संमिलन
तशी त्यांची ओळख व्हरच्युअल. म्हणजे फेसबुकवरची. टू बी प्रिसाईस फेसबुक समुहावरची. अगदी खरं सांगायचं तर ओळख नव्हतीच. ती पुण्यात आयटी कंपनीत नोकरीला असलेली, काही प्रोजेक्ट्ससाठी परदेशात राहून आलेली आधुनिक विचार, आचार आणि राहणी असलेली मुलगी. तो सांगलीत राहीलेला, शिकलेला, स्वतःची फॅक्टरी टाकलेला रांगडा इंजिनियर. त्यांना आपण कविता आणि सुनील अशी सर्वमान्य नावे देऊ.
तर कविता मनाला सुचेल रुचेल ते पोस्ट रूपाने समुहात लिहायची. तिची शैली सुंदर, साधी तरी परिणामकारक होती. तिच्या लेखनाचे (आणि डीपीच्या फोटोचे देखिल) अनेक चाहते होते. त्यामुळे रोज येणार्या नवनवीन फ्रेंड रिक्वेस्ट आणि तरुण पोरांचे नाविन्यपूर्ण विस्मयजनक मेसेजेस तिला नवीन नव्हते. But she used to take it all in her stride! हां कोणी अगदीच आगाऊपणा केला तर ब्लॉकचा सर्वमान्य पर्याय ती वापरत असे.
त्याला तिचे लेखन खूप भावत असे. तिच्या लेखात त्याला तिचा खरा चेहरा दिसत असे. अगदी तिने निवडून मुद्दाम ठेवलेल्या, सर्वांना आवडणार्या तिच्या डीपी पलिकडले तिचे KP म्हणजे खरे पिक्चर! निदान त्याला तरी तसे वाटत असे! म्हणजे तिच्या लेखातून तिचा स्वभाव, विचारसरणी, संस्कार प्रतिबिंबित होत. तिच्यातील आधुनिकतेत दडलेली परंपरा, संस्कार जपणारी त्याला दिसणारी ती त्याला कुठेतरी आवडून गेली होती. पण सर्वांसारखी फ्रेंड रिक्वेस्ट टाकली किंवा मेसेज केला तर तो सुनील कसला? तो फक्त तिच्या लेखांना लाईक करून कॉमेंट मधून यथोचित दाद देई. तो पोस्टकर्ती म्हणून फक्त आपले नाव आणि डीपी असल्याने इतर अनेकांसारखा लाईक आणि कॉमेंट न करता, पोस्ट पूर्ण वाचून, त्याचा अर्थ लक्षात घ्यायची तसदी घेऊन सुयोग्य कॉमेंट करतो हे हळू हळू तिच्याही लक्षात आले होते. त्याच्या डीपी मधील त्याचा रांगडा पण उमदा फोटो, त्याच्या अभ्यासपूर्ण कॉमेंट्स ह्यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल एक कुतूहल होते!
ह्या कुतुहलात, पोस्ट आणि कॉमेंटच्या देवाण घेवाणीत एक वर्ष गेले. ते एकमेकांना ओळखत असले तरी त्यांची ओळख नव्हती! आणि एक दिवस त्यांच्या समुहाच्या स्नेह संमेलनाची घोषणा झाली. तो तिने पैसे भरले का हे चाचपडत होता आणि ती त्याने भरले का ह्याचा अंदाज घेत होती. शेवटी पैसे भरायचा शेवटचा दिवस आला. दोघांनी एकमेकांचा अंदाज घ्यायचा नाद सोडून समुहातील सर्वांना भेटायच्या उदात्त हेतूने, निरपेक्षपणे आपापले पैसे भरले! आणि संमेलनाचा दिवस उजाडला!
तो रांगडी XUV घेऊन भल्या पहाटे निघून संमेलन स्थळी सर्वात आधी पोहोचला. म्हणजे त्याची ती सवयच होती. वेळेआधी पोचायची. ती मात्र नेहमीप्रमाणे सावकाश उठून, आरामात छान तयार होऊन अर्धा तास उशीरा निघाली! तोवर ह्याने चहा नाश्ताही केला नव्हता. म्हणजे त्याचा मूडच लागत नव्हता. भेटणार्यांना फॉर्मल हाय हॅलो करत असला तरी लक्ष सतत प्रवेशद्वारावर खिळलेले. आणि बरीच वाट पहायला लावून अखेर ती आली. चंदेरी चांदण्यांच्या नक्षीची झुळझुळीत काळी सिल्क साडी, गोरेपान दंड दाखवणारा स्लीव्हलेस ब्लाऊज, मोकळे सोडलेले रेशमी केस, हातात चंदेरी क्लच, बुद्धिमत्तेचे तेज ओसंडून वहात असलेला प्रसन्न, सुंदर चेहरा, कमनीय बांधा आणि साडीवरील चांदण्या फिक्या पडतील असे चांदण्यांचे हसू लेऊन ती आली! सभागृहातील तमाम पुरुषच नव्हे तर बायकांच्याही माना ती आल्यावर क्षणभर वळल्या! ती सराईतपणे नोंदणी करून नाश्त्याच्या काउंटरवर पोहोचली. तिने प्लेट घेई पर्यंत अजुबाजूला आपसूक चार टाळकी जमली. ती औपचारिक हसून कोणालातरी शोधत होती. आणि तिला तो दिसला. एका कोपर्यात प्लेट घेऊन उभा असलेला. सहा फुट ऊंची. साध्या टीशर्ट मधून सहज दिसून येणारे कमावलेले पिळदार शरीर. सावळ्या चेहर्यावर झळकत असलेला यशाचा आत्मविश्वास. तिला आवडणार्या काळ्याभोर घनदाट टिळक छाप मिशा! He is hot! ती सुखावून मनातल्या मनात म्हणाली आणि त्या नादात तोंडात टाकलेला गरम वड्याचा तुकडा टाळूला चिकटल्याने तिला ठसका लागला. गोरा चेहरा गुलाबी झाला. ह्याने पटकन पुढे होऊन तिला पाण्याचा ग्लास ऑफर केला. तिच्या हातातील प्लेट घेतली! तिला इतक्या जवळून आणि ते ही प्रत्यक्ष तो प्रथमच पहात होता. ठसका आवरत पाणी पिताना ती त्याला अधिकच गोड आणि व्हलनरेबल भासली! त्यात तिच्या मंद वासाच्या परफ्यूमने त्याला जणू संमोहित केले. तो तिच्याकडे तंद्री लागल्यासारखा पाहत होता. अगदी तिने excuse me म्हणून त्याच्या हातातून प्लेट जवळजवळ हिसकावून घेई पर्यंत!
“Hi! I am Kavita. Thanks for the water!” असे म्हणत तिने शेक हँड साठी हात पुढे केला. त्याने मंत्रवत आपला हात पुढे करून तिचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला “I am Sunil. Pleasure to meet you!” इतके म्हणून तिने तिचा हात सोडवून घेतला. “तुम्ही फार छान लिहिता!” काय बोलायचे न सुचल्याने तो असे काहीतरी क्लीशे पुटपुटला! ती थँक्स म्हणून चांदण्याचे हसू शिंपडून निघून गेली आणि हा आपण काम ‘चु’सारखे बोललो ह्याची जाणीव होऊन चरफडला!
मग ती तिच्या मैत्रिणींच्या कोंडाळ्यात आणि हा ओढून ताणून ओळखी काढणार्या लोकांच्या गराड्यात. ती ‘काय छान दिसते आहेस गं.’ ‘लग्नाचा काही विचार आहे की नाही?’ असे विचारणार्या काकूंनी त्रस्त आणि हा बाष्कळ विनोद करणारे काका आणि पोरींवर टवके टाकणारे थिल्लर मजनू ह्यांच्या सहवासात वैतागलेला. समोर सुरु असलेल्या कार्यक्रमाकडे दोघांचेही लक्ष नाही. हळूच, चोरून एकमेकांकडे कटाक्ष. बघताना पकडले गेले की उगाच स्माईल. शेवटी जेवणाची वेळ झाली. बुफेच्या लाईनीत हा बरोब्बर तिच्या मागे उभा राहीला. प्लेट भरून, स्माईल एक्सचेंज करून दोघे लोकांच्या गराड्यापासून लांब असलेल्या आणि पंखा लागत नसल्याने लोकांनी नाकारलेल्या एका टेबलावर बसले.
जुजबी गप्पा सुरु झाल्या.
ती – तुम्ही माझ्या लेखनाबद्दल बोलत होता.
तो – (ह्यावेळी तिच्या डोळ्यात डायरेक्ट बघत) हो. तुमच्या लेखात तुमचा चेहरा दिसतो.
ती – (थोडी लाजून नटखटपणाने) काय सांगता? कसा दिसतो माझा चेहरा?
तो – तुमच्या मनाइतका सुंदर आणि बुद्धिइतकाच तेजस्वी!
ती – (आता त्याच्याकडे रोखून पाहत) खूप डीप वाचन आहे तुमचं!
तो – हो. मला जो विषय आवडतो त्याच्या मी खोलात शिरतो. अगदी इंजिनियरिंग पासून.
ती – ओह. तुम्ही इंजिनियर आहात तर.
तो – हो. छोटीशी फॅक्टरी आहे सांगलीला. पाच कोटी टर्नोव्हर केला लास्ट ईयर.
ती – वा! That’s impressive!
तो – थँक्स!
संवाद पुढे सरकणार इतक्यात आगाऊ पब्लिक येऊन फुटकळ बडबड सुरु झाली. मुद्द्याचे बोलणे राहून गेले. लंच नंतर दोघे परत आपापल्या कोंडाळ्यात. हळूहळू कार्मक्रमाची सांगता जवळ येऊ लागली. ह्यांची नेत्रपल्लवी आता अधीर झाली. तो सरळ उठून तिच्या शेजारी जाऊन बसला.
तो – दोन मिनिटे येता का? जरा बोलायचे आहे!
ती उठून त्याच्याबरोबर निघाली. दोघे सभागृहाबाहेर आले.
तो – हे बघ मी छोट्या गावातला साधा मुलगा आहे. घरची परिस्थिती उत्तम आहे. आपली परत भेट होईल की नाही ते माहीत नाही. म्हणून आत्ता सांगून टाकतो. मला माझ्या व्यवसायात एका हुशार, सुशिक्षित भागीदाराची गरज आहे. आणि आयुष्यातही. ते दोन्ही भागीदार मला तुझ्यात दिसतात. गेले वर्षभर दिसत आहेत. तू एकदा सांगलीला माझ्या घरी, माझ्या फॅक्टरीत यावस, माझ्या घरच्यांना भेटावस आणि माझ्या भागीदारीच्या दोन्ही ऑफरबद्दल निर्णय घ्यावास असे मला वाटते. त्यातून तुझी मर्जी. तू मोठ्या शहरात वाढलेली, परदेशात फिरणारी मुलगी आणि मी छोट्या शहरातला पण नव्या जगाशी ओळख ठेऊन असलेला मुलगा. विचार कर. आत्ता लगेच नाही म्हणालीस तरी चालेल! No hard feelings! I said what I had to!
इतके बोलून त्याला खूप हलके वाटत होते. तो दूर मावळणार्या सूर्य बिंबाकडे शांतपणे पहात होता! इतक्यात त्याच्या कानावर तिचे शब्द पडले!
ती – नाही!
त्याने चमकून तिच्याकडे वळून पाहीले. ती बोलत होती.
ती – नाही….पुढल्या रविवार पर्यंत थांबून चालणार नाही. मी उद्याच सुट्टीचे ऍप्लीकेशन देते. साईट व्हिजिटला सांगलीला जायला हवे. पार्टनरशीप जमली तर एक पुस्तकच लिहिन म्हणते!
तो – आणि त्यात तू मला फक्त दिसणार नाहीस तर त्यात मी देखिल असणार!
संमेलन संपले होते…एका संमिलनाची सुरुवात करून! सूर्य जवळजवळ अस्ताला गेला होता. तिच्या चांदण्यांच्या हास्याने रात्र उजळून निघत होती!!
आणखी लघुकथा वाचायला इथे क्लिक करा- लघुकथा
आमची व्यक्तिचित्रणे वाचायला ही लिंक क्लिक करा- व्यक्तिचित्रण
मृगजळ दिर्घकथेच्या सर्व भागांची. प्रत्येक भागाच्या शेवटी पुढील भागांच्या लिंक मिळेल – मृगजळ- सर्व भाग
कादंबरी- सख्या रे …
कादंबरी- ट्वेंटी थ्री

Khup chhan laghukatha sammelan avadli khup
[…] संमिलन- संमिलन […]
गोड गोष्ट …