….एअरपोर्टच्या चेकइन काऊंटरवर फ्लाईट ओव्हर सोल्ड झाल्याने मुग्धाला बिझनेस क्लास अपग्रेड मिळाला. फ्लाईट बोर्ड केल्यावर एअर होस्टेसने अदबीने दाखवलेल्या बिझनेस क्लास सीटवर मुग्धा बसली. रोहित मागे वाय क्लास मध्ये जाऊन बसला. लोक अजूनही फ्लाईट बोर्ड करत होते. दोन दिवसांच्या थकव्याने त्या गुबगुबीत चेयर मध्ये मुग्धाला झोप लागली. सीटबेल्ट बांधून मुग्धा गाढ झोपी गेली. फ्लाईट टॅक्सी वे वरून रन वे वर आली. पायलटला रन वे समोर दिसत होता. मुग्धाने झोपेत शेजारच्या प्रवाशाच्या खांद्यावर नकळत डोकं टेकल. विमान रन वे वरून जोरात धावू लागलं. मुग्धाने झोपेतच आधारासाठी शेजारच्या प्रवाश्याचा दंड धरला. तो प्रवासी तेजस दांडेकर होता. मुंबईतल्या दांडेकर इंडस्ट्रीजचा मालक. विमान हलकेच हवेत झेपावल! तेजस मुग्धाच्या लोभस चेहऱ्याकडे बघत होता!
मुग्धाला जाग आली ती एअर होस्टेसच्या आवाजाने. ती मुग्धाला काय खाणार विचारत होती. तिला जाग आल्यावर आपण तेजाच्या खांद्यावर डोक ठेवलं आहे आणि त्याचा दंड धरला आहे हे लक्षात येऊन मुग्धा प्रचंड ओशाळली. सावरून बसत तेजसला “सॉरी” म्हणाली. एअर होस्टेस तिच्या हातात मेन्यू सोपवून हसत निघून गेली. ते मेन्यू कार्ड आयुष्यात पहिल्यांदाच बघत असलेली मुग्धा जरा भांबावली. काय मागवायचं हे लक्षात येत नव्हत. तिने उगाच आजूबाजूला पाहिलं. शेजारी बसलेल्या तेजस ने एक स्माईल दिल. त्याच ते दिलखुलास हास्य बघून मुग्धाला बर वाटलं. तिनेही एक स्मित केलं. तेजस म्हणाला “मी काही मदत करू का?” मुग्धा म्हणाली “प्लीज. मला ह्यातलं काय मागवायचं हेच कळत नाहीये.” तेजस म्हणाला “ व्हेज की…”मुग्धा म्हणाली “strictly veg.” तेजसला तिच्या उत्तराच हसू आलं. तो म्हणाला “ओके. मी ऑर्डर करतो तुमच्यासाठी.” मुग्धा म्हणाली “thanks. मी आलेच जरा चेहर्यावर पाणी मारून.” इतक म्हणून मुग्धा बाथरूम मध्ये गेली. तिच्यासाठी ऑर्डर प्लेस करून तेजस बाहेर दिसणारे ढगांचे पुंजके बघू लागला. मुग्धा परत येऊन बसणार इतक्यात तिला त्यांच्या मागच्या सीटवर बसलेले दांडेकर काका आणि काकू दिसले. त्यांना विमानात पाहून मुग्धा चकित झाली. ती काकूंना म्हणाली “तुम्ही इथे? तुम्ही तर….” काकू म्हणाल्या “आम्ही बंगलोरला एका treatment साठी आलो होतो. ते काम झालं म्हणून आता घरी निघालोय. मुंबईला. तू इथे कशी काय?” मुग्धा म्हणाली “ मी इकोनोमी क्लास मध्ये होते. पण एअर लाईनने अपग्रेड दिला म्हणून इथे आहे.” दांडेकर काका म्हणाले “ आम्ही तुला मगाशीच ओळखली होती. पण तू झोपली होतीस म्हणून बोललो नाही. मुंबईत कुठे राहतेस तू?” मुग्धा म्हणाली “विद्याविहार” काकू म्हणाल्या “एकटीच आहेस की कोणी आहे बरोबर?” मुग्धा म्हणून गेली “नाही. एक मित्र आहे.” ते ऐकून दांडेकर दाम्पत्य जरा चपापल. मुग्धा म्हणाली “म्हणजे family friend आहे. माझ्या मिस्टरांच्या पीएफच काम होत म्हणून तो बरोबर आला आहे.”
मुग्धा आपल्या जागेवर बसली. तेजसने तिच्यासाठी ऑर्डर केलेलं फूड आलं. तिचं खाऊन झाल्यावर तेजसने सहज विचारलं “आवडलं ना? मी आपला गेस केला होता तुमचा choice. बरोबर होता का गेस?” मुग्धा म्हणाली “एकदम परफेक्ट. thanks.” त्या नंतर तेजस फार काही बोलला नाही. हेडफोन मध्ये त्याच म्युझिक ऐकत बसला. मुग्धाला मात्र आज अनेक दिवसांनी खूप बर वाटत होत. मनावर साठलेलं सगळं मळभ नष्ट झाल्यासारखं वाटत होत. ती परत डोळे मिटून बसून राहिली. विमानाचा डीसेंड सुरु झाला. ह्या आधीच्या दोन विमान प्रवासापैकी एका प्रवासात विमानाचा डीसेंड सुरु झाल्यावर मुग्धाच्या कानात दडे बसून असह्य दुखत होत. त्यावेळी तिने प्रशांतचा हात घट्ट धरून तो दाब सहन केला होता. मग विमान टच डाऊन होताना तिला असलेला फोबिया तिने डोळे बंद करून प्रशांतचा शर्ट गच्च धरून निभावून नेला होता. बंगलोरला जाताना दडे बसले नाही पण टच डाऊनला मात्र तिने सीट घट्ट धरून डोक back restला दाबून डोळे मिटून घेतले होते. आता डीसेंड सुरु झाल्यावर तिच्या कानात हळू हळू दडे बसू लागले. कान ठणकू लागले. मुग्धा ते सहन करत डोळे बंद करून बसून होती. विमान हळू हळू खाली येत होत आणि मुग्धाचे कान प्रचंड ठणकत होते. तेवढ्यात टरब्युलंस मुळे विमान थोड हलू लागलं. आधीच landing आणि टच डाऊन चा फोबिया असलेल्या मुग्धाचा आता मात्र धीर सुटला. तिने भीतीने आधारासाठी नकळत तेजसचा दंड धरला. ती अंग चोरून बसून राहिली. विमान सावकाश land होऊन एरोब्रिजला लागेपर्यंत मुग्धा तशीच बसून होती. बिझनेस क्लास passenger आधी उतरत असल्याने तेजस ने तिच्या खांद्यावर tap केलं. मुग्धा दचकून लांब झाली. सॉरी म्हणाली आणि आपली hand bag घेऊन घाईघाईत एरोब्रीजवर चालू लागली. तिला तेजसच्या खांद्यावर डोक टेकण, त्याचा दंड धरण हे खूप विचित्र वाटत होत. प्रॉब्लेम तो नव्हताच. प्रॉब्लेम हा होता की तिला ते कुठेतरी आवडून पण गेलं होत. त्यामुळेच तिच्या डोक्यात प:श्चाताप आणि आश्चर्याच काहूर माजलं होतं.
मुग्धा तिचं लगेज कलेक्ट करून exit गेट जवळ रोहितची वाट बघू लागली. तेजस बरोबरचे क्षण विसरायचा प्रयत्न करत होती. रोहित आला. म्हणाला “चल मी तुला घरी सोडतो.” मुग्धा म्हणाली “नको. मी करते manage. आता मलाच करायला हव ना? किती दिवस तुझ्यावर अवलंबून राहू?” रोहित म्हणाला “काही हरकत नाही. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये.” मुग्धा त्याच्या डोळ्यात रोखून बघत म्हणाली “प्रॉब्लेम मला आहे रोहित. जा तू.” ते ऐकून मात्र रोहित तिचा निरोप घेऊन निघाला. ती arrival gate मधून बाहेर येऊन आता रिक्षा पकडावी की taxi घ्यावी ह्या विचारात होती. इतक्यात तिला अमेयचा फोन आला. तो म्हणाला “आई कधी येणार तू घरी? मी तुला खूप मिस करतोय.” मुग्धाला त्याचा आवाज ऐकून खूप बर वाटलं. ती म्हणाली “मी येते बाळा लवकरच.” एकास हाताने ट्रोली ढकलत दुसर्या हातात फोनवर बोलत मुग्धा रस्ता क्रॉस करून समोरच्या प्रीपेड taxi बूथकडे निघाली. बाजूने येणाऱ्या गाड्यांकडे तिचं लक्ष नव्हत. ती चालताना डावीकडून येत असलेल्या एका बीएमडब्ल्यूच्या पुढ्यात आली. ड्रायव्हर ने ब्रेक लावला. मुग्धा फोन कानावरून बाजूला करत, ट्रोली बाजूला घेत खजील होऊन सॉरी म्हणाली. गाडी तिच्या शेजारी आल्यावर गाडीची मागची काच खाली झाली. आत दांडेकर काकू होत्या. त्यांना बघून मुग्धाला आश्चर्याचा धक्का बसला. काकू म्हणाल्या “काय ग? तुला आमचे ड्रायव्हर आवडत नाही का? एकाला तरी तू तुरुंगात धाडणार.” मुग्धा खजील होऊन म्हणाली “काकू सॉरी. अहो मुलाचा फोन आला होता त्यात जरा दुर्लक्ष झालं.” गाडीची पुढली काच खाली झाली. तिथे तेजस बसला होता. तो म्हणाला “विद्याविहार आम्हाला on the way आहे. तुम्हाला सोडू शकतो वाटेत. बसा पटकन.” मागे इतर वाहन हॉर्न वाजवत होती. मुग्धा नाही म्हणू शकली नाही. तिने बूट मध्ये आपली bag टाकली आणि गाडीत दांडेकर काकूंच्या शेजारी बसली.
गाडीत दांडेकर काका आणि तेजस कामाबद्दल बोलत होते. इतके दिवस ऑफिसपासून लांब राहिलेला तेजस सर्व बिझनेसचे अपडेट घेत होता. दांडेकर काकू म्हणाल्या “हे असंच सुरु असत ह्या दोघांच. म्हणून मी नेहेमी कुठेही जायचं असलं की ह्यांच्या बरोबर न जाता वेगळ्या गाडीतून मस्तपैकी गाणी ऐकत जाते.” रस्ता मोकळा असल्याने थोड्याच वेळात गाडी विद्याविहाराला आली. तेजसने विचारलं “कुठे सोडायचं तुम्हाला?” मुग्धा म्हणाली “नेक्स्ट सर्कलला सोडा. मी आत जाईन. तिथून जवळ आहे.” तेजस म्हणाला “bag जड आहे तुमची आणि इतक्याश्या अंतराला taxi पण मिळणार नाही. आम्ही तुम्हाला घराजवळ सोडतो. गाडी कुठे घ्यायची सांगा.” मुग्धा म्हणाली “ सर्कल वरून सेकण्ड राईट. मग डावीकडे पाचवी बिल्डींग. गणरंग सोसायटी.” ते ऐकून तेजसने गर्रकन वळून तिच्याकडे बघितलं. म्हणाला “गणरंग सोसायटी, विद्याविहार? नाव आधी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय.” गाडी बिल्डींगच्या बाहेर येऊन थांबली. मुग्धा दांडेकर काका काकूंचा निरोप घेऊन उतरली. बूट मधून bag काढून तिने बूट बंद केलं तर समोर तेजस उभा होता. तो तिच्या बिल्डींगकडे डोळे बारीक करून बघत होता. बिल्डींग समोरच्या ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळत असलेल्या पोरांना न्याहाळत होता. अचानक तेजस त्या पोरांमध्ये जाऊन त्यांच्याशी काहीतरी बोलू लागला. मुग्धा आणि दांडेकर दाम्पत्य आश्चर्याने बघत होते. अचानक तेजस batting करू लागला. पहिल्याच बॉलवर त्याने समोरच्या इमारतीच्या गच्चीच्या कठड्यावर बॉल मारला आणि खुश होऊन उड्या मारू लागला. मग त्याने मुलांना thanks म्हणून bat परत दिली आणि मुग्धाचा निरोप घेऊन गाडीत बसला. गाडी निघाली. मुग्धा सुन्न होऊन विचार करत होती की आज तेजसने मारलेला शॉट फक्त डावरा असलेला प्रशांत मारू शकत असे. तो “प्रशांत सिक्सर” म्हणून फेमस असलेला शॉट इथे पहिल्यांदाच आलेल्या तेजसला कसा काय जमला? तिथे गाडीत दांडेकर काकांनी तेजसला विचारलं “काय रे तू डावरा कधीपासून झालास?” तेजस म्हणाला “माहित नाही. पण आज batting करावीशी वाटली आणि आपोआप डावरा स्टान्स घेतला!”
उन्ह हळू हळू कलली होती. आपल्या पोटात अनेक रहस्य दडवलेला काळ पुढे सरकत होता.
© मंदार जोग
क्रमशःगुंतता हृदय… (भाग- ७)

