मुग्धा सुन्न होऊन विचार करत होती की आज तेजसने मारलेला शॉट फक्त डावरा असलेला प्रशांत मारू शकत असे. तो “प्रशांत सिक्सर” म्हणून फेमस असलेला शॉट इथे पहिल्यांदाच आलेल्या तेजसला कसा काय जमला? तिथे गाडीत दांडेकर काकांनी तेजसला विचारलं “काय रे तू डावरा कधीपासून झालास?” तेजस म्हणाला “माहित नाही. पण आज batting करावीशी वाटली आणि आपोआप डावरा स्टान्स घेतला!” उन्ह हळू हळू कलली होती. आपल्या पोटात अनेक रहस्य दडवलेला काळ पुढे सरकत होता.
मुग्धा घरी आली. इतक्या दिवसांनी भेटलेल्या अमेयला छातीशी धरून दहा मिनिट तशीच बसली. मग त्याच्यासाठी आणलेला खाऊ आणि गिफ्ट त्याला देऊन ती चेंज करायला गेली. अमेय बाहेर बसून खेळत होता. मुग्धाने बाथरूम मध्ये जाऊन कोमट पाण्याचा शावर घेतला. तिला बर वाटलं. प्रवासाचा सगळा शीण निघून गेला. मग टॉवेल गुंडाळून बाहेर येऊन ती खोलीत अंग पुसू लागली. समोर असलेल्या प्रशांतच्या फोटोकडे तिची नजर गेली. तो तिच्याकडे रोखून बघतोय असा भास होऊन तिने पटकन टॉवेल अंगाभोवती लपेटून घेतला. दुसर्या क्षणी तो प्रशांतच आहे आणि आपल्याला ह्या रूपात बघायला त्याला आवडत असे हे आठवून तिने टॉवेल फेकून दिला. गाऊन परिधान करून प्रशांतच्या फोटोकडे एक नजर बघून तिने अमेयला झोपायला हाक मारली. अमेय खेळण्यात मश्गुल होता. “आई दहा मिनिट !” अस म्हणून तो मान वर न करता खेळत बसला.
मुग्धा बेडवर आडवी झाली. हातात एक पुस्तक होत. ते डोळ्यासमोर होत पण लक्ष त्यात नव्हत. तिला सबंध बंगलोर ट्रीप आठवत होती. दांडेकर दांपत्य, त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि वागण. नक्की खूप श्रीमंत आहेत ते लोक. पण किती चांगले आहेत. आणि तेजस….तेजसचा चेहरा आठवून तिच्या अंगावर एक शिरशिरी उठली. विमानत त्याच्या दंडाचा झालेला स्पर्श, त्याच्या मर्दानी कलोनचा गंध, त्याच्या हातावरच्या राठ केसांची तिच्या हातावर झालेली हुळहुळ हे सर्व आठवून नकळत तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ती दचकून उठून बसली. समोर प्रशांतचा फोटो होता. तो फोटो बघून तिला प्रचंड अपराधी वाटल. प्रशांतला जाऊन काही दिवस नाही लोटले आणि दुसर्या एका पुरुषाबद्दल आपल्या मनात अश्या भावना निर्माण झाल्या ह्याच तिला आश्चर्य आणि गिल्टी वाटलं. ती उठून धावत बाथरूम मध्ये गेली. चेहऱ्यावर पाणी मारून ढसा ढसा रडली. त्यानेही समाधान न झाल्याने तिने शावर सुरु केला आणि त्यांच्या थंड धारांमध्ये भिजत भिंतीला पाठ टेकून बसून राहिली. शावरच्या पाण्यात तिचे अश्रू मिसळून तिच्या दु:ख, भावना, इच्छा, आकांक्षा, वासना आणि अपराधीपणाला वाहून नेत होते. शावर मध्ये नखशिखांत भिजत असताना मुग्धा आतून मात्र कोरडी होत होती!
दुसर्या दिवशी अमेय शाळेत गेला. मुग्धाने नोकरीच्या वेबसाईट वर नोकर्या शोधायला सुरुवात केली. आज बर्याच दिवसांनी मुग्धा थोडी तयार झाली होती. प्रशांतची आठवण म्हणून तिने त्यानेच गिफ्ट दिलेलं परफ्युम लावलं होत. नोकर्या शोधताना तिला लक्षात आल की अनुभवाचा अभाव आणि वय तिच्या आड येत होत. वयाची अट जमली तर अनुभव आवश्यक होता. अनुभवाची गरज नव्हती तिथे वयाची अट होती. मुग्धा तासभर नोकरी शोधून कंटाळली. तरीही तिने वीस पंचवीस प्लेसमेंट एजन्सी मध्ये आपला बायोडेटा मेल केला. तेवढ्यात तिला whatsapp वर एक मेसेज आला. मेसेज रोहितचा होता. काहीतरी व्हिदिओ होता. त्याखाली लिहील होत बघ आवडेल तुला. तिने तो व्हिदिओ डाऊनलोड केला. तो बघताना लक्षात आल की ती एक शृंगारिक व्हिडीओची क्लिप होती. तो बघून मुग्धा काही क्षण अस्वस्थ झाली. मग लगेच स्वतःला सावरून तिने तो मेसेज आणि व्हिदिओ डिलीट केले. रोहितला रिप्लाय केला की प्लीज हे असलं काही मला नको पाठवत जाऊ. त्याचा रिप्लाय आला. बर ते नाही पाठवत. पण मी येऊ ना? तिने रिप्लाय केला मी तू नको येऊ अस म्हणालेच नाहीये. रोहितचा रिप्लाय आला मग दार उघड. मी दारातच आहे कितीवेळ. ते वाचून मुग्धाला आश्चर्य वाटलं. हा आत्ता इथे का आलाय असा विचार मनात येऊन गेला. इतक्यात दाराची बेल जोरजोरात वाजली. तिने लगबगीने उठून दार उघडल. दारात रोहित होता. दाराला अगदी चिकटून उभा असलेला. दार उघडल्यावर जवळ जवळ तिच्या गळ्यातच पडला तो. मुग्धा दोन पावलं मागे झाली. रोहित घरात येऊन सोफ्यावर पसरून बसला आणि निर्लज्जपणे तिच्याकडे बघत म्हणाला “दार उघडायला इतका वेळ? मी पाठवलेली क्लिप परत परत बघत होतीस वाटत?” मुग्धा म्हणाली “रोहित प्लीज. मी तुला रिप्लाय पण केला आहे. हे असलं काहीतरी मला पाठवत जाऊ नको. मला अजिबात आवडलेलं नाहीये हे.” रोहित म्हणतो “ओह. सॉरी यार. मला काय माहित तुझी आवड काय आहे ते. एकदा सांग. मग तुझ्या आवडीच स्टफ पाठवीन. त्यात काय?” मुग्धा म्हणते “रोहित प्लीज. मला हे असले अश्लील मेसेज नको पाठवू. मला ते अजिबात आवडत नाहीत.” हे बोलून मुग्धा त्याच्याकडे पाठ वळवते. तिची गोरी पाठ बघून रोहित चेकाळतो. रोहित म्हणतो “मुग्धा बास काय? मला प्रशांतने सगळ सांगितल आहे. मी त्याला पाठवलेले सगळे व्हिदिओ तो तुला दाखवायचा आणि तुला ते आवडायचे पण.”
हे ऐकून ऐकून संतापाने मुग्धा वळली तर रोहित तिच्या पुढ्यात तिला चिकटून उभा होता. मुग्धा वळल्यावर त्याच्यावर आपटून तिचा तोल गेला. रोहीत्नीका हाताने तिचा दंड धरत दुसरा हात तीव्ह्या पोटावर धरत तिला सावरली. आधात डेट उभी केली. तिच्या परफ्युमचा वास त्याला आवडला होता. ती काही बोलायच्या आत रोहित म्हणाला “wow काय परफ्युम आहे. जबरदस्त attractive.” स्वतःला त्याच्या हातातून सोडवत घेत मुग्धा म्हणाली “काय काम आहे?” रोहित सोफ्यावर रेलून बसत म्हणाला “काम? आज काम नाहीये म्हणून तर आलो इथे. म्हटलं जरा बियर पिऊ तुझ्याबरोबर.” मुग्धा म्हणाली “रोहित प्लीज. मलाखूप काम आहे. तू जा.” रोहित म्हणाला ”ओह. मग कर तू काम. मी इथेच जरा आराम करतो. तुझं काम झालं की मग बियर मागवू.” मुग्धा वैतागून म्हणाली “रोहित प्लीज यार. leave me alone. मला बियर नकोय. त्या अश्लील क्लिप्स नकोयत. तुझा सपोर्ट किंवा सहवास पण नकोय. मला माझं आयुष्य जगू दे. तो आजवर जी मदत केलीस त्यासाठी तुझे धन्यवाद. पण ह्यापुढे प्लीज let me be….” हे बोलून मुग्धा डबडबलेल्या डोळ्यांनी थरथरत उभी होती. तिचा हा पावित्रा पाहून रोहित थोडा back foot वर गेला. उठून तिच्या जवळ गेला. तिला म्हणाला “हरकत नाही. तू कर तुझा स्ट्रगल. बाकी मी आहेच. कधीही मदत लागली…अगदी रात्री उशिरा देखील….तर फक्त एक फोन ओके?” त्याने तिला मिठीत घेतली. तिच्या कपाळाच चुंबन घेऊन, तिच्या दंडात आपली बोट रुतवून, तिच्या मानेचा वास घेऊन रोहित निघून गेला. मुग्धा तशीच स्तब्ध उभी होती. डोळ्यातून अश्रू वहात होते. समोर असलेल्या प्रशांतच्या फोटोकडे केविलवाणे बघत ती विचारत होती “का प्रशांत? का सोडून गेलास मला? काय करू मी? कशी जगू तुझ्याशिवाय ह्या जगात?”
दुपारी अमेय घरी आल्यावर त्याचा अभ्यास, त्याच जेवण, त्याच्याशी खेळ ह्यात दिवस सरून रात्री अमेय जेऊन झोपल्यावर मुग्धाला जरा उसंत मिळाली. ती बेडवर आडवी झाली. दहा वाजले होते. तिला परत तेजस आठवला. मग रोहितचा सजेस्टीव्ह स्पर्श आणि वागण आठवलं. रोमांच आणि घृणा दोन्ही तिने एकदम अनुभवले. काय कराव हे न समजल्याने ती उठून बसली. उगाच खूप निराश आणि हतबल वाटत होत तिला. सगळ संपून जाव असा विचार मनात आला. पण शेजारी शांतपणे झोपलेल्या अमेयला बघून आपल्या जबादारीची जाणीव झाली. ती प्रशांतच्या फोटोकडे बघत बसून राहिली. मग थोड्या वेळाने तिला झोप कधी लागली हे तिच्याही लक्षात आल नाही.
दुसर्या दिवशी अमेय शाळेत गेला. मुग्धाने घर आणि स्वतःच सगळ आवरलं. आता काय कराव ह्या विचारात असताना तिला एका प्लेसमेंट एजन्सी मधून फोन आला. फोन करणारी मुलगी म्हणाली “तुम्ही सीव्ही पाठवला होता म्हणून फोन केलाय. तुमच्यासाठी एक ओपनिंग आहे. इंटरव्ह्यूला आजच जाव लागेल. अर्जंट आहे ओपनिंग. सिलेक्ट झालात तर तीन दिवसात जॉईन कराव लागेल.” हे ऐकून मुग्धा जरा गोंधळली. म्हणाली “आज इंटरव्ह्यू? क…कुठे आहे इंटरव्ह्यू?” मुलगी म्हणाली “लिहून घ्या.” मुग्धाने कागद आणि पेन घेतले. मुलगी पत्ता सांगू लागली “सुप्रीम इंजिनियर्स, ३७, प्राईम एव्हीन्यू…….आज बरोब्बर तीन वाजता हजर रहा. all the best.” मुलीने फोन ठेवला. मुग्धाला काय रीएक्त करायचं कळत नव्हत. तिने प्रशांतच्या फोटोकडे पाहिलं. तो स्मित करून “जा” अस सांगत असल्याचा तिला भास झाला. तिला आत्मविश्वास मिळाला. मुग्धा आता पटापट आवारत होती. रोहित त्याच्या ऑफिसात एका माणसला सांगत होता “मुग्धाचा इंटरव्ह्यू तू घे आणि सिलेक्ट कर. एकदा आपल्या कंपनीत माझ्या हाताखाली आली की मग….” बरोबर असलेला माणूस म्हणाला “मग ‘खालीच’ राहणार आयुष्यभर!” दोघे पाचकळ हसले. इथे मुग्धा प्रशांतची आवडती साडी नेसून फक्त अमेय्घारी यायची वाट बघत होती. फोटो मधून प्रशांत मात्र गूढ हसत होता.
क्रमशः
(© मंदार जोग)गुंतता हृदय….(भाग ८)

