गुलजार | Mandar Jog

गुलजार

काही लोकांचं कर्तृत्व, प्रतिभा आणि व्यक्तिमत्व अशी असतात की कधी समोर आले तर आधी त्यांच्या पाया पडावं असं वाटतं. अशा दोन लोकांच्या मी पाया पडायच्या आधीच ते गेले. रतन टाटा साहेब आणि लता मंगेशकर. पण तिघे अजून आहेत. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि संपूर्ण सिंग कालरा काका उर्फ गुलजार साहेब. आज गुलजार साहेबांचा ९२ वा वाढदिवस आहे. होय. ९२ वा. म्हणून त्यांच्याबद्दल चार शब्द लिहायची हिम्मत करतोय. खरं तर मी गुलजार साहेबांबद्दल लिहिणं हे सखाराम गटणेने पु. लं. वर लेख लिहिण्यासारखं आहे. कारण गुलजार दोन वाक्यांतून जे सांगून जातो ना ते आम्ही रकानेच्या रकाने लिहिले तरी मांडता येत नाही.

हिंदी सिनेमातील माझा सर्वात आवडता गीतकार साहिर असला तरी गुलजार ह्यांची शैली, त्यांची शब्दरचना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा trademark असलेले personification आणि animated imagery मला स्तिमित करतात. त्यांच्या रचना ऐकताना हे ह्या माणसाला सुचूच कसं शकतं असा प्रश्न प्रत्येक वेळी पडतो, इतकी ताकद त्या माणसाच्या लेखणीत आहे. इथे फरक लक्षात घ्या. खूप छान लिहिणारे अनेक लोक असतात. म्हणजे त्यांचे लेख, कविता, कथा, गोष्टी असा कोणताही साहित्य प्रकार वाचल्यावर छान वाटतो. आपण हा/ही किती मस्त लिहिते असं म्हणतो. आणि गुलजारसारख्या लोकांच्या लिहिण्यापलीकडे जाऊन आपल्याला प्रश्न पडतो की ह्याला किंवा हिला हे सुचत कसं? उदाहरण द्यायचं झालं तर संदीप खरे छान लिहितो. अनेक लोक म्हणतात की संदीप खरे किती छान कविता करतो. पण ग्रेस, सुरेश भट, शांताबाई शेळके, पाडगावकर तसेच आजच्या पिढीतील गुरु ठाकूर ह्यांच्या कविता किंवा गीते वाचल्यावर ह्यांना हे सुचू कसं शकतं जे असं वाटतं ना, त्या भावनेचा गुलजार अत्युच्च अनुभव आहे. तोच फरक हिंदी सिनेमा गीतरचनेत इंदीवर, समीर आणि साहिरमध्ये होता. किंवा गाण्यात इतर आणि लता किंवा आशा ह्यांच्यात होता. छान करणारे चांगलेच असतात. पण छान सुचणारे त्यांच्या कित्येक योजने पुढे गेलेले असतात असं मला वाटतं. गुलजार त्या वाटेवर सर्वात पुढे चालणारा, शुभ्र वस्त्र धारण केलेला एक महर्षी आहे असं मला वाटतं.

माणसाची वेशभूषा त्याच्या व्यक्तिमत्वाचा, मनाचा आरसा असते असं मला नेहमी वाटतं. विशेषतः तो वापरत असलेले कापड आणि त्याचे रंग माणसाचे अंतरंग दाखवतात असं माझं वैयक्तिक मत आहे. गुलजार अगदी पूर्वीपासून, म्हणजे जेव्हा तो झब्बा लेंगा घालून जाड काळ्या फ्रेमचा चष्मा लावत असे आणि त्याचे केस काळे होते तेव्हापासून, पांढऱ्या रंगाचे मऊ, तलम, सुती कपडे वापरतो ते आजतागायत. फक्त आता त्यात पांढरे केस आणि क्वचित वापरत असलेल्या पांढऱ्या शालीची भर पडली आहे. अर्थात त्याचे कपडे सुती असतात हा माझा अंदाज. मी काही त्याच्या झब्ब्याच्या बाहीत दोन बोटं घालून “प्युअर कॉटन आहे का?” असं विचारून खात्री करून घेतलेली नाही. Jokes apart. त्याची वेशभूषा पाहिल्यावर नेहमीच मला गुलजार हा अतिशय स्वच्छ मनाचा, स्वच्छ चारित्र्याचा, स्वच्छ विचारांचा, प्रेमळ, तत्त्वनिष्ठ, सरळमार्गी माणूस वाटत आला आहे ज्याची फक्त भाषा सरळ न जाता अनेक वळणे घेत सुंदर चित्र चितारत जाते. खरंच. मला नेहमीच वाटतं की एखादा चित्रकार चित्र काढताना कॅनव्हासवर रेषा काढतो, त्यात रंग भरतो आणि चित्र पूर्ण झाल्यावर त्याला जे समाधान वाटतं तेच समाधान गुलजारसारखे लोक जेव्हा कागदावर शब्द लिहून काव्य संपवतात तेव्हा त्यांना मिळत असेल का? कारण त्यांची लिखाणाची प्रोसेस चित्र काढण्यासारखी, त्यात हळूहळू रंग भरण्यासारखीच असेल असं मला नेहमी वाटतं.

गुलजारचा धीरगंभीर खर्जातला आवाज, तो बोलताना वापरत असलेले शब्द, त्याचा सेन्स ऑफ ह्युमर, त्याची बोलण्याची ढब, त्याची विनम्रता आणि बोलता बोलता सहजपणे त्याच्या तोंडातून बाहेर पडणारी एखादी कविता किंवा मराठी निवेदकांनी खूप स्वस्त केलेला शब्द म्हणजे शब्दफुले ऐकायला माझ्यासारख्या त्याच्या भक्तांचे कान आसुसलेले असतात. मग ते त्याचं एखाद्या बक्षीस समारंभातील आभार प्रदर्शन करणारं भाषण असो की जावेद अख्तरबरोबर त्याने दिलेली मुलाखत असो. गुलजार फक्त वाचनीयच नाही तर श्रवणीय देखील आहे ह्याची खात्री होत जाते.

गुलजार दिग्दर्शक म्हणून मला आवडतोच. साधे सोपे विषय. त्याचे अनेक सिनेमे इतर भाषेतील मूळ कलाकृतीवर बेतलेले आहेत पण त्यांना गुलजारच दिग्दर्शकीय टच आहे. परिचय, अंगूर, आंधीपासून इजाजत आणि त्याच्या दिग्दर्शक म्हणून शेवटच्या हु तू तू पर्यंत त्याच्या सिनेमात त्याची दिग्दर्शक म्हणून सिग्नेचर जाणवत राहते. पडद्यावर तो थेट नसला तरी गुलजार नावाचा वॉटरमार्क सिनेमाभर असतो. त्याच्या सिनेमात गुलजारच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्वातला ठहराव सतत येत असतो. अगदी अंगूरसारखा विनोदी सिनेमा देखील रोहित शेट्टीच्या कॉमेडी सिनेमाच्या पेसने न जाता गुलजारच्या ठहरावाने पुढे सरकत राहतो आणि तरीही प्रेक्षकांना हसवण्यात कुठेही कमी पडत नाही.

गुलजारचे प्रत्येक गाणे, सिनेमा आणि रचना ह्यांच्याबद्दल लिहायचं म्हटलं तर त्याच्या रचनांच्या संख्येइतके लेख लिहावे लागतील आणि तसं करायला हा जन्म अपुरा पडेल. कारण नाम गुम जायेगा, एक अकेला इस शहर में, मेरा कुछ सामान, तेरे बिना जिंदगी से, ओ माझी रे, आप की आंखों में कुछ, इस मोड़ से जाते हैं पासून तुझसे नाराज नहीं जिंदगी आणि लकड़ी की काठीपर्यंत गुलजारने गीतांचा एक हिमालय उभा केला आहे. जो त्याच्या मनासारखा, व्यक्तिमत्वासारखा आणि कपड्यांसारखा शुभ्र, स्वच्छ आणि आपण शिखर पाहायला मान वर केली तर आपल्या टोप्या मागे पडतील इतका उत्तुंग आहे. त्या हिमालयाचं वर्णन आपण काय करायचं? हिमालयाला कवेत घ्यायला आपले हात अपुरे आहेत हे माहित असल्याने आपण फक्त हात जोडायचे आणि त्याला नमन करायचं.

गुलजार साहेब, आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेटायची, किमान बघायची तरी इच्छा आहे. आणि भेटून तुमच्या पाया पडता आलं तर मला जो आनंद, जे समाधान मिळेल ना ते शब्दात मांडता येणार नाही. कदाचित तुमच्या पाया पडल्यावर मला प्रचंड रडू येईल. तो आनंद असेल हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचल्याचा. बघू, आयुष्य ती संधी कधी देतं ते. तोवर तुमच्यातल्या शुभ्र तपस्वीला आम्ही रोज मनातल्या मनात नमस्कार करत राहू, आजवर करत आलो आहोत तसे.

तुम्हाला ईश्वर भरपूर आयुष्य, उत्तम तब्येत, प्रचंड सुख आणि अमर्याद प्रतिभा देत राहो, हीच तुमच्या वाढदिवशी तुमच्या कोट्यवधी फॅन्सकडून ईश्वरचरणी प्रार्थना.

सिनेमावर आधारित आणखी लेख वाचायला इथे क्क्लिक करा- फिल्लमबाजी

आमच्या लघुकथा वाचायला इथे क्लिक करा- लघुकथा

व्यक्तीचीत्रांची लिंक- व्यक्तिचित्रण

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

8 thoughts on “गुलजार”
      1. गुलजार….खूपच छान लेख.
        हिमालयाची उपमा किती योग्य आहे. तुम्हाला गुलजारसाहेबांना भेटायला मिळू दे, आणि पाया पडायला पण. माझ्या नावाचा ही नमस्कार सांगा.
        कारण मला ही ते प्रचंड आवडतात.

  1. खूप छान..
    काहीच व्यक्ती अशाच असतात ज्यांना भेटल्यावर मनापासून पाया पडावे वाटेल त्या पैकी एक…
    गुलजार साहेब
    आणि बाकी ज्या व्यक्तींचा आपण उल्लेख केला आहे ते सर्व पण असेच आहेत. आपलं भाग्य आहे आपल्या ला ह्या सर्वांना पहाता आलं
    धन्यवाद

  2. गुलजार….खूपच छान लेख.
    हिमालयाची उपमा किती योग्य आहे. तुम्हाला गुलजारसाहेबांना भेटायला मिळू दे, आणि पाया पडायला पण. माझ्या नावाचा ही नमस्कार सांगा.
    कारण मला ही ते प्रचंड आवडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!