गुंतता हृदय ही मराठी दीर्घकथा मंदार जोग

………तो व्हिडीओ पाहून मुग्धाच्या पायाखालची जमीन सरकली. मुग्धाच्या पायातलं त्राण गेलं आणि ती मटकन तिथेच बसली. त्याच वेळी तेजसला त्याच्या हृदयाचे ठोके अचानक खूप वेगात पडायला लागल्याचं जाणवलं. ही दांडेकरांच्या गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्याची नांदी होती की जन्मोजन्मीचा भूतकाळ आता वर्तमान बनून एक नवीन भविष्य घडवणार होता? काळ नामक एक गूढ शक्ती तिच्या हृदयात अनेक प्रश्नांची उत्तरं कवटाळून सावकाश पुढे सरकत होती.

तेवढ्यात मुग्धाच्या मोबाईलमध्ये मेसेज खणखणला. तिने घाईत मेसेज बघितला. मेसेज रोहितने पाठवला होता. त्याने शहराबाहेरच्या एका वस्तीतील एका घराचं लोकेशन त्यात पाठवलं होतं. आणि त्यात, “तू एकटीच येशील ह्याची खात्री आहे,” असा मेसेजही लिहिला होता. तो वाचून होतंय तोच त्याने एक व्हिडीओ पाठवला. त्यात अमेय म्हणत होता, “आई, लवकर ये ना. मी आणि काका वाट बघतोय तुझी.”

मुग्धाला प्रचंड अगतिक वाटत होतं. त्या घरी गेल्यावर अमेयच्या बदल्यात रोहित तिच्या शरीराचे लचके तोडणार, ह्या कल्पनेने तिला शिसारी आली. पोलिसांना सांगून उपयोग नव्हता. तिला प्रशांतची खूप आठवण आली. त्याचा प्रचंड रागही आला. ती म्हणाली—

मुग्धा- प्रशांत, तू एकटाच का गेलास आम्हाला जिवंतपणे ह्या मरणयातना सोसायला सोडून? आम्हालाही बरोबर न्यायचंस ना. काय करू मी आता? तुझ्या मुग्धाच्या ह्या शरीराला तो रोहित कलंकित करताना तुला पाहवलं असतं का रे? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? मग आज दाखव ना तुझं प्रेम. प्रशांत…. प्लीज….

मुग्धा रस्त्यात रडू लागली. जाणारे-येणारे लोक तिला बघत होते. मुग्धा बोलतच होती—

मुग्धा- प्रशांत, सांग ना मी काय करू? आपला अमेय तिथे अडकला आहे. त्याच्या बदल्यात रोहित मला मागतो आहे. प्रशांत, तुला माझी शपथ आहे. काहीतरी मार्ग दाखव रे. मी खूप खूप एकटी आणि हेल्पलेस आहे…. प्लीज, प्रशांत…. जर त्या रोहितने मला हात लावला तर मी हे शरीर संपवून टाकेन.

योगायोग म्हणजे तिने हे वाक्य बोलल्यावर अचानक तेजसची गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली. तेजसने तिला हाक मारली—

तेजस- मुग्धा, हाय….

तिला तेजसला तिथे पाहून आश्चर्य वाटलं. आणि खूप आधारही वाटला. ती त्याच्या गाडीजवळ गेली आणि म्हणाली—

मुग्धा- तेजस? तुम्ही? इथे?

तेजस- हो. तुझी वाट पाहून मी परत निघालो होतो. तेवढ्यात तू मला इथे उभी असलेली दिसलीस. काय झालंय? का रडते आहेस?

मुग्धा- (न राहवून) त… तेजस, अमेयला रोहितने पळवून नेलं आहे शाळेतून आणि तो त्याला सोडण्याच्या बदल्यात मला…..

मुग्धाला हुंदका फुटला. ते ऐकून तेजसच्या कपाळाची शीर तडतडू लागली.

तेजस- कुठे आहे रोहित?

मुग्धाने तेजसला पत्ता सांगितला आणि म्हणाली—

मुग्धा- पण तेजस, रोहितने मला एकटीला बोलावलं आहे…. तुम्ही नका येऊ….

तेजस- तू काळजी करू नको. आज रोहितला कायमचा धडा शिकवणार आहे मी.

मुग्धा- पण तेजस, त्याने अमेयला काही….

तेजस- त्याची हिंमत नाही होणार अमेयला हातही लावायची. चल तू.

मुग्धा प्रचंड टेन्शन होऊन बसली. तेजस गाडी चालवत होता. हळूहळू शहर मागे पडलं. हायवे लागला. गाडी प्रचंड वेगाने चालली होती. तेजसचा चेहरा आता शांत होता. त्याने काहीतरी निर्णय घेतला होता. जीपीएस दाखवत असलेल्या वळणावर गाडी वळली आणि कच्चा रस्ता पार करून एका घरासमोर उभी राहिली.

मुग्धा- आपण वेळेत आलो. माझा फोन आता कोणत्याही क्षणी बंद होईल. आय होप, अमेय इथेच आहे. कारण ते दुसरीकडे असतील तर मला मेसेज पण मिळू शकणार नाही. ओह…. फोन बंद झाला माझा.

मुग्धाच्या चेहऱ्यावर काळजी होती. तेजसच्या चेहऱ्यावर निर्विकार निग्रह होता.

तेजस- काळजी करू नको. माझा फोन सुरू आहे. तू पुढे हो आणि बेल दाब. मी बाजूला लपतो.

दोघे घराकडे चालू लागले. मुग्धाने बेल दाबली. रोहितने दार उघडलं. दारात उभ्या मुग्धाला बघून रोहित प्रचंड खूश झाला. आता काही मिनिटांतच मुग्धा त्याची होणार, ह्या कल्पनेने त्याच्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या.

रोहित- वॉव…. शेवटी आलीस तू…. मला खरंच वाटत नाहीये. थांब, खात्री करून घेऊ दे.

असं म्हणून मुग्धाला दारातच मिठी मारायला रोहित पुढे झाला आणि अचानक तिच्या मागे येऊन उभा राहिलेल्या तेजसला बघून प्रचंड हादरला. घाबरून मागे सरकला. मुग्धा त्याला बरोबर घेऊन येईल, हे रोहितला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. तेजसला बघून रोहित भीतीने थरथरू लागला. त्याच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता.

मुग्धा- रोहित, अमेय कुठाय?

रोहितने तेजसवरची नजर न हटवता डावीकडे हात दाखवला. मुग्धाने धावत जाऊन त्या बेडरूमचं दार उघडलं. आत अमेय चॉकलेट खात बसला होता. मुग्धाने धावत जाऊन त्याला मिठी मारली. त्याचे मुके घेतले. त्याच्या हातातलं चॉकलेट काढून फेकून दिलं आणि म्हणाली—

मुग्धा- तू बरा आहेस ना, बाळा? काकाने तुला काही त्रास दिला नाही ना? मारलं वगैरे नाही ना?

अमेय- नाही आई. काकाने मला बर्गर दिला, हे चॉकलेट दिलं.

मुग्धा- ठीक आहे. चल, आता घरी जाऊया.

मुग्धा अमेयला घेऊन बाहेर आली. बाहेर रोहित थरथरत उभा होता. तेजसच्या डोळ्यात अंगार फुलला होता.

मुग्धा- तेजस, चला. आपण निघूया.

तेजस- तुम्ही गाडीत बसा. मी आलोच.

मुग्धा- पण तेजस….

तेजस- मुग्धा, ऐकलंस का मी काय म्हणालो ते? गाडीत बसा.

मुग्धा अमेयला घेऊन बाहेर गेली. ते गाडीत बसण्यापूर्वी त्यांना रोहितची एक किंकाळी ऐकू आली. ते दोघे घाबरून गाडीत बसले. दुसऱ्या मिनिटाला तेजस आला. त्याने गाडी सुरू केली.

गाडीत तेजस आणि मुग्धा काहीच बोलत नव्हते. ह्या कशाचीच कल्पना नसलेला अमेय मस्तपैकी बाहेर दिसणारा रस्ता बघत एन्जॉय करत होता. गाडी मुग्धाच्या बिल्डिंगसमोर थांबली, तोवर रात्रीचे आठ वाजले होते. गाडी थांबवून तेजस म्हणाला—

तेजस- मुग्धा, तुमचं घर आलं. बाय….

मुग्धाला काय रिअॅक्ट करायचं कळत नव्हतं. ती तशीच बसून होती. इतक्यात अमेय म्हणाला—

अमेय- काका, आज आमच्या बिल्डिंगमध्ये होळी पेटवतात. तुम्ही या ना बघायला. खूप मजा येईल.

तोच धागा पकडून मुग्धा म्हणाली—

मुग्धा- हो. तुम्ही खरंच या. दिवसभर खूप धावपळ झाली आहे. मी लगेच गरम गरम जेवण बनवते. जेवा, होळी बघा आणि मग जा.

तेजस- तू हे मनापासून सांगते आहेस?

मुग्धा- हो….

तेजसने गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली. तिघे निघाले.

घरी आल्यावर अमेयने सर्वात आधी अंघोळ केली. कपडे बदलून तो होळी बघायला जायला तयार झाला. तेजस टीव्हीवर न्यूज बघत बसला होता. मुग्धा स्वयंपाक करत होती. घड्याळात नऊ वाजले होते.

अमेय- आई, लवकर वाढ जेवायला. साडेनऊला होळी पेटवणार आहेत.

मुग्धा- तयार आहे जेवण. तू पाणी घेऊन बस. मी आणते लगेच आणि काकांना पण विचार, जेवायला लगेच बसणार का म्हणून.

हे ऐकल्यावर तेजस म्हणाला—

तेजस- मुग्धा, अमेयचं होऊ दे आधी. आपण मग बसू. पण मला एक टॉवेल मिळेल का? मी जरा शॉवर घेतो, हे जेवण होईपर्यंत.

मुग्धा- हो. देते.

मुग्धाने अमेयचं ताट वाढून त्याच्यासमोर ठेवलं आणि बेडरूममध्ये कपाट उघडून प्रशांतचा एक टॉवेल तेजसला द्यायला बाहेर काढला. टॉवेल घेऊन ती मागे वळली, तर तेजस पुढ्यात उभा होता. इतका जवळ की ती जवळजवळ त्याच्यावर आदळली.

तेजस- हा प्रशांतचा टॉवेल आहे का?

मुग्धा- हम्म….

तेजसने टॉवेल घेतला आणि तो बाथरूममध्ये गेला. बाहेर अमेय जेवत होता. मुग्धा त्याला हवं नको ते वाढत होती. जेवण झाल्यावर अमेय होळी बघायला निघून गेला आणि तेजस शॉवर घेऊन बाहेर आला. कपडे घालून तो डायनिंग टेबलजवळ आल्यावर मुग्धा म्हणाली—

मुग्धा- तुम्ही बसता का जेवायला. मी तुम्हाला वाढून बाकी जेवण इथे आणून ठेवते आणि तुमचं होईपर्यंत मी पण शॉवर घेऊन येते. म्हणजे मग एकत्र होळी बघायला जाऊ.

तेजस- नको. तू ये शॉवर घेऊन. आपण एकत्र जेऊ आणि मग जाऊ होळी बघायला.

मुग्धा- ओके, आलेच मी पाच मिनिटांत.

मुग्धा बेडरूममध्ये गेली. तेजस टीव्ही बघू लागला. मुग्धा शॉवर संपवून बाहेर आली आणि एसी सुरू करून अंग पुसू लागली. तिला आज तेजसने केलेली मदत, त्याचे निग्रही डोळे, रोहितची किंकाळी हे सर्व आठवत होतं. मग एकदम तिला आठवलं की तिने तेजसला साधं थँक्ससुद्धा म्हटलं नाहीये. तिने ठरवलं की बाहेर गेल्यावर सर्वात आधी त्याला थँक्स म्हणायचं.

तिने कपडे घ्यायला कपाट उघडलं आणि कपडे हातात घेऊन ती वळली, तर समोर तेजस उभा होता. अगदी मगाशी होता तितकाच जवळ. त्याला इतका जवळ पाहून मुग्धा दचकली. तिने हातात धरलेले कपडे छातीशी कवटाळले. तिच्या अंगावर शहारा आला, पोटात काहीतरी कालवल्यासारखं झालं.

मुग्धा- त…. तेजस…. तुम्ही….

तेजसने तिच्या हातात असलेले कपडे घेऊन जमिनीवर टाकून दिले. पुढे होऊन तिला मिठीत घेतलं. मुग्धाला काय होतंय कळतही होतं आणि नव्हतंही. जे होतंय ते होऊ नये असं वाटत होतं आणि व्हावं असंही. तेजसने तिला अलगद उचलून बेडवर ठेवलं. त्यानंतर पुढचा एक तास तेजस आणि मुग्धा एकमेकांच्या सहवासात परमोच्च आनंदाचा अनुभव घेत होते. मुग्धाला प्रशांत गेल्यानंतर आज तृप्त वाटत होतं.

तासाभराने तेजस तिच्या कानात म्हणाला—

तेजस- आता भूक जाणवते आहे. खूप मेहनत झाली ना?

मुग्धा तृप्त पडून होती. तिच्या डोळ्यात पाणी बघून तेजस म्हणाला—

तेजस- काय झालं? का रडते आहेस?

मुग्धा- रडत नाहीये मी. तृप्त आहे.

तेजस- मग आता मस्त जेऊया आणि परत तृप्त होऊया. मला घरी पण जायचं आहे.

दोघे डायनिंग टेबलवर बसले होते. मुग्धा तेजसला आपल्या हाताने भरवत होती. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. जेवण झाल्यावर तेजसने मुग्धाला मिठी मारून तिचा निरोप घेतला.

मुग्धा- थांबा, मी पण खालीच येते आहे होळी बघायला.

दोघे निघाले. मुग्धाने त्याचा निरोप घेतला आणि ती होळीभोवती जमलेल्या गर्दीत मिसळली. तेजस त्याची गाडी सुरू करून निघून गेला.

समोर पेटलेल्या होळीकडे बघत मुग्धाला आत खूप शांत, थंड वाटत होतं. जे झालं ते चूक की बरोबर, ह्याचा विचार करण्यापलीकडचा आनंद ती अनुभवत होती. आत्ताच प्रेमाच्या वर्षावात न्हालेल्या मुग्धाला होळीची धग उबदार वाटत होती. आजूबाजूला इतके लोक असूनही मुग्धा एकटीच तिथे वावरत असल्यासारखं तिला वाटत होतं. तिला त्या एक तासातल्या ३६०० क्षणातला प्रत्येक क्षण आठवून अंगावर रोमांच उभे राहत होते. आज तिने तिची इतक्या दिवसांची कुचंबणा, अगतिकता होळीत जाळून टाकली होती. मुग्धा खूप आनंदात होती. अमेयला घेऊन ती घरी आली, तोवर बारा वाजून गेले होते.

घराचं दार उघडून आत आल्यावर तिला घरात भरून राहिलेला प्रणयाचा तो गंध जाणवला आणि अंगावर शहारा आला. बेडवर पडल्यावर अमेय दोन मिनिटांत झोपला. मुग्धा त्याच आठवणीत जागी होती. तिला तेजसचा स्पर्श, त्याने तिच्या कानात बोललेला शब्द न् शब्द आठवत होता. त्याला ती भरवत असताना त्याच्या चेहऱ्यावर दिसत असलेलं प्रेम आणि समाधान आठवून तिला खूप छान वाटत होतं. त्या आठवणीतच तिने डोळे मिटून घेतले. तिला ते क्षण डोळ्यासमोर दिसू लागले.

अचानक तिला तेजस तिच्या कानात, “मोहिनी, आज किती दिवसांनी भेटलीस!” असं म्हणाल्याचं आठवलं. तिच्या अंगावर भीतीने शहारा आला. मुग्धा दचकून उठली. तिने दिवा लावला. समोर प्रशांतचा फोटो होता. मुग्धाच्या डोक्यात विचारांचा कल्लोळ सुरू झाला!

किती वाजले हे बघायला तिने मोबाईल हातात घेतला, तर तो बंद असल्याचं तिला लक्षात आलं. तिने घाईत मोबाईल चार्जिंगला लावला आणि बाथरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले. चेहरा पुसून तिने मोबाईल सुरू केला. काही क्षणांत तिला तेजसचा मेसेज दिसला. त्यात तेजसने लिहिलं होतं—

“मी तुझी वाट बघून कंटाळून निघतो आहे. खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुझा फोन स्विच्ड ऑफ येतो आहे. प्लीज, मला कॉल कर!”

तो मेसेज वाचून मुग्धाला प्रचंड शॉक बसला. कारण रोहितने सांगितलेल्या घरी तेजसबरोबर गेल्यावर तिचा फोन बंद पडला होता. मग तेजसने मेसेज जर फोन बंद पडल्यावर केला, तर मग तिच्याबरोबर आलेला कोण होता? आणि मग अमेयला सोडवून घरी कोण आला होता?

मुग्धाच्या अंगावर आता काटा आला. तिने घाबरत तेजसला रिप्लाय लिहिला—

“हाय. तुमचा मेसेज आत्ता बघितला. पण बरं झालं आपण भेटलो ते. पण तरीही ते महत्त्वाचं बोलायचं राहून गेलं ना?”

पुढल्या क्षणी तेजसचा रिप्लाय आला—

“??? आपण कधी भेटलो? तुझा फोन दिवसभर बंद आहे. काय झालं?”

तो रिप्लाय पाहून मुग्धा प्रशांतच्या फोटोकडे बघू लागली. प्रशांतच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य असल्याचा भास तिला झाला.

इतक्यात त्यांच्या खिडकीबाहेर असलेल्या झाडावरून एक पांढरी आकृती लांब उडत जाऊन एका हॉस्पिटलच्या खिडकीवर बसली होती. त्या हॉस्पिटलच्या रूममध्ये कायमचा नपुंसक झालेला रोहित बेडवर झोपला होता. त्याला शारीरिक वेदनेपेक्षा त्या घरात मुग्धाबरोबर आलेला प्रशांत बघून बसलेला शॉक जास्त त्रास देत होता. हे कसं शक्य आहे, हा विचार त्याचा मेंदू पोखरत होता.

त्याने सहज मान वळवून खिडकीकडे पाहिलं, तर खिडकीत उभा राहून धूसर दिसणारा कोणीतरी जोरजोरात हसत होता.

पौर्णिमेचा चंद्र आकाशात आज जास्तच तेजस्वी दिसत होता!

क्रमश:

© मंदार जोग

पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग ३२)

सर्व भाग एकत्र- गुंतता हृदय – सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “गुंतता हृदय….(भाग ३१)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!