अंगारकी | mandar jog

अंगारकी- साधारण १९५०-५२ च्या आसपासचा काळ. म्हणजे मुंबईची “बंबई” व्हायच्या बऱ्याच आधीच्या दिवसातला. ती घरून आई-बाबांचे बोट पकडून जवळच्या एका साध्या देवळात दर मंगळवारी जायची. वय वाढले, कॉलेजात गेली. आई-बाबांचे बोट धरायचे वय सरले. पण लहान वयात दर मंगळवारी आणि चतुर्थीला डोळ्यात साठवलेली बाप्पाची तेजस्वी मूर्ती मनात घर करून राहिली. लग्न झाले ते देखील जवळच. त्यामुळे त्याच देवळात जाण्याचा तो शिरस्ता कायम राहिला!

पूर्वी त्या देवळात खरी भक्त मंडळी फक्त देवाला नमस्कार करायला येत असत. मागायला आणि मागणं पुरं झालं म्हणून वचनपूर्तीचा व्यवहार करायला येणारे-करणारे तेव्हा नव्हते. फिल्मी लोकं फिल्ममध्येच होते. मुंबईत पापी लोकं मुळातच कमी होते. “इथे पापांचे क्षालन होते” अशी वावडी त्या देवळाबद्दल तोवर उडवली गेली नव्हती, त्यामुळे जे होते ते पापी इथे फिरकत नव्हते. ज्यांच्या पैशाने किंवा प्रसिद्धीने भारावून जाऊन भाबडा समाज त्यांना मोठं समजतो, अशा स्यूडो सेलिब्रिटी वटवाघुळांच्या नजरेत हे छोटेसे मंदिर तेव्हा आले नव्हते. देव तेव्हा ट्रस्ट, नेते, देणग्या, VIP लाईन, सापासारख्या फिरवलेल्या रांगा, नफेखोर फुलवाले, सिक्युरिटी कॅमेरे, पोत्यामागे बंदूक घेऊन दबा धरून बसलेले पोलीस ह्यांच्या मागे लपवलेला नव्हता. तो सहज कोणालाही दिसत असे आणि भक्तांना पावत असे. त्याचे पावणे फक्त भक्तीवर अवलंबून होते. भक्तीला तेव्हा देणगी आणि सोन्याच्या दागिन्यांचे कोंदण आवश्यक नव्हते!

पण हळूहळू बाप्पा प्रसिद्ध झाला. पाहता पाहता जमाना बदलला. देव आणि भक्तांच्या मध्ये अनेक अडथळे उभे करण्यात आले. ते पार करण्यासाठी फक्त विविध मार्गाने पैसा देणे हाच उपाय राहिला. झाकलेल्या गोष्टीचे कुतूहल हा मनुष्य स्वभाव आहे. त्यानुसार तिचा देव एका मागे एक बांधलेल्या भिंतीआड लपवण्यात आला. त्यात त्या बाप्पाला जागृत म्हणून “प्रसिद्ध” करण्यात आले. मुंबईत पाप आणि पापी वाढतच होते. फिल्मी लोकांना पडदा कमी पडू लागला होता आणि मीडिया जे समोर दिसेल त्यावर “कव्हर स्टोरी” बनवत होता. मग काय? जगाला अचानक तो देव सर्व समस्या दूर करतो, काहीही पाप करा, त्याला “भोग” चढवला की आपण परत पाप करायला मोकळे, ह्याचा साक्षात्कार झाला आणि त्या देवाच्या दर्शनासाठी जास्त वेळ लाईन लावणे, चालत तिथे जाणे हे प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. देव तोच, ती तीच, तिची श्रद्धा पण तीच! फक्त देवळात तिची आणि तिच्या बाप्पाची भेट कठीण होऊन बसली!

पण तिने त्यातून मार्ग शोधला. दर मंगळवारी आणि चतुर्थीला ती पहाटे साडेचार-पाच वाजता “पेड आणि सेलिब्रिटी” भक्त साखर झोपेत असताना तिच्या बाप्पाचं दर्शन घेऊ लागली. आता तिची साठी उलटली होती. ती सेवानिवृत्त झाली होती. मुले उच्चशिक्षित होऊन मार्गी लागली होती. दृष्ट लागावी इतकं छान जीवन तिच्या लाडक्या बाप्पाने तिला दिले होते. मग वृद्धत्वात एक गंभीर आजार बळावला. बाप्पाने तिला त्यातूनही सहीसलामत बाहेर काढले. इस्पितळ आणि नंतरच्या उपचारांदरम्यान काही महिने शिरस्ता चुकला होता…..पण आज अंगारकी चतुर्थी होती…..

पाय साथ देत नव्हते. जाऊ की नको, ह्या द्विधा मनस्थितीत सकाळ विरून गेली. बाप्पानेच “ये” असा कौल दिल्यागत तिने निर्णय घेतला. साधारण सकाळी अकराच्या सुमारास ती मंदिराजवळ पोहोचली तेव्हा तिचा बाप्पा चहूबाजूंनी “व्यवहार पुरा करायला” आलेल्या भक्तांच्या विविध “ग्रेडच्या” रांगांच्या विळख्यात अडकला होता. ती सामान्य भक्त असल्याने तिने सामान्य रांगेचा मार्ग धरला आणि हजारो लोकांच्या मागे अनेक तास उभं राहायच्या तयारीने ती काठीच्या आधाराने रांगेत उभी राहिली. तिच्या मागे काही मिनिटांत आणखी शेकडो आले! डोक्यावर सूर्य आणि पुढे अथांग जनसागर! आज तिच्या भक्तीची परीक्षा घेणार होता बाप्पा… आयुष्यात पहिल्यांदा! पण तिचा निर्धार ठाम होता! ती उभी होती. सात-आठ मिनिटे झाली तरी रांग सरकत नव्हती….

इतक्यात अचानक एक लाल भडक कुडता घातलेला, कपाळावर गंध लावलेला आठ-दहा वर्षांचा चुणचुणीत मुलगा सर्व रांग सोडून नेमका तिच्याकडे आला…

मुलगा: आजी, तुम्ही देवळात जायला उभ्या आहात?

ती: हो रे बाळा.

मुलगा: हा घ्या व्हीआयपी पास.

ती: (आश्चर्याने) अरे, तुला कुठून मिळाला? तुझे आई-बाबा कुठे आहेत? मला पास का देतोस? तुम्हाला लागेल ना पास. मी रांगेत दर्शन घेईन.

मुलगा: आजी, माझ्याकडे खूप पास आहेत. हा तुमच्यासाठी. पटकन घ्या आणि दर्शन घ्या. मला घाई आहे…..

मुलाने झटकन तो पास तिच्या हातात कोंबला. पासवरील बाप्पाच्या फोटोला नमस्कार करून ती समोर पाहते तोवर मुलगा गर्दीत हरवला होता. तिने अविश्वासाने सभोवताली पाहिले. तो मुलगा कुठेच दिसत नव्हता. ती सावकाश पावले टाकत व्हीआयपी द्वाराजवळ पोहोचली. पास दाखवून आत शिरली. गाभाऱ्यात आरतीची तयारी पूर्ण झालेली होती. जणू तिची वाट पाहत असल्याप्रमाणे तिने गाभाऱ्यात पाय ठेवताच आरती सुरू झाली. घंटानादात सुरू असलेलं धीरगंभीर “सुखकर्ता दुःखहर्ता” ऐकताना ती आपल्या लाडक्या बाप्पाला डबडबलेल्या डोळ्यात साठवत होती. बाप्पाच्या जागी तिला तो पास देणारा मुलगा दिसला. अश्रूंना तसेच वाहू देत तिने हात जोडले!…बाहेर “व्यवहारी भक्तांच्या” रांगेचा अजगर आणखी विक्राळ रूप धारण करत असताना आजी मात्र आरतीच्या गजरात बाप्पाला अश्रू आणि कृतज्ञतेचे स्नान घालत हात जोडून उभी होती. बाप्पा सोंडेतून प्रसन्न हसत तिला आशीर्वाद देत होता…खऱ्या भक्ताला बाप्पाने जराही तोशीस न पडता दर्शन दिलेलं होतं. आणि बाहेर भक्तीचा बाजार फुललेला होता…

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!