंड चेहऱ्याचा, एक शांत स्माईल असलेला, घोड्यावरून हिरोईन पळवून आणणारा, कुऱ्हाडीने लाकडं फोडणारा, काऊ बॉय टाईप जाकेट घालणारा सन्नी लोकांना प्रचंड आवडला. तेव्हा stardust, Filmfare, Cineblitz आणि अन्य सिनेमा अंकांमध्ये नट नट्यांचे फोटो येत. आणि दुकानांमध्ये त्यांचे फोटो असलेली पोस्ट कार्ड्स मिळत. म्हणजे त्यावर स्टॅम्प आपण लावायचा. पण ती कोणालाही पाठवता येत असत. पोरी त्याच्या फोटोंची कार्ड्स विकत घेऊ लागल्या. Magazine मधून त्याचे फोटो फाडून पोर होस्टेलच्या भिंतींवर लावू लागली. आम्ही फार लहान होतो तेव्हा. पण सन्नी आवडला होता. त्याच साली मला वाटत जग्गूचा हिरो सिनेमा आला. सुभाष घाईने जग्गू आणि मीनाक्षी शेषाद्रीला लाँच केलं होत. हिरो देखील सुपर म्युझिक, फॉर्म्युला स्टोरी, चोप्रा ऐवजी शक्ती कपूर आणि शम्मी कपूर कॉमन फॅक्टर असल्याने सुपर हिट झाला. इंडस्ट्रीला सन्नी, जग्गू आणि अनिल असे तीन खान यायच्या आधीचे त्रिदेव सापडले.
सन्नी ग्रेट नट वगैरे कधीच नव्हता आणि नाहीये. कुरळे केस (सध्याच्या विग पूर्वी), दणकट बॉडी, प्रसन्न व्यक्तिमत्व, छान स्माईल आणि पडद्यावर बापा प्रमाणेच अत्यंत कन्व्हिक्शनने गुंडांचा खुर्दा पाडण्याची क्षमता ह्या त्याच्या जमेच्या बाजू होत्या सुरुवातीच्या काळात. त्याने सोनी महिवाल, सन्नी, मंझील मंझील वगैरे रोमांटीक सिनेमे केले जे फार चालले नाही. पण मग राहुल रवेल ने परत एकदा त्याच्या मदतीला धावून येत अर्जुन नावाचा अप्रतिम सिनेमा त्याला दिला. मेरे अपने पासून अंकुश आणि संजय दत्त च्या वास्तव पर्यंत वापरलेला सेफ फॉर्म्युला. पण जबराट नरेशन. आर डी च म्युझिक, जावेद अख्तरची लेखणी आणि सन्नीने रंगवलेला चांगल्या मुलाचा गुंड होणारा व्हीक्टिम रिबेल. कितीही वेळा पाहिला तरी आवडतो असा हिंदी सिनेमाच्या इतिहासातील माईल स्टोन सिनेमा. तिथेच त्याची भेट आरव भाटीयाच्या आजीशी झाली आणि तेव्हा जे सुत जुळल ते कायमचं! तो विवाहित होता तरीही आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने ते नातं निभावल. बापाने खुलेआम दुसर लग्न केलं. त्याने केलं नाही आणि नातं जगापुढे आणल नाही इतकाच फरक.
जवळजवळ चाळीस प्लस वर्ष आणि शंभरेक सिनेमा असं पसरलेल्या फिल्मी करियर मध्ये श्रीमंत आणि प्रसिद्ध बापाचं नेपो बाळ असूनही सन्नी कधी दारू पिऊन धिंगाणा घालताना, कोणाला गाडीखाली चीरडताना, बायकांशी लफडी करून कन्ट्रोव्हर्सी निर्माण करताना आढळला नाही. फिल्मी पार्टी मध्ये दंगा केल्याच कानावर आल नाही. आपणच कसे शहाणे आणि आपल्यालाच सगळ्यातल सगळ कसं कळत छापाचे टिपिकल बॉलीवूड हिरो छाप इंटरव्ह्यू देताना दिसला नाही. मुळातच लाजाळू वृत्तीचा सनी आपलं घर, शुटींग चा सेट, सन्नी सुपर साउंड, आपली डीम्पू आणि आपले पापा ह्यात मग्न राहिला. अगदी अनिल कपूर पासून शाहरुख खान बरोबरच्या मतभेदांबद्द्ल मिडिया मध्ये अवाक्षर न काढता पुढे त्याने त्यांच्या बरोबर सिनेमे केले नाही. माझ्या मते त्याच्या त्या नव्वद शंभर सिनेमांपैकी त्याला राष्ट्रीय तसेच फिल्म फेअर अवार्ड मिळवून देणाऱ्या सिनेमांसकट उल्लेखनीय सिनेमे त्याने राहुल रवेल, राज संतोषी, जे पी दत्ता, यश चोप्रा आणि अनिल शर्मा ह्या चार पाच दिग्दर्शकांच्या बरोबर केलेलं आहेत. गदर आणि गदर २ ह्या सिनेमांनी तर त्यांच्या नावाला जागत थंड पडलेल्या बॉक्स ऑफिसवर बंड करत कित्येक कोटींचे आकडे ओलांडले. गदर २ च्या आधी अनेक वर्ष सन्नीकडे सिनेमे नव्हते हि देखील ह्या इंडस्ट्री मधील एक विचित्र गोष्ट आहे.
पण सन्नी मुळातच platinum चा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला सुपर स्टार पुत्र आहे. पैशांची कमी कधीच नव्हती त्याला. त्याने स्वतः काही सिनेमे काढले, दिग्दर्शन केलं. सगळ करून झालं. त्याचा मुलगा हिरो म्हणून लाँच झाला. त्याची डीम्पी कधीच आजी झाली. पण जसा त्याचा बाप गरम धरम थंड होऊनही रॉकी और राणी मध्ये शबानाला कीस करत होता तसाच सन्नी देखील आज अडूसष्टाव्या वर्षी आपला ढाई किलोचा हात उचलून एखाद्या चढ्ढा, बलवंत राय, अश्रफ अली किंवा कात्याला हिंदुस्तान झिंदाबाद था झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा किंवा झक मारती है पुलिस किंवा तारीख पे तारीख किंवा ये मजदूर का हाथ है जो लोहा पिघलाकर आकार बदल देता है अस गळ्याच्या शिरा ताणून सांगू लागेल तेव्हा मल्टीप्लेक्सच्या अंधारात बसलेलं एलिट पब्लिकदेखील चेकाळून शिट्या मारेल आणि पडद्यावर खुर्दा उधळेल इतका सनी जेन्युईन वाटेल.
मागे एका लेखात मी धर्मेंद्रचा उल्लेख सिंह असा केला होता. सन्नी त्याच सिंहाचा छावा आहे. फिल्म लायनीतील फालतू राडे, गॉसिप, राजकारण, खोड्या, कुरघोडी ह्यात अजिबात न पडता आपल्या जुहूच्या गुहेत निवांत बसणारा. बाहेर पडला की आपल्या मर्जीनुसार काम करणारा. पण खूप भावूक. कुटुंबावर प्रेम करणारा. चार चौघातही सहज डोळे भरून येणारा, ह्या वयातही बापाचा धाक असलेला आणि त्याचा प्रचंड आदर तसेच प्रेम करणारा. फिल्मी जंगलात खी खी हसत कामाची शिकार शोधत एकमेकांची उणी दुणी काढत, काम आणि पाय ओढून घेत, पत्ता कट करत फिरणाऱ्या फिल्मी तरसांच्या गर्दीत वट्ट मध्ये जगलेल्या धर्मेंद्र नावाच्या सिंहाचा छावा! सन्नी पाजी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सन्नी सुपर स्टार था, सुपर स्टार है और सुपर स्टार रहेगा. ©मंदार जोग
हे पण वाचा –
सिनेमा जगताशी संबंधित आणखी लेख – फिल्लमबाजी
लघुकथा – लघुकथा
दीर्घकथा – दीर्घ कथा
कादंबरी- ट्वेंटी थ्री – ट्वेंटी थ्री
कादंबरी- सख्या रे- सख्या रे …
