…… तेजस पुढे आला. आजवर काम सुरू असताना आर्याने त्याला पुतळा अजिबात बघू दिला नव्हता. काम करून घरी जाताना ती पुतळ्यावर एक ओढणी झाकून जात असे. तेजसने देखील तिच्या विश्वासाला जागत ती ओढणी कधीच बाजूला केली नव्हती. पण आज तिच्याच परवानगीने त्याने पुतळ्यावरून ओढणी बाजूला केली आणि समोर जे दिसलं ते पाहून तेजस प्रचंड हादरला. त्याला समोर प्रशांतचा पुतळा दिसत होता. ते बघून तेजसच्या पायातले त्राण गेले. तो पुतळ्याकडे अविश्वासाने बघत खाली बसला! त्याला बसलेला बघून आर्या पुढे आली आणि म्हणाली-
आर्या- काय झालं तेजस? तुला आवडला नाही का पुतळा?
तेजस- आर्या, तू…. तू… हा कोणाचा पुतळा बनवला आहेस?
आर्या- Come on तेजस. तुझा. अजून कोणाचा? पण तू हे का विचारतो आहेस?
तेजस- तू ज्याचा पुतळा बनवला आहेस त्याला कधी पाहिलं आहेस का आयुष्यात?
आर्या- म्हणजे काय? माझ्या समोर तर आहे तो.
तेजस- आर्या, ही अशी चेष्टा बरोबर नाही. No wonder तू मला आधी पुतळा बघू दिला नाहीस.
आर्याला तो असं का बोलतो आहे हेच लक्षात येत नव्हतं.
आर्या- पण तेजस, प्रॉब्लेम काय आहे ते तरी सांग. नाही का जमला मला पुतळा? तुला आवडला नाहीये का?
तेजस- पुतळा छान आहे, पण तो माझा नाहीये आर्या.
आर्या शॉक झाली आणि म्हणाली-
आर्या- What do you mean, तेजस? हा पुतळा तुझा नाही तर कोणाचा आहे?
तेजस- हा पुतळा मुग्धाच्या नवऱ्याचा, प्रशांतचा आहे.
हे ऐकून मात्र आर्या वैतागली. रागाने थरथरत म्हणाली-
आर्या- तेजस, काय म्हणालास तू? हा पुतळा त्या मुग्धाच्या मेलेल्या नवऱ्याचा आहे? एका अशा माणसाचा ज्याला मी काळा की गोरा कधीच पाहिलं देखील नाही?
तेजस- हो आर्या, हो. हेच सत्य आहे.
हे ऐकून आर्याची सटकली. ती रूममधून बाहेर गेली. तेजस अविश्वासाने प्रशांतच्या पुतळ्याकडे बघत होता. आर्या दांडेकर काकूंचा हात धरून त्यांना तेजसच्या रूममध्ये घेऊन आली आणि म्हणाली-
आर्या- काकू, तुम्हीच सांगा की हा पुतळा कोणाचा आहे?
काकूंनी पुतळा बघितला आणि आश्चर्याने म्हणाल्या-
काकू- कोण ग आहे हा?
त्यांचा प्रश्न ऐकून आर्या चकित झाली आणि म्हणाली-
आर्या- कोण म्हणजे? तेजस आहे तो.
काकू- (पुतळा निरखून बघत) तेजस? तेजस असा कुठे दिसतो?
आर्याला कानावर विश्वास बसत नव्हता. ती काकूंच्या शेजारी जाऊन उभी राहिली आणि पुतळा बघू लागली. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो पुतळा तेजसचा नव्हता. आर्या हे पाहून हादरली.
आर्या- हे… हे कसं शक्य आहे? मी आत्ता मगाशी बघितला तोवर हा पुतळा तेजसचा होता. तेजस बघायला आल्यावर तो बदलला. पण पुतळा बदलू कसा शकतो? This is impossible.
काकू- पण हा पुतळा कोणाचा आहे?
आर्या- तेजस म्हणतो की हा पुतळा त्या मुग्धाच्या नवऱ्याचा आहे.
हे ऐकून काकूंना नवल वाटलं.
काकू- काय रे तेजस? तुला काय माहिती तिचा नवरा कसा दिसतो ते आणि आर्या त्याचा पुतळा का बनवेल?
तेजस- मी त्याचा फोटो पाहिला आहे.
काकू- हे अतर्क्य आहे. मी आजच गुरुजींना भेटून हे सर्व काय आहे ह्याचा खुलासा विचारते.
काकू तिथून निघून गेल्या. तेजस बोलायच्या परिस्थितीत नव्हता. आर्याला कळत नव्हतं की काही मिनिटांपूर्वी तेजसचा असणारा पुतळा प्रशांतचा कसा झाला. ती सुन्न डोक्याने तिथून निघाली. तेजस पुतळ्याकडे बघत तसाच बसला होता.
त्या रात्री बेडरूममध्ये दांडेकर काकू काकांशी बोलत होत्या.
काकू- गुरुजींनी इतकं सांगितलं आहे, त्याचं तुम्हाला काहीच कसं वाटत नाही?
काका- मला वाटून काही फरक पडणार आहे का? जे व्हायचं ते होणारच आहे ना?
काकू- अहो, पण तेजसच्या जीवाला धोका आहे असं सरळ म्हणाले ना गुरुजी? मग आपण काळजी नको का घ्यायला?
काका- आधी पण घेतली ना आपण सर्व काळजी? पण व्हायचं तेच झालं ना? आताही व्हायचं तेच होणार. नियतीसमोर आपण हतबल असतो.
काकू- आणि गुरुजींनी ध्यान लावल्यावर त्यांना धूसर दिसत असलेली ती व्यक्ती कोण असेल?
काका- ते मी कसं सांगू? जे त्यांना दिसलं नाही ते मला कसं दिसेल?
काकू- आपण त्या मुग्धाला भरपूर पैसे देऊन दुसऱ्या शहरात पाठवून देऊया का कायमची?
काका- तिला पैसे हवे असते तर तिने नोकरीवरून काढल्यावर दिलेला चेक बँकेत टाकला असता. तिने तो चेक टाकलेला नाही. मला कळत नाहीये त्या मुलीला नक्की काय हवं आहे ते.
काकू- पण मला खूप भीती वाटते आहे. तेजसचं काही बरं-वाईट झालं तर मी सहन नाही करू शकणार.
काका- तू विसरते आहेस. गुरुजींनी तेजसच्या जन्मानंतर त्याची पत्रिका मांडली तेव्हा एक गोष्ट सांगितली होती. आठवते का?
काकू- काय हो?
काका- तेजसवर २०१८ दिवाळी ते २०१९ पाडव्यापर्यंत संकट येतील. त्यातून त्याचं आयुष्य ढवळून निघेल. जीवावर बेतेल. पण त्यातून त्याला वाचवणारी एक शक्ती तुमच्या समोर येईल. तिचं आणि त्याचं युगानुयुगाचं नातं आहे. प्रत्येक जन्मात ती आणि तो एकत्र येतात. ह्या जन्मी ते दोन वेळा एकत्र येणार आहेत. त्यांना एकमेकांपासून दूर करणं नियतीलाही जमलं नाहीये. जे होईल ते तुम्ही बघत रहा. ह्या जन्मी तेजस तुमचा मुलगा म्हणून जन्माला आला असला तरी आयुष्यात पुढे तो त्या शक्तीचा होईल, त्या दोघांच्या प्रेमाचा भागीदार होईल हे लक्षात ठेवा.
काकू- म्हणजे ती वेळ आता आली आहे असं समजायचं?
काका- कदाचित तसंच असेल. आपण फक्त बघायचं.
काकू ह्या विचाराने घाबरल्या. काकांनी त्यांचा थरथरता हात हातात घेतला आणि म्हणाले-
काका- नियतीपुढे आपण लाचार असतो. आणि जो अनेक जन्म दुसऱ्या कुणाचा आहे त्याला आपण कोण बांधून ठेवणार. त्यांच्या प्रवासातले आपण फक्त सहप्रवासी आहोत. आपण आपल्या भूमिकेत राहावं. गुरुजींचे हे शब्द विसरू नको.
काकांनी सावकाश दिवा मालवला. रात्रभर दोघे छताकडे बघत होते. दोघांचाही डोळ्याला डोळा लागला नव्हता.
इथे तेजस पण रात्रभर झोपला नव्हता. त्याला कळत नव्हतं की आर्याने त्याचा म्हणून इतके दिवस बनवलेला पुतळा प्रशांतचा कसा काय झाला. आर्या तिच्या रूममध्ये जागी होती. तिचा ash tray थोटकांनी भरला होता. रूम धुराने ओसंडून वाहत होती. तिला टोटल लागत नव्हती की हे कसं काय होऊ शकतं. तिने लाल झालेल्या डोळ्यांवर पाण्याचे हपके मारले आणि खोलीच्या खिडक्या उघडल्या. बाहेरून आत आलेल्या पहाटेच्या फ्रेश हवेने तिला जरा बरं वाटलं.
अमेय शाळेत गेल्यावर मुग्धाने घर आवरलं. पण आज का कोणास ठाऊक, तिचं मन कशातच लागत नव्हतं. सकाळचे नऊ वाजले तरी बाहेर ढगाळ गढूळ वातावरण होतं. सूर्यप्रकाश न आल्याने वातावरणात अजून आळस होता. जणू निघत असलेल्या रात्रीला दिवसाने धरून ठेवली होती आणि तिच्या पदराच्या आडोशाला सूर्य लपला होता. मुग्धाचं मन कशातच रमत नव्हतं. इतक्यात तिला अनोळखी नंबरवरून फोन आला. तिने फोन घेतला. फोन तेजसचा होता.
तेजस- मुग्धा, मी तेजस बोलतोय. फोन कट करू नको. Please.
मुग्धा- कोण तेजस?
तेजस- मुग्धा, Please ऐक. मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तुला काहीतरी दाखवायचं आहे. आपण भेटू शकतो का आज? Please….
मुग्धा- Sorry. मला नाही जमणार. मला परत फोन करू नका Please.
मुग्धाने फोन कट केला. तेजस प्रचंड वैतागला आणि म्हणाला-
तेजस- एक नंबर मूर्ख आहे ही मुलगी. मी काय सांगतोय, भेटायला का बोलावतो आहे हे समजून पण घ्यायला तयार नाहीये. इथे माझ्या डोक्याचा भुगा झाला आहे काल रात्रीपासून आणि हिला त्याचं काहीच नाहीये. ते काही नाही. आता सरळ घरी जातो आणि ह्या पुतळ्याचा फोटो दाखवतो तिला. मग बघू काय म्हणते ते.
इतकं म्हणून तेजस त्या पुतळ्याचे फोटो काढू लागला.
मुग्धाला आज एका इंटरव्ह्यूला जायचं होतं. ते ऑफिस अमेयच्या शाळेच्या जवळ असल्याने ती अमेयला पिकअप करणार होती. मुग्धा छान तयार झाली. आज खूप दिवसांनी तयार होऊन आरशात स्वतःला बघितल्यावर तिला खूप बरं वाटलं. प्रशांत गेल्यापासून तिला कशातच इंटरेस्ट उरला नव्हता. अगदी तेजस भेटेपर्यंत….! आरशात निरखून बघत असलेल्या तिने प्रशांतबरोबर तेजसचं नाव मनात आल्यावर स्वतःला प्रश्न केला-
मुग्धा- तेजस भेटेपर्यंत…. म्हणजे? म्हणजे तेजस भेटल्यावर तू प्रशांतला विसरलीस? सगळा साज शृंगार तेजससाठी करू लागलीस? की तेजसमध्ये तुला प्रशांत दिसत होता? पण तेजस आता नाहीये…. प्रशांत तुझा भूतकाळ होता आणि तोच तुझं वर्तमान आणि भविष्य देखील असेल. अगदी तुझ्या समोर नसला तरी तुझ्याबरोबर असेल. त्याचं प्रेम तुला आयुष्यभर साथ देईल.
हे सर्व बोलून तिला एक नवा हुरूप आला. ती मागे वळली आणि तिने भिंतीवर लावलेला प्रशांतचा फोटो हातात घेतला. त्यात दिसत असलेल्या प्रशांतच्या हसतमुख चेहऱ्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि मग हळूच लाजत त्याच्या ओठांवर ओठ टेकले. तिला अचानक प्रशांतच्या ओठांचा ओलसर राकट स्पर्श जाणवला. त्याची मिशी टोचत असल्याचा भास झाला. त्याचे दात तिच्या ओठात रुतून होत असलेली हवी हवीशी वेदना जाणवली. त्याचा उष्ण श्वास तिच्या श्वासात मिसळल्याची जाणीव झाली. तिने डोळे बंद करून घेतले. दोन-तीन मिनिटं तशीच गेली. मग अचानक ती भानावर आली. तिने फोटो तिच्या चेहऱ्यापासून मागे नेला. तेव्हा फोटोवर थोडं रक्त लागलेलं तिला दिसलं. तिने ते पुसलं. परत आरशासमोर उभी राहिली तेव्हा तिचा खालचा ओठ चावला गेल्यासारखा रक्ताचा एक थेंब तिला ओठावर दिसला. तिने त्यावर जीभ फिरवली. तिला स्वतःचीच लाज वाटली. ती आरशात बघून म्हणाली-
मुग्धा- मी इतकी अधीर झाले आहे का की प्रशांतच्या फोटोबरोबर….? पण मग प्रशांतचा तो स्पर्श, त्याचा श्वास, त्याने ओठावर घेतलेला चावा…. ह्या सर्व जाणीवा…. मी आत्ता अनुभवलेल्या… ह्या सगळ्या खोट्या? हो…. म्हणजे त्या खऱ्या कशा असू शकतील? प्रशांत तर ह्या जगात….
तिला आलेला हुंदका तसाच ठेवून तिने आरशात बघत केस सारखे केले. ओठावर परत जीभ फिरवून लिपस्टिक परत लावली आणि मुग्धा निघाली. तिची रिक्षा निघाली आणि तेव्हाच तेजसची गाडी तिच्या बिल्डिंगसमोर थांबली. तेजस धावत लॉबीमध्ये आला. लिफ्टने तिच्या मजल्यावर उतरला. जोरजोरात बेल वाजवू लागला. घरात कोणीच नसल्याने दार उघडायचा प्रश्नच नव्हता. तेजस निराश होऊन निघाला. त्याला पुतळ्याचे फोटो मुग्धाला दाखवायचे होते. पण मुग्धा कुठे आहे हेच त्याला माहित नव्हतं. त्याने दुसऱ्या नंबरवरून मुग्धाला फोन केला. पण मुग्धाचा फोन रिचेबल नव्हता. तेजसने मुग्धा येईपर्यंत बिल्डिंगच्या बाहेर वाट बघायचा निर्णय घेतला.
रोहित अमेयच्या शाळेच्या गेटजवळ उभा होता. अमेय गेटजवळ आला की त्याला उचलायचा असा त्याचा प्लॅन होता. मग अमेयला सोडायच्या बदल्यात मुग्धा…..! मुग्धाला मिठीत घ्यायच्या नुसत्या विचाराने त्याच्या अंगावर शिरशिरी आली. तो प्रचंड स्वप्नरंजन करत शाळा सुटायची वाट पाहू लागला.
मुग्धाचा आजचा इंटरव्ह्यू चांगला झाला होता. पण इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती उशिरा आल्यामुळे मुग्धाला उशीर झाला. आता अमेयची शाळा केव्हाही सुटेल आणि तो आपली वाट बघत गेटजवळ थांबेल ह्या विचाराने त्रस्त झालेली मुग्धा पटापट चालत शाळेकडे येत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने फोन घेतला. फोन तेजसचा होता. अनोळखी नंबरवरून.
मुग्धा- हेलो….
तेजस- ऐक मुग्धा. Please एकदा भेट मला. खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. ते बोलल्यानंतर परत कधीच भेटली नाहीस तरी चालेल.
मुग्धा- तेजस, Please तुम्ही समजून घ्या. आपल्या दोघांच्या आयुष्यात एकमेकांना महत्त्वाचं वाटेल असं काहीही उरलं नाहीये. तुम्ही Please मला फोन करू नका ह्यापुढे.
तेजस- मुग्धा, मला प्रशांतबद्दल बोलायचं आहे.
हे ऐकून मुग्धा चकित झाली. म्हणाली-
मुग्धा- प्रशांतबद्दल? काय?
तेजस- आपण भेटून बोलूया का Please? ते असं फोनवर नाही सांगता येणार. आणि trust me, तू ते ऐकल्यावर तुलाही पटेल ते किती महत्त्वाचं आहे ते.
मुग्धा- मी अमेयला घ्यायला शाळेत आले आहे.
तेजस- ओके. मी तुझ्या बिल्डिंगखाली वाट बघतोय. ये तू पटकन.
मुग्धाने फोन कट केला. फोनवर बोलण्यात चार मिनिटं गेली म्हणून ती आणखी वैतागली. पटापट चालत शाळेच्या गेटजवळ पोहोचली. अमेय तिथे नव्हता. तिने वॉचमनला विचारलं. तो म्हणाला-
वॉचमन- अमेय तर गेला त्याच्या काकांबरोबर.
मुग्धा- (प्रचंड शॉक होऊन) काका? कोण काका? त्याला कोणी काका नाहीये. आणि तुम्ही parent card शिवाय अमेयला कसा काय सोडलात?
वॉचमन- त्यांच्याकडे कार्ड होतं Madam. ते बघूनच तर सोडलं मी.
मुग्धा- ते कसं शक्य आहे. हे बघा. अमेयचं parent card माझ्याकडे आहे.
असं म्हणून तिने कार्ड काढायला पर्समध्ये हात घातला तर हाताला कार्ड लागलं नाही. तिने अख्खी पर्स तिथे उलटी केली. पण त्यात कार्ड नव्हतं. मुग्धा प्रचंड घाबरली.
मुग्धा- कोण काका होता? त्याने काही नाव सांगितलं का?
वॉचमन- नाही Madam. पण अमेय त्यांना ओळखत होता. काका म्हणत होता.
हे ऐकून मुग्धा विचारात पडली की हा काका नक्की कोण आहे. इतक्यात तिच्या मोबाईलवर अमेयचा एक व्हिडीओ आला. त्यात अमेय रोहितच्या मांडीवर बसला होता. आणि म्हणत होता-
अमेय- हाय आई. रोहित काका खूप मस्त आहे. आम्ही खूप मजा करतोय. काका म्हणतो तू आलीस की तो तुझ्याबरोबर पण खूप मजा करेल. आणि आई, हे आपलं सिक्रेट आहे. पोलिसांना वगैरे सांगू नको हा, नाहीतर काका रागावेल. काका तुला अॅड्रेस पाठवेल. तू लवकर ये.
मग रोहित अमेयच्या गालाची पापी घेऊन म्हणाला-
रोहित- तू लवकर ये हा Please. मग तुझे पण असेच लाड करेन मी, ओके?
तो व्हिडीओ पाहून मुग्धाच्या पायाखालची जमीन सरकली. मुग्धाच्या पायातलं त्राण गेलं आणि ती मटकन तिथेच बसली. त्याच वेळी तेजसला त्याच्या हृदयाचे ठोके अचानक खूप वेगात पडायला लागल्याचं जाणवलं. ही दांडेकरांच्या गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्याची नांदी होती की जन्मोजन्मीचा भूतकाळ आता वर्तमान बनून एक नवीन भविष्य घडवणार होता? काळ नामक एक गूढ शक्ती तिच्या हृदयात अनेक प्रश्नांची उत्तरं कवटाळून सावकाश पुढे सरकत होती.
क्रमश:
© मंदार जोग
पुढील भागाची लिंक – गुंतता हृदय….(भाग ३१)
आधीच्या भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग २९)
सर्व भाग एकत्र लिंक- गुंतता हृदय – सर्व भाग
हे पण वाचा-

[…] पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग ३०) […]
[…] आधीच्या भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग ३०) […]