गुंतता हृदय ही मराठी दीर्घकथा मंदार जोग

….आर्या- हेलो, हे हॉस्पिटल आहे. हॉटेल नाही.

ते ऐकून मुग्धा दचकून बाजूला झाली. आर्या हसून म्हणाली-

आर्या- तेजस, काका आणि काकू वाट बघत आहेत. आपल्याला घरी जायचं आहे. तुमचे गुरुजी येणार आहेत.

आर्या बाहेर गेली. मुग्धा तेजसला म्हणाली-

मुग्धा- पण तेजस, हे कसं काय? डॉक्टर तर म्हणाले होते की….

तेजस- हो मुग्धा. डॉक्टर बरोबरच म्हणाले होते. मी मेलो होतो. पण…..

तेजसने सांगायला सुरुवात केली. मुग्धाला ते चित्र समोर दिसू लागलं.

तेजस- इथल्या डॉक्टरने बाबांना सांगितलं की माझ्या शरीरात प्रशांतचं हृदय बसवलेलं आहे. ते ऐकून तू बेशुद्ध पडलीस.

मुग्धा- हो….

तिने हळूच त्याच्या हृदयावरून हात फिरवला. तेजस उठून बसला. मुग्धा त्याच्या मिठीत शिरली आणि त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू लागली. तिला प्रचंड समाधानाची अनुभूती होत होती. तेजस बोलत होता.

तेजस- तुला लगेच इथे ॲडमिट केलं. आणि बाबांनी सगळ्या सिच्युएशनचा चार्ज घेतला. बाबा माझी बॉडी ठेवलेल्या खोलीत आले. खूप रडले. बाहेर जाऊन आईला म्हणाले-

दांडेकर काका- आज आपला तेजस कायमचा गेला. कदाचित त्या मुग्धाशी… जिने आपल्या तेजसला तिच्या नवऱ्याचं हृदय दिलं, तिच्याशी आपण खूप वाईट वागलो, त्याची शिक्षा असेल ही.

काकू- मला माझा तेजस परत हवाय. तो असा जाऊ शकत नाही. गुरुजी म्हणाले होते की तो जाणार नाही. फक्त धोका आहे.

काका- ते असंही म्हणाले होते की त्यांना एका मर्यादेपलीकडे काही दिसत नाहीये. कदाचित त्यांना हे दिसलं नसेल.

तेजस सांगत होता. मुग्धा ऐकत होती.

तेजस- मुग्धा, मी पण त्याच खोलीत उभा होतो. माझ्याच बॉडीला बघत. खूप हलका झालो होतो मी. आता उडून जाणार असं वाटत होतं. आणि…. आणि तेवढ्यात प्रशांत त्या खोलीत आला. माझ्यासारखाच हलका आणि धूसर. मी त्याला ओळखलं. मला आपल्यात झालेला प्रसंग आठवून लाज पण वाटली. मी त्याच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो. प्रशांतने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला-

प्रशांत- हाय तेजस….

तेजस- ह… हाय….

प्रशांत- काय झालं? इतका नर्व्हस का आहेस तू?

तेजस- क… काही नाही….

प्रशांत- अरे, आता आपण दोघंही सेम आहोत. आत्मे! ते बघ, तुझं निचेष्ट शरीर समोर ठेवलेलं आहे. माझं तर जळून नष्ट देखील झालं. प्रत्येक जन्मात होतं तसंच. पण मी आणि ती शरीर बदलून युगानुयुग विहार करत असतो.

तेजस- तुम्ही म्हणजे?

प्रशांत- तुझ्यासाठी प्रशांत आणि मुग्धा…. ह्या विश्वासाठी प्रेम आणि त्याची आराधना…. एक भावना जी युगानुयुग आमच्या रूपाने जतन होते आहे. आम्हाला कोणीच एकमेकांपासून दूर करू शकत नाही. आमची शरीरं बदलतात, काळ शेकडो-हजारो वर्षांनी पुढे सरकतो. पण आम्ही दोघं कधी मनुष्यरूपात, कधी पक्षी बनून आकाशात, कधी मासे बनून अथांग सागरात तर कधी मुंगी बनून ह्या विश्वात परत परत जन्म घेत असतो.

तेजस- पण मग तू तर ह्या जन्मात मेलास आणि मुग्धापासून दुरावलास.

प्रशांत- हो. शरीराने माझा घात केला. आमच्यावर टपून असलेल्या नियतीने डाव साधला, पण आमच्या प्रेमाचं अस्तित्व ती मिटवू शकली नाही. आम्हाला दूर करू शकली नाही. मी शरीर सोडायच्या आधी माझं हृदय, माझं मन ज्यात माझं प्रेम वास करतं ते तुझ्या शरीरात बसवलं. माझं प्रेम तुझ्या शरीरात जिवंत राहिलं.

तेजस- मग झालं ना तुझ्या मनासारखं? तरीही तू मृत्यूनंतर इतके महिने उलटून देखील आत्मा बनून का घुटमळतो आहेस? तुला मुक्ती का नाही?

प्रशांत- त्याचं उत्तरही प्रेम हेच आहे. तुझ्या शरीरात असलेल्या माझ्या हृदयाची, माझ्या प्रेमाची मुग्धाला ओळख करून द्यायची होती, तुझ्या मनात आणि विचारात तिच्याबद्दल प्रेम निर्माण करायचं होतं. माझ्या अचानक जाण्याने पुढे सरसावलेली नियती रोहितच्या रूपाने मुग्धाला त्रास देत होती. मला नियतीला हरवायचं होतं. माझ्या मुलाला, अमेयला वडिलांचं छत्र मिळेल ह्याची व्यवस्था करायची होती. खूप काम होतं मित्रा.

तेजस- पण… पण आता ते कसं शक्य आहे? I mean, आता तर मी पण….

प्रशांत- तू काय? तू पण मेला आहेस?

प्रशांत जोरात हसला. म्हणाला-

प्रशांत- ती बघ, कशी कोपऱ्यात बसली आहे अंग चोरून…. तिला माहीत्येय की आज मी तिचा पूर्ण पराभव केला आहे. ह्याआधी हजारदा केला होता तसाच. बघ, बघ….

तेजसने वळून बघितलं. एक काळी स्त्रीची धूसर आकृती खरंच अंग चोरून, घाबरून एका टेबलाखाली बसली होती.

तेजस- ही कोण आहे?

प्रशांत- नियती. आज मी तिला हरवलं आहे.

तेजस- ते कसं काय?

प्रशांत- तेजस, मी माझं हृदय तुला दिलं. त्यातल्या प्रेमासकट. आता मुग्धाला ती ओळख पटली आहे. तुझ्या घरच्यांनाही आता सर्व माहित आहे. आता मी जाणार…. पण…. जायच्या आधी माझ्या हृदयात परत एकदा स्पंदन निर्माण करून जाणार. कारण ह्या जन्मात जे झालं तो त्या नियतीचा रडीचा डाव होता. पण वैश्विक सत्य हे आहे की मला आणि तिला कोणीच दूर करू शकत नाही. नियती आणि काळ वार्धक्य आणून आमची शरीरं संपवतात, पण आम्ही परत जन्म घेतो. त्यांच्यावर मात करतो. पण ह्यावेळी ती घाणेरडा खेळ खेळली. तो विधात्यालाही मंजूर नाहीये. माझं शरीर संपलं असलं तरी माझं हृदय अजून अस्तित्वात आहे. तुझ्या शरीरात…. आणि त्यात मी माझ्या प्रेमाची स्पंदनं निर्माण करणार आहे. बघ, तू आता.

प्रशांतने डोळे बंद केले. त्याच्या डोळ्यांसमोर मुग्धाचा चेहरा आला. त्याने मुग्धाला मिठी मारली. प्रेमाचा आवेग वाढला. प्रशांतला त्याच्या आणि मुग्धामधले सर्व इंटिमेट क्षण आठवू लागले. प्रशांत आणि मुग्धा एकमेकांत हरवून गेले आणि एका अत्युच्च क्षणी तेजसच्या शरीरात असलेलं प्रशांतचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तेजसने काही वेळात डोळे उघडले आणि नर्सला बोलवायला बेल वाजवली. ती बेल ऐकून त्या रूमच्या बाहेर उभ्या असलेल्या वॉर्ड बॉयच्या अंगावर शहारा आला. त्याने हळूच आत वाकून पाहिलं तर तेजस आतून पाणी हवं असल्याचं हाताने सांगत होता. वॉर्ड बॉय घाबरून डॉक्टरांना हाका मारत पळाला.

काही वेळात तेजसच्या भोवती डॉक्टर्स, आई, बाबा, आर्या होते. डॉक्टर्सचा विश्वास बसत नव्हता.

डॉक्टर- हे miracle आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये हे असं कधीच झालेलं नाहीये.

काका-काकूंनी एकमेकांकडे बघितलं. एक स्माईल दिलं आणि सावकाश पावलं टाकत बाहेर निघाले.

काका- मुग्धा शुद्धीवर आली की दोघांना भेटवू. म्हणजे आपली जबाबदारी संपली.

काकू- हो… त्यांच्या युगानुयुगाच्या प्रेमात आपली तेवढीच भूमिका आहे.

हे ऐकून आर्याने पण मनापासून स्मित केलं. सगळे मुग्धा शुद्धीवर यायची वाट बघू लागले.

तेजस- मग तू शुद्धीवर आल्यावर उठून इथे आलीस आणि आपण बोलतो आहोत, मुग्धा!

तेजसच्या तोंडून हे सर्व ऐकून मुग्धाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिने तेजसला परत मिठी मारली. दोघे परत एकमेकांच्या मिठीत हरवले आणि आर्या परत आली.

आर्या- मी इथेच दोन नाईट स्टेचा रेट विचारून घेऊ का? आणि डबल बेड पण मिळेल का बघते.

ते ऐकून तेजस आणि मुग्धाला हसू आलं.

तेजस- नको. मला घरचा बेड जास्त आवडतो. प्रशस्त आहे. चल मुग्धा, दाखवतो तुला.

आर्या- तुम्ही पुढे व्हा. मी अमेयला घेऊन तुझ्या घरी येते तेजस.

आर्या गेली. हे दोघे बाहेर आले. दांडेकर काका आणि काकूंनी मुग्धाला जवळ घेऊन थोपटलं.

काका- गुरुजी इथे नाही तर घरी येतील असा फोन आला होता. निघायला हवं.

सगळे तिथून निघाले. त्या लांब कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला प्रशांतची धूसर आकृती तरंगत होती.

तेजसच्या घरी गुरुजी ध्यान लावून बसले होते. सगळे त्यांच्या सभोवताली बसून त्यांच्याकडे बघत होते. गुरुजींनी एका रिकाम्या तांब्यावर आपला हात ठेवला होता आणि ते काहीतरी मंत्र म्हणत होते. त्याच वेळी तेजसच्या घराच्या छतावर तरंगत असलेला धूसर प्रशांत अधिकाधिक हलका आणि पारदर्शक होत होता. गुरुजींच्या मंत्रांची लय वाढत होती. प्रशांतला जायची वेळ झाल्याची जाणीव होत होती. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. पण तेजसने प्रेमाने घट्ट धरलेला मुग्धाचा हात आणि दुसऱ्या हाताने त्याने अमेयला देखील जवळ घेतलेला पाहून प्रशांत समाधानी होता. तो हळूच तरंगत खाली आला. मुग्धाच्या शेजारी बसला. गुरुजींचे मंत्र लय वाढवत होते. प्रशांतला त्यांच्या हाताखाली असलेल्या त्या तांब्यातून मोक्षाकडे जाणारी पांढरी वाट आता स्पष्ट दिसत होती. आता ती वेळ काही सेकंदांवर आली होती. प्रशांतने तो नेहमी घ्यायचा तसा मुग्धाच्या कानामागे एक किस घेतला आणि म्हणाला-

प्रशांत- येतो ग मोहिनी… भेटू…. मी आहे… मीच आहे… आणि मीच असेन….

मुग्धाने सर्रकन मागे बघितलं. तिथे कोणीच नव्हतं. तेवढ्यात गुरुजींचा त्या तांब्यावर असलेला हात बाजूला झाला. खोलीत उपस्थित सर्वांना अचानक एक थंड वाऱ्याची झुळूक जाणवली. प्रशांत पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडून अवकाशातल्या अंधाऱ्या पोकळीत पोहोचला होता. त्याला अजूनही खाली मुग्धा दिसत होती. आणि तिच्या पोटात निर्माण झालेला तेजसचा अंश पण दिसत होता. तो अंश खरं तर कोणाचा आहे हे फक्त प्रशांत जाणत होता. समाधानाने हसून तो विरळ विरळ होत कित्येक योजने दूर दिसत असलेल्या एका तेजस्वी ठिपक्याकडे प्रकाशाच्या वेगाने सरकू लागला. त्यांच्या प्रेमाचा अविरत प्रवास पृथ्वीवर नव्या रूपात सुरू झाला होता.!

समाप्त….

© मंदार जोग

सर्व भाग एकत्र – गुंतता हृदय – सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

3 thoughts on “गुंतता हृदय….(भाग ३४- शेवटचा भाग)”
  1. Khup chhan katha aahe surwatvkelya pasoon salag 21 bhag eke baithakit vachun kadhle … Itkya sunder kathe baddal manapasoon abhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!